प्रवासाची तारीख: ९ जुलै, २०२३
वाहतुकीची पद्धत : ट्रेन आणि दुचाकी
महाराष्ट्रात विशेषत: पावसाळ्यात, सह्याद्री पर्वतरांगांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी हंगामी ट्रेकर्स सक्रिय होतात. पावसाळ्यात हिरवेगार डोंगर सुंदर दिसत असले तरी धोकाही तितकाच वाढलेला असतो. डोंगराच्या कड्यावरून घसरल्याने किंव्हा धबधब्याच्या तलावात पोहताना, पाण्यात बुडून अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागतो व अति वृष्टी मुळे दरड कोसळते! या वर्षी इर्शाळगड डोंगरात दरड कोसळली आणि पायथ्या खाली असलेलं इर्शाळवाडी गाव मातीच्या ढिगाऱ्या खाली लुप्त झालं! तसेच दोनच दिवसांनी रायगड जिल्ह्यातील आणखी एका डोंगरात दरड कोसळून किल्ल्याचा बुरुज ढासळल्याची बातमी आली. धोका टाळण्यासाठी अगदी महाराष्ट्र सरकारने सुद्धा पावसाळी सहल टाळण्याचा सल्ला दिला होता, म्हणून आम्ही सर्व मान्सून ट्रेक रद्द करण्याचा निर्णय घेतला. आम्ही प्राचीन मंदिरे आणि लेण्यांना भेट देण्याचे ठरवले, नेहमीप्रमाणे विनायक बरोबर या विषयी चर्चा केली आणि आम्ही प्राचीन अंबरनाथ शिव मंदिर, लोणाड लेणी आणि लोणाड शिव मंदिराला भेट देण्याचे ठरवले. जेव्हा मी याच योजनेबद्दल माझे मित्र स्वरूप काका विलास परब यांच्याशी चर्चा करत होतो, तेव्हा त्यांनी अंबरनाथ शिव मंदिराजवळ असलेल्या बिर्ला मंदिराला भेट देण्याचा सल्ला दिला, म्हणून आम्ही बिर्ला मंदिरही आमच्या योजनेत जोडले.
![]() |
| अंबरनाथ शिव मंदिर |
आम्ही पाहिलेली ठिकाणे
प्रवासवर्णन
अंबरनाथ शिव मंदिर
मंदिराचा परिसर आणि भव्यता पाहून अचंबित झालो, आत जाऊन शिव शंभुचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. अंबरनाथचे शिवमंदिर हे ११ व्या शतकात शिलाहार राजा छित्तराजाने बांधले असावे. हे अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून (पूर्व) २ किमी अंतरावर वालधुनी नदीच्या काठी वसलेले आहे. हे मंदिर इसवी सण १०६० मध्ये बांधले गेले. पुरातन मंदिर म्हटले की शिल्पकला आलीच, ते पाहण्याकरिता मंदिरा भोवती फेरफटका मारला, कोरलेल्या मुर्त्या, नक्षीकाम अप्रतिम आहे. तसेच मंदिराचा शिखर इतका सुंदर आहे जणू शिल्पकलेचा चमत्कारच. हे मंदिर भूमिज शैलीत बांधलेले आहे. अशेच शिखर असेलेली मंदिरे महाराष्ट्रात व मध्य प्रदेशात पाहायला मिळतात. उदाहरण रतनवाडीचे अमृतेश्वर शिव मंदिर, नाशिक सिन्नर येथील गोंदेश्वर शिव मंदिर, मध्य प्रदेशातील निळकंठेश्वर शिव मंदिर, इत्यादी. ही मंदिरे शिलाहार राजवटीत, वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या राजांनी बांधलेली आहेत. अनेक जण सांगतात की मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नाही म्हणून शिखर अर्धवट आहे, पण तसे नसून या मंदिराचे शिखर इस्लामी आक्रमणात नष्ट झाले आहे हे सत्य जाणीवपूर्वक लपवले जाते, असेच काहीसे कोल्होपुरातील खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराचेही आहे, जुने शिखर तुटल्या कारणान तेथे आता गोल घुमट बांधले आहे. अंबरनाथ शिव मंदिराच्या भिंतीवर कोरलेल्या मूर्ती पाहण्यात थोडा वेळ घालवल्यानंतर पुढच्या गंतव्यस्थानासाठी म्हणजे बिर्ला विठ्ठल मंदिराकडे जाण्याचा निर्णय घेतला. 👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
![]() |
| अंबरनाथ शिव मंदिरातील शिल्पकला |
बिर्ला विठ्ठल मंदिर
लोनाड शिव मंदिर व इतिहास
आम्ही गूगल मॅप्सच्या साह्याने, भिवंडी बायपासने आत शिरत, कच्च्या रस्त्याने लोनाड गावात सुमारे ११:३० वाजता पोहचलो. बराच पुढे गेल्यावर मंदिर दुर्ष्टीशी पढले आणि आनंद झाला, पण मंदिराची दुरावस्था आणि मंदिराचे अवशेष इतरत्र विखुरलेले पाहून हा आनंद काही क्षणातच मावळला. पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्या करीत मंदिरावर मोठी ताडपत्री टाकलेली होती, ही अवस्था आपल्या हिंदू मंदिरांची! आम्ही गाभाऱ्यात न जाता बाहेरूनच महादेवाचे दर्शन घेतले आणि मंदिरावरील नक्षीकाम पाहत, मंदिरा भोवती फेरफटका मारला. फेरफटका मारताना काही गोष्टी निदर्शनास पडल्या आणि लक्षात आले कि इतक्या सुंदर मंदिराची ही दुरावस्था कशी झाली. मंदिराच्या जवळच ४ ते ५ फूट अंतरावर २ ते ३ मजली इमारत बांधलेली आहे, ही इमारत बांधत असताना नक्कीच मंदिराला क्षती पोहचली असणार आणि मंदिराचे बरेचशे अवशेष जवळील घरे बांधताना भरणी म्हणून वापर केला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंदिराच्या मागच्या बाजूस तलाव आहे, तेथे सुद्धा गावातील लोकांनी, मंदिराचे खांब अर्धे जमाती पुरून त्यांचा वापर बॅरिकेड म्हणून केला आहे. इस्लामी आक्रमणात मंदिराचे नुकसान झाले पण, स्थानिक लोकांच्या ह्या अश्या अज्ञानी वागण्यामुळे त्यात अधिक भर पढली. हे सर्व पाहत असताना पुरातत्व खात्याला मनातल्या मनात भरभरून शिव्या शाप देत होतो.
टीप: खाली दिलेली मंदिराची ऐतिहासिक माहिती श्री प्रवीण कदम यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र टाइम्सच्या संकेतस्थळावरून घेतली आहे. लिंक : लोणाड शिव मंदिराचा इतिहास
शिलाहार राजा अपरादित्यचा प्रधान मंगलय्या याचा पुत्र अन्नपय्या याच्या इ. स. ९९७च्या एका ताम्रपटामध्ये या मंदिरासाठी भादाणे गावाचा महसूल नेमून दिल्याचे म्हटले आहे. यावरून हे मंदिर किमान १ हजार २४ वर्षे प्राचीन असल्याचे म्हणता येईल. लोणाड गावापासून एक किलोमीटर अंतरावरील चौधरपाडा गावातील मंदिरात एक शिलालेख असलेला गद्धेगळ (गर्दभ शापवाणी) आहे. २४ जानेवारी १२४० रोजीच्या या शिलालेखात लोणाडचे नाव लवणेतट असे लिहिले असून मंदिराचा उल्लेख 'लोणादित्य' म्हणून केलेला आहे. या शिलालेखाचे लिप्यंतर आणि भाषांतर डॉ. दाऊद दळवी यांच्या 'असे घडले ठाणे' पुस्तकात वाचायला मिळते. लोणाड मंदिराशी संबंधित अपरादित्य दुसरा याचा इ. स. ११८४ चा एक शिलालेख छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आहे. या शिलालेखावर चंद्र, सूर्य आणि शिवलिंग कोरलेले आहे. लेखामध्ये लोणाड गावातील दोन श्रेष्ठींची घरे जकातमुक्त केल्याचे लिहिले आहे. लोणादित्य मंदिर गजरथावर असल्याचे शिल्पांकित केलेले आहे. मंदिराचा भार हत्तींनी आपल्या पाठीवर तोलल्याचा आभास होतो. मंदिराचे अनेक अवशेष जवळपास विखुरलेल्या अवस्थेत इतस्ततः पाहायला मिळतात. त्यामध्ये गणपती, लज्जागौरी, मिथुन शिल्पे, मृदंगवादक, नृत्यांगना, यक्ष-किन्नर, पुष्पवृष्टी करणारी आकाश युगुले असे अनेक घटक दिसून येतात. लोणादित्य मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची भूमिज त्रिदल पद्धतीची बांधणी आहे. आज अस्तित्वात असलेल्या अवशेषांवरून त्याचे मूळ प्रमाण आणि सौंदर्य याची कल्पना येते. द्वारपट्टीकेवर ललाटबिंबासह नऊ शिल्पे आहेत आणि छताला कमळाच्या आकृतीने सालंकृत केलेले आहे. मंदिराच्या बाहेर महिषासूर मर्दिनी व गजासूर वधाची शिल्पे दिसतात. मंदिराच्या पश्चिमेस एक एकर क्षेत्रफळाचे मोठे तळे आहे. पूर्वी या तळ्याला घाट बांधलेला असावा, त्याचे दगड आता विस्कळीत अवस्थेत आढळतात. इथून जवळच चौधरपाडा गावात एक शिवमंदिर आहे. सध्या ह्या मंदिराला रामेश्वर मंदिर म्हणत असले तरी याचे नाव सोमेश्वर किंवा षोम्पेश्वर असावे. शिलाहार राजा मल्लिकार्जुन याच्या वसई येथील इ. स. ११६२ च्या शिलालेखात एका शिवालयाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख येतो. मंदिराकरिता लोणावाटक येथील वाडी दान दिल्याची नोंद आहे. या मंदिरातील शिवपार्वतीची मूर्ती आणि शंकराची पिंड लोणादित्य मंदिरातील असून ती भूतकाळात तिथे स्थलांतरित केली असावी. शिलाहारकालीन देखण्या परंतु उद्ध्वस्त अवस्थेतील हे स्थापत्य-लेणे एकदा आवर्जून पाहायलाच हवे. 👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
लोनाड लेणी व धबधबा
लोनाडचे शिव मंदिर पाहून झाल्यावर, आम्ही गावामध्ये अजून काही पाहण्यासारखे आहे का ते शोधत आम्ही चालत पुढे गेलो, गावातील बऱ्याच ठिकाणी घरांचे व बिल्डिंगीचे काम चालू होते, थोडे पुढे गेल्यावर काली मातेचे मंदिर नजरेस पडले. मंदिर नवीनच बांधले होते, आम्ही काली मातेच्या दर्शनासाठी पुढे जातो ना इतक्यात मंदिराच्या दारात बांधलेला कुत्रा आम्हाला पाहून भोंकू लागला, आम्हाला काही पुढे जाऊ देईना. आम्ही बाहेरूनच मातेचे दर्शन घेतले आणि लोनाड लेण्या पाहण्यासाठी प्रस्थान केले.
पुन्हा एकदा गूगल बाबाची मदत घेत आम्ही लेण्यांच्या दिशेनं चाललो होतो. डांबरी रास्ता सोडत आम्ही उजवे वळण घेत कच्या रस्त्याने पुढे निघालो, इतक्या एक आवाज आला. मंदिराची वाट इथून आहे, इथून जा, आम्हला मंदिराकडे (लेण्या) जायचे आहे, हे काकांनी बरोबर ओळखले होते. गूगल बाबा कितीही हुशार असला तरीही स्थानिक लोकांची मदत घ्यावीच लागते. लेणयांकडे जाणारा रस्ता अरुंद आहे, फक्त दुचाकी जाऊ शकते इतकाच. डाव्या बाजूला दरी असल्या कारणाने गाडी हळू व सावधपणे चालवावी लागत होती, एक ते दीड किलोमीटरचे अंतर पार केल्यावर आम्ही दुपारी १२:०० च्या सुमारास लेण्यांजवळ पोहचलो. लेण्यांमध्ये थोडी फार गर्दी होती, तीपण गावकऱ्यांचीच. ह्या लेण्या फार प्रसिद्ध नसल्या कारणाने पर्यटकांची गर्दी फार कमीच असते. गावातील तरुण मंडळी जेवण बनवण्यात व्यस्त होती, लेण्यांच्या बाहेर एक बोकड बंधनला होता व मोठमोठे टोप ठेवले होते तर दुसरीकडे काही मंडळी मिक्सर मध्ये वाटण तयार करत होते. आज देवीला, बोकडाचा बळी देऊन मटणावर ताव मारण्याचा गावकऱ्यांचा बेत होता.
![]() |
| लोनाड लेण्या |
![]() |
| लोनाड लेण्यां जवळील धबधबा |
लेणी पाहून झाल्यावर आम्ही बाहेर आलो, आणि पाहिले की काही पर्यटक जंगलातून येत आहेत, म्हणून आम्ही आणखी काही प्राचीन गोष्टी शोधण्यासाठी जंगलाच्या दिशेने पुढे निघालो, परंतु आम्ही लहान धबधब्याजवळ पोहोचलो किंवा पाण्याचा प्रवाह म्हणू शकतो. आम्ही तिथे ५-१० मिनिटे घालवली आणि परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुपारी १:२० च्या सुमारास आम्ही घरी (विनायकच्या घरी) पोहोचलो. विनायकच्या आईने दुपारच्या जेवणात "पातोड्याची आमटी" ही खास डिश बनवली होती, भरपेट जेवण केले आणि सुंदर आठवणी सह मी माझ्या घरच्या गोरेगावच्या दिशेने प्रवास सुरू केला.
टीप :- ही सर्वे ठिकाणे, दुचाकीने पाहायला अंदाजे ५०० रुपये खर्च आला. (प्रत्येकी २५० रुपये).























