विसापूर गड भ्रमंती



प्रवासाची तारीख: २६-डिसेंबर-२०१९
वाहतुकीची पद्धत: ट्रेन



विसापूर किल्ल्याचा इतिहास


    विसापूर किल्ला समुद्रसपाटीपासून ३५५६ फूट उंचीवर आहे. विसापूरच्या डोंगरात भाजे लेणी आहेत जी इ.स.पू. २ रे शतक मध्ये हिनयान बौद्ध परंपरेच्या काळात बांधण्यात आली. किल्ल्याच्या आत पाण्याच्या टाकीवर एक प्राचीन शिलालेख आहे जो ब्राम्ही लिपीत लिहिलेला आहे, तो पाहून आपल्याला कळते की हा किल्ला किती जुना आहे. सुमारे १५०० ते २००० वर्षांपूर्वी (१००-७० ईसापूर्व) प्राचीन सातवाहन युगात ब्राम्ही लिपी वापरली जात असे.

    १७१७ ते १७२० च्या दरम्यान मराठा पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली आणि ती मजबूत केली. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि लोहगड किल्ल्यावर तोफ गोळ्यांचा मारा सुरु केला, कारण विसपूर किल्ल्याची उंची लोहगड किल्ल्यापेक्षा जास्त होती आणि दुसऱ्याच दिवशी ब्रिटिशांनी लोहगड किल्ला जिंकला. इतर किल्ल्यांप्रमाणे विसपूर किल्ल्यावर तुम्हाला कोणतेही प्रवेशद्वार दिसणार नाही कारण ब्रिटिश सैन्याने गडाकडे जाणारे सर्व दरवाजे व मार्ग सुरुंग लावून नष्ट केलेत. जेणेकरून भविष्यात मराठा सैन्याला पुन्हा गडावर ताबा मिळवता येणार नाही.



प्रवास आणि ट्रेकिंगचा अनुभव


    आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी ६.४० वाजता मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास सुरू केला आणि सकाळी ९:१० वाजता लोणावळा स्थानकात उतरलो. पुणे लोकल ट्रेन येयायला बराच वेळ होता, म्हणून न्ह्यारी करण्याकरिता लोणावळा स्थानकात बाहेर आलोत. अंदाजे ५०० ते ६०० मीटर अंतरावर आनंद रेस्टॉरंट (ढाबा) मध्ये न्ह्यारी केली. न्ह्यारी पूर्ण करून आम्ही पुन्हा लोणावळा स्थानकात आलो आणि १०.१० वाजताची पुणे लोकल पकडली आणि पुढच्याच स्टेशनवर म्हणज मळवली स्थानकात उतरलो.

    अवघ्या १० मिनिटात सकाळी १०:२० च्या सुमारास मळवली येथे उतरलो आणि विसापूर किल्ल्याकडे चालायला सुरुवात केली. पुणे एक्सप्रेस हायवेवर असलेल्या पुलाच्या टोकापासून डावीकडे वळून आम्ही पाटण गावी पोहोचलो. सुरुवातीला, योग्य मार्गावर येण्यासाठी आम्ही गावकऱ्यांची मदत घेतली. पाटण गावापासूनचा ट्रेक मार्ग तुम्हाला एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव देतो. घनदाट जंगल आणि छोटे धबधबे मन प्रसन्न करतात. चढाई करताना, डावीकडे पाटण गाव आणि उजवीकडे विसापूर किल्ला ठेवावा. गावकऱ्यांनी मार्गदर्शनाकरिता खडकांवर बाणाचे चिन्ह काढलेले आहेत. अर्धा ट्रेक पूर्ण केल्यानंतर गडाची तटबंदी निदर्शनास पढली.

विसापूर रेल्वे बोर्ड

ओव्हरहेड ब्रिज वरील दिशादर्शक फलक
ओव्हरहेड ब्रिज वरील दिशादर्शक फलक

    गडमाथ्यावर पोहचण्या आधी एका छोट्याश्या लेणीजवळ पोहचलो, या लेणीमध्ये हनुमानाचे शिल्प कोरलेले आहे, म्हणून या लेणीला मारुती लेणी असे नाव दिले आहे. लेणीमध्ये पर्यटकांची गर्दी असल्यामुळं, बाहेरूनच शिल्प पाहिले आणि पुढे निघालो. लेणीला लागूनच गडावर जाण्याकरिता दगडी पायऱ्या लागतात. पावसाळ्यात या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी फार सुंदर दिसते. दोन तासांची चढाई करून, दुपारच्या सुमारास अंदाजे १२.३० वाजता आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो. 

    गडमाथ्यावर पोहचताच आम्ही उजवीकडे वळत, गडाच्या पश्चिम दिशेस चालू लागलो, काही अंतर पुढे गेल्यावर पाण्याचं ताक व उद्वस्त वास्तू दिसली. पाण्याच्या टाक्याजवळच बसून आणलेला खाऊ खाल्ला आणि गडभ्रमंती साठी तरतरीत झालो. पश्चिम दिशेस सरळ चालत राहिलो आणि पाण्याच्या टाक्यांजवळ पोहचलो. तसेच गडाच्या तटा जवळ दोन छोट्या तोफा ठेवलेल्या दिसल्या. जसजसे पुढे जात होतो तस तसे पाण्याच्या टाक्यांची शृंखला दिसत होती. गडाच्या तटबंदीजवळ पोहचलो. गडाची तटबंदी आजही सुस्तिथित व भक्कम आहे. आम्ही तटबंदीवरुन दक्षिण दिशेला म्हणजे लोहगडाच्या दिशेने चालत राहिलो. काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला चुन्याच्या घेण्याचे अवशेष दिसले, जोतेही तिथेच ठेवलेले होते, फोटो काढले आणि पुढे चालत राहिलो. तटबंदीवरुन बाहेरच्या बाजूस वाकून पहिले असता, गडाखालील जंगलातील गर्द झाडी एका फुल कोबी सारखी दिसत होती. अवघ्या १५-२० मिनिटात आम्ही दक्षिण दिशेस असलेल्या गडाच्या शेवटच्या बुरुजाजवळ पोहचलो. बुरुजावरील हिंदवी स्वराज्याचा भगवा डवलणे फडकत होता तसेच लोहगडाची तटबंदी व पावना तलाव स्पष्ट दिसत होते. थोडावेळ तिथे घालवला आणि माघारी फिरत पुन्हा गडभ्रमंतीला सुरुवात केली. 

गडावरील तोफ
गडावरील तोफ

गडाची तटबंदी
गडाची तटबंदी

    मागे फिरून गडाच्या मुख्य दरवाज्याकडे जाते वेळी आम्ही पाण्याच्या टाक्यात कोरलेले मारुतीचे शिल्प शोधत होतो, पण ते काही आम्हाला दिसले नाही. नंतर आमच्या लक्षात आले कि ते शिल्प पठाराच्या खालच्या बाजूस आहे आणि आम्ही पठारावरच्या वरच्या बाजूने पुढे गेलो. विसापूर गड हा दोन डोंगरांनी जोडलेला आहे, दोन डोंगर जोडले गेलेत व मुख्य दरवाजाच्या पायवाट जवळ एक मोठी तोफ ठेवलेली आहे. तोफ पाहून आम्ही पुढे गेलो ते थेट शिव मंदिरात. शिव मंदिराच्या आवारात एक सुंदर दीपमाळ आहे व मंदिराच्या मागच्या बाजूस विहीर आहे. मंदिर जास्त मोठे नाही पण ५-६ जणांना राहता येईल एवढे आहे. काही वेळ मंदिरात घालवला, ग्रुप फोटो काढला आणि परतीच्या प्रवासा करीत निघालो. आम्ही पाटण मार्गे गडावर आलो होतो पण उतरते वेळी लोहगड वाडी मार्गे उतरायचे असे ठरले. पुढे जाते वेळी आम्हाला राजवाड्याचे अवशेष दिसले, राजवाड्याचा आवारात एक पाण्याचे टाके होते त्यावर काही कोरले होते, कंदाची शिलालेख असावा. तेथे काही कॉलेज ची मुले बसले होते. त्यांना त्रास नको म्हणून दुरूनच पाहून पुढे निघालो आणि तसेही आम्हाला बराच उशिराही झाला होता, जास्त वेळ न घालवता पुढे निघालो. संपूर्ण गड पाहण्यासाठी सुमारे ३ ते ४ तास लागले. वेळेच्या मर्यादेमुळे आम्ही उतरायला सुरुवात केली. उतरतेवेळी आमच्या समूहातील सदस्य (विनायक काळे) याच्या बुटांचे सोल निघाले. अशावेळी युक्ती कामाला येते, पायातील मोवजे काडून बुटांवर चढवले. तसेच मी सुद्धा एक मूर्खपणा केला होता ट्रॅक पँट ऐवजी जीन्स पँट घातली होती यामुळे उतरतेवेळी फ्लेक्सिबिलिटी मिळत नव्हती. कसे बसे करत आम्ही १६ जण अंदाजे ४:३० वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. गायमुख खिंडीतून चालत आम्ही लोहगड वाडीच्या रस्त्यापर्यत पोहचलो. तिथे आम्ही चहा आणि नाश्ता घेतला, आम्ही लोणावळ्याला जेवण करण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला लोणावळा लोकल आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस पकडायची होती (ट्रेनच्या वेळेसाठी एम-इंडिकेटर अॅपची मदत घ्या आणि त्यानुसार नियोजन करा). 

    नाश्ता करून झाला आणि आता माळवलीला कसे जायायचे हा विचार करत होतो इतक्या एक टेम्पो दिलासा, टेम्पो वाल्याला हात दाखून थांबवले. आम्हाला माळ्वळीला सोडणार का? असे विचारले असता त्याच्याकडून होकार मिळाला. देवच पावला! आम्ही सर्वजण टेम्पोत बसलो आणि अंदाजे ५:१५ च्या सुमारास माळ्वलीला पोहचलो. टेम्पो वाल्याला त्याचे भाडे दिले आणि मळवली स्थानकात पोहचलो, ५:३० ची लोकल ट्रेन पकडली आणि ५:४५ च्या दरम्यान लोणावळ्याला पोहचलो. भटकंती करतेवेळी वेळेचे आणि जेवणाचे भान राहत नाही असेच काहीसे आमचे झाले होते. सायंकाळी ६:०० वाजता आम्ही लोणावळ्यात जेवणाकरिता रेस्टऑरेंत शोधत हिंडत होतो. अखेरीस रेस्टऑरेंत सापडले, जेवण पूर्णकेली आणि लोणावळ्याची चिकी घेतली आणि सायंकाळी ६:४७ ला आलेली पुणे इंटरसिटी एक्सप्रेस पकडून अंदाजे रात्री ९:४० ला मुंबईला पोहचलो. (टीप:- आरक्षण नसल्यास प्रवास त्रासदायक तर होतोच पण, जनरल बोगी मध्ये चढे सुद्धा कठीण होते).



गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे


पाण्याची टाकी
शिव मंदिर
सदर किंवा पेशवे वाडा
हनुमान कोरीव शिल्प
तोफ



जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे


जर तुम्ही तुमच्या प्रवासाचे नियोजन चांगले केले आणि तुम्ही नियमित ट्रेकर असाल तर,
 तुम्ही किमान तीन आणि जास्तीत जास्त चार ठिकाणांना भेट देऊ शकता.

१. भाजे लेणी,
२. लोहगड किल्ला,
३. कार्ला लेणी / एकवीरा देवी मंदिर



गडावरील शिवलिंग (शिव मंदिर)
गडावरील शिवलिंग (शिव मंदिर)  

दीपस्तंभ
दीपस्तंभ

गडाची तटबंदी
गडाची तटबंदी

गडाची तटबंदी
गडाची तटबंदी

गडावरील पाण्याचे टाके
गडावरील पाण्याचे टाके