गुमतारा - उसगाव मार्गे अपूर्ण राहिलेला ट्रेक

  

प्रवासाची तारीख : ६ नोव्हेंबर २०२२
वाहतुकीची पद्धत: ट्रेन आणि बस



किल्ल्याचा इतिहास

    गुमतारा हा किल्ला शिलाहारांच्या काळापासून अस्तित्वात असावा. पुढे मराठा राजवटीत शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नूतनीकरण केले. २४ मार्च १७३७ रोजी वसईच्या मोहिमेदरम्यान माहुली किल्ला सोडल्यानंतर पेशव्यांनी गुमताराच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात विश्रांती घेतली, परंतु पाण्याच्या अभावामुळे ते जास्त काळ टिकू शकले नाहीत आणि त्यामुळे ३ ते ४ सैनिक मरण पावले.


 सार्वजनिक वाहतुकीने कसे पोहोचायचे 

  • वसई आणि विरार हे जवळचे रेल्वे स्थानक आहेत - मुंबई लोकल वेस्टर्न लाईन. 
  • विरार गाडीत चढून वसईला उतरा. 
  • तुम्ही उसगाव धरणावरून ट्रेक करण्याचे ठरवले असल्यास वसई पश्चिम आगारातून जवाहर किंवा वज्रेश्वरी बस घ्या आणि उसगाव धर स्टॉपवर उतरा. 
  • जर तुम्ही दुगड - मोहिली गावातून ट्रेक करायचे ठरवले असेल तर जवाहर बस घ्या आणि अंबाडी येथे उतरा. 
  • वेळ वाचवण्यासाठी तुम्ही वसई आणि विरार येथून थेट ऑटो रिक्षा भाड्याने घेऊ शकता, परंतु ते जास्त शुल्क आकारतील.

👉 खर्चाचा व वेळेचा तपशील पह 



गुमतारा डोंगर
गुमतारा डोंगर


प्रवास आणि ट्रेकचा अनुभव

    
    हृदयस्पर्शी इतिहास व कमी प्रचलित असलेला हा किल्ला सर करण्याचे नियोजीले. आम्ही किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गांची माहिती गोळा करायला सुरवात केली, प्राथमिक माहिती नुसार अंबाडी, दुगड मार्गे मोहिली गावातून जाता येते तर, दुसरा मार्ग उसगाव धरणाच्या मागून जातो, पण यूट्यूब वर मात्र दुगड - मोहाली मार्गे जाणारेच व्हिडिओच दिसत होते, उसगाव मार्गाचा एकही व्हिडीओ यूट्यूब वर उपलब्ध नाही. म्हणून आम्ही दुगड मार्गे जाण्याचे ठरविले, पण नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते ते आपल्याला पुढे कळेलच. मी आणि इतर दोन सदस्यांनी (शैलेश सावंत,  आणि विलास काका) असे तिघे सकाळी ७:१२ ला गोरेगाव स्टेशनवरून विरार लोकलमध्ये बसून आमचा प्रवास सुरू केला. सकाळी ७:५५ च्या सुमारास आम्ही वसई स्थानकावर उतरून पश्चिमेकडे निघालो आणि MSRTC वसई बस डेपोत पोहोचलो. आम्ही बसच्या वेळेची चौकशी केली; जवाहरची बस सकाळी 8:30 वाजता येणार होती, पण नेहमीप्रमाणेच MSRTC ची बस उशीर आली, अंदाजी ८:५५ च्या दरमण्या आम्ही बस मध्ये चढलो आणि अंबाडी गावाच्या दिशेने निघालो, नियोजना प्रमाणे आम्ही अंबाडी ची तिकीट काढली, पण बस ला झालेला उशीर तसेच बस बरेच गाव फिरून अंबाडी ला जाणार होती, म्हणजे अजून एक ते दीड तास लागणार होता यामुळे आम्ही उसगाव धर ला उतरायचे ठरविले. सकाळी १०:३० च्या सुमारास उसगाव धर बस थांब्याला उतरलो, शेजारच्या स्टॉलवर नाश्ता केला आणि वज्रेश्वरी रस्ता ओलांडत उसगाव धरणाकडे चालायला लागलो. 
टीप: वसई  MSRTC बस डेपोपासून उसगाव धर ३३ किमी आहे आणि पोहोचण्यासाठी १ तास लागतो. उसगाव धर बस थांबा हा वज्रेश्वरी मंदिराच्या थांब्यापूर्वीचा चौथा थांबा आहे. दुपारच्या जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी या परिसरात योग्य रेस्टॉरंट्स किंवा ढाबा उपलब्ध नाही; म्हणून, आपल्यासोबत पुरेसे अन्न आणि पाणी घेऊन जाणे. तज्ञाशिवाय उसगाव धरण ट्रेकचा मार्ग वापरण्याचा प्रयत्न करू नये कारण, जंगल घनदाट आहे आणि त्यात वाट चुकण्याची दाट शक्यता आहे. 

उसगाव धारणाकडे जाणारा मार्ग
उसगाव धारणाकडे जाणारा मार्ग

गावदेवी मंदिर
गावदेवी मंदिर

    उसगाव गावातून गुमतार्याला जायला वाट असली तरी सहसा या वाटेने कोण्ही जात नाही, दुगड ला पोहचायला उशीर झाल्या कारणाने तसेच भर दुपारी डोंगर चढताना उन्हाच्या झळा लागतील म्हणून, उसगावच्या जंगलातून जाण्याचे ठरविले. आम्ही उसगाव धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर किमान १ किलोमीटर पायपीट केल्यानंतर, गावदेवी मंदिरासमोर पोहचलो. मंदिराच्या बाहेरूनच देवीचे दर्शन घेत आम्ही पुढे निघालो. या मार्गावरून गुमतारा पर्वत स्पष्ट दिसत होता. उसगाव धरणाच्या मार्गाने चालत असताना, आम्हाला काही गावकरी भाताच्या पेंद्या झोडपताना दिसल्या, शहरात हे सर्व पाहायला कुठे मिळते हो, म्हणून थोडा वेळ पाहत उभे राहिलो आणि पुन्हा धरणाच्या दिशेने निघालो. पुढे जाऊन आम्ही डावे वळण घेतले आणि धरणा पाशी पोहचलो, गावातील काही स्त्रिया धरणाच्या पाण्यात कपडे धुवत होते. आम्ही उजवीकडे कडे वळलो आणि सरळ चालत धरणाच्या भीती पाशी पोहचलो. जवळ जवळ १ किलोमीटर लांब धरणाची भिंतीवर चालून आम्ही पलीकडच्या बाजूला म्हणजे धरणाच्या मागच्या बाजूला (बॅक वॉटर) पोहचलो. ही जागा अतिशय सुंदर आणि शांत आहे, आम्ही काही काळ तिथे विश्राती घेतली, छान छान फोटो काढले आणि गुमताराच्या दिशेने कूच केली. 

उसगाव धारण मागिलबाजू
उसगाव धारण मागिलबाजू

उसगाव धारण मागिलबाज
उसगाव धारण मागिलबाजू
 
    सकाळी ११:३० वाजता आम्ही पायथ्याशी असलेल्या गावात (आदिवासी पाडा) पोहोचलो आणि गुमताराकडे जाणाऱ्या मार्गाची चौकशी केली. स्थानिकांच्या मदतीने आम्ही डोंगराजवळ पोहोचलो, पण नेमका कोणता मार्ग आम्हाला गुमतारा किल्ल्यावर घेऊन जाईल याबाबत शंका होती. आम्ही गावातील काही व्यक्तीं कडे चवकशी केली, त्याने आम्हाला अंदाजे मार्ग दाखवला आणि "बैल कडच्या" मागच्या बाजूला जायला सांगितले, पण शेवटची ओळ एकूण आमचा तणाव वाढला "गुमतारा किल्ल्यावर या वाटेनं कोण्ही जात नाही आणि आम्ही ही कधी या वाटेने गेलो नाही!". त्यांने सांगितल्या प्रमाणे आम्ही पुढे गेलो आणि अजून एका घरा शेजारी जाऊन चौकशी केली, त्यांनी पण बैल कड्याची वाट दाखवली आणि पाण्याच्य ओढ्याच्या उलट्या दिशेने वर जायला सांगितले. आम्ही त्यांना सोबत मार्गदर्शक म्हणून येण्याची विनंती केली, पण त्यांची शेतीची कामे चालू असल्या कारणाने त्यांने नकार दिला तसेच त्यांच्यातील पण या वाटेने किल्ल्यावर कोणी गेले नव्हते!

गावातील घर आणि शेती
गावातील घर आणि शेती

टीप: प्रचलित मार्ग अंबाडी--> दुगड--> मोहिलील गाव आहे, जिथून गुमतारा ट्रेक सुरू होतो, पण आम्ही अपरिचित किव्हा कमी रहदारीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होतो; फक्त तज्ञ आणि योग्य ट्रेकिंग उपकरणांसह प्रयत्न करा. 

     गावकर्यांनी दिलेली मार्गदर्शनाचे पालन करून आम्ही जंगलात प्रवेश केला आणि पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशने चालायला सुरुवात केली. पुडील १० ते १५ मिनिटातच आम्ही अश्या ठिकाणी पोहचलो जिथून पुढे जाण्याची वाट बंद होत होती आणि ओढ्यांच्या खडकांवरून चडून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे. आम्ही जवळपास १० ते १५ मिनिटे मार्ग शोधत होतो अखेर थकलो आणि आम्ही तिघे एका झाड खाली विश्रांती साठी बसलो. पुढे काय करायचे याची चर्चा करत असताना माझे लक्ष सहज झाडावर गेले, पाहतो तर काय एक मोठा कोळी त्याच्या विणलेल्या जाळ्यात बसला होता, याला "जायन्ट वूडन स्पायडर" असे म्हणतात हा अंदाजे १ ते १.५ इंच लांब असतो. आम्ही तिकडनं बाजूला झालो आणि पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे ठरविले. हे जंगल घनदाट आणि कमी वर्दळीचे आहे हे आमच्या लक्षात आले होते, शैलेश ने पुन्हा एकदा वाट शोधण्याचा प्रयत्न चालू केला आणि यावेळी त्याला मळलेली पायवाट सापडली.

जायन्ट वूडन स्पायडर
जायन्ट वूडन स्पायडर

गुमतारा जंगल आणि गावकर्यांनी केलेल्या वेशीच्या खुणा
गुमतारा जंगल आणि गावकर्यांनी
केलेल्या वेशीच्या खुणा 

    मिळालेल्या पायवाटेवर चालत आम्ही पुढे गेलो आणि २० मिनिटांत एक छोटा डोंगर (टेकडी) पार केली.  १५ मिनिटे विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो आणि दरी मधील ओढ्या पाशी पोहचलो, ओढ्याला पाणी नव्हते, पण पावसात प्रवाह मात्र मोठा असणार हे मोठं मोठे खडक पाहून लक्षात येत होते, हा दुसरा ओढा पार केला आणि पुढे निघालो. काही अंतर पुढे गेल्या वर आम्हाला त्याच ओढ्यात पाण्याचा जारा सापडला, आजू बाजू चा परिसर पहिला आणि पाणी स्वाच्या असल्याची खात्री करून घेतली, आम्ही आमच्या रिकामी झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. पाणी भरण्याच्या नादात आम्ही मुख्य वाट सोडून दुसऱ्याच वाटे वर चालू लागलो, पुढे गेल्या वर ती वाट बंद झाली आणि आम्ही पुन्हा मागे फिरून जिथे पाण्याच्या बाटल्या भरल्या होत्या त्या ठिकाणी आलो. गूगल मॅप्स च्या साह्याने गुमतारा किल्ल्याच्या ठिकाणाशी आमच्या स्थानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण जंगलाच्या मध्य भागी आलस्य कारणाने मोबाइलला ला नेटवर्क नव्हते, आणि जे थोडे फार नेटवर्क होते ते जिओ सिम लाच. गूगल मॅप्स सुद्धा आम्हाला गंडवत आहे हे लक्षात येताच आम्ही विकसित तंत्रज्ञान खिशात टाकले आणि शैलेश ने त्याच्या अनुभवाचा वापर करत रस्ता शोधून काढला, पण पुन्हा आमची जवळपास ३० मिनटे वाया गेली होती! 

टीप: आता पर्यंत जितके ट्रेक केलेत त्यात एक गोष्ट लक्षात आली, की जिओ सिमची नेटवर्क जंगलात बऱ्यापैकी मिळते, म्हणून ट्रेकला जनता, जिओचे सिम न विसरता घेऊन जातो.

    दुपारचे जवळपास १:००  वाजले होते, आणि आम्ही अर्धा ट्रेक पूर्ण करून एका पठार सदृश्य जागेवर पोहचलो होतो, हे पठार म्हणजेच "बैल कडा" वरची मागची बाजू. तिथून उसगाव धरण स्पष्ट दिसत होते. जवळ जवळ अर्धा तास चालल्यावर पुन्हा एकदा पायवाट अस्पष्ट झाली आणि पुन्हा वाट शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले. नुकताच पावसाळा संपला होता, रान माजले होते पायवाट झाडाझुडपांनी व्यापलेली होती. शैलेशने मार्ग मोकळा केला, आणि आम्ही गुमताऱ्याच्या दिशेने पुढे निघालो. जंगलाचे घनत्व इतके होते की भर दुपारी सूर्याचे दर्शन होत नव्हते तसेच सूर्य किरणांचा प्रकाश क्वचितच जमिनीवर पडत होता! जिओ सिम ला जे थोडे फार नेटवर्क होते तेही नाहीसे झाले होते, म्हणजे जर काही प्रसंग उद्भवला तर मदद मागवणे सुद्धा शक्य नव्हते. 

     आम्हाला पुढे गेल्या वर आणखी एक छोटासा ओढा लागलं, ओढ्याच्या पलीकडेच एक पाय वाट जात होती पण ती आमच्या निदर्शनास आली नाही आणि आम्ही ओढ्याच्या विरुद्ध दिशेने चढायला चालू केले, आणि काही अंतर पुढे जाऊन ओढ्याच्या पलीकडच्या बाजूने प्रदक्षिणा घालत शिखराच्या पलीकडच्या बाजूस पोहचलो. पुन्हा एकदा वाट अस्पष्ट झाली आणि पुढे जाण्याचा मार्ग काही सापडेना. यशापासून थोडेच अंतर दूर होतो, डोंगर माथा निव्वळ ३ ते ४ माजली उंचावर होता, पण स्पष्ट वाट काही सापडत नाही होती. शैलीचे लक्ष मात्र घड्यावर होते, दुपारचे दोन वाजले होते. पुढचे १० ते १५ मिनिटे वाट शोधण्याचा प्रयत्न कारेन, नाही सापडली तर परतीच्या प्रवासाला सुरवात करू असे शैलेश ने सांगितले. "हिवाळ्याचे दिवस होते, सूर्य लवकर मावळणार त्यात घनदाट जंगल म्हणजे लवकर अंधार होणार, तसेच जरी योग्य वाट सापडली आणि किल्ल्यावर पोहचलो तरी परतीच्या प्रवास दरम्यान वाट शोधण्यात त्रास झाला असता. आम्ही ज्या वाटेने आलो त्या वाटेत २ ते ३ तासाच्या प्रवास दरमण्या मानवी वस्ती किव्हा तिच्या खुणा दिसत नव्हत्या. ज्या वाटेने आलो होतो ती वाट अस्पष्ट आणि लंपन डाव खेळणारी होती.  ह्या सर्व बाबी लक्षात घेणे अनिवार्य होते". शैलेश ने पुढची १० मिनिटे, वाट शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण स्पष्ट वाट काही सापडली नाही. अखेरीस आम्हाला थांबावे लागले आणि परतीचा प्रवासाला सुरवात केली.

    परतीच्या प्रवासाला सुरवात केली खरी, पण ज्या मार्गाने आम्ही आलो होतो तो मार्ग आम्हाला सापडत नव्हता, थोडासा गोंधळ ऊधाला, पण शैलेश ने मात्र डोक शांत ठेवत मार्ग शोधून काढला!  आम्ही उतरत असताना ओढ्या जवळ पोहचलो आणि मळलेली वाट आमच्या निदर्शनास पडली, वरील सांगितल्या प्रमाणे हीच वाट जी आम्हाला दिसली नव्हती. सापडलेल्या वाटेने पुन्हा गडावर जाण्याचा प्रयत्न करावा असे वाटत होते, पण वेळ संपला होता, वाट भेटूनही आम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिलो आणि आम्ही आमच्या मनावर आवर घातला व सरळ खाली उतरायला सुरुवात केली. आम्ही पठारावर पोहचलो (बैल कडा). आणि मळलेल्या वाटेने उतरणे चालू ठेवले, पुढे गेल्यावर लक्षात आले की ज्या वाटेने आम्ही आलो होतो ती ही वाट नाही (कारण ज्या वाटेने आलो होतो त्या वाटेने मागे वळून पाहिल्यास उसगाव धरण दिसत होते). आम्ही घाई घाईत डाव्या बाजूची वाट न घेता उजवी कडील वाटेने उतरत होतो. पण ही वाट सुद्धा खाली जात होती म्हणून आम्ही पुन्हा मागे फिरून वेळ वाया न घालवता, आहे त्याच वाटेने उतरणे चालू ठेवले. आम्ही ज्या वाटेने आलो होतो त्यापेक्षा ही वाट स्पष्ट आणि मळलेली होती, त्यामुळे आम्ही निवांतपणे पुढे जात राहिलो. 

    तासभर उतरल्यानंतर आम्हाला शेत मांगर दिसला, हे पाहून आम्ही निर्धास्त झालो कारण या वाटेवर मानवी उपस्तीथी असल्याचे लक्षण होते. काही वेळातच आम्ही एका धबदब्या जवळ पोहचलो, जिओ सिमला नेटवर्क आले होते म्हणून आम्ही गूगल मॅप वर शोधले आणि त्या धबधब्याचे नाव "बोकड कडा" असे आढळले. धबधब्याला पाणी नव्हते, आणि पाणी जरी असते तरी अंघोळ करण्याकरिता आमच्या कडे वेळ नव्हता!  सूर्यास्ताच्या आधी पायथ्याच्या गावात पोहोचायचे होते म्हणून आम्ही पुढे जात राहिलो. सायंकाळी ४:३० च्या सुमारास, आम्ही ओढ्या जवळ पोहोचलो, १५-२० मिनिटे विश्रांती घेतली, ओढ्याच्या पाण्यात हात पाय धुतले आणि पायांना विश्रंती दिली. आता आमच्या जीवात जीव आला होता आणि मन आणि शरीर तरतरीत झाले होते.  काही फळे आणली होती ती खाल्ली आणि पुढे निघालो. १०-१५ मिनिटे चालल्यानंतर आम्ही पाहिले की गावकरी शेतीच्या कामात व्यस्त होते. आम्ही वज्रेश्वरीला जाणाऱ्या मार्गाबद्दल विचारले त्यांने आम्हाला, "शैतान पुल" पर्यंत याच मार्गाने चालत रहावे आणि तिथून तुम्हाला ऑटोरिक्षा मिळेल असे सुचविले. आम्ही आमचे सध्याचे लोकेशन जाण्याकरिता गूगल मॅप पुन्हा चालू केले आणि पाहून आश्चर्याचा धक्काच पोचला. आम्ही (उसगाव) सुरुवातीच्या ठिकाणापासून १५-१६ किमी दूर घोटगाव येते होतो, जे वज्रेश्वरी मंदिराच्या पलीकडे आहे. 

वज्रेश्वरी मंदिरापूर्वीचा चौथा थांबा असलेल्या उसगाव धर येथून आम्ही सुरुवात केली आणि वज्रेश्वरी मंदिरानंतरचा पुढील थांबा असलेल्या घोटगावला उतरलो. 

सेल्फी - मी, विलास काका आणि शैलेश दादा
सेल्फी - मी, विलास काका आणि शैलेश दादा

बोकड काड्या जवळ आकाशाला गवसणी घालणारे झाड
बोकड काड्या जवळ आकाशाला
गवसणी घालणारे झाड

    अंदाजे ३० मिनिटे चालल्यानंतर आम्ही एका गावात पोहोचलो आणि सुदैवाने आम्हाला एक ऑटोरिक्षा मिळाली. ऑटो चालक एक भली व्यक्ती होती; आम्ही त्याला शैतान पुल येथे सोडण्यास सांगितले, परंतु त्याने आम्हाला गणेशपुरी बस डेपोत  उतरण्यासाठी सुचविले, जेणेकरून आम्हाला वसई किंवा विरार आगारासाठी बस मिळेल. संध्याकाळी ५:३० च्या सुमारास गणेशपुरी बस डेपोत पोहोचलो. आम्ही संध्याकाळी ६:०० वाजता येणाऱ्या बसची चौकशी केली. पण नेहमीप्रमाणे MSRTC बस संध्याकाळी ६:३० वाजता उशिरा व आधीच भरून आली होती, बसमध्ये उभे राहण्यासाठी जागा नव्हती. म्हणून आम्ही रिक्षाने जायचे ठरवले, १५० रुपये खर्च केले आणि संध्याकाळी साडेसातच्या सुमारास विरार स्थानका जवळ पोहोचलो. आम्ही चर्चगेट लोकलमध्ये चढलो आणि रात्री ८:५० च्या सुमारास गोरेगाव स्टेशनवर उतरलो. 

    आम्ही गड माथ्यावर पोहोचलो नाही, ट्रेक अपूर्ण असला तरी पण घनदाट जंगलात फसल्याने वाट शोधण्याचा नवीन अनुभव मिळाला आणि निसर्ग सौंदर्य अनुभवले. पुढच्या वेळी उसगाव धारणा मार्गेच गुमतार किल्ला गाठू असा परतीच्या प्रवासात निश्चय केला. पाहू आता कधी योग जुळून येतो ते! शैलेश दादा आणि विलास काका यांचे खूप खूप आभार!

खर्चाचा तपशील (जेवण वगळून)

खर्चाचा तपशील (जेवण वगळून)


वेळेचा तपशील

वेळेचा तपशील


👉ब्लॉगच्या सुरुवातीला जा



ब्रम्हगिरी ट्रेक - त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग


प्रवासाची तारीख: १५ ऑक्टोबर २०२२
वाहतुकीचे साधन: ट्रेन आणि बस


ब्रम्हगिरी टेकडीचा इतिहास


    ब्रह्मगिरी हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील एक टेकडी आहे. हा टेकडी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. त्र्यंबकेश्वर शिवमंदिर या ठिकाणाजवळ आहे. पवित्र गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकजवळ आहे. ती १,४६५ किलोमीटर (९१० मैल) वाहते, प्रथम दख्खन पठार ओलांडून पूर्वेकडे जाते आणि नंतर आग्नेय दिशेने वळते, आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्हा आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यात प्रवेश करते, जोपर्यंत ती दोन जलप्रवाहांमध्ये विभागली जात नाही आणि एका मोठ्या नदीच्या त्रिभुज प्रदेशात रुंद होते आणि बंगालच्या उपसागरात वाहते.

    ब्रह्मगिरी, भगवान ब्रह्मदेवाचा टेकडी (गिरी) अनेक पौराणिक आणि पौराणिक कागदपत्रांमध्ये आढळते. पुराणांमध्ये असे म्हटले आहे की गौतम महर्षी आणि त्यांची पत्नी अहिल्या या टेकडीवर राहत होते. संत गौतम यांनी गंगा या टेकडीवर आणण्यासाठी भगवान शिवाची पूजा केली. ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये ही नदी गौतमी नदी म्हणून ओळखली जाते.

    डोंगरावर पाणी तीन दिशांना वाहते. पूर्वेकडे वाहणारी गोदावरी नदी, दक्षिणेकडे वाहणारी वैतरणा नदी आणि पश्चिमेकडे वाहणारी गंगा पश्चिमेकडील गंगा म्हणून ओळखली जाते आणि चक्रतीर्थाजवळ गोदावरीला मिळते. अहिल्या नदी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासमोर गोदावरीला मिळते.

सार्वजनिक वाहतुकीने कसे पोहोचायचे


  • नाशिक हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
  • मुंबई आणि पुण्याहून नाशिकला जाण्यासाठी अनेक गाड्या उपलब्ध आहेत.
  • नाशिक रोड बस डेपो वरून नाशिक परिवहन बसेस त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगासाठी ३० ते ४५ मिनिटांच्या अंतराने उपलब्ध आहेत.
  • जर तुम्ही नाशिक येथे रस्त्याने पोहोचलात तर जवळचा बस डेपो नाशिक जुना सीबीएस आहे, तुम्हाला दर ३०-४५ मिनिटांच्या अंतराने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगासाठी नाशिक परिवहन बसेस मिळतील.
  • त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून ट्रेकच्या सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला ३०-४५ मिनिटे चालावे लागते.


प्रवास आणि ट्रेकिंगचा अनुभव


    मी १९९३ मध्ये ३ वर्षांचा असताना माझ्या आईवडिलांसोबत हा ट्रेक केला होता. २९ वर्षांनंतर, पुन्हा एकदा मला माझ्या मित्रांसोबत (कौशल, विनायक आणि रोहिदास) ब्रम्हगिरी पर्वतावर ट्रेक करण्याची संधी मिळाली. खरा प्लॅन ब्रम्हगिरी मार्गे दुर्गभंद्र किल्ल्याला भेट देण्याचा होता.

    आम्ही दादर स्टेशन - मुंबई येथून सकाळी ६:०० वाजता तपोवन एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढलो आणि सकाळी १०:३० च्या सुमारास नाशिकला उतरलो. नाशिक स्टेशनच्या बाहेर आम्ही नाश्ता केला.  माझ्या मते, स्टेशनच्या बाहेर हॉटेल्समध्ये जेवणाची चव आणि दर्जा चांगला नसतो; किमान चहासाठी तरी रस्त्याच्या कडेला असलेल्या स्थानिक विक्रेत्यांकडून जेवणाचा आस्वाद घ्या.

    आम्ही प्रथम वाणी - सप्तशृंगी देवीच्या मंदिराला भेट देण्याचे ठरवले, म्हणून आम्ही जुन्या सीबीएस (सेंट्रल बस डेपो नाशिक) साठी नाशिक सार्वजनिक वाहतूक बसने चढलो आणि तेथून आम्ही सप्तशृंगी पर्वतासाठी वाणी बसने चढलो.
टीप: रिक्षा किंवा खाजगी वाहने भाड्याने घेऊ नका; ते जास्त पैसे घेतील.  नाशिक रोड बस डेपोमधून नाशिक जुन्या सीबीएस बस डेपोकडे जाण्यासाठी दर १ तासाच्या अंतराने बसेस आहेत. जुन्या सीबीएस बस डेपोमधून वणी आणि त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी दर तासाला बसेस उपलब्ध आहेत.

    आम्ही दुपारी १:३० वाजता वाणी - सप्तशृंगी पर्वतावर पोहोचलो; पायऱ्या चढण्याऐवजी, आम्ही रोपवे (ट्रेन) ने जाण्याचा निर्णय घेतला, ज्याचे भाडे १०० रुपये होते आणि परतीचे तिकीट होते. आम्ही सप्तशृंगी देवीचे जवळून दर्शन घेतले आणि मंदिराच्या पायथ्याशी परतलो. मंदिराच्या विश्वस्तांनी भाविकांसाठी एक इमारत बांधली, ज्यामध्ये फूड कोर्ट, दुकाने आणि विश्रांती कक्ष आहेत. आम्ही तिथे जेवण केले, जेवण चविष्ट आणि परवडणारे आहे. जेवणानंतर, आम्ही दुपारी ४:३० वाजता नाशिकच्या जुन्या सीबीएस डेपोकडे परतीचा प्रवास सुरू केला.

सप्तशृंगी वाणी रोपवे
वाणी सप्तशृंगी रोपवे

सप्तशृंगी देवी
सप्तशृंगी देवी


    आम्ही एमएसआरटीसी बसची वाट पाहत होतो, तेव्हा एक शेअर्ड टॅक्सी ड्रायव्हर आमच्याकडे आला आणि म्हणाला की तो फक्त १२० रुपयांत जुन्या सीबीएस डेपोमध्ये सोडेल, एमएसआरटीसी बसपेक्षा फक्त ५ रुपये जास्त,  आम्ही टॅक्सीमध्ये प्रवाशांची संख्या जास्त नसल्याची खात्री केली आणि शेअर्ड टॅक्सीने जाण्याचे मान्य केले.

    आम्ही संध्याकाळी ६:०० वाजता जुन्या सीबीएस बस डेपोत पोहोचलो, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्टॉलवर चहा घेतला आणि त्र्यंबकेश्वर बसची वेळ तपासण्यासाठी सीबीएस डेपोत गेलो. सुदैवाने, बस आमच्या समोर उभी आहे आणि निघण्यासाठी तयार आहे. आम्ही रात्री ८:०० वाजता त्र्यंबकेश्वरला पोहोचलो.

    आम्ही श्री गगनगिरी महाराज भक्त निवासमध्ये आधीच एक खोली बुक केली आहे. आम्ही भक्त निवासात पोहोचलो आणि आम्हाला कळले की मी माझ्यासोबत ओळखपत्राची (आधार कार्डची) छायाप्रत आणायला विसरलो होतो, म्हणून आम्ही प्रिंटर/झेरॉक्स दुकान शोधण्यासाठी बाहेर पडलो. जवळजवळ ३० मिनिटे घालवल्यानंतर, आम्हाला एक दुकान सापडले, माझ्या आधार कार्डची प्रिंटआउट घेतली आणि खोल्यांमध्ये चेक इन केले, पण दर्शनाची वेळ चुकली.

टीप: इतर खाजगी हॉटेल्सपेक्षा खोलीचे भाडे स्वस्त आहे; खोल्या स्वच्छ आणि नीटनेटक्या आहेत; त्यांच्याकडे गीझरची सुविधा देखील आहे, त्यामुळे हिवाळ्यात गरम पाण्याची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही खालील वेबसाइटवरून ऑनलाइन खोल्या बुक करू शकता: https://yatradham.org/ तुमचे राज्य किंवा गंतव्यस्थान शोधा आणि तुमची खोली बुक करा.

स्वामी गगनगिरी महाराज भक्त निवास

    आम्ही फ्रेश झालो आणि मंदिराकडे निघालो, पण दरवाजे आधीच बंद असल्याचे आढळले, म्हणून आम्ही जेवण केले, मंदिराभोवती फेरफटका मारला, काही खरेदी केली आणि रात्री ११:३० वाजता विश्रांतीसाठी भक्त निवासात गेलो. दुसऱ्या दिवशी, आम्ही पहाटे ३:३० वाजता उठलो आणि दर्शनासाठी तयार झालो. पहाटे ५:०० वाजता आम्ही दर्शन रांगेत होतो. पहाटे ५:३० च्या सुमारास, मंदिराचे दरवाजे उघडले, मी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले, मंदिराबाहेर काही फोटे काढले आणि आम्ही न्ह्यारीसाठी गेलो..

त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर द्वार

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर

    नाश्ता केल्यानंतर, आम्ही सकाळी ७:०० वाजता ब्रम्हगिरीकडे जाण्यासाठी आमचा ट्रेक सुरू केला. माझ्या एका मित्राने मला आधीच माकडांबद्दल इशारा दिला होता, म्हणून आम्ही त्यानुसार तयारी केली होती. ब्रम्हगिरी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतर आम्हाला माकडांचा एक गट दिसला आणि इतकी काळजी घेतल्यानंतरही, एका बाळ माकडाने माझ्या हातावर नख मारले. आम्ही गेट ओलांडले, लिंबाच्या रसाच्या स्टॉलवर विश्रांती घेतली आणि जखमही साफ केली.

ब्रम्हगिरी ट्रेल

ब्रम्हगिरी पर्वताचा नकाशा

    दोन ग्लास लिंबाचा रस पिऊन आम्ही डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो. सकाळी १०:०० वाजता आम्ही माथ्यावर पोहोचलो. योग्य दिशा शोधण्यासाठी आम्ही थांबलो आणि गोदावरी मंदिराकडे डावीकडे वळलो, जिथे गोदावरी नदीचा उगम होतो. आम्ही २-३ मंदिरांना भेट दिली आणि प्रत्येक मंदिरात संकल्पही केला.

गोमुख मंदिर - गौतमऋषी
गौमिख मंदिर - गौतमऋषी

मुळगंगा मंदिर
मुळगंगा मंदिर

टीप: प्रत्येक मंदिरात पुजारी/पंडित तुम्हाला संकल्पासाठी हातात पाणी धरून बसण्यास सांगतात. त्यानंतर, ते दक्षिणा (शुल्क) मागतात, माझ्या वैयक्तिक मतानुसार, हा एक घोटाळा आहे; प्रत्येक मंदिरात संकल्प कर्वे की नाही हा प्रत्येकाचा श्रद्धेचा प्रश्न आहे. तुम्ही फक्त नकार देऊ शकता, परंतु आम्हाला या घोटाळ्याची माहिती नव्हती आणि आम्ही बळी पडलो.

    सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेतल्यानंतर, आम्ही वळून जटा मंदिराकडे गेलो, जे डोंगराच्या उजव्या बाजूला आहे, जिथे भगवान शिवाच्या केसांच्या जटा आदळल्याचे निशाण तयार झाले आहे अशी मान्यता आहे.. दर्शन घेतल्यानंतर, आम्ही बाहेरील स्टॉलवरून एक काकडी खाल्ली आणि दुर्गभंडार किल्ल्याकडे प्रवास सुरू केला, दुर्गभंडार किल्ल्याकडे जाणारा मार्ग जटा मंदिराच्या मागील बाजूने सुरू होतो.

जटा मंदिर
जटा मंदिर

    त्या दिशेने जाताना आम्हाला आढळले की वाट खूपच अरुंद आहे आणि डाव्या बाजूला ६०० फूट दरी आहे. तरीही आम्ही पुढे चालत राहिलो, पण मध्यभागी पोहोचल्यानंतर आम्हाला आढळले की वाट गवताने व्यापलेली आहे आणि आम्हाला वाट सहज ओळखता येत नव्हती, म्हणून आम्ही धोका पत्करायचा नाही असे ठरवले आणि मागे वळून जटा मंदिराकडे परतीचा प्रवास सुरू केला.

दुर्गभंडार किल्ला
दुर्गभंडार किल्ला

    आम्ही उतरायला सुरुवात केली. ३० मिनिटे उतरल्यानंतर, आम्ही धर्मशाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या इमारतीत पोहोचलो. आम्ही काही फोटो काढले आणि गंगाद्वारच्या प्रवेशद्वाराकडे निघालो. आम्ही गंगाद्वारकडे डावीकडे वळलो, थोडा विश्रांती घेतली आणि ऊर्जा मिळविण्यासाठी नाश्ता केला. गंगाद्वार मार्गावर पोहोचल्यावर, आम्हाला २०० पेक्षा जास्त पायऱ्या चढायच्या आहेत हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. आम्ही आधीच प्रत्येक मंदिराला भेट देण्याचे ठरवले होते, म्हणून आम्ही गंगा मंदिराकडे चढायला सुरुवात केली. आम्ही दुपारी १२:३० वाजता गंगा मंदिरात पोहोचलो; त्यानंतर, आम्ही १०८ शिवलिंग गुहा, गोरक्षनाथ गुहा इत्यादी पाहण्यासाठी गेलो.

धर्मशाळा
धर्मशाळा

गंगाद्वार गेट
गंगाद्वार गेट

टीप: धर्मशाळच्या शेजारी असलेली पायऱ्यांची विहीर तुम्ही अवश्य पहा; ती शोधण्यासाठी स्थानिकांची मदत घ्या; आम्हाला माहिती नसल्याने आम्ही हे सुंदर स्मारक पाहू शकलो नाही.

    प्रत्येक गुहेत दर्शन आणि प्रार्थना केल्यानंतर, आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराकडे उतरायला सुरुवात केली. दुपारी १:०० च्या सुमारास आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो, काही खरेदी केली आणि भक्त निवास कक्षात पोहोचलो. भक्त निवास स्वागत कक्षात बसच्या वेळेबद्दल आम्ही चौकशी केली आणि रविवारी भाविक दर्शनासाठी येत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी आम्हाला दुपारी २ वाजता लवकर निघण्यास सांगितले. फ्रेश झाल्यावर, आम्ही आमच्या बॅगा पॅक केल्या आणि भक्त निवासातून बाहेर पडलो. आम्ही जेवण केले आणि एमएसआरटीसी बस डेपोकडे निघालो. आम्ही पुन्हा भाग्यवान होतो; बस आमच्या समोरच उभी होती आणि जुन्या सीबीएस डेपोकडे निघणार होती.

गौतमी गंगा
गौतमी गंगा

१०८ शिवलिंग
१०८ शिवलिंग

    आम्ही दुपारी ४:०० वाजता जुन्या सीबीएस डेपोवर पोहोचलो. बाहेरील डेपोतून आम्ही एक ऑटोरिक्षा भाड्याने घेतली, जी आम्हाला सामान्य दराने नाशिक रेल्वे स्टेशनवर सोडण्यास तयार झाली. आम्ही दुपारी ४:३० वाजता नाशिक रेल्वे स्टेशनवर पोहोचलो.

     आम्ही स्टेशनबाहेर प्रसिद्ध कोंडाजी चिवडा खरेदी केला, पण यावेळी आमचे दुर्दैव. तपोवन ट्रेन ४०-४५ मिनिटे उशिरा होती; ट्रेन संध्याकाळी ६:०० वाजता येणारहोती, पण ती संध्याकाळी ६:४५ वाजता आली. आम्ही रात्री ११:०० वाजता मुंबई - दादरला पोहोचलो.


   

जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे


अंजनेरी टेकडी, श्री हनुमानाचे जन्मस्थान
पंचवटी
हरिहर किल्ला


खर्चाचा तपशील  (जेवण वगळून)









हरिश्चंद्रगड ट्रेक


प्रवासाची तारीख: २९ जुलै, २०२२
वाहतुकीचे साधन: ट्रेन आणि बस




हरिश्चंद्र गडाचा इतिहास


    प्राचीन अग्नि पुराण आणि मत्स्य पुराणात हरिश्चंद्रगडाचा उल्लेख आहे. या किल्ल्याच्या गुहांमध्ये चांगदेव महाराजांनी तपश्चर्या केली होती. हा किल्ला भारतातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळील गुहांमध्ये भगवान विष्णूच्या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि त्या ११ व्या शतकातील असल्याचे मानले जाते. ११ व्या शतकात येथे अनेक गुहा कोरल्या गेल्या. या किल्ल्यावर १२ व्या शतकातील शिवमंदिर आहे. मुघलांनी, आदिवासी कोळी महादेव समुदायाकडून हा किल्ला ताब्यात घेतला. १७४७ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला मुघलांकडून घेतला आणि कृष्णाजी शिंदे यांना किल्ल्याचा प्रमुख म्हणून नियुक्त केले. १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.



प्रवास आणि ट्रेकिंगचा अनुभव


    ह्या ट्रेकची आजवर मी सर्वात जास्त वाट पहिली होती . ट्रेक बद्दल जास्त माहिती नसल्या कारणाने यावेळी आम्ही भटकंती ध्यास गडकिल्ल्यांचा गट आणि गटप्रमुख श्री. विजय सुतार यांच्यासोबत ट्रेक केला. आमच्या गटात गटप्रमुख धरून एकूण सात सदस्य होते. वेगवेगळे सदस्य वेगवेगळ्या स्टेशनवरून कासार ट्रेनमध्ये चढले. मी स्वतः दादरहून रात्री ११:०५ वाजता ट्रेनमध्ये चढलो आणि रात्री १:३० वाजता कसारा येथे उतरलो.



    कसारा रेल्वे स्थानकावर, आम्ही सर्वजण एकत्र येऊन स्टेशनबाहेर पडलो, जिथे विजयने आधीच जीप बुक केली होती. रात्री १:४५ च्या सुमारास, आम्ही कसारा रेल्वे स्थानकावरून निघालो आणि पहाटे ५:०० वाजता पाचनई गावात पोहचलो. आम्हाला जवळजवळ एक तास उशीर झाला होता. राजूरला वनविभागाची चौकी आहे तेथे प्रत्येकी ३० रु आणि गाडीचे १०० रु शुल्क भरले. पाचनई गावातील एका घरात गट प्रमुखाने नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. आम्ही फ्रेश झालो आणि नाश्ता (घरगुती पोहे आणि चहा) केला. सकाळी ६:३० च्या सुमारास आम्ही आमचा ट्रेक सुरू केला. सकाळी हवामान आणि धबधब्याचे दृश्य इतके सुंदर होते की आमचा उत्साह अजून वाढला.


पाचनई गावातील धबधबा
पाचनई गावातील धबधबा 

    काही आंतर चालल्यानंतर, आम्ही एका स्वागत कमानी जवळ पोहचलो, इथून खरी हरिश्चंद्र गडाचा ट्रेल चालू होतो. स्वागत कमानी जवळ एक ग्रुप फोटो काढला आणि पुढे निघालो. चढाई करताना आम्हाला काही गावकरी सामान घेऊन जाताना दिसले. आम्ही एका गावकऱ्याला विचारले, "किल्ल्यावर काही कार्यक्रम आहेत का?" त्याने उत्तर दिले, "हो, श्रावण महिना सुरू झाला आहे आणि उद्या श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. मंदिराचं सजावटी करीत फुले घेऊन चाललोय" सुमारे ३० मिनिटांच्या ट्रेकनंतर, आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो जिथे सर्व पर्यटकांना वेळ घालवायला आवडतो: ट्रेक मार्गावर एक छोटी गुहा आणि एक छोटासा पाण्याचा धबधबा. आम्ही थोडे भिजलो आणि फोटो काढून पुढे निघालो. त्यानंतर, आम्ही एका पाण्याच्या ओढ्या जवळ पोहोचलो, जो पुढे धबधब्यामध्ये रूपांतरित होतो. काही पर्यटक ओढ्यात डुबकीमारून आनंद घेत होते. आम्ही परतीच्या वेळी डुबकी मारायचे ठरवले आणि पुढे निघालो. थोडे अंतर पुढे गेल्यावर गावकऱ्यांनी व वनविभागाने बांधलेला धातूचा पूल दिसला, पुलावरून ओढा ओलांडत पलीकडच्या बाजूला गेलो.


पाचनई ते हरिश्चंद्र गड मार्ग
पाचनई ते हरिश्चंद्र गड मार्ग

    अवघ्या दोन तासांत आम्ही डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो. डोंगर माथ्यावरून दिसणारा परिसर सुंदर व मनमोहना होते. डोंगरांचा ढगांसोबतचा लपाछपीचा खेळ टाइमल्याप्स मध्ये टिपला आणि पुढे निघालो. चालत असतेवेळीच ढगांची चादर साराखाली आणि पुरातन हरिश्चंद्रेश्वर मंदिराचे शिकार दिसले आणि आमचा थकवा दूर झाला. मंदिराचे आकर्षण इतके होते की, न थांबता आम्ही त्या दिशेने पुढे चालत राहिलो.

हरिश्चंद्रेश्वर शिव मंदिर
हरिश्चंद्रेश्वर शिव मंदिर

    हरिश्चंद्रेश्वर शिव मंदिर, ११ व्या ते १२ व्या शतकात शिलाहार राजा झंज याने मंगळगंगा (मुळा) नदीच्या उगमस्थानी बांधलेले आहे. झंज राजाने अशी एकूण १२ मंदिरे १२ नद्यांच्या उगमस्थानी, पुणे व अहिल्यानगर (अहमदनगर) परिसरात बांधली होती.

    आम्ही मंदिराच्या परिसरात प्रवेश केला, प्रवेश कमानीवर दोन किर्तीमुखाची शिल्पे आहेत व चांगदेवांनी लिहलेल्या ओव्या आहेत. आम्ही गाभाऱ्यात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या सभोवतालचा परिसर पाहण्यास सुरुवात केली. मंदिर लहान असले तरी, आजूबाजूचा परिसर लहान गुहांनी / लेण्यांनी भरलेला आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत.

हरिश्चंद्रेश्वर मंदिरातील नंदी व शिवलिंग
हरिश्चंद्रेश्वर मंदिरातील नंदी व शिवलिंग 

ग्रुप फोटो
ग्रुप फोटो

    मंदिर परिसरातून बाहेर आलो आणि डावीकडे वळत केदारेश्वर लेणीकडे निघालो; लेणीच्या आत एक प्रचंड शिवलिंग आहे. चारपैकी तीन खांब तुटलेले आहेत; पौराणिक कथेनुसार, चार खांब चार युगांचे प्रतीक आहे. चौथा खांब तुटला की, कलियुग संपेल. जर आपण पौराणिक कथा बाजूला ठेवून हरिश्चंद्र किल्ल्याचा इतिहास तपासला असता, असे कळते कि काही काळ हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. मुघलांनी किल्ला जिंकल्यानंतर नेहमीप्रमाणे मंदिरे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असणार.

केदारेश्वर लेणीतील शिवलिंग
केदारेश्वर लेणीतील शिवलिंग

    केदारेश्वर लेणी पाहून झाल्यावर, आम्ही सप्ततीर्थ पुष्कर्णीच्या दिशेने निघालो. प्राचीन काळात, या पुष्करणीतील पाणी पिण्यासाठी तसेच इतर दैनंदिन कामांसाठी वापरले जात असे, परंतु आता पर्यटक या पुष्करणीचा वापर  स्विमिंग पूल म्हणून करत आहेत, जे चुकीचे आहे आणि हे थांबले पाहिजे. पुष्करणी जवळ थोडा वेळ घालवल्यानंतर, आम्ही सर्वात आकर्षक ठिकाण असलेल्या कोकण कड्याकडे निघालो. अंदाजे एक किलोमीटर  चालल्यानंतर, आम्ही कोकण कड्याजवळ पोहोचलो, परंतु संपूर्ण कोकणकडा ढगांनी व्यापलेला पाहून आम्ही निराश झालो. कड्यावर बसून थोडा वेळ घालवला आणि बॅगेतून आणलेला खाऊ खाल्ला. स्वच्छतेचे भान ठेवून, आम्ही सर्व रॅपर आणि प्लास्टिकच्या रिकामी बाटल्या आमच्या बॅगेत भरल्या आणि माघारी निघालो. 


पुष्करणी
पुष्करणी

    पावसाळ्यानंतर पुन्हा भेट देण्याचा निर्णय घेतला आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दिशेने चालू लागलोग, मंदिराजवळ पोहचण्या पूर्वी काही अंतर अलीकडे उजवीकडे एक रस्ता जातो जो, गणेश लेणी कडे पोहचवतो. आम्ही उजवे वळण घेतले आणि गणेश लेणी जवळ पोहचलो, लेणी मध्ये श्री गणेशाची ८ फूट उंचीची मूर्ती कोरलेली आहे. लेणीचा परिसर इतका मोठा आहे की २० ते ३० जण त्यात राहू शकतात. आजही या लेण्यांमध्ये, पर्यटक आणि ट्रेकर गट रात्रीचा मुक्काम करतात.

गणेश लेणीतील, ८ फूट उंचीचे गणपतीचे शिल्प
गणेश लेणीतील, ८ फूट उंचीचे गणपतीचे शिल्प 

हरिश्चंद्र डोंगरावरील ओढा
हरिश्चंद्र डोंगरावरील ओढा

    गडावर ३ तास फेरफटका मारून झाल्यानंतर, आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. जवळपास तासभर चालल्यानंतर, आम्ही पुन्हा ओढ्याजवळ पोहोचलो, ओढ्याजवळ बसून थोडावेळ विश्रांती केली तर काही सदस्यांनी ओढ्यात डुबकी मारून अंघोळीचा आनंद लुटला. नियोजित वेळेनुसार आम्हाला उशीर झाला असला तरी, आमचा गटप्रमुख मात्र घाई करत नव्हता. आम्हाला प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ दिला! ओढ्या जावळी विश्रांती नंतर पुन्हा उतरायला सुरुवात केली आणि अवघ्या तासाभरात अंदाजे दुपारी १२:०० वाजता, पाचनई गावात पोहोचलो.

    घरगुती, गरम गरम जेवण जेवल्यावर आम्ही जीप मध्ये बसून कसाऱ्याच्या दिशेने प्रवास सुरूकेला. सायंकाळी ०४:३० वाजता आम्ही कसारा रेल्वे स्थानकाजवळ पोहचलो. सायंकाळी ०५:०० ची कसारा -  सीएसएमटी ट्रेन पकडली आणि दादरला सायंकाळी ७:१५ ला पोहचलो.


👉 ब्लॉग पोस्ट -- हरिश्चंद्रगड आणि निसर्गाचे रौद्ररूप


हरिश्चन्द्र गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे


कोकण कडा
हरिश्चंद्रेश्वर मंदिर
केदारेश्वर लेणी व शिवलिंग 
तारामती शिखर
सप्ततीर्थ पुष्करणी
गणेश लेणी व गणेश मूर्ती



नाणेघाट ट्रेक आणि तेथील ओढ्यांचा थरार



प्रवासाची तारीख: २३-जुलै-२०२२
वाहतुकीची पद्धत: राज्य परिवाहन बस



नाणेघाटाचा इतिहास


    मौर्य राजा नंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला. या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते. येथे असलेल्या लेखात सातवाहन सम्राज्ञी नागणिके विषयी माहिती मिळते. या लेखांमध्ये महाराष्ट्राच्या आद्य राज्यकुल, त्यांचा पराक्रम, दानधर्माबद्दल माहिती आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठया भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हे पहिले राजे. हा राजवंश सुमारेचार शतके सलगतेने राज्य करत होता. या काळात त्यांचे तीस पराक्रमी राजे होऊन गेले. या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली. अशा या सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘नाणेघाट’ हा प्रमुख मार्ग होता.

    येथील एका लेखात सातवाहनांच्या पराक्रमाशिवाय त्यांनी इथे केलेले यज्ञ, दानधर्माचे उल्लेख आहेत. सातवाहन राजांनी दोनदा अश्वमेध यज्ञ केला असे दिसून येते. याशिवाय वाजपेय यज्ञ, राजसूय यज्ञ असे तब्बल २२ यज्ञ इथे पार पडल्याची माहिती हे लेख देतात. हजारो गाई, शेकडो हत्ती, घोडे, खेडी, धान्य, वस्त्र-अलंकार आणि तत्कालीन सातवाहनांची कार्षांपण या नाण्यांचा मोठा दानधर्म केल्याचाही यात उल्लेख येतो. (सौजन्य - विकिपीडिया).





नानाचा अंगठा
नानाचा अंगठा



प्रवासवर्ण

    कोविड लॉकडाऊन नंतरचा हा पहिला ट्रेक होता; त्यामुळे या पावसाळी ट्रेकसाठी मी खूप उत्सुक होतो. मी दादर रेल्वे स्थानकातून सकाळी ५:१५ ला प्रवास सुरु केला आणि सकाळी ६:३५ च्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचलो. मित्र विनायक कल्याण स्थानकात माझी वाट बघत उभा होता. कल्याण स्थानकावरून आम्ही कल्याण पश्चिमेस असलेल्या राज्य परिवाहन बस डेपोकडे चालत गेलो, बस डेपो १० मिनिटांच्या अंतरावर आहे. आळे फाटा किंवा माळशेज घाटमार्गे जाणारी "कल्याण ते अहमदनगर" ह्या मध्ये बस चढलो. नाणेघाट हा अधिकृत बस थांबा नसल्यामुळे आम्ही बस कंडक्टरला नाणेघाट कमानी जवळ सोडण्याची विनंती केली. (ऑफिशियल बस स्टॉप टोकवडे येथे आहे, जे नाणेघाटच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून ५ किलोमीटर अंतरावर आहे.) आम्ही सकाळी ९:१५ च्या सुमारास नाणेघाट येथे उतरलो आणि जवळच्या स्टॉलवर नाश्ता केला. बस कंडक्टरने आम्हाला नाणेघाट कमानी जवळ सोडल्याबद्दल धन्यवाद!

    सकाळी ९:४५ च्या सुमारास आम्ही चढायला सुरुवात केली, नाणेघाट माथ्यावर पोहोचायला ३ तास ​​लागतील आणि उतरायला तेवढाच वेळ लागणार याची कल्पना होती. पहिल्या कमानी जवळ वन विभागाची चौकी होती. नुकतेच वन विभागाचे अधिकारी तिथे आले होते, आम्ही अजून थोडे लवकर आलो असतो तर वन विभागाचे शुल्क भरावे लागले नसते. वन विभागाच्या रजिस्टर मध्ये नोंद केली आणि प्रत्येकी ३० रुपये भरून ट्रेकला सुरुवात केली. काही अंतर पुढे गेल्यावर आम्ही दुसऱ्या कमानी जवळ आलो, ती पार करत आम्ही पहिल्या ओढ्यापाशी पोहोचलो (नाणेघाट मार्गावर एकूण ३ ओढे लागतात). ओढ्याला पाणी कमी होते (टाचे एवढेच) म्हणून आम्ही ओढ्याच्या किनारी थोडी विश्रांती घेतली, काही चांगले फोटो काढले आणि पुढे निघालो. काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला दोन पायवाट दिसल्या, आम्ही डावीकडच्या वाटेने पुढे गेलो आणि दुसऱ्या ओढ्या पाशी आलो. (डावीकडील वाट ही नाण्याच्या अंगठ्याकडे जाते तर उजवी वाट गावात जाते). दुसरा ओढा ओलांडत आम्ही काही अंतर पुढे गेलो आणि तिसऱ्या ओढ्या पाशी आलो. हाही जोधा ओलांडत पुढे गेलो आणि एक छोटासा अवघड टप्पा पार करत पठारावर पोहचलो. नानाचा अंगठा अगदी सुंदर दिसत होता! काहीवेळ पठारावर फोटो काढण्यात घालवल्यावर पुन्हा चढायला सुरवात केली. अडीच तास चढून गेल्यावर आम्हाला एका पाण्याचे टाके दुर्ष्टीस पढले, हे पाण्याचे टाके दिसणे म्हणजे डोंगर माथा जवळ आल्याची खूण होती. आम्ही पुढे गेल्यावर व्हिव पॉईंट दिसला, पण हा व्हिव पॉईंट ढंगानी झाकला होता, काहीच दिसत नव्हते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने लावलेली रेलिंग मात्र दिसत होती. अखेरीस, आम्ही १२:४५ च्या सुमारास मुख्य लेणीत पोहोचलो. लेणी जवळील दृश्य आणि वातावरण आल्हाददायी होते, आपण जणू स्वर्गातच आलो आहोत असे वाटत होते.


पाण्याचे टाके
पाण्याचे टाके



    लेणीच्या परिसरात बरीच गर्दी होती, जुन्नर मार्गे बरेच पर्यटक गाडीने आले होते. गर्दी पाहून थोडी निराशा झाली करी पण आता काही पर्याय नाही होता. आम्ही लेणीत गेलो, तेथील ब्राम्ही लिपीत लिहिले लेख पाहत थोडा वेळ घालवाल आणि डोंगर माथ्यावर जायचे ठरवले.
टीप: लेणीतील तीनही भिंतींवर ब्राम्ही लिपीत लेख लिहलेला आहे, ह्या लेखात राज सत्कारणी यांची पत्नी नागनिका हिने केलेल्या यज्ञ व दान धर्म याची माहिती लिहलेली आहे. 

डोंगर माथ्यावर जाण्या करीत आम्ही लेणीतून बाहेर आलो आणि आमची भेट एका जर्मन पर्यटकाशी झाली. त्याच्या सोबत त्याची भारतीय मेत्रीन होती. त्यांनी आम्हाला नाणेघाटाबद्दल माहिती विचारली असता, थोडक्या माहिती दिली आणि चौघेही जण रिवर्स वॉटरफॉल (उलटा धबधबा) पाहण्या करता डोंगरमाथ्यावर जायला निघालो. लेणी ते डोंगरमाथा हे अंतर अवघे ५० एक मीटर चे असेल, पण शेवाळ असल्या कारणाने चालणे अवघड झाले होते. काळजी पूर्व पाऊले टाकत आणि तोल सावरत आम्ही माथ्यावर पोहचलो. आमचे दुर्दैव असे की टेकडीचे पठार किंवा माथा पूर्णपणे ढगांनी झाकलेला होता, ५० मीटरच्या पुढे दिसत नव्हते. आम्ही बराच प्रयत्न केला, पण रिवर्स वॉटरफॉल काही दिसला नाही, म्हणून आम्ही रांजण (नाणे - कर गोळा कार्याचे दगडी भांडे) पाहण्या करीत गेलो, या रांजांचा उपयोग प्राचीन काळी व्यापाऱ्यांकडून टोल वसूल करण्यासाठी केला जात होता. पुरातत्व खात्याने या रंजनाची डागडुजी केलेली आहे व एक दगडी चवथरा बांधून त्यावर रांजण सुरक्षित ठेवले आहे. 

ब्राम्ही लिपीतील लेख
ब्राम्ही लिपीतील लेख 
नाणे (कर) गोळा करण्या करीत दगडी रांजण
नाणे (कर) गोळा करण्या करीत दगडी रांजण

    जर्मन पर्यटक आणि त्याच्या मैत्रिणीसोबत गरम गरम भजी खाल्ली आणि चहा प्यालो. एक सेल्फी काडून त्यांचा निरोप घेतला  आणि आम्ही नानाच्या अंगठ्यावर जायायचे ठरवले, पण अचानक पाऊस वाढला आणि वाऱ्याचा प्रवाह इतका वाढला की आम्ही मागे ढकलले जात होतो. त्यामुळे तोल सावरणे कठीण जात होते, धोका टाळण्यासाठी आम्ही आमचा बेत रद्द केला आणिपाण्याच्या टाक्यात कोरलेली गणपतीची मूर्ती  पाहायला गेलो. डोंगर माथ्यावर तासभर घालवल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला, पण यावेळी जुन्नरमार्गे मुंबईला परतण्याचा विचार होता. आमच्याकडे पुरेशी माहिती नसल्याने आणि कोणतीही वाहने लिफ्ट देण्यास तयार नसल्याने आम्ही जुन्नरला जाण्याचा प्लॅन रद्द केला. तेथून निघायच्या वेळी, एक पर्यटक आम्हला भेटला. हा पर्यटक त्याच्या समुहापासून वेगळा झाला होता, डोंगरमाथ्यावर मोबाइलला नेटवर्क नसल्या कारणाने संपर्क करणे अवगढ होत होते, त्यात गडद धुके इतर सभासदांना शोधायचे कसे हा मोठा प्रश्न होता. विनायक कडे जिओच्या सिमला नेटवर्क होते. त्याने ग्रुप लीडरला कॉल केला पण त्याने काही उत्तर दिले नाही. त्याला आम्ही आमच्या सोबत यायला सांगितले, पण त्याच्या पायाला क्रॅम्प आल्या कारणाने उतरणे शक्य नाही असे त्याने सांगितले व तो घाटघर मार्गे जुन्नरला जायायला निघाला.

सूचना : जेव्हापण आपण मोठ्या समूहात दुर्गम भागात ट्रेकिंगला जाल, तेव्हा तेथे मीटिंग पॉईंट ठरवावेत, म्हणजे जर कोणी चुकले व समूहातून वेगळे झाले तर त्या व्यक्तीने मीटिंग पॉईंट कडे जाऊन ग्रुप लीडरची वाट पाहत उभे राहावे, जेणे करून ग्रुप लीडर व इतर सभासदांचे काम सोपे होते, हरवलेल्या व्यक्तीला शोधण्यात वेळ वाया जात नाही.

     आम्ही दुपारी २:१५ च्या सुमारास उतरायला सुरुवात केली, जसजसा वेळ वेळ पुढे जात होता तसतसा पावसाचा जोर वाढत होता यामुळे खाली उतरणे आम्हला अवघड जात होते. पुढे जाऊन आम्ही एका मोठ्या समस्येच्या सामोरी चाललो होते हे अवगत नव्हते! मी ब्लॉगच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आम्ही तीन पाण्याचे ओढे पार केले होते. परतत असताना, आम्ही तिसऱ्या पाण्याच्या प्रवाहाजवळ पोहोचलो (उलट क्रमाने) आणि पाहिलं की मुसळधार पावसामुळे ओढ्याचा प्रवाह वाढला होता व पाणी गढूळ झाले होते. आम्ही मदतीची वाट पाहण्याचे ठरवले. काही वेळाने एक किशोरवयीन गट आला. पाण्याचा प्रवाह पाहून ते सुद्धा विचारात पढले, पण त्यांनी एकमेकांचे हात पडकून मानवी साखळी तयार केली आणि ओढा ओलढण्यास सुरवात केली, त्यामुळे आम्हीही त्यांच्यात सहभागी झालो. आम्ही जो निर्णय घेतला होता तो चुकीचा होता व आम्ही आमचा जीव धोक्यात घालत असल्याचे पूर्ण जाणीव होती. ज्याच्या बारवश्यावर ओढा पार करत होतो, ती व्यक्ती ओढ्याचे मधोमध जाऊन बावचली आणि आम्ही सर्वजण ओढ्याच्या मधोमध आढक्लो. त्या क्षणी नोको नको ते विचार मनात येऊ लागले. इतक्या एक मुलगा मग्न आला आणि त्याने ओढ्या उडी मारली आणि आम्हा सर्वांना बाहेर काढले. हा ओढा तर ओलांडला होता पण पुढे आजून दोन ओढे ओलांडायचे होते. आम्ही किशोरवयीन गटासह पुढे निघालो आणि दुसऱ्या ओढ्या जवळ पोहोचलो (उलट क्रमाने). या ओढ्यात, आम्हाला आधारासाठी कोठेही मोठे खडक दिसत नव्हते. जीव धोक्यात घालायचा नाही म्हणून मी जंगलात रात्र घालवायचे ठरवले, पण विनायक मात्र जंगलात रात्र घालवण्यास तयार नव्हता. रात्र घालवण्याकरिता आमच्यकडे पर्याप्त पाणी आणि खाऊ होते, फक्त डोक्यावर छत नव्हते. मी एके ठिकाणी जाऊन बसलो. ओढ्याच्या पलीकडच्या बाजूस असलेल्या एका ट्रेकर ने मला पहिले आणि ओढा ओलांडण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याने हा ओढा नुकताच पार केला होता, घाबरायचे काही कारण नाही असे सांगितले. मानवी साखळी करण्यासाठी आम्ही पुन्हा किशोरांच्या गटात सामील झालो आणि जीव मुठीत गेहून ओढायचा उतरलो. देवाच्या कृपेने सुखरूप ओढा पार केला. आम्हाला ओढे पार करण्यास मदत केल्याबद्दल ट्रेकर ग्रुपचे आणि देवाचे आभार मानतो.

टीप: पाऊस सुरू राहिल्यास, ओढ्यांतील पाण्याचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे ओढे ओलांडणे कठीण किंवा अशक्य होते. जंगलात रात्र घालवण्याची परिस्थिती उद्भवल्यास काही खाद्य पदार्थ, सुखे कपडे, पाणी बॉटल प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून सोबत ठेवावे. ओढे ओलांडण्याचा प्रयन्त करून आपला जीव धोक्यात घालू नये.


    तिसऱ्या ओढ्या जवळ पोहोचलो आणि सुखद धक्का मिळाला, धरणाच्या भिंतीमुळे पाण्याचा प्रवाह खूपच कमी होता. कमी प्रवाह पाहून आम्ही सुटकेचा श्वास सोडला! तिन्ही ओढे पार करून झाल्यावर, मुंबई करीत बस पकडण्याकरिता आम्ही आमचा वेग वाढवला. ओढ्याची समस्या तर पार केली होती, पण नवीन समस्या उद्भवणार होती, तिच्याशीही आम्ही अवगत नव्हतो . राज्य परिवहन बस व खाजगी वाहनांना आम्ही हात दाखवून लिफ्ट साठी थांबव्याचा प्रयत्न करत होतो, पण एकही वाहत थांबत नव्हते. आम्ही जवळपास ३० मिनिटे थांबलो आणि मग ३ किमी अंतरावर असलेल्या वैशाखरे गावाकडे चालत जाण्याचा निर्णय घेतला. साधारण ५:३० वाजले होते, आम्ही खूप दमलो होतो पण वैशाखरे गावाकडे चालत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. २ किमी चालल्यानंतर आम्हाला एक ढाबा दिसला, तेथे जेवण करून पुढचा प्रवास करायचा असे ठरवले. जेवणानंतर, आम्ही हॉटेल मालकाकडे वाहनासाठी मदत मागितली, पण आधीच उशीर झाला होता सायंकाळचे ६:०० वाजले होते आणि त्यात मुसळधार पाऊस यामुळे रिक्षा किव्हा इतर वाहन मिळणे शक्य नव्हते, म्हणून त्याने आम्हाला वैशाखरेला जाऊन टोकावडे करीत ऑटो मिळेल असे सांगितले. पण वैशाखरे अद्याप १ किमी दूर होते 😟.

    थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा वैशाखरे गावाकडे परतीचा प्रवास सुरू केला. संध्याकाळी ६:३० वाजता वैशाखरे गावात पोहोचलो, सुदैवाने रेस्टॉरंटजवळ एक ऑटोरिक्षा उभी होती. रिक्षावाले काका, त्यांचा मोबाइलला रेस्टऑरेंत मध्ये विसरले होते म्हणू माघारी आले होते, पण त्यांचे मोबाईल विसरणे आमच्या फायद्याचे ठरले होते. आम्ही त्यांचा टोकावडे बस स्टँडवर सोडायला सांगितले. (ऑटोरिक्षासाठी संपर्क क्रमांक: ९०२१०८६३५३) टोकावडे येथे आम्ही राज्य परिवहन बसची वाट पाहत होतो. संध्याकाळी ७:००  च्या सुमारास, बस आली (जुन्नर-ठाणे). विनायक कल्याणला उतरला तर मी ठाण्याला उतरलो. पायात त्राण उरले नव्हते म्हणून नाईलाजास्तव ओला - टॅक्सी बुक केली आणि गोरेगावला घरी ११:०० वाजता पोहचलो.


    हा ट्रेक सोपा असला तरी मुसळधार पाऊस आणि परतीच्या प्रवासाचे नियोजन नसल्यामुळे तो अवघड आणि कठीण झाला.


नाणेघाटाजवळ पाहण्यासारखी ठिकाणे

जीवधन किल्ला
माळशेज घाट
    
    

खर्चाचा तपशील





यादृच्छिक छायाचित्रे

नामफलक
नामफलक

नाणेघाट प्रवेशद्वार कमान
नाणेघाट प्रवेशद्वार कमान


👉 ब्लॉगच्या सुरवातीला जा