प्रति व्यक्ती खर्च: 800 रु
प्रवासाची तारीख: २३-जानेवारी-२०२०
वेरूळ लेण्यांचा इतिहास
![]() |
| युनेस्को बोर्ड |
प्रवासवर्ण
आम्ही रात्री ९.३० वाजता देवगिरी एक्स्प्रेसमध्ये बसून, ठाणे रेल्वे स्थानकावरून प्रवास सुरू केला. हा एक पूर्वनियोजित प्रवास होता म्हणून आम्ही आरक्षण केले होते. पहाटे ४:०० वाजता आम्ही छत्रपती संभाजीनगरला पोहोचलो, रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक कप चहा घेतला, आणि छत्रपती संभाजीनगर सिडको बस डेपोच्या बसची वाट बघत बसलो, सकाळी ४:३० च्या सुमारास बसमध्ये चढलो आणि १० मिनिटांत सिडको बस डेपोत पोहोचलो. एलोरा (वेरूळ) बससाठी आम्ही सिडको बस डेपोमध्ये चौकशी केली. वेरूळ मार्गे जाणारी बस समोरच्याच फलाटावर उभी होती. वेरूळला जाणाऱ्या एस.टी बसमध्ये चढलो आणि वेरूळ गावात उतरलो. *टीप तुम्हाला वेरूळ लेणी गेट किंवा जंक्शनवर उतरावे लागेल. वेरूळ लेण्यांपासून आम्ही एक स्टॉप पुढे उत्तरलो होतो, म्हणून गूगल मॅप्सची मदत घेत मागे फिरलो आणि वेरूळ लेण्यांच्या दिशेने चालायला लागलो. साधारण सकाळचे ६.०० वाजले होते, हिवाळ्याचे दिवस असल्या कारणाने, कडाक्याची थंडी होती, हात पाय गारठले होते. वेरूळ लेण्यांच्या दिशेने चालत असताना, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दिसले, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आम्ही आमचे पाकीट, कमरपट्टा, मोबाईल फोन इ. मंदिराबाहेरील दुकानात ठेवली. मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले.
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील हे तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. छत्रपती संभाजी नगरपासून सु. ३० किमी. वेरूळ गावाजवळ महिषाद्रीच्या पायथ्याशी येलगंगा नदीतीरी घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर आहे. ते लालसर घोटीव दगडांचे असून गाभाऱ्यात काळ्या पाषाणाचे शिवलिंग आहे. मंदिराच्या शिखरावर, छतावर आणि मंडपाच्या खांबांवर सुंदर नक्षी, सुरेख मूर्ती व चित्रे आहेत. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणाभोवती उंच कोट असून जवळच शिवालयतीर्थ हे बांधीव प्रशस्त तळे आहे. राष्ट्रकूट वंशातील कृष्णराजाने बांधलेल्या मूळ मंदिराचा आणि शिवालयतीर्थांचा १५९९ मध्ये वेरूळचे पाटील मालोजी भोसले यांनी जीर्णोद्धार केला, परंतु पुढे औरंगजेबाने त्याचा विध्वंस केला. मल्हारराव होळकरांची पत्नी, गौतमाबाई हिने १७३० मध्ये सध्याचे मंदिर बांधले आणि अहिल्याबाईने १७६९ मध्ये शिवालयतीर्थ पुन्हा बांधले. प्रतिवर्षी शिवरात्रीला येथे मोठी यात्रा असते. (सौजन्य मराठी विश्वकोश)
सुमारे सकाळचे ६:३० वाजले होते आम्ही जंक्शनजवळील एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि आमच्या बॅगा हॉटेलमध्येच ठेवल्या जेणेकरून आम्हाला लेण्या मुक्तपणे पाहता येतील. आम्ही आमच्यासोबत फक्त एक छोटी हँडबॅग आणि पाण्याची बाटली घेतली. टीप प्रवेशद्वाराजवळ असलेल्या माकडांपासून सावध रहा कॅमेरा किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तू हातात ठेवू नका. आम्ही प्रत्येकी ४० रु. प्रवेश शुल्क भरले आणि सिक्युरिटी चेकमधून गेलो, आत जाताच लेणी क्र १६ कैलास लेणी समोरच होती.
![]() |
| वेरूळ लेण्यांचा नकाशा |
सुमारे सकाळचे ६:३० वाजले होते आम्ही जंक्शनजवळील एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि आमच्या बॅगा हॉटेलमध्येच ठेवल्या जेणेकरून आम्हाला लेण्या मुक्तपणे पाहता येतील. आम्ही आमच्यासोबत फक्त एक छोटी हँडबॅग आणि पाण्याची बाटली घेतली. टीप प्रवेशद्वाराजवळ असलेल्या माकडांपासून सावध रहा कॅमेरा किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तू हातात ठेवू नका. आम्ही प्रत्येकी ४० रु. प्रवेश शुल्क भरले आणि सिक्युरिटी चेकमधून गेलो, आत जाताच लेणी क्र १६ कैलास लेणी समोरच होती.
वेरूळ परिसरात एकूण १०० लेण्या आहेत त्यातील फक्त ३४ लेण्या पर्यटकांसाठी खुल्या आहेत, परंतु लेणी क्रमांक १६ ही सर्वात मोठी आणि जुनी लेणी आहे. आम्ही कैलास लेणी पाहायला सुरवात केली, दगडांवर कोरलेल्या मुर्त्या, त्यावरील केलेले नक्षीकाम अप्रतिम! या लेणी मध्ये, हिंदू पौराणि कथा कोरून ठेवले आहेत, आम्ही गाईड सोबत घेतला नव्हता आणि आमचा पौराणिक कथेतील अभ्यासही फार कमी असल्या कारणाने कोरलेल्या शिल्पांचा संधर्भ लावणे कठीण जात होते. विंडो शॉपिंग करतात तसे आम्ही सर्व शिल्प पाहता होतो. जस जसा वेळ पुढे सरकत होता तशी गर्दीही वाडत होती, म्हणून आम्ही पहिल्या मजल्यावर जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. एकसंग दगडात कोरलेले मंदिर आणि दगड कोरून बनवलेला सेतू पाहून मती गुंग होऊन जाते! एवढे सटीक आणि सुबक बांधकाम करायला त्याकाळी कोणते तंत्रज्ञान वापरले असावे? अशी बरीच प्रश्न डोक्यात फिरत होती पण या प्रश्नांची उत्तरे अद्याप काही मिळालेले नाहीत. तसेच या लेणीमध्ये छोटी छोटी कोरलेली गुहा आणि त्यांचे आंतरजाल का बनवले याचाही शोध आजवर लागलेला नाही. कैलास लेणी पाहायला आम्हला जवळपास ३ तास लागले. लेणी क्रमांक १६ कैलास लेणी अभ्यासपूर्ण पाहायची असल्यास एक दिवस सुद्धा कमी पाढेल!
![]() |
| लेणी क्रमांक १६ - कैलास लेणी प्रवेश द्वार |
![]() |
| लेणी क्रमांक १६ - दगडी स्तंभ |
![]() |
| लेणी क्रमांक १६ - शिवलिंग |
लेणी क्रमांक १६ पाहून झाल्यावर, बाहेर येत डावीकडे वळलो आणि लेणी क्रमांक १५ ते १ पाहण्यासाठी गेलो. यातील लेणी क्रमांक १ - १२ ह्या बौद्ध लेण्या आहेत. लेणी क्रमांक ११ ही दुमजली इमारत आहे तर लेणी क्रमांक १२ ही तीनमजली इमारत आहे, वैशिट्य म्हणजे या इमारती एकावर एक दगड रचून न बनवता, एकाच खडकात कोरलेल्या आहेत! लेणी क्रमांक १० मध्ये गौतम बुद्धाच्या ध्यानस्त मुद्रेतील ७ मुर्त्या एकाच ओळीत कोरलेल्या आहेत, तसेच लेणी क्रमांक ७ मध्ये गौतम बुद्धाची मूर्ती व स्तूप आहे. अश्या एकूण १२ बौद्ध लेण्या पाहायला आम्हाला १ तास लागला. सकाळचे ११:०० वाजले होते, गर्दीही खूप वाढली होती. काही शाळांनी विद्यार्थ्यांची सहल आणली होती. अश्या सहली प्रत्येक शाळांनी काढायला हवेत जेणे करून मुलाना ऐतिहासिक स्थळांचे महत्व कळते व त्याची आवड निर्माण होते. लेणी क्रमांक १ पासून माघारी येत आम्ही पुन्हा लेणी क्रमांक १६ च्या प्रवेशद्वारापाशी आलो. आम्हाला लेणी क्रमांक ३० ते ३४ पाहायचे होते, पण ह्या लेण्या १.४ किलोमीटर दूर आहेत आणि यासाठी राज्य परिवहन मंडळाची बस सेवा प्रत्येक तासाला उपलब्ध आहे.
![]() |
| लेणी क्रमांक १६ प्रवेशद्वारासमोरील बाग |
![]() |
| लेणी क्रमांक ११ - दो ताल |
![]() |
| लेणी क्रमांक १२ - तीन ताल |
आम्ही वेरूळ लेणीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बसची वाट पाहत बसलो होतो, प्रतीक्षा कालावधीत, आम्ही आमच्या परतीच्या प्रवासासाठी दुसऱ्या दिवशीचे रेल्वे तिकीट बुक केले कारण आमची लोणार सरोवराला भेट देण्याची योजना होती. मी लोणार सरोवरावर एक ब्लॉग प्रकाशित केला आहे. मुख्य दरवाज्याच्या काही अंतरावरच येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रसाधन गृहाची सोय केलेली आहे, तेथे जाऊन फ्रेश झालो आणि पुन्हा गेट जवळ येऊन बसची वाट पाहत बसलो. ३० -३५ मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर बस आली, प्रतिव्यक्ती २० रुपये भाडे भरले (परतीच्या प्रवासा सहित) आणि बस मध्ये बसलो. अवघ्या ५ मिनिटात आम्ही लेणी क्रमांक ३१ जवळ पोहचलो, पुरातत्व विभागाने पर्यटकांच्या सोयी करीत डांबरी रस्त्यावरच मार्किंग केलेली आहे, कोणती लेणी कोणत्या दिशेला आहे ते. बस सुटायला ४५ मिनिटे होती आणि एवढा वेळ पुरेसा होता या लेण्या पाहण्या करीत. ३० ते ३४ क्रमांकाच्या ५ लेण्या ह्या जैन लेण्या आहेत, यात भगवान महावीर यांच्या मुर्त्या पाहायला मिळतात. चारही लेण्या पाहून झाल्यावर आम्हाला एक पायवाट दिसली जी डोंगरावर जात होती, आम्ही त्या पायवाटेने वर गेलो आणि पाहतो तर काय अजून एक लेणी होती, लेणी क्रमांक ३० छोटा कैलास.
![]() |
| लेणी क्र ३३ येथील भगवान महावीर शिल्प. |
![]() |
| लेणी क्रमांक ३० - छोटा कैलास |
सर्व लेण्या पाहून झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाकरिता बस मध्ये येऊन बसलो. आम्ही बस वाहकाला मुख्य प्रवेशद्वारा आधी बस थांबवायला सांगितली, कारण आम्हाला लेणी क्रमांक १७ ते २९ पाहायच्या होत्या. आम्ही मधेच उतरून काही अंतर पुढे चालत गेलो आणि लेणी क्रमांक २१ रामेश्वर लेणी जवळ पोहचलो. या लेणीमध्ये चामुंडेची कोरलेली मूर्ती अप्रतिम आहे. जितके जमतील तितके लेणी पाहून आम्ही पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो. आम्हला बुलडाण्याला जायचे होते म्हणून आवरते घ्यावे लागले.
दुपारी २:३० च्या सुमारास आम्ही वेरूळ लेणी आवारातून बाहेर पडलो आणि हॉटेल मध्ये ठेवलेले सामान घेण्याकरिता हॉटेल मध्ये गेलो आणि त्याच हॉटेल मध्ये जेवण करून पुढच्या प्रवासाला निघालो. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) सिडको बस डेपो मध्ये जाण्या करीत आम्ही शेअर जीप मध्ये चढलो आणि आम्ही खूप मोठी चूक केली.
स्थानिक लोकांची मदद घेत आम्ही बस थांब्याजवळ आनकी थोडावेळ थांबलो असतो तर बरे झाले असते असं वाटू लागले कारण, प्रवासी भरण्या करीत जीप बऱ्याच ठिकाणी फिरत आणि थांबत होती, आमचा वेळ वाया जात होता इतकेच नाही तर जीप मध्ये अतिरिक्त प्रवासी भरल्या कारणाने बसने सुद्धा असह्य झाले होते. सायंकाळी ४:३० सुमारास आम्ही बाबा पेट्रोल पंप या ठिकाणी उतरलो, तेथून छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) सिडको बस डेपोसाठी ऑटो रिक्षा केली, तिथून लोणारला गेलो. सिडको बस डेपोतून तुम्ही छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) रेल्वे स्थानकावर पोहोचू शकता.
जवळपास पाहण्याची ठिकाणे
- अजिंठा लेणी
- देवगिरी - दौलताबाद किल्ला
- भद्रा मारुती मंदिर
- औरंगाबाद लेणी
- घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
- बीबी का मकबरा
- शैतान औरंगझेब कबर
- जायकवाडी धरण













