घारापुरी - एलिफॅन्टा लेण्या



प्रवासाची तारीख : १९ एप्रिल २०२२
प्रवासाची पद्धत : ट्रेन, बस, बोट 


सार्वजनिक वाहतुकीने कसे पोहोचायचे

  •  मुंबई, पुणे, नाशिक किंवा देशातील इतरत्र कोणत्याही ठिकाणावरून तुम्हाला घारापुरी - एलिफंटा लेण्या पाहायला जायचे असल्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वात जवळचे स्थानक आहे.  
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरून तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया करिता टॅक्सी मिळतील किंवा दक्षिण दिशेस पाच मिनिटे चालून गेल्यास बस डेपो आहे तिथून १११ नंबरची बस गेटवे ऑफ इंडियाला जाते.  
  • गेटवे ऑफ इंडियाच्या मागच्या बाजूने  घारापुरीला जाण्याकरिता होड्या सुटतात.
  • बोटीने घारापुरीला जाण्यास ४५ ते ६० मिनिटे लागतात

👉 खर्चाचा व वेळेचा तपशील पहा 

👉 महत्वाच्या सूचना




प्रवासवर्ण


    लहानपणापासून मी एलिफंटा लेण्यांबद्दल ऐकत होतो, त्यामुळे त्या पाहण्याची उत्सुकता होती. यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना, एलिफेंटा लेण्यांशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला. व्हिडीओ पाहिल्यानंतर मी भेट देण्याचे ठरविले. गुगलच्या मदतीने मी प्रवासाची योजना आखली आणि माझे मित्र कौशल आणि विनायक यांच्याशी चर्चा केली. दोघांनाही घारापुरी लेण्या पाहण्याची कल्पना आवडली आणि १९ एप्रिल ही तारीख सुनिश्चित केली. 

घारापुरी येथील प्रसिद्ध  त्रिमूर्ती शिल्प
घारापुरी येथील प्रसिद्ध  त्रिमूर्ती शिल्प
 
   १९ तारखेला सकाळी ८:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सर्वांनी भेटायचे असे ठरविले, म्हणून सकाळी ६:३० वाजता गोरेगाव हून निघालो पण गोरेगाव स्थानकावरील फलाटांचे क्रमांक बदलल्या कारणाने,  मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ट्रेन पकडण्याऐवजी चर्चगेटला जाणारी ट्रेन पकडली आणि सर्व गोंधळ झाला! मग काय मी बांद्राला उतरलो आणि ट्रेन बदलली, यामुळे पोहचायला वीस ते पंचवीस मिनिटांचा उशीर झाला.  नेहमी उशिरा येणारा कौशल मात्र आज वेळेवर पोहोचून माझी आणि विनायकची प्रतीक्षा करत उभा होता.  मी ८:४० च्या दरम्यान सी.एस.एम.टी स्टेशन ला पोहोचलो,  तर माझ्या मागोमाग अवघ्या दहा-पंधरा मिनिटांनी विनायकही तिथे हजर झाला. आम्ही तिघे सी.एस.एम.टी स्टेशन बाहेर आलो आणि दहा मिनिटे चालत बस स्थानक जवळ पोहोचलो १११ नंबरची बस पकडून आम्ही गेटवे ऑफ इंडिया जवळ उतरलो. गेटवे ऑफ इंडिया पाहत आणि त्याचे फोटो काढत काही वेळ घालवला, गेटवे ऑफ इंडिया जवळ गेल्यावर सेल्फी काढण्याचा मोह काही आवरत नाही सेल्फी तर काढलेच पण  तिथे इन्स्टंट फोटो काढून देणाऱ्या काकांकडून एक आठवण म्हणून तिघांनी सोबत फोटो काढला. इतक्यात विनायकला त्याच्या ऑफिस मधून त्याच्या सहकर्मीचा फोन आला आणि विनायक वीस ते पंचवीस मिनिटांसाठी फोनवर व्यस्त झाला, तोपर्यंत आम्ही  घारापुरीला जाणाऱ्या बोटीची तिकीट कुठे मिळते याची चौकशी केली आणि विनायक मोकळा झाल्यावर आम्ही तिघे गेटवे ऑफ इंडियाच्या मागच्या बाजूला जाऊन रांगेत उभे राहिलो ते घारापुरीला जाणाऱ्या बोटीची वाट पाहत. पाच ते दहा मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर बोट आली,  बोटीच्या आत शिरतानाच तिकीट देत होते, बोटीच्या खालच्या बाजूस बसायचे असल्यास  २६० रुपये तर वरच्या माळ्यावर बसायचे असल्यास दहा रुपये जादाचे द्यावे लागणार होते. आम्ही उन्हाची परवा नकरता वरच्या माळ्यावर  जाण्यासाठी दहा रुपये जादा देऊन तिकीट घेतली कारण, अथांग समुद्रात प्रवास करण्याची ही आमची तिघांची पहिलीच वेळ होती.

 सूचना - 
  • गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा ही बोट सर्विस सकाळी ०९:०० ते दुपारी ०३:३० वाजेपर्यंत चालू असते.  
  • तसेच एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया ही बोट सर्विस दुपारी १२:०० ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत चालू असते.
  • ही बोट सर्विस सोमवारी बंद असते याची नोंद असावी.
  •  सर्वात महत्त्वाचे म्हणजे  बोटीचा प्रवास हा आपल्याला आपल्या जबाबदारीवर करायचा आहे, कोणताही अपघात झाल्यास बोट कंपनी जबाबदार नाही असे तिकिटेवर नमूद केलेले असते
  • परतीचा प्रवासही याच पैशांमध्ये होतो म्हणून पावती सांभाळून ठेवावी

बोटीवरील सेल्फी
 बोटीवरील सेल्फी

     घारापुरीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला, बोट जसजासी पुढे जात होती तसे मोठ मोठे मालवाहू जहाज दिसत होते ते पाहतच राहावे असे वाटत होते, तसेच अजून पुढे गेल्यावर माझगाव डॉक मधील उभे असलेले दोन भारतीय नवसेनेची जहाजे (डेस्ट्रॉयर) दिसू लागली, नौसेनेची जहाज पाहताना छाती अभिमानाने फुलली.  बोटीवरती फोटो काढण्याचा मोह काही आवरत नव्हता पण समुद्रांच्या लाटांवर डोलणाऱ्या बोटीमुळे तोल सावरणे अवघड जात होते, कसेबसे पुढे जात रेलिंगला पकडून उभे राहून छान छान फोटो काढले आणि पुन्हा आसनावर जाऊन बसलो. बाजूच्या आसनांवर काही जर्मन पर्यटक बसले होते त्यांना पाहून आश्चर्य वाटले,  कारण एप्रिलचा महिना आणि सकाळचे साडेदहा वाजले होते सूर्यनारायण डोक्यावरच आग ओखत होता, पण त्या जर्मन पर्यटकांना काही फरक पडत नव्हता ते आपले मजेत होते आणि आम्ही भारतीय असून सुद्धा उन्हामुळे त्रस्त झालो होतो. अवघ्या ४५ मिनिटांमध्ये आम्ही घारापुरीच्या बेटावर पोचलो होतो.  बोटीतून खाली उतरलो आणि टॉय ट्रेनच्या तिकीट काउंटरच्या रांगेत उभे राहिलो सूचना  : परतीचा प्रवासही याच पैशांमध्ये होतो म्हणून पावती सांभाळून ठेवावी.  ट्रेन सुटायची वेळ झाली होती म्हणून धावत जाऊन डबा पकडला आत जाऊन बसतो ना इतक्यात ट्रेन सुरू झाली आणि पाच मिनिटात  आम्हाला  घारापुरीच्या गेट जवळ सोडले. पोटात कावळे ओरडत होते म्हणून न्ह्यारी साठी एका हॉटेलात गेलो आणि पावभाजीची ऑर्डर केली, ज्या किमतीत पावभाजी आम्ही घेतली होती त्या किमतीला शोभेल अशी पावभाजी नव्हती, पावभाजी मध्ये भाजी कमी आणि टोमॅटो जास्त होते निव्वळ येणाऱ्या पर्यटकांची लूट करत होते. न्ह्यारी पूर्ण करून आम्ही  रेस्टॉरंटच्या बाहेर आलो आणि  जवळच  उभ्या असलेल्या गाईडला बुक केले.  गाईड सोबत आम्ही घारापुरी लेण्यांच्या दिशेने निघालो काही पायऱ्या चढलो आणि तिकीट काउंटर जवळ आलो  पुरातत्त्व विभागाने  पावती फाडली आणि आम्ही आत गेलो. 

    घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ह्या महाराष्ट्रामधील मुंबईपासून ६-७ मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या आहेत. पाषाणात खोदलेल्या ह्या लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्माण करण्यात आल्या आहेत. १९८७ साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे.  या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट , यादवनी मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली.सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले आणि सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले. या बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेल्या आहेत. येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे. त्यात अनेक वेचक, निवडक शिवकथा समूर्त झालेल्या दिसतात. या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासुर वध इ. दृश्ये अतिशय रमणीय असून, साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात आपल्यापुढे साकार करतात.

घारापुरी लेण्यांतील शिल्पकाम
घारापुरी लेण्यांतील शिल्पकाम

      दुपारचे बारा वाजले होते गाईडने आम्हाला घारापुरी लेण्यातील शिल्पकाम, मुर्त्या व त्यांच्या संधार्बत माहिती सांगितली, जवळजवळ अर्धा तास आम्ही गाईड बरोबर फिरलो. सर्व लेण्या पाहून झाल्यावर आम्ही त्याला त्याचे पैसे दिले आणि मोकळे केले. लेण्यां व्यतिरिक्त अजून काय पाहाण्यासारखे आहे का बेटावर, हे पाहण्यासाठी आम्ही  बाकीच्या ठिकाणांवर फिरत होतो. आम्ही पुन्हा मुख्या लेण्यांमध्ये आलो तिथे कोरलेल्या मुर्त्या पुन्हा पाहत वेळ घालवला. तेथील असणारी त्रिमुखमूर्ती अतिशय सुंदर आहे तिथे आम्ही बरेचसे फोटो काढले आणि  बेटावरच्या उच्च भागावर जाण्यास प्रस्थान केले, कारण तिथे दोन मोठ्या तोफा ठेवलेल्या होत्या त्या पाहायच्या होत्या. पुरातत्व विभागाच्या चौकीला पार करत पुढे आलो आणि  डाव्या बाजूचे वळण घेत तोफांच्या दिशेने निघालो एक किलोमीटर चालून पुढे गेल्यावर आम्हाला एक भलीमोठी तोफ निदर्शनास पडली, तोफ पाहत असताना डोंगराच्या वरच्या बाजूने एक परदेशी महिला खाली उतरताना दिसली तिला विचारले असता तिने सांगितले अजून एक तोफ वरच्या बाजूस आहे म्हणून आम्ही अजून दोनशे तीनशे मीटर पुढे गेलो. या तोफांचे वैशिष्ट्य म्हणजे या तोफा एका विशिष्ट धातूपासून तयार केलेले आहेत समुद्रातील खाऱ्या हवेचा या तोफांवर काही एक परिणाम झालेला नाही. आज जरी या टोकांना बत्ती दिली तर सटीक निशाणाला लागेल! तोफ पाहत असताना एक पर्यटक आला आणि तोफेवर बसून फोटो काढू लागला त्याला योग्य ती समज देऊन खाली उतरवले. तोफेची रचना त्याला ठेवण्यासाठी केलेली तरतूद तसेच दारूगोळा ठेवण्यासाठी केलेली भुयारी तरतूद अप्रतिम! ते सर्व पाहून झाले आणि आम्ही पुन्हा माघारी फिरलो. तोफेच्या शेजारून दिसणारा जेएनपीटीचा परिसर अतिशय सुंदर होता. आम्ही दुपारी तीनच्या सुमारास खाली आलो, सकाळी न्ह्यारीच्या वेळी जो अनुभव आला होता त्यामुळे मुंबईला जाऊन जेवण करायचे असे ठरवले, पण उन्हात हिंडल्या कारणाने आम्हाला ताण फार लागली होती म्हणून जवळच असणाऱ्या एका दुकानात आम्ही लिंबू सरबत प्यालो आणि परतीच्या मार्गाला लागलो.

घारापुरी किल्ल्यावरील अजस्त्र तोफ
घारापुरी किल्ल्यावरील अजस्त्र तोफ

     पायऱ्यांनी खाली उतरत असताना पायऱ्यांच्या कडेला असलेल्या दुकानातील वस्तू पाहत आम्ही खाली उतरत होतो. तेवढ्यात एका दुकानात आम्हाला विंड चीम दिसले, हे शिंपल्यापासून बनवले होते आम्ही तिघांनी विकत घेतले आणि टॉय ट्रेनच्या दिशेने निघालो. टॉय ट्रेन पाच मिनिटांपूर्वीच निघाली होती, आमच्याकडे पर्याप्त वेळ असल्याकारणाने आम्ही चालतच धक्क्यापर्यंत पोहोचलो.  दहा मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर बोट आली, आम्ही बोटीत बसलो आणि गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. सुमारे सायंकाळी ०५:०० वाजता आम्ही गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो. थोडा वेळ गेटवे ऑफ इंडियाला घालवला आणि जेवणाकरिता जवळील दिल्ली दरबार या रेस्टॉरंटमध्ये गेलो सायंकाळी सातच्या दरम्यान आमची पोटपूजा पूर्ण झाली आणि आम्ही तिघेही आप आपल्या घराच्या दिशेने निघालो.

 खर्चाचा तपशील




वेळेचा तपशील