कळसुबाई - नाईट ट्रेक



प्रवासाची तारीख : १ मे २०२४
प्रवासाची पद्धत : ट्रेन आणि जीप


प्रवासवर्ण 

    कळसुबाई! महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, याला महाराष्ट्रातले एव्हरेस्ट असेही म्हटले जाते. मी कळसुबाई ट्रेक २०१७ साली  पावसाळ्यात योगेश सोबत पूर्ण केला होता, तेव्हापासून ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. आतापर्यंत २० ते २१ ट्रेक पूर्ण केले आहेत पण, एकही नाईट ट्रेक केलेला नाही. नवीनच झालेल्या मित्रांपैकी काही मित्रांनी कळसुबाई ट्रेक करायची इच्छा दर्शवली होती. म्हणून १ मे ही तारीख ठरवली, पण उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यात कळसूबाई शिखर सर करणे हे सोपे काम नाही म्हणून रात्रीच्या वेळेस ट्रेक करायचा असे ठरवले, पण आमच्यापैकी कोणालाही नाईट ट्रेकचा अनुभव नव्हता, पण काही दिवसांपूर्वीच कामावरचा एक सहकर्मी एकटाच तिथे नाईट ट्रेक करून आला होता, त्यामुळे त्याच्याकडून काहीशी माहिती घेतली आणि ट्रेकची योजना आखली.  २०१७ साली केलेल्या ट्रेकचा अनुभव, तेथील वाटा आणि लागणारा वेळ या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ट्रेकचे नियोजन केले. प्रत्येकाला सोबत एक टॉर्च घ्यायला सांगितली होती, तसेच विजय कडू यांना फोन करून जीपची बुकिंग केली होती आणि बारी गावातील बाळू खडे यांना फोन करून राहण्याची व जेवणाची सोय करायला सांगितली होती.

विजय कडू (जीप) - ७२७६४३४९९५
बाळू खडे (बारी गाव, जेवण व राहण्याची सोय) - ७७४५०२४५४७



👉 खर्चाचा व वेळेचा तपशील पहा 


कळसुमाता मंदिर
कळसुमाता मंदिर  

   आमच्या समूहात एकूण नऊ जण होते, मी स्वतः, अमेय विपत, विनायक काळे, आकाश शिंदे, सुदेश, लतेश जाधव, संतोषराज कारंडे आणि त्याचा एक भाचा आणि भाची.  सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुन कसारा करीत सुटणारी रात्री १०:५० ची जलद लोकल  पकडायला सांगितली. प्रत्येकाला आपापल्या जवळच्या स्थानकावरून एम इंडिकेटर वर दिलेल्या वेळेत ट्रेन पकडायला सांगितले. कसाऱ्याला जाणारी ट्रेन मात्र पंधरा मिनिटं उशिराने आली.  १२:४५ च्या दरम्यान आम्ही आसनगावला पोहोचलो तेव्हा विजय कडू यांना फोन करून कसाऱ्याला जीप घेऊन यायला सांगितले. आम्ही रात्री १:३० च्या दरम्यान कसाऱ्याला पोहोचलो, सर्वजण एकत्र आलो आणि पूर्व दिशेला कसारा स्थानकातून बाहेर पडत, शंभर एक मीटर चालत बाहेर रस्त्यावर आलो. तिथे विजय कडून उभे होते. आम्ही सर्वजण जीपमध्ये बसलो आणि बारी गावाच्या दिशेने निघालो. काही अंतर पुढे आल्यावर जीप चहा करिता थांबवली,   पण पोरांनी नुसती चहा प्यायची सोडून गरम गरम भजी मागवली,  यामुळे आम्हाला पुढील प्रवासात उशीर होणार होता. आमचा बेत होता कळसुबाई शिखरावरून सूर्योदय पाहण्याचा, पण ट्रेनला झालेल्या पंधरा मिनिटे उशीर आणि इथे चहा आणि भजी खायला लागलेला वेळ त्यामुळे जवळजवळ ३५ ते ४० मिनिटे आमची वाया गेली होती. तरी पण आम्ही ट्रेकिंगच्या करते वेळी ही वेळ कव्हर करू असे ठरवले. चहा पिऊन झाल्यावर आम्ही आमचा प्रवास बारी गावाच्या दिशेने रुजू केला, रात्री दोन २:२० च्या दरम्यान आम्ही बारी गावात पोहोचलो. २०१७ सालचे बारी गाव आणि आताचे २०२४ चे बारी गावात बराच बदल झालेला आहे. आम्हाला बाळू खडे यांच्या तन्मय हॉटेल कडे जायचे होते, पण गावात झालेल्या बदलामुळे त्यांचे घर व हॉटेल शोधणे अवघड झाले. अखेरीस जीपवाले काका विजय कडू यांची मदत घेत आम्ही बाळू खडे यांच्या घरी पोहोचले.


नाईट ट्रेक ग्रुप फोटो
नाईट ट्रेक ग्रुप फोटो

कळसुबाई ट्रेक कमान
कळसुबाई ट्रेक कमान 

     बाळू खडे यांनी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीकरिता राहत्या घराच्या शेजारीच नवे घर बांधले आहे. आम्हाला पहिल्या मजल्यावर जाऊन फ्रेश व्हायला सांगितले. आम्ही फ्रेश झालो आणि महत्त्वाच्या वस्तू जसे टॉर्च, पाणी बाटली, फर्स्ट एड किट, औषधे इत्यादी सामान सोबत घेतले व इतर सामान बाळू खडे यांच्याच घरी ठेवले. माझ्या बाबतीत एक गोंधळ झाला होता मी दोन टॉर्च आणल्या होत्या पण त्या दोन्हीही बंद पडल्या, इतर मेंबर्सनी टॉर्च आणले होते म्हणून निभावले. कळसुबाई ट्रेक जिथून सुरुवात होतो तिथे एक कमान बांधलेली आहे. गावात झालेल्या बदलामुळे ही कमान शोधणे व मुख्य वाट शोधणे थोडे अवघडत झाले होते बाळू खडे यांनी आम्हाला वाट दाखवली, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढे चालत राहिलो, पण काही अंतर पुढे गेल्यावर वाट चुकलो आहे असे जाणवले. तेव्हा दुर्ग या ॲपवर डाऊनलोड केलेल्या ऑफलाइन मॅपची मदत घेत योग्य वाटेवर आलो. तसेच काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा वाट चुकायला झाले, त्याचे कारण म्हणजे आमचे नेहमीचे ट्रेकर लतेश जाधव हे पायाला स्केटिंग बांधल्याप्रमाणे सरसर पुढे पळत होते. सर्वांना हाय तिथेच थांबायला सांगितले आणि योग्य वाट शोधून काढली, यामध्ये दुर्ग या ॲपची खूप मदत झाली.   तसेच गावकऱ्यांनी जागोजागी मार्किंग करून ठेवलेली आहे त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता फार कमीच आहे! तसेच काही अंतरावर दुकाने आहेत व त्यांची लाईट रात्रभर चालू असते त्यामुळे थोडा दिलासा मिळतो. आमची ३५ ते ४० मिनिटे वाया गेली होती ती आम्हाला कव्हर करायची होती, पण इथे वेगळाच गोंधळ झाला होता. नेहमीप्रमाणे विनायक ट्रेकच्या सुरुवातीलाच दमला होता व त्यांनी खडकावरच लोळून दिले. समूहातील काही मंडळी त्याच्याकडे पाहून घाबरली होती, पण मला ठाऊक होते हा कितीही दमला तरी हा ट्रेक पूर्ण करणार 😄. तितकेच नाही तर संतोषराज कारंडे यांची भाची सुद्धा यावेळी फार दमली होती, तिला  ट्रेकिंगची सवय होती पण कुणास ठाऊक या गर्मीमुळे जास्तच थकायला झाले असावे. शेवटी सूर्योदय पाहण्याचा नाद सोडून ज्याला जसे जमेल तसे आरामात चालावे असेच सांगून शिखर सर करायचे ठरवले. ६०% ते ७०% अंतर पार करून झाले होते आणि  सूर्यनारायणाने दर्शन दिले! शिखरावर जाऊन सूर्योदय पाहता आला नाही, पण बऱ्यापैकी आम्ही उंची गाठली होती. संतोषने थालीपीठ आणले होते, थोडे थोडे थालीपीठ खाल्ले आणि पोटाला आधार दिला, थोडासा आराम करून सूर्याचे फोटो काढले आणि पुढे चालायला सुरवात केली. कळसुबाईचे शिखर व लावलेले भगवे झेंडे दिसत होते पण, बऱ्याच महिन्यांनी एवढे चालल्या कारणाने पायात त्राण उरले नव्हते. पाय लटपटू लागले होते, कसेबसे हळूहळू चालत शिखर गाठले. कळसुबाईला शिखरावर जाताना एकूण चार लोखंडी शिड्या लागतात. सुरवातीच्या तीन शिड्यांच्या पायऱ्या अरुंद असल्या कारणाने, सावध पाने चढावे व उतरावे लागते.   चौथ्या क्रमांकाची शिडी ही तुम्हाला डायरेक्ट शिखरावर घेऊन जाते. शिडी फार उंच असली तरी त्याच्या पायऱ्या मात्र रुंद आहेत त्यामुळे काळजी करावी लागत नाही. 

👉 दुर्ग नॅव्हिगेशन ऍप प्लेस्टोरवरून डाउनलोड करा


कळसुबाई शिखर ग्रुप फोटो
कळसुबाई शिखर ग्रुप फोटो

चौथ्या शिडीवरील ग्रुप फोटो
चौथ्या शिडीवरील ग्रुप फोटो

    अंदाजे सकाळी ६:५० च्या दरम्यान आम्ही शिखरावर पोहचलो. शिखरावर बरीच मंडळी सूर्योदय पाहण्यासाठी रात्रीची येऊन बसली होती. शनिवार रविवार नसल्याकारणाने गर्दी फार कमी होती. सर्वप्रथम मंदिराच्या मागच्या बाजूस जाऊन बसलो आणि आराम केला, डब्यातून आणलेले खाऊ खाल्ले आणि सर्वजण तरतरीच झाले. मंदिरात जाऊन कळसू मातेचे दर्शन घेतले आणि  शिखरावरून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य पाहण्यात थोडा वेळ घालवला. आम्ही शक्यतो ट्रेकिंगच्या वेळेस शाकाहारी जेवणाला प्राधान्य देतो, पण १ मे बुधवारचा दिवस असल्याकारणाने बऱ्याचश्या मेंबर्सनी मांसाहारी जेवणाची इच्छा वर्तवली. शिखरावरूनच बाळू खडे यांना फोन करून विचारले की "जेवणाचा मेनू  बदलू शकतो का?" त्यांनी होकार दिला व आम्ही त्यांना मांसाहारी जेवण बनवायला सांगितले.  

    सूचना : कळसुबाई शिखरावर जिओचे नेटवर्क वेवस्तीथ मिळते, त्यामुळे कोणताही अपघात किंवा रस्ता चुकल्यास तुम्ही फोन करून मदत मागू शकता. ऐन वेळेस जेवणाचा मेनू बदलणे टाळावे, जेणेकरून गैरसोय होणार नाही, जेवण वाया जाणार नाही आणि ज्यांच्याकडे थांबला आहेत त्यांची धावपळ होणार नाही. आमच्या बाबतीत सकाळीच फोन करून कळवले म्हणून मेनू बदलून मिळाला. ही गावे शहरापासून दूर आहेत, त्यामुळे हवी ती वस्तू / खाद्य पदार्थ मिळतील याची आशा बाळगू नये. आपण येथे ट्रेकिंग करायला आलो आहोत, रिसॉर्ट मध्ये मजा मस्ती करायला नाही याचे भान ठेऊनच वागावे ही सर्वांना विनंती.

कळसुबाई शिखरावरून दिसणारा सूर्योदय
कळसुबाई शिखरावरून दिसणारा सूर्योदय

    सूर्यनारायण वर येत होता तसतसे तापमान वाढू लागले होते, म्हणून खाली उतरायचा निर्णय घेतला. शिखरावर एक-दोन माकडे दिसली होती त्यामुळे थोडा अंदाज आलाच होता की खाली उतरताना माकडांचा त्रास होणार आहे आणि तसेच झाले. माकडे हुशार!  जेव्हा आम्ही शिडीवर आमचा तोल सांभाळत उतरत होतो त्याच वेळेला आमच्या बॅगांवर हात घालत होते, म्हणजे दोन्ही हात रेलिंग पकडून असल्याकारणाने त्यांना दूर लोटणे अवघड जात होते व त्यांचे काम सोपे जात होते. आम्ही आधीच तयारी करून होतो  मोबाईल, सेल्फी स्टिक, इत्यादी वस्तू बॅगेत भरले होते. काही अंतर खाली उतरल्यावर एक दुकान उघडे दिसले, तिथे बसून आम्ही लिंबू सरबत प्यालो थोडा आराम केला आणि खाली उतरायला सुरुवात केली. अंदाजे साडेदहा अकरा वाजले होते, उन्हाळा असल्याकारणाने घामाच्या धारा निघत होत्या, जर हा ट्रेक आम्ही दिवसा केला असता तर कुणास ठाऊक आमचे काय हाल झाले असते? साडेअकरा पर्यंत आम्ही बाळू खडे यांच्या घरी पोहोचलो. तिथे सर्वांनी आराम केला, काही मंडळींनी झोपही काढली! जेव्हा जेवण तयार झाले तेव्हा बाळू खडे यांनी निरोप पाठवला, आम्ही सर्वजण पोट भरून जेवलो आणि परतीच्या मार्गाला निघालो. २:४२ ची कसारा सी.एस.एम.टी जलद लोकल पकडून आम्ही मुंबईला पोहोचलो.

    

खर्चाचा तपशील (न्ह्यारी व पाणी बॉटल खर्च वगळून )


वेळेचा तपशील