भीमाशंकर ट्रेक - गणेश घाट


प्रवासाची तारीख: ५-नोव्हेंबर-२०२४
वाहतुकीची पद्धत: ट्रेन आणि रिक्षा


प्रवासवर्णन

     २०१५ साली आई वडिलांसोबत भीमाशंकर महादेवाचे दर्शन घेतले होते, पण जंगलातून पायपीट (ट्रेक) करत जायची मजा औरच! खांडस गावातून भीमाशंकरला जाण्याकरिता अनेक मार्ग आहेत, त्यातील मुख्य दोन मार्ग, पहिला - शिडी घाट आणि दुसरा - गणपती (गणेश) घाट. भीमाशंकर ट्रेकची मजा पावसात तेही रात्री, कारण या जंगलात चमकणारी शेवाळ आढळते. पण मागील २-३ वर्षात ढगफुटी सदृश्य होणाऱ्या पावसामुळे, आम्ही पावसाळी ट्रेक टाळत आहोत.

    सहकर्मी संतोषराज करंडे आणि अमेय विपट यांच्यासोबत भीमाशंकर ट्रेक करायचा असे ठरले. २२ ते २५ ऑक्टोबर अशी तारीख ठरली, २२ ला भीमाशंकर ट्रेक करून २३ ला आराम आणि २४ ला संतोषराज यांच्या गावा शेजारील असणारे महाराष्ट्रातील शिखरांपैकी एक शिंगेरी ट्रेक करायचा असे ठरले होते, पण काही कारणास्तव ही योजना रद्द करावी लागली. मग पुन्हा एकदा योजना आखली आणि ५ नोव्हेंबर ला जायायचे ठरवले, पण यावेळी फक्त भीमाशंकर ट्रेक करायचा असे ठरले. गूगल आणि यूट्यूब वरून भीमाशंकर ट्रेकची माहिती काढली. यूट्यूब वरून मिळालेल्या नंबर द्वारे ऑटो रिक्षा ठरवली ६०० रुपये असे भाडे ठरले. सकाळी ७:०० ची डेक्कन एक्सप्रेस पकडायची असे ठरले. ५ नोव्हेंबरला मी सकाळी ४:३० ला उठून तयार झालो, माझ्यासोबत माझी आई सुद्धा उठली आणि तिने सकाळ सकाळी आंबोळ्या आणि चटणी डब्याला बनवून दिली, कारण भीमाशंकर ट्रेक हा ५ - ६ तासांचा आहे. सकाळी ६:४० ला दादरला पोहचलो. बॅगेत पाणी बाटली व जेवनाचये डब्बे असल्या कारणाने वजन बरेच वाढले होते. फलाटावरील असलेल्या एका आसनावर जाऊन बसलो आणि ट्रेनची वाट पाहू लागलो. नेहमी प्रमाणेच भारतीय रेल्वेने आपला गुण धर्म दाखवला ७:११ ला दादर ला येणारी डेक्कन एक्सप्रेस २० मिनिटे उशीरा म्हणजे ७:३१ ला आली.


भीमाशंकर मंदिराचे शिखर
भीमाशंकर मंदिराचे शिखर

    संतोषराजने ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुन पकडली होती, मी दादर हून आणि अमेयने ठाणे हून. आरक्षण नसल्या कारणाने नेरळ पर्यंतचा प्रवास जनरल डब्यातून केला, पण आम्हाला बसण्याकरिता आसन मिळाले होते. ८:४५ च्या दरम्यान आम्ही नेरळला पोहचलो आणि ठरवलेल्या रिक्षा चालकाला फोने करून बोलावले (समीर तरे : ८५५२०१२५१०). आमचा प्रवास खांडस गावाच्या दिशेने सुरु झाला. रिक्षा चालक समीर बऱ्यापैकी बोलका होता त्यामुळे त्याचाशी गप्पा मारत प्रवास चालू होता. ३० -३५ मिनिटात आम्ही कशेला (कशेले) या गावी पोहचलो. तेथील तिट्या वरील बाजारपेठेत आम्ही चहा नाश्ता केला आणि सोबत जास्तीचे पाणी बाटल्या घेतल्या आणि पुन्हा निघालो खांडसच्या दिशेने. अंदाजे सकाळी ९:५० च्या दरम्यान आम्ही भीमाशंकर ट्रेक गणेश घाटाच्या सुरवातीच्या पॉईंट वर पोहचलो. रिक्षा चालक समीर याला त्याचे भाडे दिले आणि थोडा वेळ पाय मोकळे करून ट्रेकला सुरवात केली. 

टीप : खांडस गावात नेटवर्क नसल्याने ऑनलाईन पेमेंट होत नाही, म्हणून गाडी भाडे देण्या करीत सोबत कॅश घ्यावी. कर्जतहून कशेला गावी राज्य परिवहन मंडळाच्या बसने पोहचून खांडस करीत शेयर रिक्षा मिळतात, पण आम्हाला वेळ आणि होणारी दगदग वाचवायची होती म्हणून नेरळहून रिक्षाचे बुकिंग केले.

    सकाळी १०:०० वाजता ट्रेकला सुरवात केली. अंदाजे ३५ ते ४० मिनटात आम्ही गणपती मंदिराजवळ पोहचलो. गणपती बाप्पाचे दर्शन घेतले, सोबत आणलेला खाऊ खाऊन ,थोडावेळ आराम केला आणि ११:०० वाजता पुन्हा ट्रेकला सुरवात केली. (गणपती मंदिरा मुळे या वाटेला गणपती वाट / घाट असे नाव पडले आहे). गणेश घाटाच्या मानाने शिडी घाटाने भीमाशंकरला लवकर पोहचता येते, पण शिडी घाटातील काही टप्पे अवघड आहेत व छोटीशी चूक जीवावर बेतणारी आहे आणि या घाटातील लावलेली शिडी सुद्धा काही वर्षांपूर्वी तुटली आहे. म्हणून पदरवाडीला वळसा घालून जाणारी वाट म्हणजे, गणेश घाटाच्या वाटेने जायायचे सोयीस्कर वाटले. पुन्हा ट्रेकला सुरवात केली खरी पण, दोन वाटा असल्या कारणाने आम्ही डावीकडच्या वाटेने पुढे निघालो, पण मनात शंका होती म्हणून दुर्ग नॅव्हिगेशन ऍपच्या मदतीने उजवीकडील जाणाऱ्या योग्य वाटेवर आलो. 

👉 दुर्ग नॅव्हिगेशन ऍप प्लेस्टोरवरून डाउनलोड करा


गणेश मंदिरातील फोटो, संतोषराज अमेय, प्रथमेश.
गणेश मंदिरातील फोटो, संतोषराज अमेय, प्रथमेश.

    गणपती मंदिराकडून निघाल्या पासून अवघ्या ३० मिनटात, अंदाजे ११:३० ला आम्ही वन विभागाच्या चौकी जवळ पोहचलो. तेथील उपस्तिथ असणाऱ्या तरुण कर्मचाऱ्यांशी गप्पा गोष्टी केल्या आणि वन विभागाचा प्रवेश कर भरला आणि पुढे निघालो. जस जसे पुढे जात होतो तस तसे पदरगडाच्या जवळ पोहचत होतो. पदरगडावर जावे असे वाटत होते पण गड माथ्यावर जाण्या करीत करावी लागणारी चिमणी क्लाइम्बिंग आठवली आणि मोहाला आवर घातला. सूर्यनारायण माथ्यावर आल्या करणारे ऊन लागू लागले व सततच्या ४० मिनिटे चालण्याने थकायलाही झाले होते. ११:४० च्या दरम्यान आम्ही क्षणभर विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला व एका झाडाच्या सावलीत जाऊन बसलो. संतोषराजने सोबत लिंब आणली होती त्याचे लिंबू शरबत बनवून प्यालो आणि तरतरीत झालो. 

लिंबू शरबत एक्स्पर्ट
लिंबू शरबत एक्स्पर्ट 😀

    पदरगडासोबत सेल्फी काढले आणि पुन्हा ट्रेकला सुरवात केली, यावेळी जास्तीत जास्त अंतर कापायचे असे ठरवले होते. दुर्ग नॅव्हिगेशन ऍपची मदद वेळोवेळी घेतच होतो आणि त्यात दिलेली पॉईंट्स नुसार केव्हा विश्रांती घेयायची हेही ठरवत होतो. यावेळी चालण्याचा वेगही थोडा वाढवला होता. घनदाट जंगलातून जाणारी वाट, निरव शांतता आणि अधून मधून येणारे पशु पक्षयांचे आवाजाने मन शांत झाले. मुंबईची दगदग आणि टेन्शन सर्व काही विसरून गेलो. आठवड्याच्या मधल्याच दिवसात ट्रेक करत असल्या कारणाने, इतर पर्यटकांची लगबग नव्हती, जंगलात फक्त आम्हीच, थोडीशी भीती वाटत होती, पण एक चांगली गोष्ट होती ती म्हणजे पूर्ण ट्रेक मध्ये मोबाइलला नेटवर्क होते! चालत असताना, पाण्याचा झरा दिसला. झऱ्यातून येणारे पाणी, बाटली मध्ये भरता यावे म्हणू कुणीतरी सजननाने तिथे प्लास्टिकचा पाईप अडकवला होता. आमच्या पाण्याच्या बाटल्या अर्ध्या झाल्या होत्या, भरून घ्यावे म्हणू जात होतो. इतक्यात आठवले वनविभागाच्या अधिकारी बोलले होते, पुढे विहीर खोदली आहे. म्हणून विचार केला पुढे जाऊन विहीरचेच पाणी भारुया. काही अंतर पुढे गेलो आणि अमेयचा लक्ष घोरपडीच्या पिल्लू कडे गेले. आमच्या पासून अंदाजे ४०-५० मीटरच्या अनंतराव घोरपड असावी, पायवाट ओलांडून पलीकडच्या बाजूस, झाडीत गुडूप झाली. शंभर एक मीटर पुढे गेलो आणि दोन डोंगरांच्या बेचक्यात आलो. खालच्या बाजूस असणारे कोकणातील जंगल खोरे आणि भीमाशंकर डोंगराची कडा, दिसायला जितके सुंदर तितकेच भयावह, अश्या जंगलात कुणी वाट चुकला किव्हा दरीत तोल जाऊन पडला तर त्याला शोधणे कठीण.. काही फोटो काढले आणि पुढे निघालो.

पदरगड सोबत सेल्फी
पदरगड सोबत सेल्फी 
 
पॅनोरमा, खाली बाजूस कोकणातील खोरे आणि भीमाशंकर डोंगर
पॅनोरमा, खाली बाजूस कोकणातील खोरे आणि भीमाशंकर डोंगर 

   काही अंतर पुढे गेलो आणि विहीर निदर्शनास पडली, बाटलीत पाणी भरण्या करीत आम्ही पुढे सरसावलो खरे, पण विहिरीतले पाणी पाहून मन निराश झाले. पाण्यावर शेवाळ तयार झाले होते, तर काही पर्यटकांनी विहिरीत प्लास्टिकचा कचरा टाकला होता. जोवर पुढे कुठे पाण्याचा स्रोत मिळत नाही तोवर, आमच्या जवळ असलेल्या पाण्यातच भागवायचे होते. यातून एक गोष्ट शिकण्यासारखी होती, जेव्हापण स्वच्छ पाणी दिसेल तेव्हा बाटल्या भरून घ्या, पुढे भरू किव्हा नंतर भरू असे केल्यास फजिती होते. दोन डोंगरांच्या बेचक्यातील धबधबा ओलांडून (धबधबयाला पाणी नव्हते). पलीकडच्या डोंगरावर गेलो. डोंगराच्या कडेने असणाऱ्या वाटेने पुढे चालत राहिलो. नुकताच पावसाळा संपला असल्या कारणाने, बऱ्याच ठिकाणे वाटेत चिखल होता आणि त्या चिखलात खेकडे होते. मन कारत होते, एक एक पकडून ब्यागेत भरायचे पण तितका वेळ नव्हता. पुढे चलात राहिलो आणि अंदाजे ५० मिनिटात म्हणजे १२:३० वाजता आम्ही पदरगड वाडीत पोहचलो. भूक लागली होती आणि पुडील टप्पा थोडासा अवघड असल्या कारणाने थोडी विश्रांती आणि भोजन करणे गरजेचे होते. गावकर्यांनी पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी विश्रांती व लिंबू सरबतच्या सोयी करीत शेड बांधली होती. त्या शेड मध्ये बसून आईने बनवून दिलेल्या आंबोळ्या आणि खोबऱ्याची चटणी खाल्ली आणि थोडा वेळ आराम केला. तेथे आराम करत असतेवेळी, काही वृद्ध इसम डोंगरातून खाली उतरत आले. त्यांना विचारले असता त्यांने सांगितले ते भीमाशंकर महादेवाचे दर्शन घेऊन आले, सकाळीच निघाले होते. ह्या वयात आजी आजोबा डोंगर चालून गेले हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. बाबांना विचारले अजून किती चालावे लागेल? किती वेळ लागेल? ते म्हणाले ४०-४५ मिनिटे लागतील, हे आकडे त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रवासानुसार सांगितले, पण आमच्यासाठी परिस्तिथी वेगळी होती. समोर दिसणारा डोंगर पाहून आम्हाला जाणवले होते की थोडी कसरत कारवी लागणार, पण बाबांनी सांगितलेल्या आकडे एकूण थोडा हुरूप आला. 

भीमाशंकर जंगल
भीमाशंकर जंगल

निघण्या पूर्वी, इतर विधीं करिता योग्य जागा शोधत होतो, सार्वजनिक मुतारी होती पण पाणी नव्हते व दुर्गंधी फार होती, म्हणून जंगलातच जायचे ठरविले. मागच्या बाजूस गेलो असता तेथील प्लास्टिक बदल्यांचा पडलेला खच पाहून दुःख झाले. आपण स्वतःला सुशिक्षित समजतो, पण खरंच आपण सुशिक्षित आहोत का? घेतलेल्या शिक्षणाने डिग्री तर मिळाली पण अक्कल मात्र शून्यच राहिली. रिकामी झालेली बाटली ब्यागेत टाकून शहरातील कचराकुंडीत टाकण्या इतकी सुद्धा तसदी पर्यटक वर्ग घेत नाही. यात दोष फक्त पर्यटकांचाच नाही तर तेथील गावकरी व वनविभागातील अधिकाऱ्यांचाही आहे. भरलेल्या बाटल्या दूरवर जंगलात घेऊन येऊशकता मग रिकाम्या बाटल्या जंगला बाहेर नेऊन टाकणे काही कठीण काम नसावे.


    अंदाजे दुपारी १:२५ च्या सुमारास आम्ही शेवटचा टप्पा पार करायला सुरवात केली, बाबांनी सांगितलेले आकडे आमच्यासाठी तर खोटे ठरले होते. कारण खडा चड चढताना धाप लागत होती, प्रत्येक ८-१० दहा पावलांवर आम्हाला विश्रांती करिता थांबावे लागत होते. हा खडा चड अंगातली रग जिरवणारा होता. संतोषने बनवलेल्या लिंबू सरबत आणि इलेकट्रोल पावडरचे मिश्रित पाणी पिऊन शरीरातली ऊर्जा वाढवत होतो. विश्रांती करत करत पुढे जात होतो, सूर्यास्त होण्या आधी डोंगर पार करण्याचे आव्हान आमच्या समोर होते, कारण प्रत्येक ८-१० पावलांवर विश्रांती करावी लागत असल्या कारणाने वेळ वाया जात होता. काही अंतर पुढे गेल्यावर संतोषला त्याच्या ट्रेकिंग स्टिकची आठवण झाली. आम्ही तिघेही एकमेकांच्या हाताकडे पाहू लागलो, तेव्हा लक्षात आले कि, ट्रेकिंग स्टिक खालीच विसरलो आहोत. ज्या जागी आम्ही लिंबू सरबत बनवले त्याच ठिकाणे विसरलो. पुन्हा माघारी जाऊन ट्रेकिंग स्टिक आणणे शक्य नव्हते, मग काय ट्रेकिंग स्टिक वर पाणी सोडले आणि पुढे चालायला सुरवात केली.   

भीमाशंकर डोंगरावरून दिसणारा पदरगड
भीमाशंकर डोंगरावरून दिसणारा पदरगड

निसर्गाचे डेकोरेशन
निसर्गाचे डेकोरेशन 

    डोंगराच्या कडेने चालत असताना, खडकावर पाणी पडून गारगोटी (क्रिस्टल) तयार झालेले नजरेस पडले आणि भान हरपले. अमेयला ते दाखवण्याकरिता पुढे गेलो आणि तोल गेला, वेळीच तोल सावरला असल्या कारणाने दरीत पडून अपघात होता होता राहिला. काही क्षणाकरिता अमेय सुद्धा घाबरला आणि ओरडला होता. घडला प्रकाराबद्दल संतोषराजला कल्पना नव्हती कारण तो आमच्यापासून बराच पुढे होता. गारगोटीचा नाद सोडला आणि सावधगिरी बाळगत पुढे चालत राहिलो. विरुद्ध दिशेने काही मंडळी येताना दिसली, ते महादेवाचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर होते. संतोषराजने त्यांना ट्रेकिंग स्टिक विसरलेल्या ठिकाणाची माहिती दिली आणि ट्रेकिंग स्टिक सापडली तर त्यांनाच ठेवायला सांगितली. काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला काही इमारती वर कुंपण दिसू लागेल, भले ते आमच्या पासून बरेच दूर होत पण मनाला दिलासा देणारे होते कि, मंदिर आता जास्त दूर नाही. थोडावेळ विश्रांती केली आणि पुन्हा चालायला सुरवात केली. अवघ्या ५ - १० मिनिटात आम्ही तलावाजवळ पोहचलो, काही अंतर पुढे चालत गेल्यावर भीमाशंकराच्या पठारावर पोहचलो. सकाळी ११:०० ला चालू केलेला ट्रेक सायंकाळी ४:०० ला पूर्ण झाला होता, एकूण ५ तास लागले आमहाला. आजवर मी केलेल्या ट्रेकिंग मधील हा सर्वात मोठा ट्रेक होता. 

सह्याद्रीतील रानफुल
सह्याद्रीतील रानफुल 

भीमाशंकर ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यातील दिशादर्शक फलक
भीमाशंकर ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यातील दिशादर्शक फलक
    आमच्याकडील पाण्याचा साठा संपला होता, कोरडा झालेल्या घश्याला ओला करण्या करीत बाजारातील एका दुकानातून लिंबू सरबत प्यालो, पण तहान काही भागली नाही, म्हणून प्रत्येकी अजून दोन दोन ग्लास लिंबू सरबत प्यालो. गुप्त भीमाशंकर आणि नागफणी करायची इच्छा होती, पण अंगात त्राण उरले नव्हते आणि उशिरही खूप झाला होता. तसेच, संतोषराज यांची परिवार मंडळी भीमबाशंकर महादेवाच्या दर्शनाला येणार होती. काही वेळ त्यांची वाट पहिली, ते आल्यावर आम्ही सर्वजण महादेवाच्या दर्शनाला गेलो. अंदाजे १ किलोमीटर खाली उतरून चालत जायचे होते आणि पुन्हा तेवढेच चालून वर येयायचे होते. एवढी मेहनत केलीच होती तर आजू थोडी मेहनत करू महादेवाच्या दर्शनासाठी 😁. अंदाजे सायंकाळी ६:२० च्या दरम्यान महादेवाचे दर्शन झाले.

सेल्फी - संतोषराज, प्रथमेश, अमेय
सेल्फी - संतोषराज, प्रथमेश, अमेय

    दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आलो. मंदिरपरिसात लावलेली एक मोठी घंटा दिसली. या घंटेचे ऐतिहासिक महत्व म्हणजे, ही घंटा चिमाजी अप्पा यांनी वसई किल्ला जिंकल्यावर तेथील चर्च मधील घंटा येथे आणून लावली. इस्लामी आक्रमणात पुरातन मंदिर नष्ट झाले, सध्याचे असलेले मंदिर सुंदर व प्रशस्त असले तरी, मंदिराच्या भिंतींवरील कला कुसर व नक्षी काम पुरातन मंदिरा इतके सुंदर नव्हती. एकविसाव्या शतकातील आधुनि अवजारांनी देखील आजच्या पिढीला मूर्तीतील नाजूकता व सुंदरता दाखवता येत नाही. दगडांवर नक्षी काम करण्याची कला बऱ्यापैकी लुप्त झाली असे म्हणायला हरकत नाही.

ऐतिहासिक घंटा
ऐतिहासिक घंटा 

    आम्ही सर्व पुन्हा बाजारात आलो आणि चहा पिऊन तरतरीत झालो. आमचा आजचा मुक्काम संतोषराजच्या गावच्या घरी होता. रात्री ८:०० च्या सुमारास आम्ही प्रायव्हेट गाडीने पईट गावातील करंडे वाडीत पोहचलो आणि एका गोष्टीचा उलगडा झाला संतोषराज याचे आडनाव कारंडे नसून करंडे आहे 😃. गरम पाण्याने अंघोळ करून फ्रेश झालो आणि भोजन करून टेरेस वर गेलो. दिवाळीचा सण असल्याकारणाने संतोषराज ने त्याच्या मुलासाठी (शिवांश) फटाके आणले होते. शिवांश पहिल्यांदाच फटाके फोडत असल्या कारणाने घाबरत होता, त्याला पाहून मलाही माझ्या बालपणाची आठवण झाली. फटाके फोडून झाल्यावर आम्ही सर्वजण झोपायला गेलो. झोपण्या आधी संतोषराजने आम्हाला सांगितले की टेरेस वरून सूर्योदय होताना दिसतो, पाहायचा असेल तर सकाळी लवकर उठा. आता एवढा ट्रेक करून आल्यावर सकाळी कसले लवकर उठतोय, तरीसुद्धा सकाळी ५:३० चा गजर लावून झोपलो 😁. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही दोघे अमेय आणि मी ५:३० चा गजर होण्या आधीच उठलो होतो. ६:०० वाजता टेरेस वर जाऊन बसलो. सूर्योदय पाहिला, टाइमल्याप्स काढला आणि थोडा वेळ कोवळ्या उन्हात उभे राहून व्हिटॅमिन डी खाल्ल 😃.  घराच्या डाव्या बाजूस दिसणाऱ्या कोंडेश्वर डोंगरावर जाऊन कोंडेश्वर महादेवाचे दर्शन घेयायचे होते. वर गाडीने जाता येते पण आम्हाला पायी (ट्रेक) करत जायचे होते, पण पुरेसा वेळ नसल्याकारणाने बेत रद्द केला. 

कारंडे वाडीतून दिसणारा सूर्योदय - क्रेडिट अमेय (आयफोन १४)
कारंडे वाडीतून दिसणारा सूर्योदय - क्रेडिट अमेय (आयफोन १४)

कारंडे वाडीतून दिसणारा सूर्योदय - क्रेडिट अमेय (आयफोन १४)
कारंडे वाडीतून दिसणारा सूर्योदय - क्रेडिट अमेय (आयफोन १४)

    अंघोळ करून फ्रेश झालो, चहा आणि फराळ खाऊन, शेतात फिरायला गेलो. शेतातील लिंबाच्या झाडाला लागलेली लिंब काढली आणि घरी आलो. चहा आणि कांदे पोहे व अनारसे खाल्ले आणि पुन्हा निघालो शेजारील असलेल्या संतोषी मातेच्या मंदिरात. आईचे दर्शन घेतले आणि घराच्या मागच्या बाजूस असलेल्या शेतात बोरिंगचे पाणी सोडण्या करीत संतोषराज आणि त्याच्या बाबांसोबत गेलो. थोडा वेळ तिथे घालवला, शेजारी असलेल्या चिंचेच्या झाडावरील चिंच काढली आणि घरी आलो. ब्यागा भरल्या आणि तयार झालो कारण दुपारी २ वाजता मुंबईला जाण्या करीत गाडी येणार होती. दुपारच्या जेवणात गावठी खेकड्यांच सार होते. मस्त पैकी ताव मारला, आणि निघालो मुंबईला.

खर्चाचा तपशील 


टीप: न्ह्यारी व जेवणाचा खर्च वागला आहे. तसेच परतीचा प्रवास पईट गावातून केला असल्या कारणाने, खर्च समाविष्ट केलेला नाही. 



वेळेचा तपशील