प्रति व्यक्ती खर्च: ३०० रु
प्रवासाची तारीख: २३-जून-२०१३
तोरणा किल्ल्याचा इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला.
तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. महाराजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ. स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. (सौजन्य विकिपीडिया).
![]() |
| बिन्नी दरवाजा |
प्रवास आणि ट्रेकिंगचा अनुभव
हा ट्रेक RSS (राष्ट्रीय सेवा संघ) सांताक्रूझ यांनी आयोजित केला होता. मी रात्री १०:०० वाजता वाकोला सांताक्रूझ येथे पोहोचलो. संघाने ३ बसेसची व्यवस्था केली होती. मी संघाचा सदस्य नसल्या कारणाने, संघातील काही लोकांनी मित्राला विचारून एकदा खातर जमा करून घेतली कि मला संघा सोबात यायला काही प्रॉब्लेम नाही ना? मी मित्राला सांगितलें "मला काही प्रॉब्लेम नाही, मला फक्त महाराज्यांचे गड किल्ले पाहायचे आहेत!" मी आणि माझा मित्र सुयोग असे मिळून १५० सदस्यांनी प्रवास सुरू केला. संपूर्ण प्रवासात आम्ही देशभक्ती गीते आणि पोवाडे गात होतो, उत्साही वातावरण असल्या कारणाने झोप काही आली नाही. सकाळी ६.०० च्या सुमारास आम्ही तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावात पोहोचलो.
बसमधून उतरत्याच क्षणी माझ्या बालिश मेंदूच्या इंद्रियांच्या संकेतानुसार, मी ३६० अंशात माझी नजर फिरवून तोरणा गड कुठे दिसतो का पाहायला सुरवात केली 😂. गड काही दिसला नाही, मला वाटले असेल इथेच कुठेतरी जवळ पास. वेल्हे गावात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे ह्यांचे सुंदर पुतळे आहेत, त्यांचे फोट काढले आणि आम्ही सर्वजण जवळच्याच एका हॉटेलात न्ह्यारी करायला पोहचलो. पोट भरून मिसळपाव खाल्ली आणि सकाळी ७:०० च्या सुमारास ट्रेकला सुरुवात केली. सर्वांसोबत मीही उत्साहात ट्रेकला सुरवात केली. चालत असतानाच एका सदस्याच्या हातात, दोरखंड दिसला. ह्या दोराचा उपयोग कशासाठी होणार हे मला ठाऊक नव्हते. काही मिनिटे चालल्यानंतर आम्हाला एक नैसर्गिक ओढ्यावर कृत्रिम बनवलेला धबधबा दिसला, काही मिनिटे धबदब्या जवळ घालवली आणि गडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. पावसाळ्यामुळे ढग खूप खाली आले होते, डोंगरमाथा ढगांनी झाकला गेला होता, त्यामुळे आपल्याला अजून किती अंतर चालायचे आहे याचा अंदाज मांडणे कठीण जात होते. पण ही गोष्ट माझ्या पथ्यावर पडली होती, गड फार उंचावर नसेल असेच समजून मी चालत राहिलो.
![]() |
| वेल्हे गावातील छत्रपती शिवाजी महाराज्यांचा पुतळा |
बसमधून उतरत्याच क्षणी माझ्या बालिश मेंदूच्या इंद्रियांच्या संकेतानुसार, मी ३६० अंशात माझी नजर फिरवून तोरणा गड कुठे दिसतो का पाहायला सुरवात केली 😂. गड काही दिसला नाही, मला वाटले असेल इथेच कुठेतरी जवळ पास. वेल्हे गावात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे ह्यांचे सुंदर पुतळे आहेत, त्यांचे फोट काढले आणि आम्ही सर्वजण जवळच्याच एका हॉटेलात न्ह्यारी करायला पोहचलो. पोट भरून मिसळपाव खाल्ली आणि सकाळी ७:०० च्या सुमारास ट्रेकला सुरुवात केली. सर्वांसोबत मीही उत्साहात ट्रेकला सुरवात केली. चालत असतानाच एका सदस्याच्या हातात, दोरखंड दिसला. ह्या दोराचा उपयोग कशासाठी होणार हे मला ठाऊक नव्हते. काही मिनिटे चालल्यानंतर आम्हाला एक नैसर्गिक ओढ्यावर कृत्रिम बनवलेला धबधबा दिसला, काही मिनिटे धबदब्या जवळ घालवली आणि गडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. पावसाळ्यामुळे ढग खूप खाली आले होते, डोंगरमाथा ढगांनी झाकला गेला होता, त्यामुळे आपल्याला अजून किती अंतर चालायचे आहे याचा अंदाज मांडणे कठीण जात होते. पण ही गोष्ट माझ्या पथ्यावर पडली होती, गड फार उंचावर नसेल असेच समजून मी चालत राहिलो.
![]() |
| कृत्रिम धबधबा |
![]() |
| सुंदर जंगल |
बहुतांश सदस्य पुढे गेले होते, माझा हा पहिलाच ट्रेक असल्या कारणाने थकायला होत होते. नागमोडी पायवाटेवर चालत असलेली माणसांची रांग जणू मुंग्याच्या रांगे प्रमाणे भासत होती. मी अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत थकलो होतो, मित्राला विचारले असता, त्याने सांगितले "थोडेशेच अंतर बाकी आहे मग पोहचू आपण" असे सांगत मला प्रोत्साहन दिले. तासभर चालल्यानंतर एक डोंगर पार झाला आणि दोन डोंगरांना जोडणाऱ्या वाटेवर आम्ही पोहचलो. तिथे वाऱ्याचा जोर इतका होता कि जणू आम्ही हवेत उडून जातो कीकाय असे वाटू लागले. अंदाजे दोन तास चालल्यानंतर आम्ही एका रॉक पॅच जवळ पोहचलो, अंदाजे १० ते १२ फूट उंच असेल. डिसकवरी चॅनेल वरील "मॅन वर्सेस वाईल्ड" ह्या मालिकेतील "बेयर गिल्स" ह्याचे अनुकरण करून रॉक पॅचवर चढाई करण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वीपणे रॉक पॅचवर चढलो, पण परतीच्या वेळेस हा रॉक पॅच कसा उतरायचे हे "बेयर गिल्स" ने आम्हाला सांगितले नव्हते 😁 (अभिमन्यूला जसे चक्र्यूह भेदून आत जायचे ज्ञान होते पण, चक्रवहिवातून बाहेर पडायचे ज्ञान नव्हते, अशीच परिस्तिथी माझी काहीशी झाली होती).
अंदाजे दोन तास झाले होते आम्ही चालत होतो, सकाळचे ९:३० वाजेल असतील. मी सहज नजर वर फिरवली असता, गडाची तटबंदी दिसली आणि तोंड उघडे ठेऊन पाहतच राहिलो. ह्या क्षणी माझा बालिश मेंदू प्रौढ झाला! माझे सगळे अंदाज चुकले होते. एवढ्या उंचावर असणाऱ्या गडावर महाराज आणि त्यांचे मावळे जड शस्त्र घेऊन कसे चढले असतील आणि नुसते चढायचे नाही तर गनिमाशी लढून गड जिंकायचा पण! ह्याचाच विचार करू लागलो. स्वतःलाच स्वतःची लाज वाटू लागली. केलेल्या बालिश विचाराची मनोमन महाराज्यांची आणि मावळ्यांची क्षमा मागून गडाच्या दिशेने चालायला सुरवात केली.
![]() |
| डोंगरावरून दिसणारे दृश्य |
![]() |
| डोंगरावरून दिसणारे दृश्य |
अजून एक तास चालून, अंदाजे १०:३० च्या सुमारास आम्ही बिन्नी दरवाजा जवळ पोहोचलो. नतमस्तक होत आत प्रवेश केला. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस काही छोटी मंदिरे आहेत. थोडे पुढे चालत गेल्यावर पाण्याचे एक मोठे टाके दिसले, या टाक्याच्या मागच्या बाजूस मेघाई देवीचे मंदिर आहे. मंदिरात जाऊन मेघाई देवीचा आशीर्वाद घेतला. मंदिराच्या डाव्या बाजूने चालत पुढे गेलो आणि कोकण दरवाज्या जवळ पोहचलो. ह्या दरवाज्यातून जाणारी वाट कोकणात उतरते म्हणून कोकण दरवाजा म्हणतात. मेघाई देवीच्या मंदिराच्या उजव्या बाजूने पुढे गेल्यास बुधलामाची लागते, पण दाट धुके असल्या कारणाने तिथे जाणे टाळले.
![]() |
| कोकण दरवाजाकडे जाणारी वाट |
![]() |
| कोकण दरवाजा |
गडावरचे जमतील तितके वास्तू पाहून झाल्यावर, एका पडक्या वाड्याचे संवर्धनाचे काम चालू असल्याचे दिसले, तिथे वेवस्थित सर्वांना उभे राहण्याची जागा होती. सर्वजण एकत्रित आले आणि ध्वजवंदन केले. हिन्दवी स्वराज्याचा भगवा ध्वज डवलाने फडकू लागला! ध्वजवंदन झाल्यावर एका सदस्याने गडाचा इतिहास व छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पराक्रमाची गाथा सांगितली. सर्वात शेवटी राष्ट्रीय गीत गायले आणि परतीच्या प्रवासाला सुरवात केली. परतीच्या प्रवासाला सुरवात केली तेव्हा अंदाजे १२:०० वाजले होते. काही अंतर पुढे गेल्यावर वाटेतील एका धबधब्यावर थोडा वेळ घालवला आणि पुन्हा उतरायला सुरवात केली.
![]() |
| धबधबा |
आम्ही पुन्हा त्या रॉक पॅच जवळ पोहचलो, हा रॉक पॅच उतरायचा कास हे "बेयर गिल्स" ने सांगितले नसल्या कारणाने माझे वांदे झाले होते 😅. पण ब्लॉगच्या सुरवातीला सांगितल्या प्रमाणे, मी एका सदस्याच्या हातात दोर पहिला होता, त्याच दोराचा उपयोग इथे केला आणि सर्व सदस्यांना सुखरूप खाली उतरवले. खाली उतरताना पाय थरथरू लागले होते, इतक्यात एका सदस्याने पाय धरून ओढला आणि दगडाच्या खचित अडकवला आणि मला खाली उतरवले. सुटकेचा श्वास घेतला आणि पुन्हा खाली उतरायला सुरु केले. पावसामुळे माती चिकट आणि निसरडी झाली होती, म्हणून काही ठिकाणे खाली बसूनच उतरावे लागत होते. असेच खाली बसून उतरत असताना, माझ्या मागून येणाऱ्या दोन लहान मुलांपैकी केला मुलाने चुकून माझ्या बोटांवर पाय ठेवला, त्या मुलाने पटकन "सॉरी" बोलले पण, त्यातील एक मुलगा पटकन म्हणाला "शाहिस्त्य खानाची बोट तुटली!" मी माझे दुखणे विसरून हसू लागलो. अशी मजा मस्ती करत आम्ही अंदाजे २:०० वाजे पर्यंत पायथयशी असलेल्या वेल्हे गावात पोहचलो. सकाळी ज्या हॉटेल मध्ये न्ह्यारी केली होती तिथेच दुपारचे जेवण केले आणि सायंकाळी ४:०० च्या दरम्यान मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला. मुंबई पुणे मार्गावर ट्राफिक असल्या कारणाने मुंबईला पोचायला उशीर झाला. अंदाजे रात्री ११:०० वाजता आम्ही मुंबईला पोहचलो.
पावसाळी ढगांमुळे गड पूर्ण पाहता आला नाही ह्याची खंत राहील, पुन्हा कधीतरी येऊन पूर्ण गड पाहायचा असे ठरवले होते. पाहू पुन्हा केव्हा योग येतो तोरणा गडाला भेट देण्याचा. मित्र सुयोग खुडे आणि संघाच्या सर्व सदस्यांना खूप खूप आभार, त्याच्या मुळे मला तोरणा गड पाहता आला 🙏.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
पाण्याचे टाके
मेघाई देवी मंदिर
बुधला माची
बिन्नी दरवाजा
चिलखती बुरुज
कोकण दरवाजा
हनुमान बुरुज















