प्रवासाची तारीख : १२ ते १४ जानेवारी २०२४
वाहतुकीची पद्धत: ट्रेन, बस आणि दुचाकी
सातारा नाव ऐकले की अजिंक्यतारा, संत श्री रामदास स्वामींचा सज्जनगड, ठोसेघर धबधबा, कासपठार ही ठिकाणे प्रामुख्याने आठवतात. सज्जनगडचा डोंगर, यवतेश्वर, जरंडेश्वर, माकडाचा डोंगर, किटलीचा डोंगर आणि पेंड्या भैरोबा पर्वत रांगा (टेकड्या) आहेत आणि सातवा अजिंक्यतारा मधून तारा म्हणजे सात-तारा, अपभ्रवंश होऊन सातारा हे नाव पडले असावे असे जाणकारांचे मत आहे. ऐतिहासिक आणि निसर्गाने समृद्ध सय्यगिरीच्या सात टेकड्यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील या प्रदेशात भटकंती करण्याचा माझा योग आला, त्याच भटकंतीचा अनुभव मी तुमच्या समोर मांडत आहे.
 |
| ट्रेन प्रवास सातारा |
आम्ही भेट दिलेल्या ठिकाणांची नावे
पहिला दिवस
दुसरा दिवस
तिसरा दिवस
अभिवादन
साताऱ्याची सहल करायची असा काही विचारही नव्हता, कारण नुकतीच आमची ऑक्टोबर महिन्यात हंपीची सहल झाली होती. जानेवारी महिन्यांत कामाचा व्याप कमी असल्या कारणाने, साहेबाने कामावरच्या सर्व कामगारांवर सुट्ट्यांचा वर्षाव केला होता! भले त्या सुट्ट्या आमच्या वार्षिक खात्यातल्या असल्या तरी, न मागता सुट्ट्या मिळायला पण भाग्य लागते. ११ ते १४ जानेवारी असे चार दिवस सलग सुट्ट्या मिळाल्या होत्या, मग या सुट्ट्यांचा पुरे पूर फायदा उचलायचा म्हणून आमचे परम मित्र आणि ट्रेकिंग पार्टनर विनायक काळे याला फोन लावला. विनायकने सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्याला जाऊया असे सुचवले, मग चार दिवस सुट्टी असल्या कारणाने नुसते सज्जनगड आणि ठोसेघर धबधबा न पाहता साताऱ्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देयायचे ठरविले. विनायकने पण त्याच्या कामावर ३ दिवसांची सुट्टी टाकली. विनायक दरवर्षी त्याच्या वडिलांसोबत सज्जनगडला जातो, त्यामुळे त्याला साताऱ्यातील वाहुतुकी बद्दल बऱ्यापैकी माहित होती, म्हणून मी नियोजनाची जबाबदारी त्याच्यावरच सोपवली.
वरील दिलेल्या यादी प्रमाणे आम्ही ठिकाणे ठरवली पण अंतर्गत प्रवास कसा करायचा या वर संभ्रम होता. सार्वजनिक वाहतुकीने सर्व ठिकाणे पाहणे अशक्य होते, म्हणून आम्ही फेसबुक वरील "सह्याद्री ट्रेकिंग" या ग्रुप वर भाडे तत्वावर दुचाकी किव्हा रिक्षा मिळेल का असे विचारले होते. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या, त्यातील श्री मोरेश्वर जोशी म्हणून एका सभासदाने त्यांच्या परीने प्रयत्न केला, त्यांचा स्वतःचा गाड्या भाडे तत्वावर देण्याचा व्यवसाय आहे, तरीही त्यांनी स्वतः काही रिक्षा चालकांना कॉल करून विचारले, पण रिक्षा चालकांनी सांगितलेले भाडे त्यांनाच पटले नाही. "एवढ्या भाड्यात तर माजी चार चाकी गाडी भाड्याने मिळेल" असे सांगितले, त्याने आम्हाला मित्र किव्हा नातेवाईकाची टू वहिलर मिळते का पहा असे सुचवलेले. तसेच सज्जनगडावर राहण्याची सोय न झाल्यास त्यांना कॉल करा ते गडावरच व्यवस्था करून देतील असे सांगुन आम्हाला आधार दिला. त्यांनी केलेल्या प्रयत्नांकरिता विशेष आभार! तसेच त्याच समूहातील श्री देविदास भुजबळांनी मला साताऱ्यातील गडकिल्ल्यान विषयी मार्गदर्शन केले, व पाटेश्वर लेण्यांना भेट द्या असे सुचविले, म्हणून मी पाटेश्वर हे गूगल वर शोधले असता तेथील वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंगाचे फोटो दिलसे आणि पाटेश्वर हे ठिकाण आम्ही आमच्या सहलीत जोडले. "पाटेश्वर सारख्या अद्भुत लेण्या सुचवल्या बद्दल तसेस मार्गदर्शन केल्या बद्दल देविदास भुजबळ यांचे खुप खुप आभार!". तसेच श्री उमेश ठोंबरे आणि श्री अस्मित महाडिक यांच्याकडूनही मोलाचे मार्गदर्शन मिळाले, कल्याणगडावरील दरवाजा बंद असतो! गडावर जाता येत नाही, बुरुजावरून आत जाता येते असे सांगितले, तसेच त्यांनी गडावरील एका बाबांचा संपर्क क्रमांकही दिला, या दिलेल्या सूचनेबद्दल दोघांचे खूप आभार! या सर्व बाबी लक्ष्यात घेत आम्ही आमचा प्रवास आखला पण, भाडे तत्वावर रिक्षा किंवा दुचाकीची सोय काय झाली नव्हती. विनायकला फेसबुकच्या एका समूहात केदार कान्हेरे यांनी दोन चाकी वर चार चाकी भाडे तत्वावर देणाऱ्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक दिला, त्यांना आम्ही साताऱ्यात जाऊनच संपर्क करायचा असे ठरविले. श्री केदार कान्हेरे यांचे खूप खूप आभार, त्यांच्या मुळे आम्ही ठरवलेली स्थळे आम्हाला वेळेत पाहता आली.
सर्वात महत्वाचे ट्रेनचे बुकिंग, आम्हाला ११ तारखेची महालक्ष्मी एक्सप्रेसची तिकीट मिळाली नाही रिझर्व्हशन फूल झाले होते, म्हणून आम्ही १२ तारखेच्या सकाळची कोयना एक्सप्रेसची तिकीट काढली. १२ तारखेचा पूर्ण दिवस प्रवासात वाया जाणार हे निश्चित होते. समस्या एवढ्या वरच थांबल्या नाहीत, तर परतीच्या प्रवासासाठी पण रेल्वे रिझर्व्हशन फूल होते म्हणू १४ तारखेच्या रात्रीचे बसचे तिकीट काढावे लागले. अचानक ठरवलेल्या सहलीचा हा परिणाम होता! दोन दिवस मुक्कामाचा ही प्रश्न होताच, १२ तारखेच्या रात्री सज्जनगडावर राहण्याची सोय होईल यात कोणतीच शंका नव्हती. १३ तारखेच्या रात्री साठी विनायकने, वाई मध्ये राहणाऱ्या त्यांच्याच एका नातेवाईकाकडे सोय होईल असे सांगितले, पण काही कारणास्तव ते होऊशकले नाही. मग काय ऑनलाईन रूम बुकींग केली, आगोडा या ऍपवर टाकलेल्या छान छान फोटो पाहून आम्ही "गोकर्ण" ह्या हॉटेल मध्ये रूम बुक केली, पण आमचा हा निर्णय चुकीचा होता हे आम्हाला रूम वर गेल्यावर कळाले. सर्व तयारी झाली होती पण भाडे तत्वावर रिक्षा किव्हा दुचाकीची सोय काय झाली नव्हती, थेट साताऱ्यात जाऊनच चौकशी करू किव्हा श्री केदार कान्हेरे यांनी दिलेल्या नंबर वर संपर्क करू असे ठरवत बॅगा भरल्या.
प्रवास आणि ट्रेकचा अनुभव
दिवस पहिला
१२ जानेवारी पहाटे ५:३० ला उठून तयार झालो आणि ७:०० च्या सुमारास घर सोडले. अंदाजे ८:२० पर्यंत दादर स्टेशन ला पोहोचलो. कोयना एक्सप्रेस ही सकाळी ८:५० ला दादर ला येणार होती, फलाटावरच्या बाकड्यावर बसून ट्रेनची वाट पाहत बसलो होतो, ८:४५ च्या दरम्यान सूचना झाली की "मध्य रेल्वे वरील सर्व ट्रेन्स उशिराने चालत आहेत आणि कोयना एक्सप्रेस ४० मिनिटे उशिराने येणार आहे". लगेच विनायकला कळवले, कारण तो कल्याण हुन चढणार होता. एवढा वेळ फलाटावर कसा काढायचा याचा विचार करत होतो इतक्यात एक आजोबा बाजूला येऊन बसले. ते बोलक्या स्वभावाचे असल्या कारणाने ओळख ना पाळख पाहता त्यांनी बोलाया सुरु केले. बोलता बोलता ते म्हणाले, तेही बऱ्याच ठिकाणी फिरले पण आजवर एकाही किल्ल्यावर गेले नाहीत, पण त्यांनी रायगडावर जाण्याची इच्छा मात्र वर्तवली, पण उतार वयात रायगड चढणे जमणार नाही अशे म्हणाले. मी त्यांना रोपवेने जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्याशी गप्पा मारता मारता ४० मिनिटे कशी गेली कळालेच नाही आणि ९:३० च्या दरम्यान कोयना एक्सप्रेसची येण्याची सूचना झाली. आजोबांचा निरोप घेत डी-२ डबा ज्या ठिकाणे लागणार होता त्या ठिकाणे जाऊन उभा राहिलो. ९:३५ ला ट्रेन आली आणि मी माझ्या आरक्षित आसनावर जाऊन बसलो, तसेच १०:१० च्या दरम्यान विनायकही कल्याणला ट्रेन मध्ये चढला आणि आमचा प्रवास साताऱ्याच्या दिशने सुरु झाला.
दुपारी १:१५ च्या दरम्यान ट्रेन पुणे इथे पोहचली, जेवणाची वेळ झाली होती, मला काही जेवणाचा डबा आणायला जमले नव्हते, विनायक ने जेवणाचा डबा बाहेर काढला, वांग्याची भाजी आणि चपाती वर ताव मारत पोटपूजा पूर्ण केली. जेजुरी पर्यंत ट्रेन बऱ्यापैकी रिकामी झाली होती, आजूबाजूची आसने रिकामी होती, आम्ही दोघेही एक एका सीट वर आढवे होत वामकुक्षी घेतली. ट्रेन ४० मिनिटे उशीराने आली होती, जर पुडील प्रवासात आणखी उशीर झाला तर सातारा डेपोतून सज्जनगडला जाणारी शेवटची ६:०० ची एसटी बस चुकणार होती, तसे झाल्यास आम्हाला जास्तीचे भाडे देत रिक्षाने जावे लागणार होते. पण स्वामींच्या कृपेने असे काही झाले नाही ट्रेन साताऱ्याला ४:२० च्या दरम्यान पोहचली. आम्ही सातारा स्थानकात उतरून उजवे वळण घेत "सातारा रेल्वे स्टेशन" रोडवरून चालत "सातारा कोरेगाव" रोड वर आलो तिथून डावे वळण घेतले आणि एसटी बस थांब्या जवळ थांबलो. रेल्वे स्टेशन ते बस थांबा हे चालत १० मिनिटांचे अंतर आहे, तर रेल्वे स्टेशन ते सातारा बस स्थानक, एसटी बस ने १५ मिनिटांचे अंतर आहे. बस थांब्यावर थांबून ५ मिनिटे झाले ना इतक्या सातारा बस स्थानकात जाणारी बस आली. आम्ही बस मध्ये चढलो आणि सुमारे सायंकाळी ४:५० ला सातारा बस स्थानकात पोहचलो. चौकशी कक्षा मध्ये सज्जनगडला जाणाऱ्या बस बद्दल चौकशी केली, ५ वाजता ची बस आहे असे आम्हाला सांगितले. सज्जनगडला जाणारी बस सहसा फलाटावर लागत नाही, तर फलाटाच्या समोरील बाजूस लागते हे विनायकला ठाऊक होते. आम्ही तिथे जाऊन उभे राहतो न राहतो इतक्यात बस आली, आम्ही बस मध्ये बसलो आणि सायंकाळी ५:४५ वाजता सज्जनगडावरच्या पायर्यांपाशी पोहचलो. पोटात कावळे ओरडत होते म्हणून वेळ न दवडता तेथील एका दुकानात न्ह्यारी केली आणि सज्जनगडावर जाण्यास सज्ज झालोत. टीप :- प्रत्येक तासाला सकाळी ६ ते सायंकाळी ६ अशी सातारा - सज्जनगड - सातारा बस सेवा उपलब्ध आहे.
किल्ले सज्जनगड
सुमारे ६:३० च्या दरम्यान आम्ही पायऱ्या चढायला चालू केल्या, बऱ्यापैकी अंधार होत आला होता. पायर्यांच्या कडेला काही अंतरांवर श्री हनुमानाच्या वेगवेगळ्या प्रकारातील बसवलेल्या मुर्त्या पाहत चढत होतो. गणेश दरवाजा (शिवाजी महाराज प्रवेश द्वार) पाशी पोहचलो, काही फोटो काढले आणि नतमस्तक होत आत प्रवेश केला. १०-१५ पाऊले चाललो आणि समर्थ प्रवेश द्वारापाशी पोहचलो, तेथील एका शिलालेखाचा फोटो काढत पुढे निघालो. अवघ्या १५ मिनिटांत आम्ही गडमाथ्यावर पोहचलो. २०-२५ पाऊले चालून पुढे गेल्यावर आम्ही एका भक्तनिवासा पाशी पोहचलो. गडावर दोन भक्त निवास आहेत पहिले लागते ते श्री श्रीधर स्वामींचे भक्तनिवास आणि थोडे पुढे गेल्यावर राम मंदिरा समोरील भक्तनिवास आहे ते, श्री रामदास स्वामींचे. आम्ही श्री श्रीधर स्वामींच्या भक्तनिवासाच्या कार्यालयात आमची नोंदणी केली, आम्हाला दुसऱ्या माळ्यावरच्या खोलीची चावी मिळाली. आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या आणि फ्रेश होऊन थोडा आराम केला. सायंकाळी ७:३० वाजता आम्ही शेज आरती साठी खाली उतरलो. पहिले श्रीधर स्वामींच्या मंदिरात आरतीला गेलो, तिथून समोरील दास मारुतीच्या मंदिरात गेलो नंतर श्री राम मंदिरात आणि मग रामदास स्वामींच्या समाधी स्थानाकडे आरती करून पुन्हा ८:३० च्या दरम्यान भक्तनिवासाकडे आलो. भक्तनिवास शेजारीच एक मोठी पुष्करणी आहे तिथे फोटो काडत थोडा वेळ घालवला. पुष्करणी जवळ शेंदूर फसलेल्या एका वीरगळाने आमचे लक्ष वेधून घेतले. वीरगळाचा फोटो काढला आणि रात्रीच्या जेवणाकरिता रांगेत जाऊन उभे राहिलो. रात्रीच्या महाप्रसादाची वेळ ९:०० ची आहे, ही वेळ चुकली तर तुम्ही महाप्रसादाला मुकलात. आम्ही महाप्रसाद घेतला आणि आमच्या खोलीत झोपायला गेलो, कारण आम्हाला सकाळी ४:३० वाजता काकड आरती साठी उठायचे होते! भक्तनिवासातील सोयी सुविधा यथोचित होत्या, झोपण्याकरिता गादी, उशी, चादर तसेच अंघोळी व इतर विधीं साठी स्वच्छ सामूहिक स्वच्छतागृह उपलब्ध होते, तेही निशुल्क!
 |
१. सज्जनगडावरील शिलालेख, २. वीरगळ, ३. दास मारुती, ४. ब्रम्हपिसा स्मारक |
दिवस दुसरा
रात्री झोपताना पहाटे ४:०० चा गजर लावून झोपलो होतो, पण आदल्या दिवशीच्या प्रवासाच्या थकव्यामुळे उठायला काय होईना, पण विनायक मात्र स्वतःहून उठला आणि अंघोळीला गेला. एरव्ही आरामात उठणारा विनायक मात्र आज लवकर उठला याच कारण म्हणजे त्याच्या मनातील भक्ती भाव, त्याला स्वामींच्या काकड आरतीला जायचे होते! मी मात्र आरामात उठून गरम पाण्याने अंघोळ करत तयार झालो आणि प्रभू श्री रामांच्या मंदिरात आरती साठी पोहचलो. विशेष म्हणजे जानेवारी महिना असून गडावर थंडी जाणवत नव्हती. मंदिरातील प्रभू श्री राम, सीता माता आणि श्री लक्ष्मण यांच्या मुर्त्या तंजावरचे वेन्कोजी राजे यांनी श्री रामदास स्वामी यांना भेट दिल्या होत्या. विशेष म्हणजे ह्या मुर्त्या एका अंध कारागिराने बनवल्या असल्या कारणाने ह्या मूर्त्यांना डोळे नाहीत अशी आख्यायिका सांगितली जाते! मंदिरातील आरती पूर्ण करून आम्ही तळघरातील स्वामींच्या समाधी स्थळापाशी होणाऱ्या आरती कडे गेलो, त्यानंतर जवळच असलेल्या स्वामीच्या वस्तू संघरालयाला भेट दिली. संग्रहालयात ठेवल्या वस्तू पाहिल्या आणि आम्ही चहा पिण्या करीत भक्त निवासात सकाळी ६:०० वाजता पोहोचलो.
सूचना : भक्त निवासात नियम व वेळा कटाक्षाने पाळल्या जातात, त्यामुळे दिलेल्या वेळेत चहा, नाश्ता व जेवणा साठी हजार राहावे लागते. चहा पिऊन झाल्यावर आम्ही सूर्योदय पाहण्या साठी पूर्वेकडील अंगाई देवीच्या मंदिराकडे गेलो. अंगाई देवीचा आशीर्वाद घेतला आणि तेथील बुरुजावर जाऊन सूर्यनारायणाची वाट पाहत उभे राहिले. अनेक भक्त मंडळी सूर्योदय पाहण्याकरिता तेथे आली होती. सूर्याच्या तेजाने आकाशात पडणाऱ्या भगव्या छटा पाहण्याचा अनुभव काही औरच होता. सुमारे ७:१३ च्या दरम्यान सूर्यनारायणाचे दर्शन झाले, काही फोटो काढले आणि गडा वरील इतर वास्तू पाहण्या करीत निघालो.
सूचना : अंगाई देवीच्या मंदिर परिसरात व बुरुजाच्या आसपास माकडांचा वावर असतो, त्यामुळं सावधगिरी बाळगावी. हातातील मोबाईल व कॅमेरा जपून वापरावे. तसेच बुरुजाच्या कडेला किव्हा तटबंदीवर उभे राहणे टाळावे, अचानक माकड जवळ आल्याने दचकून तोल जाण्याची शक्यता असते.
 |
१. चुन्याचा घाना, २. सज्जनगडावरून दिसणारा सूर्योदय, ३. उमरोडी धरण, ४. ठोसेघर घाट |
अंगाई देवी मंदिराकडून मागे वळत आम्ही चुनाच्या घाण्या जवळ आलो. चुन्याचा घाना पहिला, पण जाते कुठे निदर्शनास पढले नाही. चुन्याच्या घाण्याजवळील डावीकडील एका पडक्या इमारती कडे गेलो, त्या इमारतीचे बांधकाम इस्लामिक शैलीचे वाटले, कदाचित ती मशीद असावी. मी काही इतिहास तज्ज्ञ नाही, माझा अंदाज चुकीचाही असू शकतो. इसवी सण १७०० च्या दरम्यान सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला होता व गड जिकल्यावर औरंगझेबाने गडावरील मशिदीमध्ये जाऊन नमाज अदा केला अशी नोंद सापडते, यावरून मांडलेला हा अंदाज. पडकी इमारत पाहून झाल्यावर आम्ही थेट गेलो ते गडाच्या पश्चिम टोकावर. गडाच्या पश्चिमेस जाण्यास श्री राम मंदिराच्या मागच्या बाजूने वाट आहे. पश्चिम टोकाच्या बुरुजावर उभे राहिल्यास, ठोसेघरला जाणारा सुंदर असा घाट रस्ता दिसतो. आजूबाजूचा प्रदेश न्याहाळत आम्ही धाब्याचा मारुतीचे दर्शन घेतले, तेथून मागे फिरत आम्ही ब्रम्हपिसा स्मारका पाशी आलो. ब्रम्हपिसा स्मारक म्हंजे काय हे मी सांगण्या पेक्षा, ते तुम्ही तिथे स्वतः जाऊनच वाचा आणि सज्जनगडावरच प्रसन्न वातावरण अनुभवा! ब्रम्हपिसा स्मारक पाहून झाल्यावर आम्ही ज्या वाटेने आलो होतो त्याच वाटेने आम्ही पुन्हा भक्तनिवास गाठले ते नाश्ता करण्या साठी. सकाळचे आठ वाजले होते गरमा गरम पोहे खाल्ले आणि गडाची उत्तर बाजू पाहण्यास सज्ज झालो. पूर्वेस आलो आणि तेथून रामघळ पाहण्यासाठी गडाच्या उत्तरेस गेलो. रामघळ किंव्हा तेथील जाणारी वाट काही आम्हाला सापडली नाही पण थोडे पुढे गेल्यावर आम्हाला कल्याण उडी स्मारक दिलसे. कल्याण उडी स्मारक म्हणजे या जागेवरून श्री कल्याण स्वामिनी उडी मारली होती, जेव्हा श्री रामदास स्वामींची वल्कले हवेने उडून खाली गेली, ते आणण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता श्री कल्याण स्वामींनी दरीत उडी मारली, सर्वांना वाटले की, आता काय कल्याण स्वामी येत नाही! पण श्री कल्याण स्वामी समर्थांचे वल्कले घेऊन परतले, विशेष म्हणजे त्यांना साधा ओरखडा पण आला नव्हता!
कल्याण उडी स्मारक पाहून आम्ही अजून थोडे पुढे गेलो. गडाच्या उत्तर टोकावरून दिसणारे विहंगम दृश्य अप्रतिम होते, तसेच
उमरोडी धरणाचे पात्र पाहून मन प्रसन्न झाले. बुरुज आणि तटबंदी ढासळली असल्या कारणाने अजून पुढे जाण्याच्या मोहाला आवर घातला आणि आहे त्याच जागेवरून निसर्ग सौंदर्य अनुभवला. गडावरच्या बहुतांश वास्तू पाहून झाल्या होत्या, आता आम्ही गड उतार होण्याचा निर्णय घेतला. आम्हाला दिलेल्या खोलीत जाऊन सामानाची आवराआवर केली आणि खोली रिकामी करून चावी कार्यालयात नेऊन दिली. सकाळी ९:०० च्या सुमारास आम्ही गड उतरायला सुरुवात केली. काही पायऱ्या खाली उतरल्या वर उत्तरेस जाणारी एक वाट दिसली, आम्हाला वाटले ही वाट रामघळीकडे जात असेल म्हणून आम्ही मुख्य वाट सोडत त्या वाटेने पुढे गेलो. रामघळ काय आम्हाला दिसली नाही पण तेथे एक मंदिर दिसले, ते मंदिर श्री कल्याण स्वामींचे होते (ज्या ठिकाणी कल्याण स्वामि उडी मारून खाली उतरले ती जागा). त्याच वाटेने गडावर येणारे एक बाबा भेटले, त्यांना आम्ही विचारल रामघळ कुठे आहे त्यांने गडाच्या तटाकडे बोट करून दाखवले, आणि म्हणाले तेथील वाट आता तुटलेली आहे जाण्या योग्य नाही. आम्ही बाबांना दुसरा प्रश्न विचारला की ही वाट कुठे जाते, त्यांने सांगितलं की ही वाट
परळी गावात जाते. आम्हाला परळी गावातील भूमिज शैलीतील (हेमाडपंती)
पुरातन शिव मंदिर पाहायचे होते, पण तेथून वाहतुकीची सोया होईल कि नाही याची खात्री नव्हती. म्हणून आम्ही जाण्याचे टाळले आणि माघारी फिरत मुख्य वाटेने गड उतार होत वाहनस्थळापाशी पोहचलो. बस यायला अजून ३० मिनटे शिल्लक होती, म्हणून आम्ही बसची वाट न पाहता पायी उतरायचे ठरविले जेणेकरून थोडं चालणे होईल आणि ठोसेघर हुन येणारी एखादी बस मिळाली तर लवकर अजिंक्यतारा गाठता येईल. रस्त्याने खाली उतरत असताना, एक एसटी बस गडावर गेली, हीच बस खाली येणार हे निश्चित. आम्ही तिट्या पाशी पोहचलो आणि थांबलो, ठोसेघर घाटातून बस येताना दिसत नव्हती, त्याच वेळेत विनायक ने दु चाकी भाड्याने मिळते का विचारण्या करिता श्री केदार यांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर वर संपर्क केला. एका महिले ने कॉल उचलला, विनायक ने गाडी संदर्भात चौकशी केली आणि समोरून गाडी भाड्याने मिळे असा होकार आला, जणू स्वामींची कृपा आमच्या वर झाली होती, आमचा पुढील प्रवास सुखकर होणार होता तसेच ठरवलेली ठिकाणे वेळेत पाहून होणार होती. सज्जनगडावर गेलेली एसटी, तिट्या जवळ आली आम्ही हात दाखून बस थांबवली आणि बस मध्ये जाऊन बसलो. सातारा बस स्थानकात उतरून आम्ही गूगल मॅप्सच्या साहाय्याने "वीर राजपूत सर्व्हिसेस" या गाडी भाड्याने देणाऱ्या दुकाना जवळ पोचलो. सातारा बस स्थानकापूस हे दुकान १.६ किलोमीटर अंतरावर आहे, चालत २० - ३० मिनिटे लागतात.
गूगल लोकेशन : Veer Rajput Car Rental Service.
सूचना : सजननगडाचे दरवाजे सकाळी सूर्योदयाला उघडता तर सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर बंद होतात, याची नोंद घ्यावी.
विनायकने त्याच्या आधारकार्डची फोटो कॉपी दिली आणि १००० रुपय डिपॉझिट ठेऊन ज्युपिटर ही दुचाकी एका दिवसासाठी भाड्याने घेतली. सर्वप्रथम आम्ही ऑनलाईन बुक केलेल्या "गोकर्ण" लॉज वर गेलो. रिसेप्शन मधल्या काकांनी पहिल्या मजल्यावर नेऊन रूम दाखवली. रूमची अवस्था एकदम बिकट होती, जणू आम्ही चुकीच्या मुहूर्तावर रूम बुक केली कि काय असे वाटले. पैसे भरले नव्हते म्हणून बुकिंग कॅन्सल कारवी असे वाटले, पण नवीन लॉज शोधून रूम बुक करण्यासाठी आमच्या कडे पर्याप्त वेळ नव्हता, बरीच ठिकाणे पाहायची होती, म्हणून आम्ही मिळालेल्याच रूम मध्ये राहण्याचे ठरविले आणि पैसे भरले. आम्ही आमच्या बॅगा रूम मध्ये ठेवल्या आणि महत्वाच्या वस्तू एका छोट्या बॅगेत भरून अजिंक्यतारा पाहण्यासाठी निघालो.
सूचना : गोकर्ण लॉज मी तरी कोणाला सुचवणार नाही, आणि आगोडा वर टाकलेल्या फोटोंवर तर अजिबात विश्वास ठेऊ नका, जर तुमच्या कडे पुरेसा वेळ असेल तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन रूम बुक करा. 👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
किल्ले अजिंक्यतारा
सकाळचे ११:२५ वाजले होते, आम्ही गूगल मॅप्सच्या साह्याने अजिंक्यतारा किल्ल्याच्या मुख्य दरवाज्या जवळ अवघ्या १५ मिनिटात म्हणजे ११:४० ला पोहचलो. रस्ता सुस्थितीत असून मुख्य दरवाजा पर्यंत गाडी नेता येते. मुख्य प्रवेशद्वारावरील कोरलेली शिल्पे पाहत आम्ही नतमस्तक होत आत प्रवेश केला. गडाच्या आत जाणारी पायऱ्यांची वाट जणू स्वर्गात जाणारी वाट असल्या सारखे भासते, इतक्या सुंदर रित्या ती रचली आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस देवळ्यांवर कोरलेली शिल्पे पाहत आम्ही बुरुजावर पोहचलो. प्रवेशदरवाजा पूर्ण पाहून झाल्यावर बुरुजावरून खाली उतरलो आणि मुख्य वाटेवरील पायऱ्या चढत, आम्ही दुसऱ्या दरवाज्या जवळ पोहचलो. दुसऱ्या दरवाज्याच्या आत प्रवेश केला, थोडे चालत पुढे गेलो आणि गडमाथ्यावर पोहचलो. उजवीकडे वळत आम्ही श्री हनुमान मंदिरा जवळ पोहचलो , मारुतीचे दर्शन घेतले आणि समोरच छोटेखानी असलेल्या श्री शिव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले.
 |
१. अजिंक्यतारा मुख्य दरवाजा, २. मारुतीची मूर्ती, ३. दक्षिण दरवाजा, ४. मंगळाई देवीची मूर्ती |
तेथून काही पाऊले पुढे गेल्यावर आम्हाला दोन पायवाट दिसल्या, दिशादर्शक फलकावर डावीकडील वाट मंगळाई देवी मंदिराकडे जाते तर उजवीकडील वाट सप्तर्षी मंदिराकडे जाते असे लिहिले होते. आम्ही उजवीकडील वाटेने पुढे जाण्याचे ठरवत गड भ्रमंती चालू केली. गडावर फारशी रहदारी नव्हती आम्ही ज्या वाटेने पुढे जात होतो त्या वाटेने फार कमी लोक येतात असे जाणवले. रान माजले होते, या वाटेवरून आम्ही दोघेच जात होतो म्हणून थोडी भीती ही वाटत होती तसेच उजवीकडील बाजूस दरी होती म्हणून आणखीच सावधतेने चालावे लागत होते. काही अंतर पुढे चालल्यावर एक कमान दिसली, तिथून पुढे गेल्यावर मंदिराचे शिखर दिसले, हेच ते सप्तर्षी मंदिर. डाव्या बाजूच्या छोट्याश्या वाटेने पुढे जात आम्ही नैसर्गिक तलावाच्या शेजारी पोहचलो, तलाव आटले होते. तेथूनच पुढे गेलो आणि सप्तर्षी मदिरा कडे पोहचलो. मंदिराच्या आत असलेल्या शिव पिंडीचे दर्शन घेतले आणि तलावाच्या आवारातून बाहेर आलो, आणि पुन्हा त्याच वाटेने पुढे जात राहिलो. ही वाट कुठे जाते ते ठाऊक नव्हते पण वाट स्पष्ट मळलेली होती म्हणू धास्ती वाटत नव्हती. काही अंतर चालल्यावर आम्हाला गडावरील वास्तू सदृश अवशेष दिसले, आम्ही आमचा वेग वाढवत पुढे गेलो आणि पाहतो तर काय आम्ही पोहचलो होतो गडाच्या दक्षिण दरवाज्या कडे. खाली उतरत दक्षिण दरवाजा पहिला, काही वेळ घालवला आणि वर येऊन पुन्हा मुख्य पायवाटेने पुढे जात राहिलो. काही वेळाने आम्ही दक्षिण बुरुजा जवळ पोहचलो, तेथून डावे वळण घेत पुढे चालत आम्ही दारू कोठार शोधत होतो, कुठेही मार्गदर्शक फलक नसल्या कारणाने शोधायला अडचण येत होती. विनायकने सहज डावीकडे मागच्या बाजूस वळून पहिले, त्याला एक दगडी वास्तू दिली, ती काय आहे हे पाहण्यासाठी मुख्य पायवाट सोडत आम्ही डावीकडील वाटेने वर गेलो. ही दगडी वास्तू दुसरेतिसरे काही नसून दारू कोठार होते. दारू कोठार पाहून झाल्यावर आम्ही खाली उतरलो आणि मुख्य पाय वाटेने पुढे चालत राहिलो आणि गडाची तटबंदी दिसली, तटबंदी मध्ये काही देवळ्या बनवल्या होत्या किव्हा ते शौचकूप आसवावेत, सुरक्षितता लक्षात घेता आम्ही पुढे जाऊन पाहण्याचे टाळले. तटबंदी सुस्तिथित दिसत होती पण केव्हाही ढासळेल असे वाटत होते, महाराज्यांवर व त्याच्या मावळ्यांवर विश्वास आहे हो, पण सध्याच्या सरकारी वेवस्थे वर विश्वास नाही, डागडुजीच्या नावावर गलथान कारभार करतात. असो आम्ही काही अंतर पुढे गेल्यावर मंगळाई देवीच्या मंदिराकडे पोहचलो. मंदिर बंद असल्या कारणाने आत जात आले नाही, बाहेरूनच देवीचे दर्शन घेतले. काळ्या पाषाणात कोरलेली देवीची मूर्ती फार सुंदर आहे. मंदिराच्या आवारात काही वीरगळ ठेवलेल्या दिसल्या, वीरगळ म्हणजे युद्धात धारातीर्थ पढलेल्या वीरांच्या स्मरणार्थ बनवलेली शिळा, पण लोकांनी याला शेंदूर फासून व फुले वाहून देवाचे रूप दिले होते.
मंगळाई देवीचे मंदिर पाहून झाल्या वर आम्ही पुढे निघालो, इत्याकत माझे लक्ष एका पायरी वर गेले. मंदिराच्याच एका अवशेषचा भाग पायरी म्हणून वापर केला होता. पाहून वाईट वाटले, जर पुरातत्व विभागाने थोडी जरी मेहनत घेतली असती आणि उत्खनन केले असते तर मंदिराचे बरेचसे अवशेष सापडेल असते व पुरातन मंदिर पुन्हा उभे करता आले असते, आताचे जे मंदिर आहे ते नव्याने बांधलेले आहे. आम्ही पुढे गेलो आणि एका तलावा जवळ पोहचलो. तलावा कडे मुख करून ठेवलेला संगमरवरी दगडात कोरलेला नंदी निदर्शनास पढला, पण शिव पिंडी कुठे दिसली नाही. आम्ही डावे वळण घेत एका रस्त्याला लागोलो, हा रास्ता कुठे जातो हे ठाऊक नव्हते. गडावर फार कमी ठिकाणी दिशादर्शक फलक लावली आहेत त्यामुळे गडावर फिरताना आपण कोणत्या दिशेने पुढे जावे हे कळात नाही. उजवे वळण घेत आम्ही पुढे चालत राहिलो आणि एका वास्तू जवळ पोहचलो, ही वास्तू राजसदर किव्हा वाड्याचे अवशेष असल्या सारखे भासत होते. नुकताच इथे कोणता तरी कार्यक्रम पार पढला होता, काही कामगार छतासाठी बांधलेले बांबु काढत होते, त्या वास्तूला गोंड्यांच्या तोरणांनी सजवले होते, आम्ही कामगारांना विचारले असता त्यांने सांगितले की, दोन दिवसांपूर्वी
छत्रपती शाहू महाराज्यांची जयंती होती त्या निम्मत इथे दरवर्षी उत्साह साजरा केला जातो! काही जण या वास्तूला
छत्रपती तारा राणींचा महाल असे ही सांगतात, पण तेथ कोणते ही नामफलक नाही, यामुळे लोक जे सांगतील ते ऐकायचे आणि खरे मानायचे.
तेथून आम्ही वाड्याच्या मागच्या बाजूस गेलो तेथे
समाधी सदृश्य एक वास्तू दिसली, पण तेतेही नामफलक नसल्या कारणाने कळले नाही कि नक्की समाधी आहे कि अजून काही. तेथून मागे वळत आम्ही पुढे गेलो आणि आम्हला एक फलक दिसले त्यावर टांकसाळ असे लिहले होतो.
टांकसाळ पाहून आम्ही जवळील एका पडक्या इमारतीत गेलो. त्या इमारतीच्या खालच्या बाजूस दोन मोठे, मडक्याच्या आकाराचे गाळे होते.
धान्य कोठार असावे कदाचित, किंव्हा बाजूलाच टांकसाळ असल्या कारणाने, तयार झालेली नाणी ठेवण्या करीत तरतूद केलेली असावी. नाम फलक नसल्या कारणाने अंदाजच लावावे लागत होते. मागे वळत पुन्हा वाड्याच्या अवशेषांजवळ आलो, तेथून उजवीकडे वळत आम्ही मुख्य पायवाटेने पुढे चालत राहिलो आणि पुन्हा हनुमान मंदिरा जवळ आलो. आमची गडफेरी पूर्ण झाली होती. गड उतार होत आम्ही मुख्य प्रवेश द्वारातून बाहेर आलो. दुपारचे १:४० वाजले होते, गडाजवळ जेवणाची सोय नसल्या कारणाने दुसरे ठिकाण पाहण्या आधी पोटाला आधार म्हणून जवळील एका गाड्यावर काकांकडून भेळ आणि लिंबू सरबत घेतले. काका जे कार्य करत होते ते विशेष होते, जे कुणीही पर्यटक, काकांकडून पाणी बाटली विकत घेत होते, काका त्यांच्या कडून १० रुपये अधिकचे घेत होते आणि सांगत होते, गडावर बाटली फेकू नका, रिकामी बाटली आणून दिलीत तर १० रुपये परत मिळतील. गड स्वच्छ ठेवण्याकरिता काकांच्या या प्रयत्नांना सलाम!
👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
चार भिंती हुतात्मा स्मारक
पुढचे ठिकाण होते
चार भिंती हुतात्मा स्मारक, ज्या रस्त्याने आम्ही अजिंक्यतारा किल्ल्यावर आलो होतो त्याच रस्त्यानं माघारी जात शाहू चौकात पोहचलो. एका टेकडी वर स्मारकाच्या भिंती दिसत होते, म्हणून विनायकाला गाडी थांबवायला सांगून, मी गूगल मॅप्स वर पाहिले तर कळाले, आम्ही काही अंतर पुढे आलो होतो. पुन्हा मागे जात आम्ही एका पाण्याच्या टाकी जवळ गाडी उभी केली. पाण्याच्या टाकी शेजारून एक पायवाट स्मारकापाशी जाते. आम्ही उत्साहात तेथो गेलो खरे, पण हा उत्साह काय जास्त काळ टिकला नाही, तेथील दृश्ये मनाला हेलावणारी होती. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्या साठी बलिदान दिले, त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मारकाच्या आवारात पान आणि गुटख्याने लाल पिचकारी मारत रांगोळी कडून ठेवली होती , तसेच तिथे शाळकरी व कॉलेजातील मुले मुली (प्रेमी-युगल) आपला मौल्यवान वेळ वाया घालवत होते. येणारे पर्यटक व तेथील स्थानिक लोकांना याचे महत्व कळले नाही हे महाराष्ट्राचे वर देशाचे दुर्दयवच म्हणावे लागेल! प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फार वेळ न घालवता तेथून आम्ही निघालो ते ढोल्या गणपती मंदिराकडे.
👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
ढोल्या गणपती
शाहू चौकातून डावे वळण घेत आम्ही पोहचलो ढोल्या गणपती मंदिराकडे (सातारा शहर). वाई प्रांतातील ढोल्या गणपती मंदिर आणि हे मंदिर दोन्ही वेगळे, यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. छोटेशे मंदिर गर्द झाडीत असल्या कारणाने मंदिराचा कळस दिसत नव्हता, स्थानिक लोकांची मदद घेत, मंदिरा जवळ पोहचलो. मंदिरातील गणरायाची मूर्ती सुंदर व वेगळी आहे. एका मोठ्या खडकावर मूर्ती कोरलेली आहे, खडकाच्या मोठ्या आकार मुळे मूर्ती आकाराने रुंद आहे त्याच कारणाने याला ढोल्या गणपती असे नाव दिले असावे. गणरायाचा आशीर्वाद घेत आम्ही निघालो पाटेश्वर मंदिर पाहायला. 👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
 |
| १. चारभिंती हुतात्मा स्मारक, २. ढोल्या गणपती - सतार शहर |
पाटेश्वर मंदिर व लेणी
दुपारचे २:३० वाजले होते, थोड्या वेळापूर्वीच भेळ खाल्ली होती, म्हणून पाटेश्वर मंदिर आणि तेथील ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग पाहून झाल्यावर जेवण करू असे ठरविले आणि गूगल बाबाच्या साह्याने निघालो देगावच्या दिशेने. पण पुडील येणाऱ्या समस्यांशी आम्ही अवगत नव्हतो. आम्ही देगाव गावाच्या सीमे जवळ पोहचलो, पण पाटेश्वरला जाणारा रास्ता स्वागत कमानी जवळ खोदला होता. पुढे जायायला वाट नसल्या कारणाने पर्यायी मार्ग शोधण्या करिता गाडी डावी कडे वळवली. गावातील काही व्यक्तींना विचारले असता, रस्त्याचे काम चालू असल्या कारणाने पुढे जात येणार नाही असे सांगितले. एवढा लांबून पाटेश्वरचे शिवलिंग पाहायला आलो आणि आता मागे फिरणे मनाला पटत नव्हते, म्हणून आम्ही गूगल मॅप्सच्या साह्याने पर्यायी मार्ग सापडतो का याचा प्रयत्न करत होतो, इतक्यात गावातील एक काकी आणि एक लहान मुलगा भेटला, त्यांने आम्हाला एक वाट दाखवली आणि म्हणाले "हा रास्ता जातो पाटेश्वरला, पण तुम्हाला गावणार नाही!". त्याला वेहवस्तीत फोड करून सांगता आले नव्हते, आणि आम्हीही उत्साहात त्या रस्त्याने जायचे ठरवले. भले रास्ता कच्चा असला तरी चार चाकी गाडी जाईल इतका रुंद होता, तसेच चारचाकी गाडीच्या चाकांचे ठसे रस्त्यावर उमटले होते, म्हणून बिनधास्त आम्ही गाडी घेऊन पुढे निघालो. काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला रस्त्याच्या मधोमध चिखलाने भरलेला मोठा खड्डा दिसला, खड्डा जास्त खोल नव्हता पण, गाडी आत नेली तर रुतणार हे निश्चित होते. सेतू बांधण्या करिता आजूबाजूला काही मिळते का याचा प्रयत्न केला, पण काही सापडले नाही अखेरीस विनायकने आपल्या ड्रायविंग कौशल्याने खड्ड्याचा बाजूने दुचाकी पलीकडे नेली.
आम्ही जवळ जवळ २ ते २.५ किलोमीटर पुढे आलो होतो, हा रास्ता गूगल मॅप्स वर दाखवत नव्हता, पण आमचे सध्याचे स्थान आणि पाटेश्वरचे स्थान लक्ष्यात घेत पुढं जात होतो. काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला दोन वाटा दिसल्या, गूगल मॅप्स वर पाटेश्वर हे उजव्या बाजूला दाखवत असल्या कारणाने मी विनायकला उजव्या वाटेने पुढे जाऊ असे सुचवले. पण या वाटेवरील मोठमोठया दगडांमुळे दुचाकी चालवणे कठीण जात होते, म्हणून विनायकला गाडी थांबवायला सांगत मी खाली उतरून वाट पाहण्याकरिता पुढे गेलो. वाट पुढे बंद होती, पायवाट असावी पण दुचाकी जाणार नाही हे निश्चित होते, माघारी येऊन विनायकला माघे फिरुया असं सांगितले असता, विनायक मात्र माघारी जाण्यास तयार नव्हता, त्याचे म्हणणे ही बरोबर होते, एवढ्या लांब येऊन पाटेश्वर मंदिर न पाहता जाणे न पटण्यासारखे होते. पण, तो गाडी जंगलात उभी करून पुढे पायी चालत जाऊ असे म्हणू लागला. गाडी जंगलात उभी करून जाणे हे योग्य नाही, तसेच जंगलातील वाटा आपल्याला माहित नाहीत म्हणून मागे फिरण्या शिवाय पर्याय नाही. कशी बशी दगडातून दुचाकी वळवत बाहेर आलो. अजून एक प्रयत्न करू म्हणून डावी कडील वाटेने पुढे गेलो, पण ही वाट सुद्धा पुढे जाऊन बंध झाली. स्प्ष्ट अशी वाट काही दिसत नव्हती, मी गाडीवरून खाली उतरून योग्य वाट सापडते का शोधत होतो, तर दुसरीकडे विनायक मात्र सैरा वैरा दुचाकी लोकांच्या शेतात, वाट शोधत फिरत होता. भले शेतात पीक नव्हते पण दुसऱ्यांच्या शेतात अशी गाडी फिरवणे मुळीच योग्य नाही असे सांगत विनायकाला आहे तिथेच थांबुन मागे फिरायला सांगितले. वाटेत मला दोन गावकरी शेतीची कामे करताना दिसली होती, म्हणून मागे जात आम्ही त्यांना जाऊन विचारले. त्यांचे उदगार एकूण आम्हाला कळून चुकले होते कि आम्ही चुकीच्या मार्गाने पुढे आलो आहोत. " अरे रे तुम्हे इथे कुठे आलात, ही वाट पाटेश्वर ला जात नाही. मागे जा आणि जिथे जमिनीची लेवल केली आहे तिथे जाऊन गावकऱ्यांना विचार ते तुम्हाला वाट दाखवतील". काकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही मागे गेलो, जिथे जमिनीची लेवल केली होती तेथे जाऊन थांबलो. तिथे एक काकी दिसल्या त्या शेतीच्या कामात व्यस्त होत्या, त्यांना आम्ही पाटेश्वर ला जाणाऱ्या वाट कोणती विचारले असता, त्या म्हणाल्या ह्या डावीकडील वाटेने जा, पण गाडी जाणार नाही चालत जावे लागेल. समोर एका डोंगरावर भगवा झेंडा फडकत होता, तिथे इशारा करत काकींनी सांगितले वर डोंगराव आहे पाटेश्वर मंदिर. हे एकूण आम्हाला धक्काच बसला होता. पाटेश्वर मंदिर डोंगर माथ्यावर आहे हे आम्हाला ठाऊकच नव्हते, आमचा समाज होता कि मंदिर गावातच कुठे तरी आहे. "अर्धवट माहिती घेऊन निघाल्याने आमची चांगलीच फजिती झाली होती!"
नेहमी समजूतदार पणे वागणारा विनायक मात्र आज विचित्र वागत होता, पुन्हां गाडी जंगलात ठेऊन चालत जाऊ असे बोलू लागला, तसेच आपण बरेच ट्रेक केले आहेत मग हा ट्रेक काही कठीण नाही आपण चालत वर जाऊ असे म्हणाला. माझ्या मनाला काही हे पटत नव्हतं, त्याला समजावून सांगितले की, आपण ट्रेक करण्याच्या तयारीने आलो नाही आहोत. आपल्याकडे पाणी पर्याप्त नाही आहे तसेच जेवलो ही नाही आहोत व बॅगेतून काही खायला आणलेल नाही. हा परिसर आपल्या ओळखीचा नाही, जंगलातल्या वाटा सुद्धा आपल्या माहित नाहीत, तसेच दुपारचे ३:०० वाजले होते, म्हणजे डोंगर माथ्यावर पोहचायला दीड ते दोन तास लागतील. सुमारे ५ पर्यंत पोहचणार, हिवाळ्याचे दिवस असल्या कारणाने सूर्यास्त लवकर होणार. परतीच्या वेळी अंधार होईल व अंधारात वाट भरकटण्याची दाट शक्यता आहे. ह्या सर्व सांगितलेल्या गोष्टी त्याला पटल्या व निराश मानाने आम्ही माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. आम्ही पुन्हा जेथे रस्ता खोदला होता तेथे आलो, अचानक सुचले की पुढे जाऊन अजून एक प्रयत्न करू, म्हणून पुढे गेलो आणि तेथील खेळात व्यस्त असलेल्या मुल्लांना विचारले, त्यांनी आम्हाला बैठ्या चाळीतून जाणारी एक वाट दाखवली आणि म्हणाले, ह्या वाटेने पुढे जाऊन उजवीकडे वळा, तुम्ही पाटेश्वरच्या रस्त्याला लागला. काही अंतर पुढे गेल्यावर मी विनायकला थांबायला सांगितले. नुकत्याच आलेल्या अनुभवावरून पुढे जाणे योग्य आहे की नाही, रस्ता व्यवस्थित आहे की नाही ही खातर जमा केल्या शिवाय पुढे जायचे नाही असे ठरवले होते. मी गाडीवरून उतरून पुढे पायी चालत गेलो, वर तेथिल काही घरातील लोक्काना विचारू खात्री करून घेतली आणि विनायकला पुढे बोलावले. बैठया चाळीतील चिंचोळ्या वाटेतून आम्ही पुढे गेलो आणि पाटेश्वरला जाणार्र्या मुख्य डांबरी रस्त्याला लागलो. आमचा आनंद काही गगनात मावेना! जणू आम्ही केलेली धडपड पाहून भोलेनाथाला आमची दया आली असावी. पण या सर्व धडपडीत आमचा १ तास वाया गेला होता. ज्यामुळे आम्हला पाटेश्वर मंदिर पाहायला कमी वेळ मिळाला.
 |
| १. वैनायकी, २. शेषशाही विष्णू, ३. पाटेश्वर शिवलिंग, ४. महिषासुरमर्दिनी |
आम्ही घाट रस्त्याने पुढे जात पाटेश्वरच्या दरवाज्या पाशी पोहचलो खरे, पण इथेही आमचा अंदाज चुकला होता. सूचना - पाटेश्वर ला जाणारा घाट रस्ता सुस्तिथित नसल्या कारणाने, दुचाकी काळजी पूर्वक चालवावी व रात्री अंधारात जाणे टाळावे. तसेच पाटेश्वरच्या मुख्य दरवाजा पासून मंदिराकडे जाण्या करिता १.५ ते २ किलोमीटरची जंगलातून पायपीट करावी लागते, ह्याची नोंद असावी. आम्हाला वाटले आम्ही मंदिरा जवळ पोहचलो, गाडी पार्क करत आम्ही पायी चालत पुढे निघालो, काही अंतर पुढे गेल्या वर आम्हाला पायऱ्या लागल्या, त्या चढत आम्ही पुढे गेलो, उजवीकडील खडकात सुंदर गणपतीची मूर्ती कोरलेली दिसली. फोटो काढला आणि पुढे निघालो, जवळ जवळ १० मिनिटे चालत होतो पण मंदिर काही दृष्टीस पडत नव्हते. गूगल मॅप्स वर पाहिले असता कळाले की मंदिर अजून १ किलोमीटर पुढे आहे. सायंकाळचे ४:०० वाजले होते आणि मंदिराचा दरवाजा ५:०० वाजता बंद करतात, म्हणून आम्ही आमचा वेग वाढवला आणि सुमारे ४:१० च्या दरमण्या एका पुष्करणी जवळ पोहचलो. पुष्करणीतील फुल्ललेली कमळे पुष्करणीची शोभा वाढवत होती, बाजूलाच सद्गुरू श्री गोविंदानंद यांचा मठ आहे व मठाच्या बाजूने पाटेश्वर मंदिराकडे वाट जाते. उजवे वळण घेत आम्ही दगडी पायऱ्या चढायला सुरवात केली, पायर्यांच्या दोन्ही बाजूतील भिंतीत देवळ्या कोरलेल्या आहेत. काही देवळ्यांमध्ये शिवलिंग तर काहींमध्ये देवी देवतांच्या मुर्त्या पाहायला मिळतात. आम्ही मंदिराच्या बाहेरील परिसरात पोहचलो, मंदिराचा परिसर चारही बाजूंनी भिंत घालून सुरक्षी केलेला आहे. मंदिर परिसराच्या बाहेरील बाजूस, भिंतीच्या डाव्या बाजूला ३ ते ४ फूट उंच शिवलिंग पाहायला मिळते तर उजव्या बाजूस मारुतीची मूर्ती पाहायला मिळते, तसेच गरुडाची मूर्ती तर काही छोटे आकारातील शिवलिंग पाहायला मिळतात. आम्ही भिंतीतील कोरलेल्या दरवाज्याने आत मंदिर परिसरात गेलो, समोर दगडात कोरलेला भव्य आकारातील पुरातन व सुंदर नंदी दृष्टीस पडतो व त्याच्या समोरील पाटेश्वर मंदिरही तितकेच सुंदर आहे. मंदिराचं माधकाम व खांब पाहता हे पुरातन भूमिज शैलीचे असल्याचे कळते. मंदिराच्या आत प्रवेश करून आम्ही शिव शंभूचे दर्शन घेतले, मंदिराच्या सभामंडपात देवी देवतांच्या काही मुर्त्या पाहायला मिळतात. येथील मुर्त्या ह्या इतर मंदिरातील मुर्त्यांपेक्षा जरा वेगळ्याच आहेत.
 |
| १. अग्निवृषा २. चामुंडा, ३. शिवदंड, ४. सहस्रशिवलिंग. |
मंदिराच्या परिसरात आम्ही दोघेच होतो, पाटेश्वर मंदिराच्या सभामंडपात मुर्त्या पाहत असतानाच तिथे एक दाम्पत्य आले. ते दादा थोडे घाबरले होते कारण निर्जन आणि घनदाट जंगलातून आले होते, त्यांची सुद्धा अपुऱ्या माहिती मुळे आमच्या सारखीच फजिती झाली होती. अश्या ठिकाणी काही प्रसंग ओढवल्यास मदतीला जवळपास कोणीच नाही. त्यांनी आम्हाला सोबत राहण्याची विनंती केली, व पुढील सर्व लेणी सदृश मंदिरे आमच्या सोबतच पहिली. पाटेश्वर मंदिराच्या परिसरात अनेक लेण्या आहेत तेथील एका लेणीत ३ ते ४ फुटाचे मोठे शिवलिंग आहे व त्याच्याच शेजारी ९ ग्रह पट आहे. इतर लेण्यांन मधील मुर्त्या पाहून आम्ही मंदिर परिसरातून बाहेर आलो व पायर्यांनी खाली उतरत गोविंदानंद मठा शेजारी आलो. मठा शेजारून अजून एक पायवाट पुढे जाते, उजवे वळण घेत, त्या वाटेने २० - २५ पाऊले पुढे जात आम्ही दुसऱ्या लेणी समुहा जवळ पोहचलो. आम्हाला उत्सुकता होती ती तेथील सहस्त्र शिवलिंग आणि अग्निवृषा मूर्ती पाहण्याची. पर्याप्त वेळ नसल्या कारणाने आम्ही घाई घाईतच सर्व शिवलिंग आणि मुर्त्या पाहल्या आणि मठात जाऊन गोविंदानंद स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतले. माठातील सेवकाने महाप्रसाद (भोजन) करिता विचारले. तेव्ह कुठे आम्हाला भूक लागल्याचे जाणवले, मंदिर आणि तेथील शिवलिंग आणि मुर्त्या पाहण्याच्या उत्साहात आम्ही तहान भूक विसरून गेलो होतो. सेवकाच्या शब्दाचा मान राखत आम्ही प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू घेतला कारण, आधीच खुप उशीर झाला होता अंधार होण्याच्या आत आम्हाला जंगलातून बाहेर पडायचे होते. अपुरी माहिती, चुकलेल्या वाटे मुळे झालेला उशीर, यामुळे पाटेश्वरला पुरेसा वेळ देता आला नाही म्हणू पुन्हा पाटेश्वरला येयचेच असा निश्चय करून निरोप घेतला, पाहूया पुन्हा केव्हा योग येतो पाटेश्वरला जाण्याचा. तेथील तांत्रिक लेण्या व जंगलामुळे मंदिराच्या परिसरात एक गूढ वातावरण निर्माण झाले होते, आणि त्यात तिन्हीसांजेच्या शांततेमुळे मनावर एक वेगळेच दडपण जाणवत होते. या वातावरणाची आम्हाला सवय नसल्याने अंधार होण्या आधी खाली उतरण्याचा निर्णय घेतला. सुमारे सायंकाळच्या ४:५० च्या दरम्यान आम्ही परतीच्या प्रवासाला सुरवात केली आणि देगाव स्वागत कमानी जवळ ५:१० वाजता पोहचलो. देगावातील एका दुकानात न्ह्यारी केली आणि निघालो संगम माहुलीला. 👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
पाटेश्वर मंदिर व लेणी विषयी अधिक माहिती जाणून घेयायची असल्यास, खालील पुस्तके वाचावी.
१. पाटेश्वर एक शोधनिबंध - लेखक : आदित्य फडके
२. पाटेश्वर लेणी व मंदिर समूह - लेखक : विजय वाईकर
 |
| १. ९ ग्रह पट, २. शिवलिंग, ३. चतुर्मुख शिवलिंग, ४. वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग. |
संगम माहुली - दक्षिण काशी
देगाव हुन संगम माहुली ३० किलोमीटर अंतरावर आहे, गूगल मॅप्सच्या साह्याने संगम माहुली - दक्षिण काशी जवळ पोहचलो, पण पुन्हा एकदा गूगल बाबाने आम्हाला भरकटवले. जणू चकवा लागल्या प्रमाणे फिरून फिरून पुन्हा एकाच ठिकाणे येत होतो, अखेरीस वैतागून विनायकने एका ठिकाणी गाडी उभी केली आणि चालत पुढे गेलो ते थेट शिव मंदिरा जवळ. मंदिराच्या परिसरात बरीच गर्दी होती, नव वर वधू संक्रांतीचे निमित्त साधून फोटो शूट साठी आले होते. त्यांना आमची अडचण नको म्हणू आम्ही कृष्णा नदीच्या पात्रात उतरून छत्रपती शाहू महाराज्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. नदी पार करून पलीकडच्या बाजूस असलेल्या रामेश्वर मंदिराकडे जायायचे होते, पण पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्या कारणाने नदी पार करण्याचे टाळले. तसेच परिसरातील संगमेश्वर मंदिर, व इतर मंदिरे पाहणे टाळले व काही वेळाने पुन्हा शिवमंदिरात येऊन महादेवाचे दर्शन घेतले. पुरातन मंदिर असून त्यावर कोरीव काम फार कमीच आहे, पण मंदिरातील खांबांवरील कोरलेले वेगवेगळ्या नागांचे शिल्प पाहण्या सारखे आहेत. महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही, मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या राम मंदिर व विठ्ठल रखुमाई मंदिरात गेलो. सायंकाळी ६:४५ च्या दरम्यान आम्ही आमची दुसऱ्या दिवसाची भ्रमंती संपवली. दुपारचे जेवण केले नसल्याने भूक लागली होती म्हणून एका चांगल्या रेस्टऑरेंत मध्ये जेवण करून रूम वर जाऊन असे ठरवले. ज्या रेस्टऑरेंत मध्ये थांबलो ते पण एक विचित्र पद्धतीचे होते. तेथ फक्त थाळी मिळते त्यात पण भारतातील अनेक राज्यातील गोड पदार्थ स्टार्टर म्हणू मिळतात, त्यानेच तुमचे पोट भरते नंतर जेवणार काय? त्यात एवढ्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जेवणात मोठ्या मुंगळ्या सापडल्या! काय म्हणायचे आता. कसे बसे जेवण पूर्ण करून आम्ही भाड्याने घेतलेली दुचाकी परत करण्या करिता गेलो. गाडी मालकाने गाडी तपासली वर हिशोब पूर्ण करत डिपॉजिट रक्कम परत केली. आम्ही बुक केलेली रूम १ किलोमीटर अंतरावाचं होती म्हणून चालतच लॉज वर पोहचलो. आता समस्या ही होती की झोप लागणार की नाही, कारण गोकर्ण लॉज हा बाहेरून सुंदर दिसत असला तरी आतमध्ये मात्र खंडर पेक्षा कमी नव्हता. माळकटलेली बेडशीट व उशीचे कव्हर, देवास ठाऊक नक्की धुतले होते कि नाही. मी रिसेपशनला जाऊन चादर बदलायला सांगितले तर, त्या काकांनी मलाच कामाला लावले. मलाच बेड वर चादर टाकावी लागली. एवढी भयानक सार्विक आजवर अनुभवली नव्हती. भांडायला अंगात त्राण उरले नव्हते, तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरही उठायचे होते. रूम वर गेलो बेड वर चादर टाकली आणि झोपून दिले. 👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
 |
१. छतंत्रपती शाहू महाराज समाधी, २. मंदिरातील पायरीवरील कीर्तिमुख, ३. मंदिरातील खांबावरील नागशिल्प, ४. मंदिरातील खांबावरील पोपटांचे शिल्प. |
दिवस तिसरा
पहाटे ४:३० ला उठून तयारी चालू केली, गरम पाण्यासाठी गीझरची सोय नव्हती. रिसेपशन मधून हीटर आणला आणि बालदीत टाकून पाणी गरम करत ठेवले. पाणी गरम करण्यात २५ - ३० मिनिटे वाया गेली होती. सकाळी ६ च्या दरम्यान प्रवास सुरु करायचा होता, पण गोकर्ण लॉजने दिलेल्या सर्विस मुळे आम्हाला ६:४५ वाजले होते. आम्ही सकाळीच चेक आऊट करायचे ठरवून निघालो, महत्वाचं सामान छोट्या बॅगेत घेतले आणि मोठ्या बॅगा लॉजच्या रिसेपशन मध्ये ठेऊन गाडी भाड्याने घेण्या करिता रेंटल सर्विसच्या दुकानात पोहचलो. आजच्या दिवशीचे ठिकाण दूर दूर वर होते, जवळ पास १२० किलोमीटर चा प्रवास होणार होता, म्हणजे दुप्पट भाडे लागू होणार होते. रेजिस्ट्रेशन करून दुचाकी घेतली आणि थेट निघालो ते बारामोटाची विहीर पाहायला. सज्जनगडावर थंडी नव्हती पण आज मात्र पारा खाली उतरला होता, मी थंडी नसेल म्हणून अति शहाणपणा करत हुडी घेतली नाही आणि नंतर पचतावलो कारण दुचाकी वरून जाताना थंड वारा बोचत होता. काही वेळाने सूर्यनारायण थोडा वर आला, त्याच्या किरणांच्या उबे मुळे थोडे बरे वाटले. ३० मिनिटात सुमारे सकाळी ८:०० वाजता आम्ही बारामोटेच्या विहिरी जवळ पोहचलो.
बारामोटाची विहीर
विहीर पाहून एकच म्हणावेसे वाटते "
अभियांत्रिकी चमत्कार". विहिरीची बांधणी, त्यातील सज्जा व सज्जातील खांबांवरचे शिल्प सर्वच अप्रतिम! बारामोटेच्या विहिरीचा इतिहास पाहता, सुमारे इसवी सन १७१९ ते १७२४ ह्या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ह्या विहिरीचे बांधकाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र, शाहू महाराज ह्यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले. लिंब गावाच्या आसपास सुमारे ३०० झाडांची आमराई होती. ह्या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी ह्या विहिरीची रचना केली गेली.
👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
 |
| बारामोटाची विहीर व त्यातील शिल्पे |
कोटेश्वर मंदिर
विहीर पाहून झाल्या वर, लिंब गावात अजून कोणते ऐतिहासिक ठिकाण किव्हा मंदिर आहे का, हे गूगल वर शोधले असता,
कोटेश्वर मंदिर जवळच असल्याचे दिसले. सुमारे ८:३० च्या दरम्यान आम्ही कोटेश्वर मंदिरा कडे निघालो. जेव्हा दुचाकी जवळ गेलो तेव्हा पेट्रोलचा वास येऊ लागला म्हणून गाडी तपासली असता कळाले की पेट्रोलची गळती होत होती. आम्ही गाडी मालकाला कॉल करून कळवले असता, त्याने आम्हाला जवळील गॅरेज मध्ये नेऊन दुरुस्त करून घेयायल सांगितले व जो काही खर्च होईल तो ते देतील, पण सकाळची वेळ होती ८:३० वाजले होते. दुकाने काही उगधली नव्हती. पेट्रोल गळतीचे प्रमाण फार कमी असल्या कारणाने चिंतेचं कारण नव्हते म्हणून तसेच पुढे जात आम्ही
कोटेश्वर मंदिराजवळ पोहचलो. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर आहे, तसेच ह्या मंदिराची प्रथा काहीशी वेगळी आहे. इतर शिव मंदिरात अर्धी प्रदक्षिणा घातली जाते, पण या मंदिरात मात्र पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते असे सांगितले, असे का ते माहित नाही. तसेच गाभाऱ्यात जायचे असल्यास कमर पट्टा व शर्ट काढून आत जावे लागते. असो आम्ही कोटेश्वर महादेवाचे बाहेरूनच दर्शन घेतले आणि जवळील
राम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले. गाडी मधील पेट्रोल गळती चालूच होती पण फार कमी प्रमाणात, तरीपण पेट्रोलची टाकी खाली होण्याची भीत सतावत होती कारण आज पूर्ण दिवस फिरायचे होते.
👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
किल्ले कल्याणगड
कोटेश्वर मंदिराकडून निघालो ते थेट कल्याणगडा कडे. सकाळचे ९:०० वाजले होते, गावातील काही दुकाने उघडली होती, जवळील एका दुकानात जाऊन न्ह्यारी केली दुकानदाराकडे जवळपास कुठे गॅरेज आहे का चवकशी केली असता, त्यांने आम्हाला जवळच एक गॅरेज असल्याचे सांगितले, आम्ही तिथे गेलो पण गॅरेज बंद होते. गॅरेज शोधण्यात जास्त वेळ वाया न घालवता आम्ही आमच्या पुढच्या टप्प्या कडे निघालो. काही अंतर पुढे गेल्यावर किनही गावात आम्हाला एक गॅरेज दिसले, तेथील मेकॅनिकलला गाडी दाखवली असता, त्याने आम्हाला काळजीचे काही कारण नाही, पेट्रोलच्या टाकी मध्ये काही प्रॉब्लेम नाही, त्याची पिन खराब आहे ती बदलली तर गळती थांबेल. पण ती पिन त्याच्याकडे उपलब्ध नव्हती, त्यानं टाकी खाली होणार नाही असे आश्वासन देऊन आमची चिंता दूर केली होती. आम्ही कल्याण गाडा कडे प्रस्थान केले, रस्त्याचे डाव्याबाजूने एक छोटीशी कच्ची वाट कल्याणगडावर जाते, या वाटेच्या अगदी बाजूला एक मठ आहे व वाटेच्या समोर एक दुकान आहे. गूगल मॅप्सच्या साह्याने ही वाट आपल्याला सहज सापडते. श्री अस्मित महाडिक आणि श्री उमेश ठोंबरे यांनी आम्हाला सांगितलेच होते की कल्याण गडाचा दरवाजा बंद असतो, पण गुंफेत जात येते, म्हणून गुंफा तरी पाहून येऊ म्हणून कल्याणगडावर जात होतो, तसेच तिथली एका साधूंचा संपर्क क्रमांक त्यांने दिला होता. कल्याणगडावर दु चाकीने वर पर्यंत जाता येते, पण रास्ता खडतर वर अरुंद आहे, चार चाकी गाडी करीत हा रास्ता सोईस्कर नाही. आम्ही काळजीपूर्वक दुचाकी वरून गडावर चाललो होतो, जंगल आणि निरव शांतता, अपघात झाल्यास मदतीस जवळ पास कोण्हीच नाही. कल्याणगडावर फार कमीच लोक जातात, रविवारचा दिवस असूनही गडावर जाताना किव्हा गडावरून येताना कोणीही दिसत नव्हतं. जस जसे वर जात होतो तसतशी भीती वाढत होती कारण एकाबाजूला दारी आणि रास्ता आणकीणच खराब होत चालला होता. दुचाकी चालवणे कठीण होत होते, अचानक ताबा सुटला किव्हा तोल गेला तर सरळ दरीत पडू, म्हणून गाडी दरीच्या बाजूने न चालवता दरीच्या विरुद्ध बाजूने चालवत होतो. काही वेळाने एक व्यक्ती दुचाकीवरून गडा वरून खाली उतरताना दिसली. गावातलीच व्यक्ती आहे हे पाहून लक्षात आले होते, त्यांना थांबून गडाच्या दरवाज्याच्या चावी बद्दल विचारावं असे वाटले होते, पण रास्ता इतका खराब कि न थांबता चालत राहणे सोईस्कर वाटत होते. नंतर हीच व्यक्ती गाडा खाली आम्हाला भेटली, ते नंतर सांगेनच. गडावर जाताना बाजूतील डोंगरांवर लावलेल्या पवनचक्क्या पाहतच राहाव्या असे वाटत होते. साताऱ्यात बहुतांश डोंगरांवर तुम्हाला पवनचक्क्या पाहायला मिळतात.
कल्याणगडाच्या दरवाजा आधीचा रास्ता, किमान १ ते १.५ अतिश विकट आहे, दुचाकी चालवणे कठीणच. म्हणून दुचाकी सुरक्षित ठिकाणी लावून आम्ही पायी चालत गेलो. १५ ते २० मिनटात आम्हाला गडाच्या पायऱ्या दिसू लागल्या. सकाळचे १०:३० वाजले होते, काही अंतर पुढे गेलो आणि गडाच्या प्रवेशदारा जवळ पोहचलो. गडाच्या प्रवेश दाराला गावकऱ्यांनी लोखंडी दरवाजा बसवला आहे. नतमस्तक होत आत प्रवेशकेला आणि अवघ्या ८ ते १० पायऱ्या चढल्याव वर समोर दिशादर्शक फलक दिसले. उजवीकडील वाट गडावर जाते तर डावीकडील वाट
गुंफेत किव्हा दत्त मंदिरा कढे जाते. आम्ही पहिले गुंफेत जायचे ठरविले, पादत्रणे काढले आणि डावीकडे वळत २०-२५ पायऱ्या खाली उतरून गुंफेत प्रवेश केला. गुंफेत जायचे म्हणून आठवणीने हेड टॉर्च घेतली होती, गुंफेत गडद अंधार होता, टॉर्च नसेल तर जाणे अवघड. तसेच गुंफे मध्ये दगडात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. भर उन्हाळ्यातही ह्या टाक्यांमध्ये पाणी असते हे विशेष. पाण्याच्या टाक्यात पडून अपघात होऊ नये म्हणून गावकर्यांनी रेलिंग बसवले आहेत. सुरवातीला गुंफेची उंची फार कमी असल्या कारणाने वाकूनच आत जावे लागते, ३०-४० मीटर पुढे गेल्यावर डाव्या बाजूला अजून एक पाण्याचे टाक आहे, तेथून पुढे गेल्यावर गुंफेची उंची वाढते व आपल्याला वेवस्थित उभे राहता येते. उजव्या बाजूला जैन तीर्थांकर श्री पार्शवनाथ यांची दगडात कोरलेले सुंदर अशी मूर्ती आहे व तेथून थोडे पुढे गेल्यावर देवीची मूर्ती व श्री दत्तगुरूंची मूर्ती स्थापित केलेली आहे. आज
भले इथे दत्त मंदिर असे नामफलक लावले आहे, पण मुळात ही जैन लेणी आहे, देवीची व दत्तगुरूंची मूर्ती ही विसाव्या शतकात स्थापित केलेली आहे, हे पाहताच क्षणी कळून येते. आम्ही गुंफा पाहून बाहेर आलो, पादत्रणे घातली आणि गडावर जायला निघालो. गडाचा दरवाजा बंद असतो हे ठाऊक होते पण कुणास ठाऊक आज दरवाजा उघडा असेल तर. आम्ही दरवाज्या जवळ गेलो, लोखंडी दरवाज्याला कुलूप नव्हते हे पाहून आम्हाला आनंद झाला, पण हा आनंद काही क्षणातच दूर झाला. दरवाज्या उघडण्याचा प्रयत्न केला असता तो काही उघडेना, आम्हाला वाटले दरवाजा जाम झाला असावा म्हणून वेगवेगळे प्रयत्न करून पहिले पण काही उपयोग झाला नाही. दरवाज्याकडे निरखून पाहता लक्षात आले की दरवाज्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूला
चावी लावून बंद केले आहे. अस्मित महाडिक याने सांगितले होते की
बुरुजावरून आत जात येते, पण दरवाज्या उघडण्याच्या नादात विसरायला झाले. तसेच गडावरील बाबांचा संपर्क क्रमांकावर
९७६४२२६१०७ कॉल केला असता काही उत्तर मिळाले नाही. ३ ते ४ वेळा प्रयत्न केला अखेरीस निराश होऊन गड उतार होण्याचा निर्णय घेतला. कदाचित गडावर येण्या आधी दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल केला असता तर आम्हाला चावी मिळाली असती. आम्ही सावधगिरी बाळगत दुचाकीने गडावरून गावात उतरलो. समोरील एका दुकानात चहा घेण्या करीत थांबलो.
दुकानातील काकींना गडाच्या दरवाज्याला कुलूप का लावतात असे विचारले असता त्यांनी आम्हाला सांगितले की, काही महिन्यांन पूर्वी पर्यटकांनी गडावरील मठातील सामान चोरी केले, तसेच गडावरी दर्ग्याची नासधूस केली, म्हणून कुलूप लावले जाते. आम्ही पियायला पाणी मागितले असता काकींनी प्लास्टिकचे ग्लास दिले व पाणी पिउन झाल्यावर ग्लास आतमध्ये ठेवत म्हणाल्या गावातली लोक बरोबर नाहीत, पाणी पियायला येतात आणि ग्लास घेऊन जातात, आता पर्यंत ३ स्टीलची ग्लास चोरीला गेली म्हणून प्लॅस्टिकची ग्लायसे आणली पण त्यातलं पण एक चोरीला गेला. या वरून तुम्ही अंदाज लावू शकता की गडावरील चोरी ही पर्यटकांनी केली की गावातील लोक्कांनी! पुढे काकी म्हणाल्या गडावर जाण्या आधी विचारले असते तर चावी मिळवून दिली असती, समोरील मठात चावी असते. राहील गोष्ट दर्ग्याची तर हे दर्गे आणि पीर बहुतांश गडावर पाहायला मिळतात. इस्लाम धर्म किती चमत्कारिक आहे ना, यांच्या ढोंगी बाबांना गडावरच मरण येते इतर कोणती ही जागा सापडत नाही! गडावर ताबा मिळवण्या करीत दर्गे किव्हा स्पीड ब्रेकर सदृश्य वास्तू बांधून त्यावर हिरवी चादर टाकत पीर असे नामफलक लावून जागेवर कब्जा करायचा. मग दरवर्षी तिथे उरूस काढायचा आणि हळू हळू दर्ग्याची व पिराची जागा वाढवत जायायची. गडावर नवीन बांधकाम किव्हा डागडुजी करायची झाली की पुरातत्व खात्याची परवानगी लागते व अधिकारी कायदे दाखऊन आडी बाजी करतात ते वेगळेच, पण इस्लामी दर्गे आणि पीर याच्या विरोधात बोलताना मात्र यांची दातखिळी बसते. थोडे विषयांतर झाले, आपण परत आल्या प्रवास वर्णनाकडे येऊ. आम्ही दुकानातून निघत असतानाच तिथे एक काका येऊन बसले, हे तेच काका जे आम्ही गडावर जात असताना दिसले होते. त्यांना आम्ही गडावरील दरवाजाच्या चावी बद्दल विचारले असता, त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांच्याकडे चावी नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट सांगत होते की काका खोट बोलत आहेत. आम्हाला अजून दोन गड पाहायचे होते, आणि दुपारचे ११:४५ वाजले होते, म्हणून जास्त वेळ न थांबता आम्ही साखरगड कढे निघालो.
👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
 |
१. गडावर जाणाऱ्या पायऱ्या, २. कल्याणगड प्रवेश द्वार, ३. गुहेतील पुरातन पार्श्वनाथांची मूर्ती, ४. गुहेतील देवीची मूर्ती, ५. गडावरून दिसणाऱ्या पवनचक्क्या, ६. गुहेतील श्री दत्तगुरु यांची मूर्ती |
साखरगड
साखरगड हा किल्ला नसून एक टेकडी आहे किव्हा अंबाबाई देवीचे प्रसिद्ध स्थान म्हणू शकता. मंदिराला चहू बाजूंनी भिंत बांधून सुरक्षित केले आहे, या मुळे ह्या टेकडीला किल्याचे स्वरूप प्राप्त झाले. किल्ल्याच्या बिंतींना बुरुज, जंग्या, इत्यादी गोष्टी पाहायला मिळतात पण साखरगडाच्या भिंतींमध्ये मात्र ह्या गोष्टी दिसत नाहीत, कारण हा किल्ला नाही. कल्याणगड पायथा ते साखरगड यातील दुरी
७.५ किलोमीटर आहे. आम्ही २० मिनिटांत दुपारी १२:१० वाजता साखरगडाच्या प्रवेशद्वारा जवळ पोहोचलो. यात एक महत्वाची गोस्ट म्हणजे गाडीतील पेट्रोल गळती थांबली होती, तरीपण गाडी सुरक्षित ठिकाणे लावली. मंदिरात येयायला पायथ्या पासून दगडी पायऱ्यांची वाट आहे, पण वेळे अभावी पायी न जाता आम्ही गाडीनेच वर गेलो. पुढे गेल्यावर सुंदर दगडी पायऱ्या आपल्याला मंदिराच्या प्रवेशद्वारा कडे घेऊन जातात. मंदिराचे प्रवेश द्वार, सुंदर व किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखेच बांधले आहे. बाहेर पादत्राणे काढत आत प्रवेश केला, प्रवेशद्वाराजवळ डावीकडील बाजूस एका पाषाणावर देवीचे चित्र काढून पूजा केलेली दिसते व त्याच्या मागील बाजूस दोन दीपस्तंभ आहेत आणि त्यांच्या शेजारी एक "
युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट" असा दगडी फलक लावलेला दिसतो. या मुळे हे स्थान खुप महत्वाचे आहे हे आपल्या लक्षात येते, वर्ल्ड हेरिटेज का हे पुढे कळेलच. पुढे गेल्यावर मंदिरा समोर दगडी नंदी पाहायला मिळतो. मंदिराच्या सभामंडपात देवीची पालखी व अनेक चित्रे लावलेली आहेत. आम्ही गर्भगृहात प्रवेश केला आणि देवीचे दर्शन घेतले. देवीच्या मूर्तीचे फोटो काढू नये असे फलक लावलेला असल्या कारणाने, नियमाचे पालन करत फोटो काढला नाही. मंदिराचे बांधकाम पाहता मंदिर पुरातन असल्याचे कळते, तसेच मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस अनेक शिल्प कोरलेली आहेत.
गणपती , नागदेवता, विठ्ठल, मारुती, गरुड, इत्यादी शिल्पे पाहायला मिळतात, याच सोबत काही मिथुन शिल्पे ही पाहायला मिळतात. मला सर्वात जास्त अवाढलेले शिल्प म्हणजे सिंहाचे, मंदिराच्या उजव्या खांबावर हे शिल्प आहे. असे शिल्प फार कमी ठिकाणे पाहायला मिळते, ह्या शैलीची शिल्पे कर्नाटकातील विजयनगर साम्राज्य "हंपी" मध्ये मी पाहिलीत. चौकोनी खांबाच्या दोन बाजूस सिंह कोरलेला असून त्या दोन्ही सिंहाचे मुख मात्र एकच आहे असं हे "टू इन वन" शिल्प आहे. महत्वाचे सांगायचेच राहिले, भले आज हे देवीचे मंदिर असले तरी कधी काळी हे शिवमंदिर होते हे ठाम पने सांगता येते, याचे कारण म्हणजे मंदिरा समोरील नंदी आणि मंदिराच्या डाव्या बाजूस गाभाऱ्यातून येणाऱ्या पाण्यासाठी बांधलेले प्रणाला व कुंड जसे एका शिवमंदिरात पाहायला मिळते अगदी तसे. मंदिराच्या डाव्या बाजूस वाडा आहे, गावातील लोक तिथे राहत असल्या कारणाने जाता येत नाही, तसेच मंदिराच्या मागच्या बाजूस प्रसाधन गृह आहे, जरी हे वयक्तिक असलं तरी येणाऱ्या पर्यटकांना वापरता येते. मंदिराच्या डाव्या बाजूस वाड्या शेजारी एक मोठी आणि सुंदर दीपमाळ आहे. ही दीपामाळ थोडी वेगळीच आहे. दिवे लावायचा प्रत्येक दिवटी मोराच्या आकाराची कोरलेली आहे. मी त्या दीप माळेचा फोटो काढण्याकरिता पुढे गेलो असता तेथील आजी मला ओरढली, फोटो काढायचा नाही, जे काही फोटो काढायचे आहेत ते मंदिराच्या पलीकडच्या बाजूस. म्हणून मी मोबाईल खिश्यात टाकला आणि दीपमाळ पाहत उभा राहिलो तर, आजी अजूनच चवताळल्या. वाद विवाद नको म्हणून माघारी येत प्रवेशद्वारापाशी येऊन बसलो, पण विनायक मात्र काही एकेना, काही वेळाने विनायक गेला आणि दीपमाळेचा फोटो काढून आला. अश्या प्रकारे ४० मिनिटात साखर गडावरील ऐतिहासिक आणि जागतिक वारसा असलेले मंदिर आणि दीपमाळ पाहून झाली आणि आम्ही दुपारी १२:५० च्या सुमारास निघालो ते वर्धनगडा कडे.
👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
 |
| साखरगडावरील मंदिरातील काही शिल्पे |
किल्ले वर्धनगड
वर्धनगड कडे जाताना आम्हाला रसवंती गृह दिसले, दोन ग्लास ताज्या ताज्या उसाचा रस पिउन थंड झालो आणि रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरून वर्धनगडा कडे प्रस्थान केले. साखरगड ते वर्धनगड यातील अंतर २१ किलोमीटर आहे. चांचली रोड वरून पुढे जात आम्ही सातारा पंढरपूर द्रुतगती मार्गावर आलो. द्रुतगती मार्गावर उसाने भरलेले बरेच बैलगाडी, ट्रॅकटर जात होते, काही अंतर पुढे गेल्या वर एक कारखाना दृष्टीस पढला आणि लक्षात आले की हे सर्व साखर कारखान्यात ऊस विकायला चालले आहेत. थोडे अंतर पुढे गेल्या वर डोंगर दिसू लागला, हाच तो वर्धनगड. वर्धनगडच्या घाट रस्त्यातून गडाची तटबंदी स्पष्ट दिसते. घाटातून पुढे गेल्यावर डावीकडे वळत पवारवाडी रोडला लागलो. निशाणी म्हणून तिट्या वर गडावरच्या दोन तोफा ठेवल्या आहेत. पवारवाडी रोड ने पुढे जात डावे वळण घेत गावात शिरलो आणि दुचाकी सावलीत उभी केली. वर्धनगडावर जाणारी पायवाट नक्की कोणती हे कळत नव्हते म्हणू जवळील एका घरातील व्यक्तीला विचारले असता त्यांने समोर बोट दाखवले. ह्या पायऱ्या वर्धनगडावर जातात. पायऱ्या चढायला चालू केले, पायऱ्या चढताना एके गोष्ट निदर्शनास आली. गावकऱ्यांनी स्वखर्चातून पायऱ्या बांधल्या होत्या, खूप चांगले काम केले होते. अर्धा अधिक डोंगर गाडीनेच वर आल्या कारणाने फार चढायचे नव्हते पण दुपारचे २:०० वाजले होते, उन्हामुळे दमछाक होत होती. १५ मिनिटांची वाट होती, पण आम्हाला मात्र ३० मिनिटे लागली. गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहचलो. प्रवेशद्वाराची गोमुखी रचना पाहूनच कळते की हा गड महाराज्यांनी बांधला होता. दरवाज्या जवळ छान थंड हवा येत होती, म्हणून आम्ही जवळ जवळ १५ मिनिटे तिथे बसून विश्रांती घेतली.
दुपारी २:४५ च्या दरम्यान आम्ही नतमस्तक होत गडाच्या आत प्रवेश केला आणि पायवाटेने उजवे वळण घेत पुढे जात राहिलो. सर्वात पहिले आम्ही छोट्याश्या शिवमंदिरा जवळ पोहचलो, महादेवाचे दर्शन घेत आम्ही पुढे निघालो. पुढे गेल्यावर देवळी स्वरूपातील हनुमान मंदिर जवळ आलो, मारुतीचे दर्शन घेऊन पुढे जात असताना एका पाण्याच्या टाक्याजवळ निळ्या रंगाचा सुंदर पक्षी दिसला. त्याची काहीच हालचाल नव्हती म्हणून, नक्की पक्षी आहे की पोस्टर कळत नव्हते, फोटो काढायला थोडे पुढे गेलो असत तो उधून गेला, तो पक्षीच होता! नंतर त्याचे फोटो काढायचे बरेच प्रयत्न केले पण काही जमलं नाही, तो ह्या झाडा वरून त्या झाडावर उडत होता. पक्षीचा नाद सोडत पुढे निघालो आणि वर्धानीमातेच्या मंदिराजवळ पोहचलो. मंदिरातील पुजारी काका, देवीची पूजा करून देवीला साडी नेसवत होते. काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती सुंदर होती. देवीचे दर्शन घेतली आणि थोडा वेळ पुजारी काकांशी गप्पा मारत गाभाऱ्यातच बसलो. पुजारी काकांची जिल्ह्यातील नेते मंडळींकडून फार अपेक्षा होत्या, पण नेते मंडळी काही गड किल्ल्याकडे लक्ष देत नाहीत. गडांच्या पायऱ्यांचे काम सुद्धा अर्धवट राहिले आहे. अश्या बऱ्याच गोष्टीत त्यांनी सांगितल्या. काकांशी गप्पा मारून झाल्यावर आम्ही मंदिरातून बाहेर आलो आणि पुढे जात पठारावर पोहचलो. तेथील एका देवळी जवळ बसून बिस्किटे आणली होती ती खाल्ली आणि तेथील एका श्वानाला पण खायायला दिली. दुपारचे ३:१५ च्या दरम्यान आम्ही गड उतरायला सुरवात केली. अवघ्या १० मिनिटांत आम्ही खाली गावात पोहचलो. महिमान गडावर जायायचे होते, पण तसे केल्यास गाडीचे किलोमीटर वाढणार होते म्हणजे अधिकचे भाडे द्यावे लागणार होते. आधीच खर्च बजेटच्या बाहेर गेला होता म्हणून, महिमान गडावर जाणे टाळले आणि पुसेगावातील श्री सेवागिरी महाराज मठात जायायचे ठरविले.
👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
 |
| वर्धनगडावरील गोमुखी प्रवेश द्वार, पाण्याचे टाके आणि गडावरील मंदिरे |
सेवागिरी महाराज मठ
वर्धनगड हुन श्री
सेवागिरी महाराज मठ ५.६ किलोमीटर अंतरावर आहे. दुपारी ३:४५ च्या दरम्यान आम्ही मठात पोहचलो. दोन दिवसांपूर्वीच रथ उत्सव झाला होता आणि रविवारचा दिवस असल्या कारणाने मठात गर्दी होती. महाराज्यांच्या समाधीच्या दर्शनाची रांग कुठून सुरु होते हे कळतच नव्हते. तेथील एका भक्ताला विचारले असता त्याने लोखंडी शिडीने पहिल्या मजल्यावर जा, तेथून रांग चालू होते असे सांगितले. त्यांनी सांगितल्या प्रमाणे पहिल्या मजल्यावर गेलो आणि रांगेत जाऊन उभे राहिलो. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता केलेले उत्तम नियोजन होते. महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि जवळील एका पुरातन शिवमंदिरात जाऊन महादेवाचे ही दर्शन घेतले. मठाच्या गेट शेजारी प्रसादाचे काउंटर होते, तेथे जाऊन प्रसाद घेतला आणि सायंकाळी ४:१५ च्या दरम्यान मठातून बाहेर आलो. मठाच्या बाहेर, अहमदाबादी बोर विकत असणाऱ्या काकांकडून दोघांनीही अर्धा अर्धा किलो बोरे घेतली आणि निघालो संगम माहुलीला.
👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
 |
| पुसेगावातील श्री सेवागिरी महाराज मठ |
संगम माहुली - क्षेत्र माहुली
संगम माहुली गाठण्या आधी जेवण करायचे ठरवले, म्हणून जवळपास कुठे हॉटेल आहे का शोधण्याकरिता पुसेगावात फेर फटका मारला. पण हॉटेल काही सापडले नाही, म्हणून संगम माहुलीला जाण्याकरिता निघालो आणि द्रुतगती मार्गा लगतच एका हॉटेल मध्ये जेवलो. आदल्या दिवशी संगम माहुलीला आम्ही गेलो होतो पण तेथील
क्षेत्र माहुली भागातील रामेश्वर मंदिर पाहायचे राहून गेले होते. तसेच तारा राणी यांची समाधी देखील पाहायची होती, म्हणून पुन्हा संगम माहुलीला चाललो होतो. सायंकाळी ६:२० च्या दरम्यान आम्ही क्षेत्र माहुलीला पोहचलो, इथेही फोटोशूट चालू होते पण गर्दी कमी होती. मंदिर परिसरात जाण्या करीत पायऱ्या उतरत असताना उजवीकडील भिंत वाकलेली जाणवली. भिंत केव्हाही ढासळेल, म्हणून भिंतीची पुनर बांधणी करिता पुरातत्व विभागाने भिंतीतील प्रत्येक दगडाचे क्रमांकन केले होते, जेणे करून जो दगड जिथे आहे तिथेच लावायला मदद होईल. आम्ही मंदिर परिसरात पोहचलो असता, तिथे आम्हाला दोन दीपमाळ पाहायला मिळाले. त्या दोन दीपमाळेतील
मोठी दीपमाळ हुबेहूब साखरगडावरी दीपमाळे प्रमाणेच होती. दीपमाळेला लोखंडी पट्ट्यांचा आधार देऊन संरक्षित केले होते. मंदिराच्या बाहेर काळ्या दगडात कोरलेला नंदी फार सुंदर होता. मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले आणि परिसरातील इतर मुर्त्या पाहण्याकरिता बाहेर आलो. भिंतीच्या कोनाड्यात दोन मुर्त्या दिसल्या
एक मूर्ती ही गरुड देवतेची होती, तर दुसरी मूर्ती ही शंकराची होती.
चार मुख असलेली शंकराची मूर्ती मी पहिल्यांदाच पहिली होती, अशी मूर्ती पाटेश्वरला होती, पण तेथे गेलो असता कुठे दिसली नाही. भिंतीवर या मूर्तीला ब्रह्मदेवता असे संभोधले होते, पण ही मूर्ती ब्रह्मदेवतेची नसून, शंकराची होती.
चारही मुखांकडे निरखून पहिल्यावर लल्लटावर तिसरा डोळा कोरलेला दिसेल. या मुर्त्या पाहून आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूस गेलो आणि तिथे आम्हाला अजून एक मंदिर दिसले, मंदिराचा दरवाजा बंद होता. हे मंदिर प्रभू श्री रामाचें होते. मंदिरात पाच मुर्त्या होत्या पहिली मूर्ती हनुमानाची, दुसरी शत्रुघन, तिसरी राम आणि सीता, चौथी भरत आणि पाचवी लक्ष्मण, याला
राम पंचायतन असे म्हणतात. प्रभू श्री रामाचें दर्शन घेऊन आम्ही तारा राणी यांची समाधी पाहायला निघालो. गूगल मॅप्स वर लोकशन काही बरोबर दाखवत नव्हते, म्हणून तेथील एका काकांना विचारले असत, त्यांनी आम्हाला समाधी पलीकडच्या बाजूस आहे असे सांगितले. तिथे जाणे म्हणजे गाडीचे किलोमीटर वाढवून जास्तीचे भाडे देणे, आदल्या दिवशी तिथे गेलो होतो तेव्हा गूगल मॅप्स ने भरकटवले होते, म्हणून समाधीचे दर्शन घेण्याचे रद्द करत, नटराज मंदिर पाहण्याकरिता निघालो.
👉 ब्लॉगच्या सुरुवातीला जा
 |
१. प्राचीन दीपमाळ, २. रामेश्वर मंदिरा समोरील नंदी, ३. गरुडाची मूर्ती, ४. चतुर्मुख शिव मूर्ती, ५. राम पंचायतन, ६. कृष्णा नदी व संगम माहुली परिसर |
श्री उत्तर चिदंबरम - नटराज मंदिर
हे संगम माहुली पासून २.४ किलोमीटर अंतरावर आहे, आम्ही अवघ्या ५ ते ६ मिनिटात मंदिरा जवळ पोहचलो. सायंकाळचे ६:४५ वाजले होते, मंदिरात आरती चालू होती. आरती पूर्ण करून श्री विष्णूचे दर्शन घेतले, आणि मंदिर परिसरातील इतर मंदिरे पाहत थोडा वेळ घालवला. सकाळी ७:३० वाजता गाडी भाड्याने घेतली होती, म्हणजे सायंकाळी ७:३० ते ८:०० वाजे पर्यंत, १२ तासात परत करायची होती, म्हणून मंदिरात जास्त वेळ न काढता मंदिरातून निघालो आणि साताऱ्यातील सुप्रसिद्ध कंदी पेढे घेण्या साठी, पवई नाक्यातील राजपुरोहित स्वीट्स कडे गेलो. कंदी पेढे घेऊन थेट गोकर्ण लॉज वर पोहचलो. लॉजच्या रिसेप्शन मध्ये ठेवलेल्या बॅगा घेतल्या, फ्रेश झालो आणि गोकर्ण लॉजमधील आलेल्या कटू अनुभवामुळे शेवटचा राम राम ठोकला, तो कदीही गोकर्ण लॉज वर परत न येण्याचा. गोकर्ण लॉज वरून निघालो आणि पोहचलो रेंटल सर्विसच्या दुकानात दु चाकी परत करण्या करिता. गाडीत बऱ्यापैकी पेट्रोल उरले होते, म्हणून विनायकने गाडी मालकाला तसे सांगून २०० रुपये कमी करून घेतले. तेथून निघालो आणि मुंबई सातारा द्रुतगती मार्गाजवळ आलो, कारण आमची मुंबईला जाणारी बस इथेच येणार होती. आमच्या समोर एक मोठा प्रश्न उभा राहिला होता, सायंकाळचे ८:३० वाजले होते आणि बस रात्री १२:३० वाजत येणार होती. मग ४ तासाचा वेळ कुठे आणि कसा घालवायचा?
 |
| उत्तर चिदंबरम नटराज मंदिर गोपुरम |
सुरवातीला आम्ही ३०-३५ मिनिटे उत्तरचिदंबरम मंदिराच्या बाहेरील परिसरात बसून घालवली, रात्री ९:०० च्या सुमारास मंदिराचे दरवाजे बंद झाले आणि आम्हाला तेथून उठावे लागले, कारण सुरक्षे करीत बांधून ठेवलेले कुत्रे आवारात सोडले जातात असे तेथिल सुरक्षा रक्षकाने सांगितले. आता दुसरी जागा शोधण्याची धडपड सुरु झाली, मुंबई सातारा द्रुतगती मार्गावरील थोडा फेर फटका मारून काही जागा सुनिश्चित केल्या आणि ९:३० च्या दरम्यान सुरज रेस्टऑरेंत मध्ये जेवायला गेलो. तेथे आम्ही हळू हळू जेवत वेळ काढत होतो, हळू तरी किती जेवणार! रात्री १०:३० च्या दरम्यान जेऊन निघालो आणि बस स्टॉप जवळील एका बंद एटीएमच्या पायर्यांनवर बसून दोन तास कसे बसे काढले. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसेच काहीसे झाले २ तास बसून वैतागलो होतो, आणि रात्री १२:३० वाजता येनारती बस, अर्धा तास उशिराने म्हणजे १:०० वाजता आली. बस मध्ये बसलो आणि आमचा मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास चालू झाला. साताऱ्यातील अजून बरीच ऐतिहासिक ठिकाणे व किल्ले पाहायचे राहिलेत, ते पाहण्या करीत केव्हा योग्य जुळून येतो ते पाहूया!
खर्चाचा तपशील (जेवण आणि नाश्ता खर्च वगळून)