प्रवासाची तारीख: २९ जुलै, २०२२
वाहतुकीचे साधन: ट्रेन आणि बस
हरिश्चंद्र गडाचा इतिहास
प्राचीन अग्नि पुराण आणि मत्स्य पुराणात हरिश्चंद्रगडाचा उल्लेख आहे. या किल्ल्याच्या गुहांमध्ये चांगदेव महाराजांनी तपश्चर्या केली होती. हा किल्ला भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळील गुहांमध्ये भगवान विष्णूच्या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि त्या ११ व्या शतकातील असल्याचे मानले जाते. ११ व्या शतकात येथे अनेक गुहा कोरल्या गेल्या. या किल्ल्यावर १२ व्या शतकातील शिवमंदिर आहे. मुघलांनी, आदिवासी कोळी महादेव समुदायाकडून हा किल्ला ताब्यात घेतला. १७४७ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला मुघलांकडून घेतला आणि कृष्णाजी शिंदे यांना किल्ल्याचा प्रमुख म्हणून नियुक्त केले. १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
प्रवास आणि ट्रेकिंगचा अनुभव
ह्या ट्रेकची आजवर मी सर्वात जास्त वाट पहिली होती . ट्रेक बद्दल जास्त माहिती नसल्या कारणाने यावेळी आम्ही भटकंती ध्यास गडकिल्ल्यांचा गट आणि गटप्रमुख श्री. विजय सुतार यांच्यासोबत ट्रेक केला. आमच्या गटात गटप्रमुख धरून एकूण सात सदस्य होते. वेगवेगळे सदस्य वेगवेगळ्या स्टेशनवरून कासार ट्रेनमध्ये चढले. मी स्वतः दादरहून रात्री ११:०५ वाजता ट्रेनमध्ये चढलो आणि रात्री १:३० वाजता कसारा येथे उतरलो.
कसारा रेल्वे स्थानकावर, आम्ही सर्वजण एकत्र येऊन स्टेशनबाहेर पडलो, जिथे विजयने आधीच जीप बुक केली होती. रात्री १:४५ च्या सुमारास, आम्ही कसारा रेल्वे स्थानकावरून निघालो आणि पहाटे ५:०० वाजता पाचनई गावात पोहचलो. आम्हाला जवळजवळ एक तास उशीर झाला होता. राजूरला वनविभागाची चौकी आहे तेथे प्रत्येकी ३० रु आणि गाडीचे १०० रु शुल्क भरले. पाचनई गावातील एका घरात गट प्रमुखाने नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. आम्ही फ्रेश झालो आणि नाश्ता (घरगुती पोहे आणि चहा) केला. सकाळी ६:३० च्या सुमारास आम्ही आमचा ट्रेक सुरू केला. सकाळी हवामान आणि धबधब्याचे दृश्य इतके सुंदर होते की आमचा उत्साह अजून वाढला.
![]() |
| पाचनई गावातील धबधबा |
काही आंतर चालल्यानंतर, आम्ही एका स्वागत कमानी जवळ पोहचलो, इथून खरी हरिश्चंद्र गडाचा ट्रेल चालू होतो. स्वागत कमानी जवळ एक ग्रुप फोटो काढला आणि पुढे निघालो. चढाई करताना आम्हाला काही गावकरी सामान घेऊन जाताना दिसले. आम्ही एका गावकऱ्याला विचारले, "किल्ल्यावर काही कार्यक्रम आहेत का?" त्याने उत्तर दिले, "हो, श्रावण महिना सुरू झाला आहे आणि उद्या श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. मंदिराचं सजावटी करीत फुले घेऊन चाललोय" सुमारे ३० मिनिटांच्या ट्रेकनंतर, आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो जिथे सर्व पर्यटकांना वेळ घालवायला आवडतो: ट्रेक मार्गावर एक छोटी गुहा आणि एक छोटासा पाण्याचा धबधबा. आम्ही थोडे भिजलो आणि फोटो काढून पुढे निघालो. त्यानंतर, आम्ही एका पाण्याच्या ओढ्या जवळ पोहोचलो, जो पुढे धबधब्यामध्ये रूपांतरित होतो. काही पर्यटक ओढ्यात डुबकीमारून आनंद घेत होते. आम्ही परतीच्या वेळी डुबकी मारायचे ठरवले आणि पुढे निघालो. थोडे अंतर पुढे गेल्यावर गावकऱ्यांनी व वनविभागाने बांधलेला धातूचा पूल दिसला, पुलावरून ओढा ओलांडत पलीकडच्या बाजूला गेलो.
![]() |
| पाचनई ते हरिश्चंद्र गड मार्ग |
अवघ्या दोन तासांत आम्ही डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो. डोंगर माथ्यावरून दिसणारा परिसर सुंदर व मनमोहना होते. डोंगरांचा ढगांसोबतचा लपाछपीचा खेळ टाइमल्याप्स मध्ये टिपला आणि पुढे निघालो. चालत असतेवेळीच ढगांची चादर साराखाली आणि पुरातन हरिश्चंद्रेश्वर मंदिराचे शिकार दिसले आणि आमचा थकवा दूर झाला. मंदिराचे आकर्षण इतके होते की, न थांबता आम्ही त्या दिशेने पुढे चालत राहिलो.
![]() |
| हरिश्चंद्रेश्वर शिव मंदिर |
हरिश्चंद्रेश्वर शिव मंदिर, ११ व्या ते १२ व्या शतकात शिलाहार राजा झंज याने मंगळगंगा (मुळा) नदीच्या उगमस्थानी बांधलेले आहे. झंज राजाने अशी एकूण १२ मंदिरे १२ नद्यांच्या उगमस्थानी, पुणे व अहिल्यानगर (अहमदनगर) परिसरात बांधली होती.
आम्ही मंदिराच्या परिसरात प्रवेश केला, प्रवेश कमानीवर दोन किर्तीमुखाची शिल्पे आहेत व चांगदेवांनी लिहलेल्या ओव्या आहेत. आम्ही गाभाऱ्यात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या सभोवतालचा परिसर पाहण्यास सुरुवात केली. मंदिर लहान असले तरी, आजूबाजूचा परिसर लहान गुहांनी / लेण्यांनी भरलेला आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत.
![]() |
| हरिश्चंद्रेश्वर मंदिरातील नंदी व शिवलिंग |
![]() |
| ग्रुप फोटो |
मंदिर परिसरातून बाहेर आलो आणि डावीकडे वळत केदारेश्वर लेणीकडे निघालो; लेणीच्या आत एक प्रचंड शिवलिंग आहे. चारपैकी तीन खांब तुटलेले आहेत; पौराणिक कथेनुसार, चार खांब चार युगांचे प्रतीक आहे. चौथा खांब तुटला की, कलियुग संपेल. जर आपण पौराणिक कथा बाजूला ठेवून हरिश्चंद्र किल्ल्याचा इतिहास तपासला असता, असे कळते कि काही काळ हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. मुघलांनी किल्ला जिंकल्यानंतर नेहमीप्रमाणे मंदिरे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असणार.
![]() |
| केदारेश्वर लेणीतील शिवलिंग |
केदारेश्वर लेणी पाहून झाल्यावर, आम्ही सप्ततीर्थ पुष्कर्णीच्या दिशेने निघालो. प्राचीन काळात, या पुष्करणीतील पाणी पिण्यासाठी तसेच इतर दैनंदिन कामांसाठी वापरले जात असे, परंतु आता पर्यटक या पुष्करणीचा वापर स्विमिंग पूल म्हणून करत आहेत, जे चुकीचे आहे आणि हे थांबले पाहिजे. पुष्करणी जवळ थोडा वेळ घालवल्यानंतर, आम्ही सर्वात आकर्षक ठिकाण असलेल्या कोकण कड्याकडे निघालो. अंदाजे एक किलोमीटर चालल्यानंतर, आम्ही कोकण कड्याजवळ पोहोचलो, परंतु संपूर्ण कोकणकडा ढगांनी व्यापलेला पाहून आम्ही निराश झालो. कड्यावर बसून थोडा वेळ घालवला आणि बॅगेतून आणलेला खाऊ खाल्ला. स्वच्छतेचे भान ठेवून, आम्ही सर्व रॅपर आणि प्लास्टिकच्या रिकामी बाटल्या आमच्या बॅगेत भरल्या आणि माघारी निघालो.
![]() |
| पुष्करणी |
पावसाळ्यानंतर पुन्हा भेट देण्याचा निर्णय घेतला आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दिशेने चालू लागलोग, मंदिराजवळ पोहचण्या पूर्वी काही अंतर अलीकडे उजवीकडे एक रस्ता जातो जो, गणेश लेणी कडे पोहचवतो. आम्ही उजवे वळण घेतले आणि गणेश लेणी जवळ पोहचलो, लेणी मध्ये श्री गणेशाची ८ फूट उंचीची मूर्ती कोरलेली आहे. लेणीचा परिसर इतका मोठा आहे की २० ते ३० जण त्यात राहू शकतात. आजही या लेण्यांमध्ये, पर्यटक आणि ट्रेकर गट रात्रीचा मुक्काम करतात.
![]() |
| गणेश लेणीतील, ८ फूट उंचीचे गणपतीचे शिल्प |
![]() |
| हरिश्चंद्र डोंगरावरील ओढा |
गडावर ३ तास फेरफटका मारून झाल्यानंतर, आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. जवळपास तासभर चालल्यानंतर, आम्ही पुन्हा ओढ्याजवळ पोहोचलो, ओढ्याजवळ बसून थोडावेळ विश्रांती केली तर काही सदस्यांनी ओढ्यात डुबकी मारून अंघोळीचा आनंद लुटला. नियोजित वेळेनुसार आम्हाला उशीर झाला असला तरी, आमचा गटप्रमुख मात्र घाई करत नव्हता. आम्हाला प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ दिला! ओढ्या जावळी विश्रांती नंतर पुन्हा उतरायला सुरुवात केली आणि अवघ्या तासाभरात अंदाजे दुपारी १२:०० वाजता, पाचनई गावात पोहोचलो.
घरगुती, गरम गरम जेवण जेवल्यावर आम्ही जीप मध्ये बसून कसाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरूकेला. सायंकाळी ०४:३० वाजता आम्ही कसारा रेल्वे स्थानकाजवळ पोहचलो. सायंकाळी ०५:०० ची कसारा - सीएसएमटी ट्रेन पकडली आणि दादरला सायंकाळी ७:१५ ला पोहचलो.
👉 ब्लॉग पोस्ट -- हरिश्चंद्रगड आणि निसर्गाचे रौद्ररूप
हरिश्चन्द्र गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
कोकण कडा
हरिश्चंद्रेश्वर मंदिर
केदारेश्वर लेणी व शिवलिंग
तारामती शिखर
सप्ततीर्थ पुष्करणी
गणेश लेणी व गणेश मूर्ती









