ज्यांच्यामुळे मला फिरण्याची व ट्रेकिंगची आवड निर्माण झाली ते दोन मित्र वैभव आणि योगेश, पण आज हे दोघेही माझ्यासोबत नाहीत याची खंत आहे. वैभव कामानिमित्त अमेरिकेला तर योगेश पुण्याला असतो. २०१६ साली वैभव सोबत रायगडचा ट्रेक केला होता, त्यानंतर पुन्हा काही योग आला नाही. आज जवळजवळ आठ वर्षांनी त्याच्यासोबत फिरण्याचा योग आला. वैभव दोन वर्षांनी भारतात परत आला होता. त्याला शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घ्यायचे होते, म्हणून त्यांनी मला सोबत यायला सांगितले. ५ एप्रिल ही तारीख निश्चित झाली, मग नुसते शिर्डीला न जाता त्या जवळील असलेल्या सिन्नर गावातील गोंदेश्वर शिवमंदिर, ऐश्वर्या शिवमंदिर आणि गारगोटी संग्रहालय पहायचे असे ठरले.
आम्ही पाहिलेली ठिकाणे
प्रवासवर्ण
सकाळी साडेसहा वाजता वैभव त्याची गाडी घेऊन माझ्या घराशेजारी आला, पावणे सातच्या दरम्यान आम्ही दोघे गोरेगावहून निघालो सुमारे सकाळी नऊ वाजता वासिंधच्या अलीकडे पडघा या गावातील श्री दत्त स्नॅक्स मध्ये आम्ही न्ह्यारीसाठी थांबलो. न्याहारी पूर्ण करून पावणे दहाच्या सुमारास आम्ही शिर्डीच्या दिशेने प्रस्थान केले. इगतपुरीहू उजवे वळण घेत आम्ही समृद्धी महामार्गावर आलो. समृद्धी महामार्गावर गाड्यांची रहदारी कमी असल्याकारणाने गाडी सुसाट पळवत होतो, पण सततची गाडी चालवून थकायला होत होते म्हणून, सिन्नरच्या अलीकडेच एका पेट्रोल पंपाजवळ गाडी थांबून थोडी विश्रांती घेतली दहा-पंधरा मिनिटे विश्रांती घेऊन झाल्यावर आम्ही थेट थांबलो ते शिर्डीला. शिर्डीला पोहचल्यावर गुगल बाबाची मदत घेत आम्ही मंदिराजवळील वाहन तळ शोधले, हे वाहन तळ खाजगी होते. वाहन तळात गाडी उभी करून आम्ही बाहेर आलो, तेथील बाजूच्याच एका दुकानातून बाबांना वाहाण्य करीत फुले घेतली. दुपारचे साडेबारा वाजले होते आम्ही मंदिरात गेलो तेव्हा आरतीला सुरुवात झाली. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने उत्तम सोय केलेली आहे. आम्ही मंदिराच्या आवारातच बसून आरती केली आणि आरती झाल्यावर दर्शनाची लाईन चालू झाली.

दुपारी सव्वा एकच्या सुमारास आम्ही बाबांचे दर्शन घेऊन मंदिरा बाहेर आलो. मंदिर परिसरातील इतर मंदिर आहेत जशी गणपती मंदिर, शनी मंदिर, इत्यादी हे सर्व पाहून आम्ही मंदिराच्या आवारातून बाहेर आलो आणि वाहन स्थळाजवळ पोहोचलो ज्या दुकानातून फुले विकत घेतली होती त्याच दुकानातून प्रसादी घेतली आणि वाहन तळातून गाडी बाहेर आणली. तहान लागली होती म्हणून रस्त्याकडेलच असलेल्या एका हातगाड्यावरून उसाचा रस प्यालो आणि थेट पोहोचलो ते प्रसादालय मध्ये. प्रसादालाच्या बाहेर गाडी उभी केली आणि तिकीट काउंटरच्या रांगेत उभे राहिलो. प्रसादाची पावती घेतली आणि आत जाऊन दोघेही पंक्तीत बसलो. मंदिर प्रशासनाने आता महाप्रसाद निशुल्क केला आहे. महाप्रसाद ग्रहण करून आम्ही बाहेर आलो, तर बाजूलाच शिवसृष्टीचे प्रदर्शन चालू होते. शिवसृष्टी पाहायला जायचे होते पण मोहाला आवर घातला कारण मग सिन्नरला जायला उशीर झाला असता.
गारगोटी संग्रहालय
दुपारचे अडीच वाजले होते शिर्डीतून बाहेर पडत आम्ही सिन्नरच्या दिशेने निघालो. सिन्नरला सर्वात पहिले गारगोटी संग्रहालय पाहायचे असे ठरले. गारगोटी संग्रहालय हे सिन्नर जवळील मालेगाव येथील एमआयडीसी भागात आहे, गावातील अरुंद रस्त्यांमुळे आम्हाला थोडा उशीरच झाला, सुमारे सायंकाळी चारच्या दरम्यान आम्ही संग्रहालय जवळ पोहोचले. संग्रहालयाच्या दाराशेजारीच एक छोटेसे कार्यालय आहे तिथून आम्ही प्रत्येकी शंभर रुपये भरून पावती घेतली आणि संग्रहालयात प्रवेश केला. संग्रहालयाच्या आत प्रवेशमार्गीके जवळ एक व्यक्ती बसलेली होती, आम्ही जेव्हा तेथील खनिजांनी बनलेले क्रिस्टल्स पाहायला सुरुवात केली तेव्हा ती व्यक्ती आमच्या जवळ आली आणि त्यांनी स्वतःची ओळख सांगितली त्या व्यक्तीच्या आता नाव आठवत नाही पण ती व्यक्ती तिथली गाईड आहे. (गाईड सर्विस ही निशुल्क आहे). त्यांनी आम्हाला विचारले, की हे पूर्ण संग्रहालय पाहायचे असल्यास आणि माहिती जाणून घ्यायची असल्यास तासभर तरी लागतो, जर एवढा वेळ तुमच्याजवळ असेल तर मी तुम्हाला सर्व माहिती देईन. आता एवढे दूरहून आलो आहोत तर कशाला घाई करा, म्हणून आम्ही तासभर द्यायचा ठरवला आणि गाईडने आम्हाला सर्व माहिती सांगायला सुरुवात केली. आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत ते आम्हाला माहिती देत होते. प्रत्येक क्रिस्टल समोर माहिती फलक होते त्यावर हे क्रिस्टल कोणत्या पद्धतीचे आहे व कोणत्या भागात सापडले हे लिहिले होते. जेव्हा एका क्रिस्टल समोर आम्ही मालाड हा शब्द पाहिला आणि आश्चर्यचकित झालो, कारण आम्ही सध्या मुंबईमध्ये ज्या ठिकाणी राहतोय हे तेच ठिकाण, त्यामुळे आमची उत्सुकता अजूनच वाढली. संग्रहालयातील स्पटीक (quartz) या क्रिस्टल पासून बनवलेले शिवलिंग व गणपतीची मूर्ती अप्रतिम होती. तसेच डायनासोरच्या अंड्यांचे जीवाश्म पाहायला मिळाले, एवढेच नाही तर मंगळ व चंद्र ग्रहावरून आलेल्या दगडांचे अवशेष इथे ठेवलेले आहेत. खालच्या विभागातील सर्व क्रिस्टल्स पाहून झाल्यावर आम्ही पहिल्या मजल्यावर गेलो, तिथेही बरेच क्रिस्टल्स ठेवलेले आहेत व क्रिस्टल्स पासून काही मुर्त्या बनवलेल्या आहेत. पहिल्या मजल्यावर खरेदी करण्यासाठी दुकान आहे इथे क्रिस्टल्स पासून बनवलेले दागिने व इतर वस्तू आहेत. जर आपण या दुकानातून वस्तू घेण्याकरिता आला असाल तर तुमच्याकडून तिकिटाचे शंभर रुपये घेतली जात नाही. हे संग्रहालय लोकांपासून अजूनही अपरिचित आहे तेथील ठेवलेले क्रिस्टल्स खूप मौल्यवान व अप्रतिम आहे या संग्रहालयाला आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी असे मला वाटते.
 |
१. अमिठाईस्ट - ब्राझील, २. ओकिनाईट - मालाड, ३. स्फटिकाची गणेश मूर्ती, ४. सॉलिसिट - नाशिक |
गारगोटी संग्रहालय हे भारतातील एकमेव आणि एकमेव रत्न आणि खनिज संग्रहालय आहे हे जगातील सर्वात मोठे "खाजगी" रत्न आणि खनिज संग्रहालय आहे गारगोटी संग्रहालयात जगातील भारतीय जिओलाइट खनिजे आणि क्रिस्टल्सचा सर्वात मोठा आणि उत्कृष्ट संग्रह आहे. "सिन्नर, नाशिक" येथे पहिले संग्रहालय एप्रिल 2001 मध्ये अस्तित्वात आले; याला "गारगोटी द मिनरल म्युझियम" असे नाव देण्यात आले. त्याचे उद्घाटन माननीय कै. श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी केले. गारगोटी म्युझियममध्ये पारखी श्री.के.सी.पांडे यांचा वैयक्तिक संग्रह प्रदर्शित करण्यात आला आहे, जो त्यांच्या गेल्या 40 वर्षांच्या सातत्यपूर्ण कार्याचा परिणाम आहे.
वेळा: सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० (दररोज उघडे असते)
पत्ता: डी-५९, एम.आई.डी.सी मालेगाव, सिन्नर, नाशिक ४२२११३
 |
१. अमोनाइट मोरक्को जीवाष्म, २. अनेक प्रकारची खनिजे, ३. पेंटागॉनईत - पुणे, ४. डायनोसॉर अंड्डी जीवाष्म |
गोंदेश्वर शिवमंदिर
सायंकाळी पाचच्या सुमारास आणि संग्रहालयातील बाहेर आलो आणि निघालो गोंदेश्वर मंदिराकडे. यावेळी मात्र आम्हाला गुगल बाबाने भरकटवले शॉर्टकट रस्ता दाखवत आम्हाला बंद असलेल्या रस्त्यावर जायला सांगितले, यामुळे आमचे १० ते १५ मिनिटं वाया गेले होते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेथील स्थानिक लोकांना गोंदेश्वर मंदिराकडे जाणारी वाट विचारली असता गोंदेश्वर मंदिर ठाऊक नाही असे बोलू लागले. सायंकाळी सहाच्या दरम्यान मंदिरे बंद होतात व अंधारात मंदिर व्यवस्थित पाहता येणार नाही म्हणून घाई करत होतो. समस्या इतक्यावरच थांबली नाहीत जेव्हा मुख्य रस्त्यावर पुन्हा आलो. तर पुढे जाऊन अजून गुगलने आम्हाला भरकटवले, जणू गोंदेश्वर महादेवाला दर्शन द्यायचे नव्हते. आम्हीही तितकेच जिद्दी होतो, दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही, शोधता शोधता अखेरीस आम्हाला मंदिराकडे जाणारी वाट सापडली सायंकाळी ५:४० च्या दरम्यान आम्ही मंदिरा जवळ पोहोचलो. मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि दोन मिनिटं मंदिराकडे पहातच उभा राहिलो. मंदिराची भव्यता आणि त्याची सुंदरता त्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही. सर्वप्रथम आम्ही महादेवाचे दर्शन घेतले आणि मंदिरातून बाहेर आलो आणि त्यावर केलेले नक्षीकाम पाहत होतो.
 |
| गोंदेश्वर मंदिर व त्यातील शिल्पकाम |
गोंदेश्वर महादेव मंदिर हे भूमीज शैलित बनवलेले असून एका अधिष्ठानावर उभे आहे. या मंदिराच्या चारही बाजूला छोटी मंदिरे आहेत म्हणून याला शिवपंचयातन असे म्हणतात. शिखरावरचे अमलक व कळस इस्लामी आक्रमणात नष्ट झाले आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला मोठे तलाव आहे, मंदिराचे बांधकाम करायला इथलेच दगड वापरले असतील याची शक्यता नाकारता येत नाही. मंदिराचा परिसर संरक्षण भिंत घालून सुरक्षित केलेला आहे. मंदिराच्या परिसरात आणखीन काही वास्तू होत्या पण सध्या त्यांचे चौथरे उपलब्ध आहेत, त्यामुळे ह्या वास्तू काय होत्या हे कळणं अशक्य आहे. पुरातत्त्व विभागाने या जागेत उत्खनन केल्यास किंवा शेजारील असलेल्या तलावात ती गाळ काढल्यास बरेच अवशेष सापडतील याची शक्यता नाकारता येत नाही. मंदिराचे शिखर हे हुबेहूब अंबरनाथचे शिवमंदिर व रतनवाडीतले अमृतेश्वर मंदिरासारखे आहे. यावरून आपल्याला अंदाज लावता येतो की हे मंदिर शिलाहार राजवटीत बनवलेले आहे. हे मंदिर कोणी बनवले याची माहिती जरी आज गुगलवर उपलब्ध असली तरी यावर अजूनही संभ्रम आहे कारण याला दुजोरा देणारे पुरावे उपलब्ध नाहीत. यावर संशोधन होणे गरजेचे आहे.
 |
| गोंदेश्वर मंदिर व त्यातील शिल्पकाम |
गोंदेश्वर मंदिर सेउना (यादव) राजवटीच्या काळात बांधले गेले होते आणि ते ११व्या किंवा १२व्या शतकातील आहे. सिन्नर हे त्यांच्या पूर्व-साम्राज्य काळात राजघराण्यांचे एक गड होते आणि आधुनिक इतिहासकार त्याची ओळख सेनापुरा या यादव राजा सेयुनचंद्रने वसवलेले शहर असे करतात. स्थानिक परंपरेनुसार, सिन्नर शहराची स्थापना गवळी (म्हणजेच यादव) प्रमुख राव सिंघुनी यांनी केली होती आणि गोंदेश्वर मंदिर २००,००० रुपये खर्चून त्यांचा मुलगा राव गोविंदा याने बनवले होते. दुसऱ्या सूचनेनुसार, मंदिर - गोविंदेश्वर म्हणूनही ओळखले जाते - हे यादव सरंजामदार गोविंद-राजाने बांधले होते, परंतु कोणताही ऐतिहासिक पुरावा या सूचनेला समर्थन देत नाही.
(सौजन्य: विकिपीडिया).
ऐश्वरेश्वर शिवमंदिर
संध्याकाळचे साडेसहा वाजले होते गोंदेश्वर मंदिर पाहून झाल्यावर आम्ही निघालो ते ऐश्वरेश्वर मंदिर पाहण्याकरिता. ऐश्वरेश्वर मंदिर हे गोंदेश्वर मंदिर पासून दीड किलोमीटर अंतरावर आहे, यामुळे तेथे पोहोचायला आम्हाला फार वेळ लागला नाही. ऐश्वरेश्वर मंदिर हे गोंदेश्वर मंदिराच्या आधी बांधल आहे असे म्हणतात. मंदिराचा कळस व बराचसा भाग इस्लामी आक्रमणात नष्ट झाला आहे मंदिराचा गाभारा अंतराळ आणि सभामंडप हेच काय ते शिल्लक आहे. मंदिरावरील कोरीव काम पाहण्यासारखे आहे मंदिराच्या उजव्या बाजूस सरस्वती नदीचे पात्र आहे. महादेवाचे दर्शन घेतले आणि गाभाऱ्यातून बाहेर आलो आणि सभामंडपात बसून थोडा आराम केला.
शहराच्या वायव्येला ऐश्वरेश्वर मंदिर असून ते चालुक्यशैलीत बांधले असले, तरी त्यांत नागरशैलीत आढळणारे स्तंभशीर्षांचे ज्ञापक सर्वत्र आढळते आणि सांप्रत त्याचे गर्भगृह व काही स्तंभच अवशिष्ट आहेत. स्तंभांवर तुळ्या आहेत. गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस स्तंभ आहेत. स्तंभशीर्षावर सिंहाकृती असून मधल्या कंगोऱ्यात अनेक मूर्ती कोरल्या आहेत. त्यात कामशिल्पे आढळतात. भिंतीच्या तळाशीही शिल्पांकन आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर गजलक्ष्मी, शेषशायी विष्णू व सप्तमातृका यांच्या प्रतिमा आहेत. वितानात (छत) अष्टदिक्पालांच्या मूर्ती असून द्वाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपालांच्या मूर्ती आढळतात, तसेच समोरच्या भिंतीतील स्तंभांवर ब्रह्मा व विष्णू यांच्या सुरेख मूर्ती आहेत. प्राकारातील स्तंभ चौकोनी, षट्कोनी व अष्टकोनी असून त्यांवर विष्णूचे अवतार आणि नृत्यांगनांच्या सुंदर मूर्ती आहेत. त्याच्या वास्तुशैलीवरुन तज्ञांच्या मते ते अकराव्या शतकातील असावे.
(सौजन्य: मराठी विश्वकोश).
 |
| ऐश्वरेश्वर मंदिर व त्यातील शिल्पकाम |
गारगोटी संग्रहालयात जास्त वेळ घालवल्या कारणाने गोंदेश्वर व ऐश्वरेश्वर मंदिरांवरील शिल्पकाम पहायला पुरेसा वेळ देता आला नाही. पुन्हा कधीतरी येऊन व्यवस्थित मंदिर पहायचे असा निश्चय करून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो. समृद्धी महामार्गाच्या अलीकडेच आम्ही एका छोट्याशा दुकानात चहा पिण्याकरिता थांबलो. चहा पिऊन झाल्यावर आम्ही पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला, काही अंतर पुढे गेल्यावर मला आठवले की पाण्याची बाटली दुकानातच विसरलो आहे. पाण्याची बाटली आणण्याकरिता गाडी मागे फिरवूया असे वैभव बोलू लागला, पण यु टर्न घेण्याकरिता योग्य ती जागा सापडत नव्हती. वैभवला सांगितले बाटली आणण्याकरिता जेवढी पेट्रोल वाया जाईल त्या पैशात अजून दोन ते तीन बाटल्या विकत येतील, पण वैभवच्या पुढे गुड कोणाचे काही चालत नाही हे मला ठाऊक होते. त्याने तीन किलोमीटर पुन्हा मागे येऊन दुकानातील विसरलेली बाटली घेतली आणि पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. आम्हाला मुंबईला गोरेगाव येथे पोहोचायला रात्रीचे अकरा वाजले.
टीप:- प्रवासातील सर्व खर्च वैभवने केला असल्याकारणाने खर्चाचा तपशील दिलेला नाही.