तुंगारेश्वर आणि घोडबंदर सहल


वाहतुकीची पद्धत: दुचाकी
प्रवासाची तारीख: २५-मार्च-२०२४


      दरवर्षी होळीच्या निमित्ताने आम्ही फिरायला जातो, मुंबईच्या जवळपास असलेल्या ठिकाणांना भेट देतो. याही वर्षी आम्ही जायचे ठरवले पण, ठिकाण ठरत नव्हते. धुळवडीच्या आदल्या दिवशी शैलेश दादा आणि मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यायचं असे ठरवले तसे आम्ही सकाळी ७:०० वाजता घरातून दुचाकी घेऊन निघालो. अवघ्या वीस मिनिटात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या द्वारापाशी पोहोचलो. दरवाजे बंद पाहून आमची निराशा झाली आम्ही सुरक्षारक्षकाला विचारले असता त्याने सांगितले आज सोमवार असल्या कारणाने उद्यान बंद आहे. नेहमी पब्लिक हॉलिडेच्या दिवशी उघडे असणारे उद्यान आज मात्र बंद होते मग आता काय दुसरे ठिकाण ठरवायचे. 

    द्वारापाशी बसूनच आम्ही वसईच्या किल्ल्याला भेट द्यायची असे ठरवले आणि वसई किल्ल्याच्या दिशेने निघालो पण, वाटेतच आठवले की आज धुळवडीचा दिवस आहे. किल्ल्या शेजारील वस्तीतील लोक आज धुळवड साजरी करत असतील त्यामुळे त्यांना आमचा आणि आम्हाला त्यांचा त्रास नको म्हणून आम्ही तुंगारेश्वरला जायचे ठरवले. सकाळी नऊच्या सुमारास आम्ही तुंगारेश्वरच्या वन विभागाच्या चौकी जवळ पोहोचले. धुळवड असल्याकारणाने चौकी बंद होती. हेर्वी मात्र वन विभागाचा प्रवेश  शुल्क देऊनच आत प्रवेश करावे लागते. वन विभागाची चौकी ते तुंगारेश्वर मंदिर एवढे कमी अंतर पार करायला आम्हाला ३५ ते ४० मिनिटे लागले कारण येथील रस्ता कच्चा आहे व दुचाकी चालवताना विशेष काळजी घ्यावी लागत होती. 

    वाहन तळात गाडी उभी केली आणि महादेवाच्या मंदिरात पोहचलो. नुकतीच आरती पार पढली होती, यामुळे दर्शना करिता भली मोठी रांग लागली होती, म्हणून आम्ही गर्दी कमी झाली कि येयायचे असे ठरवून पुढे निघालो. मंदिराच्या द्वारस्थानी एक दीपमाळ आहे, ही दीपमाळ पाहता एकविसाव्या शतकात बांधली असल्याचे लक्षात येते. पुरातन मंदिरातील दीपमाळेतील सुबकता ह्या दीपमाळेत दिसत नव्हती. ही दीपमाळ कमी आणि मिल वर उभारलेली चिमणी भासत होती. तुंगारेश्वर परिसरात बरीच नवी बांधकामे झालेली आढळतात व सुशोभीकरणाच्या नावाखाली बसवलेल्या टाईल्स मुळे येथील नैसार्गिगत्व नष्ट झालेले आढळते.नव्याने बांधलेल्या पायवाटेने आम्ही डोंगर चढत पुढे गेलो, ओढ्यावर बांधलेला पूल पार केला आणि दुर्गा देवीच्या मंदिरा पाशी पोहचलो. देवीचा आशीर्वाद घेतला आणि काही वेळ तिथेच घालवला. 

    तुंगारेश्वर हा पाच पर्वतांचा संग्रह आहे, या ठिकाणी भगवान परशुरामाने तुंगा नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे. हे मंदिर भगवान परशुरामाच्या सन्मानार्थ बांधले गेले. याच ठिकाणी भगवान परशुरामांनी तपश्चर्या केली होती. असे मानले जाते की आदि शंकराचार्यांनी शुपारकाजवळील एका ठिकाणी ध्यान केले होते, ज्याला आता सोपारा किंवा नालासोपारा म्हणतात.

तुंगारेश्वर महादेव मंदिर
तुंगारेश्वर महादेव मंदिर

    विश्रांती घेत असते वेळी शैलेश दादा म्हणाला, काही वर्षांपूर्वी येथे आलो होतो तेव्हा ओढ्याच्या किनारी बरीच वीरगळ ठेवलेली होती, आता ती कुठे दिसली नाहीत, कदाचित शुशोभीकरण करतेवेळी अडगळीत नेऊन टाकली असावीत असे वाटले. काही पर्यटक दुर्गादेवी मंदिराच्या मागच्या बाजूस जाताना आढळले, मंदिराच्या मागे काय आहे हे पाहण्या साठी आम्ही सुद्धा गेलो, आणि पाहतो तर काय ज्या वीरगळी विषय आम्ही चर्चा करत होतो त्याच वीरगळी इथे आणून ठेवल्या होत्या. वीरगळी पहिल्या आणि महादेवाचे दर्शन घ्या करीत खाली उतरलो. वीरगळ म्हणजे, युद्धात वीरगतीस प्राप्त झालेल्या सैनिकाच्या स्मरणार्थ बांधलेली शिळा. या ठिकाणी अनेक लढाया झाले असावीत व हे ठिकाण पूर्वी काळी किती महत्वाचे होते हे प्रामुख्याने लक्षात येते. 

वीरगळ
वीरगळ

     महादेवाचे दर्शन घेतले आणि डोंगर माथ्यावरील सदानंद महाराज्यांच्या मठात जाण्याकरिता आम्ही निघालो. मुळात आम्हाला छोटासा ट्रेक करायचा होता. जेव्हा आम्ही पुढे गेलो तेव्हा तिथे वन विभागाचा बोर्ड दिसला आणि तिथे बॅरिकेट लावलेले दिसले.  पुढे जाण्यास मनाई होती, त्यामुळे इथेही आमची निराशा झाली. आम्ही तिथेच बसलो आणि थोडा वेळ घालवायचा असे ठरवलं इतक्यातच  शैलेश दादाच्या आईचा फोन आला आणि कळले की तो सकाळचे औषधे घ्यायला विसरला आहे!  त्यामुळे आता जास्त वेळ न काढता केमिस्ट गाठून औषधे विकत घेणे हेच ध्येय होते.  आम्ही दहा-पंधरा मिनिटे तिथेच विश्राम केला आणि परतीच्या प्रवासाला निघालो.  

    परतीचा प्रवास करत असताना डाव्या बाजूला पायवाट दिसली, आम्ही दुचाकी तिथेच उभी केली आणि त्या पायवाटेने पुढे गेलो. काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला एक ओढा दिसला,  ओढ्याला पाणी नव्हते. आम्ही त्या घोड्याच्या पात्रात उतरलो तिथे काही वेळ घालवला आणि एक आश्चर्य करणारी गोष्ट दिसली, किनाऱ्यावरील एक झाड उलमळून पडले होते पण त्याच्या कडेला असलेल्या वेलीने मात्र त्या पडलेल्या झाडाला घट्ट पकडून ठेवले होते. जणू काही जन्मो जन्मोका साथ असेच काही.  

निसर्ग प्रेम - जन्मो जन्मोका साथ
निसर्ग प्रेम - जन्मो जन्मोका साथ

    आम्ही काही वेळ तिथे फोटोग्राफी केली आणि न्ह्यारीसाठी डब्यातून पुरणपोळ्या आणल्या होत्या त्या खाल्ल्या. तेथील काही फुलांचे फोटो काढले. अचानक आलेल्या वाऱ्याच्या झुळकेमुळे, झाडांवरील सुकलेल्या पानांचा वर्षाव होऊ लागला, पण हा क्षण कॅमेऱ्यात कैद करायचा राहून गेला. जंगलातून बाहेर येते वेळी, आम्हाला लाल मुंग्यांची छोटी छोटी वारुळे दिसली, या वारुळांचा उपयोग दिशादर्शक म्हणून कसा करायचा याची मौल्यवान माहिती शैलेश दादाने दिली, ती खालील प्रमाणे.

"मुंग्या वारूळ बनवतात त्यावेळी माती ओली असते, ती लवकरात लवकर सुखण्या करीत मुबलक सूर्यकिरनांची गरज असते, त्याकिरता वारूळ बनवतेवेळी सपाट भाग हा पूर्व आणि पश्चिम दिशेला असतो, जेणेकरून दिवसभर सूर्यकिरणे वारुळावर पडत असतात. यावरून आपल्याला जंगलात वाट चुकल्यास योग्यती दिशा शोधण्यास मदत होते"  

लाल मुंग्यांचे वारूळ
लाल मुंग्यांचे वारूळ

    जंगलातून बाहेर आलो आणि दुचाकी वर बसून आम्ही वनविभागाच्या चौकीजवळ आलो. तिथे पाणपोई होती रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि मुख्य रस्त्याच्या दिशेने निघालो. विरार मुंबई हायवे ला पोचल्यावर आम्हाला एक केमिस्ट दिसले  पण तिथे हवी असलेली अवषधे उपलब्ध नव्हती, मग काय आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो. जेव्हा फाउंटन हॉटेल जवळ पोहोचलो तेव्हा  शैलेशने डावे वळण घेत गाडी घोडबंदर रोडला वळवली.  त्याला गायमुख बंदर व गायमुख मंदिर पाहायचे होते, पण त्याआधी केमिस्ट शोधणे अत्यंत गरजेचे होते. 

धुळवड दिवशी पाहिलेले निसर्गाचे रंग
धुळवड दिवशी पाहिलेले निसर्गाचे रंग 

    गायमुख बंदराच्या दिशेने जाताना एक केमिस्ट दिसले पण आत जाण्याचा रस्ता बंद होता, आत कसे जाता येईल हे पाहत असतानाच, एक स्थानिक व्यक्ती आली आणि त्यांनी केमिस्ट वाल्याला फोन लावून औषधे मागवली, शैलेश दादाने सुद्धा औषधे मागवून घेतली आणि औषधांचा भाग घेतला, आम्ही दोघेही आता निर्धास्त झालो होतो. पुढील दहा मिनिटातच आम्ही गायमुख बंदरा जवळ पोहोचलो, सध्या तिथे फार चांगले सुशोभीकरण केलेले आहे. पर्यटकांसाठी व्यवस्थित बसण्याची सोय उपलब्ध केलेली आहे. तिथे थोडा वेळ घालवला आणि ठाणे महानगरपालिकेने उभे केलेले घोड्यांचे दोन पुतळे पाहण्यासाठी आम्ही चालत पुढे गेलो तितक्यात आमची नजर एका बाजूस पुरातन वास्तूकडे पडली. तिथे पुरातत्त्व विभागाने इथे कचरा टाकू नये असे लिहिले होते. नंतर कळले की हे गायमुख बंदरावरील लक्ष ठेवण्यासाठी दुर्ग सदृश्य पुरातन चौकी आहे. पुरातत्त्व विभागाच्या फुकट पगारी अधिकाऱ्यांनी पाटी लावून आपले काम पूर्ण केले होते, त्याचे संवर्धन व तेथील सुशोभीकरण हे रामभरोसे सोडले आहे. पुरातन वास्तूच्या अगदी शेजारीच एक रेस्टॉरंट बांधले आहे, ही परवानगी कशी काय मिळाली? आम्ही पुढे जाऊन घोड्यांच्या पुतळ्यांचे फोटो काढले.

नव्याने बांधलेले गाईमुक बंदर
नव्याने बांधलेले गाईमुक बंदर

पुरातन गायमुख चौकी (दुर्ग)
पुरातन गायमुख चौकी (दुर्ग)

    पूर्वी काळी या ठिकाणी उच्य दर्जाच्या अरबी घोड्यांचा व्यापार होत असे, म्हणून या ठिकाणचे नाव घोडे गाव असे ठेवले होते, पुढे जाऊन याचे नामांतर घोडबंदर असे झाले. ठाणे महानगर पालिकेने उभारलेले घोड्यांचे पुतळे त्याच स्मरणार्थ. अरबी समुद्राद्वारे होणाऱ्या व्यापारी मार्गांपैक हा एक महत्वाचा मार्ग होता, इथून सर्व सामग्री कल्याण, वसई, नाणेघाट मार्गे जुन्नर अशी पोहचत असे. या व्यापारी मार्गाच्या सुरक्षेकरिता अंदाजे एकूण ११ दुर्ग वर चौक्या पोर्तुगीजानी आस पास बांधल्याचे इतिहासात नोंद आहे. या ११ दुर्ग व चौक्यांपैकी एक म्हणजे गायमुख दुर्ग(चौकी). राजकीय स्वार्थ आणि पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे आज ही वास्तू शेवटची घटक मोजत आहे. एक आठवण म्हणून या चौकीचे फोटो काढले आणि गाईमुक मंदिराच्या शोधात निघालो.

घोड्यांचे पुतळे

    गूगल मॅप्स वर गायमुख मंदिराचे लोकेशन एका टेकडीवर दाखवत होते, पण तेथे जाण्याचा मार्ग मात्र आम्हाला काळात नव्हतं, स्थानिक लोकांची मदद घेत आम्ही तेथे पोहचलो. गायमुख मंदिर एका छोट्याशा टेकडीवर असून सध्याचे मंदिर हे नव्याने बांधलेले आहे व पुरातन मंदिराचे अवशेष आता दिसत नाहीत. या टेकडीवरून उल्हास नदीचा परिसर पूर्णपणे दृष्टीक्षेपात येतो गायमुख मंदिरातील महादेवाचे दर्शन घेतले आणि या मंदिराचा व जागेचा इतिहास जाण्याकरिता वृद्ध जाणकार व्यक्तीचा शोध घेऊ लागलो, पण आम्हाला हवी असलेल्या माहितीची (जाणकार) व्यक्ती येथे नसल्याचे लक्षात आले आणि आम्ही आमच्या  घरच्या दिशेने निघालो दुपारी दोनच्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो.


गायमुख शिव मंदिर
गायमुख शिव मंदिर