प्रवासाची तारीख : ८ ऑगस्ट, २०२३
प्रवासाची पद्धत : ट्रेन आणि खासगी जीप
👉 गाडी चालक व गावातील संपर्क क्रमांक
प्रवासवर्ण आणि गडाचा इतिहास
हरिश्चंद्रगड, भटक्यांची पंढरी, खरंच ही पंढरीच आहे! जसे विठ्ठलाला भेटायला त्याचे भक्त दरवर्षी पंढरपूरला जातात, तसेच आम्हा भटक्या ट्रेकर्सना हरिश्चंद्रगडाला सारखी सारखी भेट द्यावी असे वाटत असते. कितीही वेळा भेट दिली तरी मन काही भरत नाही. २०२२ साली मी पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडाला भेट दिली होती. पावसाळा संपला की पुन्हा यायचे असे ठरवले होते पण ते काही जमले नाही पुन्हा योग आला तो २०२३ च्या पावसाळ्यातच, पण यावेळी निसर्गात भलतेच बदल घडले होते, बायपरजॉय वादळामुळे काही काळासाठी पावसाने दडी मारली होती, पण जुलै महिन्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली पण हवा तास जोर नव्हता. कमी पाऊस असल्या कारणानेच हरिश्चंद्रगड पाहायला जायचे असे ठरवले.
| पाचनई धबधबा |
८ ऑगस्ट ही तारीख निश्चित झाली, नेहमीप्रमाणेच विजय कडू यांना फोन करून कसारा ते पाचनई जीप बुक केली आणि पाचनई गावातील राहुल भारमळ यांना फोन करून नाश्त्याची व जेवणाची सोय करायला सांगितली. सुरुवातीला आमच्या समूहात एकूण ११ जण होते, पण जसजशी ट्रेकची तारीख जवळ येत गेली तसतशी संख्या कमी झाली. उरले फक्त पाच जण मी स्वतः, अमेय विपत, लतेश जाधव, विलास काका आणि रवी काका. नेहमीप्रमाणेच रात्री १०:५० ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुन सुटणारी कसाराकरिता जलद लोकल दादर हुन पकडली आणि रात्री १:२० च्या दरम्यान कसाऱ्याला पोहोचलो. जेव्हा आम्ही आसनगावला पोचलो तेव्हा विजय कडू यांना फोन करून कळवले, त्यामुळे आम्ही कसाऱ्याला पोचण्या आधीच ते जीप घेऊन रेल्वे स्थानका बाहेर उभे होते. आम्ही पूर्व दिशेला स्टेशन मधून बाहेर पडत रस्त्यावर आलो, तिथे विजय कडून उभे होते त्यांना भेटलो आणि जीपमध्ये बसून पाचनई गावाच्या दिशेने प्रवास सुरू केला. पेट्रोल भरण्याकरिता पेट्रोल पंप वर गाडी थांबवली असता तिथे धुके असल्याचे दिसले. तसेच पाचनई मार्गे जाताना पाऊस नव्हता म्हणून आम्ही बिनधास्त होतो. कसारा ते पाचनई हे १०० किलोमीटरचे अंतर आहे तिथे पोहोचायला तीन तास तरी लागतात, राजुर च्या पुढे आल्यावर वन विभागाची एक चौकी लागते. तिथे वनविभागाचे पैसे भरून पुढे जावे लागते प्रत्येकी ३० रुपये व गाडीचे १०० रुपये, पण आज मात्र वन विभागाचे अधिकारी गेट उघडा ठेवून झोपले होते. त्यामुळे आम्ही पैसे न भारताच पुढे गेलो. आम्ही सकाळी साडेचार वाजता पाचनई गावात पोहोचलो, गेल्यावर्षीच इथे येऊन गेलो होतो म्हणून राहुल भारमळ याचे घर शोधायला अवघड गेले नाही आणि तसेही ऑफलाईन लोकेशन डाउनलोड करून ठेवले होते. आम्ही घराजवळ गेलो आणि विचार केला की एवढं सकाळ सकाळी घरातल्यांना का त्रास द्यावा म्हणून बाहेरच थांबू, पण त्यांच्या घरात असलेल्या कुत्र्याने मात्र भुंकायला सुरू केले आणि सर्वांनाच उठवले. नुकत्याच झालेल्या वादळामुळे पाचनई गावात विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे लाईट नव्हते. गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा नाश्त्याला कांदेपोहे मिळाले होते म्हणून आजही कांदे पोहे मिळतील याच आशेवर होतो, पण राहुल ने मात्र मॅगीची पाकिटे फोडायला सुरवात केली आणि मन निराश झाले. गावातली व घरातली परिस्थिती पाहता शांतच राहिलो. नाश्ता करिता राहुल भारमळच्या घरात बसलो असतानाच वाऱ्याला जोरदार सुरुवात झाली होती, जणू पुन्हा वादळ आले की काय असेच वाटत होते. वारा इतका जोरदार होता की त्याच्या आवाजानेच छाती धडधडायला लागत होते. हा ट्रेक कॅन्सल करून पुन्हा घरी जावे असे वाटू लागले.
विजय कडू (जीप) - ७२७६४३४९९५राहुल भारमळ (पाचनई - नाश्ता आणि जेवण) - ७६२०११६४७६
सूचना : राजूर गावाच्या पुढे आल्यावर, पाचनई भ्रमणध्वनी (मोबाईल) ला नेटवर्क मिळत नाही, त्यामुळे काही प्रसंग ओढवल्यास संपर्क साधने अवघड होते, ह्याची नोंद असावी.
| हरिश्चंद्रगड ट्रेक स्टार्ट पॉईंट |
एक आठवड्यापूर्वीच हरिचंद्र गडावर खिरेश्वर मार्गे येणाऱ्या एका पर्यटकाला वाट चुकल्यामुळे, भर पावसात जंगलात रात्र काढावी लागली व तापामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे वन विभागाने पर्यटकांना सोबत वाटाड्या घेणे अनिवार्य केले होते. नाश्ता करून झाल्यावर सुमारे सकाळी ६:०० वाजता आम्ही ट्रेकला सुरुवात केली, आमच्यासोबत वाटाड्या म्हणून राहुल भारमाळ याचा चुलत भाऊ आला होता. पाचनई गावातील मनमोहक धबधबा पाहून मन प्रसन्न झाले. काही अंतर पुढे गेल्यावर एक कमान लागली इथूनच हरिचंद्रगडाकरिता ट्रेकला सुरुवात होते. ट्रेकला सुरुवात करतो ना इतक्यात पावसाने हजेरी लावली, जोरदार वारा आणि पाऊस चालू होता. अर्धा पाऊण तास चालून पुढे आल्यावर, काही गुंफा लागल्या, तिथे थोडा वेळ विश्रांती घेतली. या जागेत कड्यावरून पडणारा धबधबा लागतो, पण जोरदार वाऱ्यामुळे पाणी काय खाली पोहोचत नव्हते, त्यामुळे या धबधब्यात आंघोळ करण्याचा आस्वाद घ्यायचा राहूनच गेला. काही अंतर पुढे गेल्यावर आम्ही एका ओढ्या जवळ आलो, ह्या ओढ्याचे रूपांतर धबधब्यात होते, पण ओढ्यात नंतर उतरू पहिले गडावर जाऊ म्हणून पुढे चालत राहिलो. आमच्या सोबत असणारा वाटाड्या घाई घाई पुढे निघून गेला आणि तो दिशेनासा झाला. शंभर मीटर अंतरावरचे दिसत नव्हते इतके दाट धुके होते. आम्ही वाटाड्याला आवाज दिला आणि थांबायला सांगितले. हे धुके पाहता वाटाड्या सोबत घ्यायचा निर्णय आमचा योग्य होता असे वाटले.
| वाटेत लागणारी छोटीशी गुहा |
काही अंतर पुढे गेल्यावर एक लोखंडी सेतू लागला, गावकऱ्यांनी पर्यटकांच्या सोईकरिता बनवलेला आहे. सेतूवरून ओढा ओलांडत आम्ही पलीकडच्या बाजूस गेलो. ह्या सेतू वरून ओढा ओलांधताना अनुभवलेली एक गम्मत अशी की, या जागेत एक पक्षी मधुर आवाजात ओरडत असतो! हा मधुर आवाज गेल्यावर्षी सुद्धा येत होता. हा आवाज कोणत्या पक्ष्याचा आहे हे ज्ञात नाही, तो पक्षी दिसत नव्हता पण, त्याचे घरटे इथल्याच कुठच्यातरी झाडावर असणार हे निश्चित! काही अंतर पुढे गेल्यावर एक छोटीशी झोपडी सदृश्य दुकान दिसले, ऑड दिवस असल्या कारणाने दुकान बंद होते. आम्ही त्या दुकानाचा आश्रय घेत थोडा आराम केला आणि सोबत आणलेले खाऊ बॅगेतून बाहेर काढले. रवी काकांनी चिकी आणली होती तर, विलास काकांनी खजुराचे लाडू आणले होते. मी नेहमी प्रमाणेच पार्लेजी बिस्कीट आणले होते. खाऊ खाऊन तरतरीत झालो आणि निघालो मंदिराच्या दिशेने. पावसामुळे तेथील माती फार चिकट व निसरडी झाली होती त्यामुळे चालणे थोडा अवघड होत होते. कसेबसे तोल सावरत डोंगर माथ्यावर पोहोचलो, पण इथे धुक्याचे प्रमाण फारच जास्त होते. गेल्या वर्षी येथे आलो होतो, म्हणून या वाटेच्या दोन्ही बाजूला दारी आहे हे ठाऊक होते. कुठे जायचे हे कळत नव्हते पण वाटाड्याला मात्र वाट माहित होती. डावे वळण घेत धुक्यातून वाट काडत पुढे चालू लागला. ज्या ठिकाणे आम्ही उभे होते त्या ठिकाणाहून हरिश्चंद्रेश्वर मंदिराचे शिखर स्पष्ट दिसते, पण या वेळी मात्र मंदिर काय १०० मीटर अंतरावरचे दिसणे सुद्धा कठीण होते. वाटाड्याच्या मागून चालत चालत आम्ही हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळ पोहोचलो.
हरिश्चंद्रेश्वर मंदिर, गडावर आल्या आल्या डोळय़ांत भरणारे हे कातळशिल्प! संत चांगदेवांनी नाव दिलेल्या मंगळगंगा नदीच्या काठावर एका लवणात हे देखणे शैलमंदिर उभे आहे. तट, तटालगत खोदलेल्या ओवऱ्या, थंडगार पाण्याच्या टाक्या आणि या प्राकारात मधोमध कोरलेले-बांधलेले हे देखणे मंदिर! ‘नागेश्वर’प्रमाणेच झंज राजानेच मंगळगंगा ऊर्फ मुळा नदीच्या उगमस्थळी याही मंदिराची निर्मिती केली. पूर्व दिशेस असलेल्या प्रवेशद्वारातून या प्राकारात शिरावे. या दरवाजाच्या दोन्ही अंगांना कीर्तिमुखांची भव्य शिल्पं आहेत. डाव्या भिंतीवर एक महत्त्वाचा लेखही! ‘चक्रपाणी वटेश्वर : नन्दतु तस्य सुत : वीकट देऊ ॐ’ निसर्गशिल्पाने भारावलेली ही भूमी संत चांगदेवांनाही भावली. मग त्यांनीही त्यांच्या तपश्चर्येसाठी हा हरिश्चंद्रगड निवडला. हरिश्चंद्रेश्वराच्या या मंदिरात सहा, तर शेजारच्याच केदारेश्वराच्या लेण्यात दोन असे आठ लेख चांगदेवांच्या या वास्तव्याचे पुरावे देतात. ज्येष्ठ साहित्यिक आणि दुर्गप्रेमी गो. नी. दांडेकर, डॉ. वि. भि. कोलते आणि डॉ. रा. चिं. ढेरे यांनी परिश्रमपूर्वक या लेखांचे संशोधन करत त्यांचे तेराव्या शतकातील संत चांगदेव, ज्ञानदेव आणि निवृत्तिनाथ या संतमहात्म्यांशी असलेले नाते समाजापुढे आणले. डॉ. ढेरे यांच्या मते या प्रवेशद्वाराच्या उजव्या भिंतीवरही आणखी एक लेख होता. पण त्याची अक्षरे पुसट झाल्याने आज तो वाचता येत नाही. आत शिरताच मधोमध अवकाशात उंच शिखर नेलेले हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर दिसते. या मंदिराच्या भोवतीने दक्षिण आणि पश्चिम दिशांना काही कोरीव लेण्यांची दालने आणि पाण्याच्या टाक्या आहेत. मुख्य मंदिरास पूर्व आणि पश्चिम असे दोन्ही बाजूस दरवाजे आहेत. गाभाऱ्यात मधोमध शिवलिंग आणि त्याच्या पुढय़ात नंदी विराजमान आहे. अशा या मंदिराच्या शिखर, भिंती, खांब आणि प्रवेशद्वार सर्वत्र मुक्तहस्ते शिल्पकाम केलेले आहे. देव-देवता, प्राणी, रत्न-रूप, -निसर्ग आदी रूपके, विविध भौमितिक रचना या साऱ्यांची एक विलक्षण वीण या भरजरी कामात गुंफलेली आहे. यामुळेच अभ्यासक या रचनेची तुलना उत्तरेतील बुद्धगयेच्या मंदिराशी करतात. हरिश्चंद्रेश्वराचे हे सौंदर्य पाहणाऱ्यांची मती काही क्षण गुंग करून टाकते. याची हीच भूल संत चांगदेवांनाही पडली आणि म्हणूनच त्यांनी तपश्चर्येसाठी हा भाग निवडला. इथल्या त्यांच्या या वास्तव्यात त्यांनी ‘तत्त्वसार’ हा ग्रंथ कार्यसिद्धीस नेला. या ग्रंथातील १०२८ ते ३३ दरम्यानच्या ओव्यांमध्ये या गडाचा उल्लेख आलेला आहे, तो असा,
‘हरिश्चंद्र नाम पर्वतु।
तेथ महादेओ भवतु।।
सुरसिद्ध गणी विख्यातु।
सेविजे जो।।१०२९।।
हरिश्चंद्र देवता। मंगळगंगा सरिता।।
सर्वतीर्थ पुरविता। सप्तस्थान।। १०३०।।’
तत्त्वसारप्रमाणेच स्कंद, पद्म, अग्नी, मस्य पुराणांतही या हरिश्चंद्र पर्वताची माहिती येते.
| हरिश्चंद्रेश्वर मंदिर |
| हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या भिंतीवरील गणपतीची मूर्ती |
हरिश्चंद्रेश्वर मंदिर पाहून झाल्यावर आम्ही शेजारीच असलेली केदारेश्वर लेणी काढे निघालो, लेणी मध्ये असलेल्या भव्य शिवलिंग पाहायची उत्सुकता होती. पावसाळ्याच्या दिवसात लेणी पाण्याने तुडुंब भरते, पण यावर्षी मात्र पाण्याची पातळी कमी होती. वाटाड्याला याचे कारण विचारले असता त्याने पुरातत्व विभागातील अतिहुशार अधिकाऱ्यांना दोष देत म्हणाला "या लेणीला लागून उंबराचे झाड होते, त्यामुळे पावसाचे पाणी लेणीमध्ये जायचे, पण गेल्यावर्षी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते तोडून टाकले तसेच समोरच असलेल्या ओढ्याचे पाणी देखील आत जायचे, पण संवर्धनाच्या कामात त्याच रचना सुद्धा बदलली".
केदारेश्वराचे लेणे, औरस-चौरस असलेल्या या लेण्यात कमरेएवढे पाणी असून त्याच्या मधोमध एका मोठय़ा ओटय़ावर विशाल शिवलिंग आहे. या शिवलिंगाभोवती चार सालंकृत खांबांची रचना केली आहे. यातील एक पूर्णपणे, तर दोन अध्र्यापर्यंत पडलेले आहेत. या लेण्याच्या डावीकडील भिंतीवर शिवपूजेचा एक शिल्पपटही कोरला आहे. उरी इच्छा आणि मनी श्रद्धा असेल तर त्या थंडगार पाण्यातही स्वत:ला झोकून देत ‘त्या’ शिवाला प्रदक्षिणा घालायची आणि हर हर महादेवच्या गर्जनांनी ते लेणे जागवायचे!
| केदारेश्वर लेणीतील शिवलिंग |
| केदारेश्वर लेणीतील शिव पूजेचा शिल्पपट |
केदारेश्वर गुफा पाहत असतानाच तिथे काही लहान मुलांची टोळी आली व त्यांनी पाण्यात उडी टाकून शिवलिंगाच्या चौथऱ्यावर उभे राहून फोटो काढायला सुरुवात केली. त्यांना ओरडा देत, योग्य ती समज देऊन खाली उतरवले. पण ही गोष्ट सांगण्यापेक्षा ज्याला त्याला स्वतःलाच कळली पाहिजे. येणारी पर्यटक मंदिराच्या जवळील पुष्करणीत व या केदारेश्वर लेणीतील पाण्याला स्विमिंग पूल प्रमाणे वापरतात. खरं तर पुरातत्त्व विभागाने किंवा गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन, हे कृत्य थांबवले पाहिजे असे वाटते. नाहीतर मग आमच्यासारख्या पर्यटकांना चाबूक घेऊन फिरावे लागेल.
केदारेश्वर लेणी पाहून झाल्यावर, मागे फिरत, आम्ही हरिश्चंद्रेश्वर मंदिर शेजारील पुष्करणी जवळ आलो. पुष्करणीच्या एका अंगास ओळीने चौदा कोनाडे. ज्यामध्ये आता १९८४ पर्यंत विविध देवतांच्या मूर्ती होत्या. पुढे सुरक्षेच्या कारणावरून त्या हरिश्चंद्रेश्वर मंदिरातीलच एका खोलीत ठेवल्या आहेत. १९७०च्या सुमारास या गडावर राहात असलेल्या एका महाराजांनी या पुष्करणीची साफसफाईची टूम उठवली होती. या वेळी त्याला दोन पोती भरतील एवढी चांदीची नाणी मिळाली. या नाण्यांपासून चांदीचा मुखवटा करायचा म्हणून ती इथून हलविली गेली. पण पुढे हा मुखवटाही झाला नाही आणि त्यापेक्षाही इतिहासाची अस्सल साधने असलेली नाणीही लांबविली गेली.
ज्या दुकानात आम्ही थांबलो होतो ते दुकान राहुल भारमाळ यांचेच होते, गार वारा आणि पावसामुळे आम्ही सर्वजण गारठलो होतो, म्हणून प्रत्येकासाठी एक एक कप चहा मागवला. साबोत आणलेले भडंग आणि गरम गरम चहा प्यालो पण अंगातली थंडी काही जाईना. म्हणून सर्वजण आत जाऊन चुलीच्या शेजारी उब घेत भासलो. तेथे बसून बाबांसोबत गप्पांना सुरवात झाली आणि बाबांनी काही दिवसापूर्वीच झालेल्या अपघाताची माहिती सांगितली. या थंड वाऱ्यात आणि पावसात आमची जी अवस्था झाली होती, यावरून अंदाज आलाच कि त्या मुलांची या जंगलात दोन रात्र घालवल्याने काय अवस्था झाली असेल ती! बाबांनसोबत गप्पा मारून झाले आणि बाबांचा निरोप घेत आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. गड उतार होत असताना, आम्ही पुन्हा त्या ओढ्या जवळ आलो, ओढा पाहून विलास काकांना डुबकी मारायचा मोह काही आवरत नव्हता, पण पावसाचा जोर बघता वाटाड्याने पाण्यात उतरण्यास मनाई काली. थोडावेळ ओढ्याच्या शेजारी बसलो आणि पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो.
| धबधब्याची वरील बाजू |
अंदाजे सकाळी ११:०० वाजता आम्ही पायथ्याला पोहचलो, वाटाड्याचे काम झाले होते, म्हणून त्याला घरी जायला सांगितले आणि तिथे असलेल्या छोट्याश्या पठारावर बसून आम्ही समोर दिसणाऱ्या पाचनई धबधबा आणि छोटे छोटे रिव्हर्स धबधबे पाहत, चणे शेंगदाणे खात निसर्गाचा आस्वाद घेत अर्धा पाऊणतास घालवला. सुमारे दुपारी १२:०० च्या दरम्यान आम्ही राहुल भारमल यांच्या घरी पोहचवली, जेवण तयार होते. गावातील विद्युत पुरवठा खंडित असल्या कारणाने, टॉर्चच्या प्रकाशातच जेवण केले. राहुल भारमाळ याचे मानधन देऊन दुपारी १:०० च्या दरम्यान आम्ही कसारा करीत जीप मध्ये बसलो. ३ तासाच्या प्रवासानंतर अंदाजे सायंकाळली ४:०० वाजता कसारा स्थानका जवळ पोहचलो. सायंकाळी ४:१६ ची कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही जलद लोकल पकडून आम्ही सायंकाळी ७:०० वाजता दादर स्थानकात उतरलो.
हरिश्चंद्र गडाचे सौंदर्य पाहत असताना, निसर्गाने दाखवलेले रौद्र रूप कदीही न विसरणार अनुभ ठरला!
सूचना : वरील दिलेली हरिश्चंद्र गडाची व तेथील वास्तूंची माहिती ही लोकसत्ता वृत्तपत्रात आलेल्या लेखातून घेतलेली आहे.