प्रवासाची तारीख: २१ मे ते २७ मे, २०२५
वाहतुकीची पद्धत: ट्रेन आणि खाजगी वाहन
केदारनाथ शब्द हा "केदार" आणि "नाथ" या दोन संस्कृत शब्दांपासून बनला आहे. "केदार" म्हणजे "प्रदेश" किंवा "भूमी", तर "नाथ" म्हणजे "स्वामी" किंवा "देव". म्हणून, केदारनाथचा अर्थ "प्रदेशाचा स्वामी" किंवा "भूमीचा देव" असा होतो. केदारनाथ मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात स्थित आहे. ते चोराबारी हिमनदीजवळ गढवाल हिमालयात ३५८६ मीटर उंचीवर आहे. केदारनाथ ज्योतिर्लिंग! बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि सर्वात अवघड ठिकाणी वसलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आणि वर्षातील फक्त ६ ते ७ महिने (अक्षय तृतीया ते कार्तिकी पौर्णिमा) या कालावधी करिता भक्तांसाठी मंदिर खुले असते.
 |
श्री केदारनाथ मंदिर
|
पंच केदारांचा परिचय
हिंदू पौराणिक कथेनुसार, कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर, जेव्हा पांडव भ्रातृहत्येच्या दोषाखाली दबले गेले होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी भगवान शिवाचा शोध घेतला. तथापि, शिव त्यांच्या कृत्यांवर खूश नव्हते आणि वारंवार बैलाचे रूप धारण करून त्यांच्यापासून वाचले. एके दिवशी, पाच पांडव बंधूंपैकी भीम, बैलाच्या रूपात शिवाला ओळखण्यात यशस्वी झाला. पकडले जाण्याच्या भीतीने, शिवाने जमिनीत उडी मारून अदृश्य होण्याचा निर्णय घेतला. तरीही, असे करताना, त्याने आपला कुबडा उघडा ठेवला. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा आता केदारनाथ मंदिर म्हणून पूजली जाते. मंदिरात आजही पूजनीय असलेले शिवलिंग कुबड्याच्या शंकूच्या आकाराच्या बाहेरील भागासारखे दिसते, इतर शिव मंदिरांमध्ये पूजा केल्या जाणाऱ्या शिवलिंगाच्या नेहमीच्या स्वरूपापेक्षा वेगळे.
कुबड्याशिवाय, बैलाचे इतर चार भाग नंतर वेगवेगळ्या ठिकाणी दिसू लागले, ते सर्व भारतीय हिमालयातील गढवाल प्रदेशात - तुंगनाथ येथे हात दिसले, मध्यमहेश्वर येथे नाभी दिसली, रुद्रनाथ येथे शिवाचे मुख दिसले आणि कल्पेश्वर हे त्याचे डोके आणि केस दिसले. पांडवांनी या सर्व ठिकाणी मंदिरे बांधली, जी नंतर एकत्रितपणे पंच केदार म्हणून ओळखली जाऊ लागली. छोटा चार धाम यात्रेसह भगवान शिवाचे अनेक भक्त शाश्वत आशीर्वाद आणि मोक्षाचा मार्ग शोधण्यासाठी पंच केदार यात्रा देखील करतात.
पूर्वतयारी
केदारनाथ ज्योतिर्लिंग हिमालय पर्वतरांगेत वसलेले असल्या कारणाने, तेथील वातावरण सुंदर व मनमोहक आहे, यामुळे आपसूकच या जागेला भेट देण्याची ओढ निर्माण होते. गेल्या तीन वर्षांपासून केदारनाथला जाण्याची इच्छा मनी बाळगून होतो, पण काही अपरिहार्य कारणांमुळे जाणे होत नव्हते किव्हा टाळावे लागत होते. याही वर्षी ट्रेक ऑर्गनाईझर श्री विजय सुतार (दूरध्वनी क्रमांक ८१४९५३३१६८, इव्हेंट ग्रुप - भटकंती ध्यास गडकिल्ल्यांचा) याने व्हाट्सअप स्टेटसला केदारनाथ - तुंगनाथ सहलीची जाहिरात टाकली होती, याही वर्षी आपल्याला जाता येणार नाही असे समजून जाहिरातींकडे दुर्लक्ष केले होते इतक्यातच सहकर्मी अमेय विपट यांनी विजय सुतार याने केलेली जाहिरात फॉरवर्ड करत केदारनाथला जायचे का विचारले. अप्रत्यक्षपणे केदार बाबानेच बोलावणे पाठवले होते! लगेच अमेयला कॉल करून चर्चा केली आणि या वर्षी केदारनाथला जायचे ठरले, पण प्रश्न होता सुट्यांचा, दुसऱ्याचदिवशी ऑफिस मध्ये जाऊन मॅनेजर समोर थान मांडून बसलो आणि दोंघांसाठी सुट्या मंजूर करून घेतल्या. परम मित्र कौशल सुतार यालाही विचारले असता, त्याने "हो जाऊया" असे उत्तर दिले होते, पण नेहमीप्रमाणे हा टांग देणार असे गृहीत धरले होते. यावेळी मात्र पठ्ठ्ट्याने बायकोकडून परवानगी मिळवली आणि यात्रेची तयारी केली 😂. सहकर्मी अमेय सोबत अजून एक सहकर्मी संतोषराज करंडे सुद्धा येण्यास तयार झाला, संतोषराज ने सुचवले कि आपण आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन जाऊया, त्यानुसार आम्ही सर्वांनी तयारीला सुरवात केली. केदारनाथ व तुंगनाथ दोनीही तीर्थक्षेत्र उंचावरील असल्या कारणाने तेथील प्राणवायूची मात्रा फार कमी असते, आई वडिलांचे वय आणि तब्बेत पाहता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक होते. डॉक्टरांनी यात्रेसाठी दोघेही अनफिट असल्याचे सांगितले, हे ऐकून मन निराश झाले. ऑर्गनाईझर विजय सुतार यांनी १० मार्च ही रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख दिली होती, दिवस फार कमी उरले होते त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे होते. विजयशी चर्चा करून हेलिकॉप्टरच्या पर्यायी विषयी चर्चा केली, पण वर पोहचल्यावर काही त्रास झाल्यास, त्वरित उपचार मिळणे अवघड असल्याचे कळले. डॉक्टरांच्या सल्याचा मान ठेवत आई वडिलांशिवाय यात्रा करायची ठरवले. दुसरीकडे अमेयने सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेतला व डॉक्टरांकडून आई वडिलांना घेऊन जाण्यास ग्रीन सिग्नल मिळाले.
१० मार्चला आम्ही सर्वांनी रुपये ५ हजार भरून यात्रेसाठी आमची जागा सुनिश्चित केली, यात्रेची तारीख २१ मे होती, अंदाजे अडीच महिने होते तयारी व शॉपिंग करिता, पण ६ दिवसांचा प्रवास आणि २५ किलोमीटरचा ट्रेक आणि हिमालय पर्वतरांगेतील थंड वातावरण यामुळे कोणते सामान घ्यावे, किती घ्यावे आणि कोणते नाही हे सुचत नव्हते, मेंदू गारठला होता. अशावेळेला मित्रच कामाला येतात, शैलेश दादाने यात बरीच मदद केली. बॅगेचे वजन कमी कसे ठेवता येईल, कोणती वस्तू घेणे आवश्यक आहे ही सर्व माहिती त्याने दिली. शैलेश दादाला हिमाचल प्रदेशातील गिर्यारोहण प्रशिक्षणाचा अनुभव असल्या कारणाने त्याने दिलेली माहिती व सल्ले मोलाचे होते. वायफळ खर्च होऊनये म्हणून त्याने त्यांच्याकडचे बहुतेक ट्रेकिंगचे सामान मला दिले. तसेच रेल्वेवाले परब काकांनी त्यांचा पॉन्चो दिला, ज्यामुळे माझ्यासोबत माझी पूर्ण बॅग पण झाकली जात होती, त्यामुळे पावसात बॅगेतील सामान भिजण्याची चिंता मिटली. डिकॅथलॉनला जाऊन हेड टॉर्च, वूलन सॉक्स आणि ग्लोव्स खरेदी केले. २० मार्चला विजयने कॉल करून वयक्तिक माहिती घेतली आणि ट्रेन बुकिंग व उत्तराखंड टुरिझम बोर्डचे यात्रा रजिस्ट्रेशन पूर्ण केले. जसजशी तारीख जवळ येतहोती तसतशी उत्सुकता वाढत होती. एक महिना शिल्लक असताना संतोषराजने निराशाजनक माहिती दिली कि, अचानक वाढलेल्या कामाच्या व्यापामुळे त्याचे येणे रद्द होत आहे, इतकेच नव्हे तर विजयने सुद्धा धक्कादायक माहिती दिली होती ती म्हणजे हॅलिकॉप्टरचे बुकिंग फुल्ल झाले आहे, म्हणजे ग्रुप मधील वरिष्ठ नागरिकांना पालखी (डोली) हा एकच पर्याय उपलब्ध राहिला होता. गोष्टी इतक्यावरच थांबल्या नाहीत, २२ एप्रिलला झालेल्या दहशदवादी हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून ६ मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानी दहशदवादी ठिकाणांवर हल्ला केला आणि
अघोषित युद्धाला सुरवात झाली. जवळच्या लोकांनपैकी बरेचजण आपआपल्या परीने सल्ले देऊ लागले. "युद्ध सुरु आहे नका जाऊ, रिस्क नका घेऊ, वगैरे वगैरे", पण मी आणि अमेय आमच्या मताशी ठाम होतो, जोवर उत्तराखंड सरकार आणि ऑर्गनाईझर विजय सुतार "यात्रा रद्द" सांगत नाही तोवर आपण आपली तयारी चालू ठेवायची
"दि प्लॅन इस ऑन". देवाच्या आणि भारतीय सशस्त्र सेनेच्या कृपेने युद्ध थांबले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. 👉
पृष्ठाच्या सुरुवातीला जा
महत्वाच्या सूचना
- केदारनाथ ट्रेक करिता, बॅगेचे वजन जितके कमी ठेवता येईल तितके कमी ठेवावे. महत्वाची औषधे, थर्मल, रेनकोट, गरम जॅकेट, एक एक्सट्रा जोड कपडे (ड्राय फिट), अतिरिक्त मौजे, हेड टॉर्च, पॉवर बँक, इतके सामान पुरेसे आहे.
- महत्वाची औषधे जसे कि (ताप, सर्दी, उलटी व जुलाब यांच्यावरील औषधे आणि इलेक्ट्रॉल / एनर्झल पावडर) सोबत ठेवावीत.
- पालखी करिता सरकारी दर सकाळी ४ ते १० वाजेपर्यंत असतात, १० नंतर जास्तीचे दर आकारले जातात.
- केदारनाथ ट्रेक करिता, सोनप्रयागच्या पुढे गाडी घेऊनजाण्यास परवानगी नाही.
- गर्दी जास्त असल्यास, सोनप्रयागला रजिस्ट्रेशन तपासणी करिता रांगेत ३-४ तास लागू शकतात.
- गौरीकुंड ते केदारनाथ मंदिर ट्रेक करिता १० ते १२ तास लागतात, त्यानुसार तयारी करून जाणे.
- केदारनाथ ट्रेक मधील किलोमीटर फलकांवर विश्वास ठेऊ नये, सर्व किलोमीटर चुकीचे लिहलेले आहेत. गूगल बाबा सुद्धा चुकीचे किलोमीटर दाखवते २३ किलोमीटर ऐवजी १५ किलोमीटर दाखवते.
प्रवासवर्णन
दिवस पहिला
२१ मे चा दिवस उजाडला, पण माझी पहाट काही झाली नव्हती. एक आठवडा नाईट शिफ्ट केल्या असल्याने सायकल ब्रेक झाले नव्हते, अदल्यारात्री ४ वाजे पर्यंत घुबडासारखा जागा राहिलो होतो. आईने सकाळी ९:३० वाजता उठवले. फटाफट तयार झालो, आई वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि सकाळी ११:३० वाजता घरातून निघालो. ऑटो रिक्षाने गोरेगाव स्टेशनला पोहचलो आणि तेथून लोकल ट्रेन ने सुमारे दुपारी १२:२० ला बोरिवली स्थानकात पोहचलो. हरिद्वार सुपरफास्ट एक्सप्रेस ही ट्रेन बांद्रा टर्मिनसहून दुपारी १२:४५ ला सुटणार होती, एकूण १८ सदस्यांनपैकी १५ सदस्य बांद्रा टर्मिनस हुन ट्रेन मध्ये चढणार होते तर मी आणि अजून दोन सदस्य बोरिवली हुन ट्रेन पकडणार होतो. ट्रेनची वाट पाहत असताना, विजयला कॉल केला आणि बोगी नंबर व सीट नंबर विचारला तेव्हा कळले सीट्स कन्फर्म नाहीत, RAC आहेत. २५ तासांचा प्रवास RAC ने कसा करायचा हा विचार पडला होता, पण आता वेळ निघून गेली होती, जो होगा देखा जायेगा म्हणत मनाची तयारी केली. प्रवास म्हटलं की अश्या छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. ट्रेन दुपारी १ वाजून २५ मिनिटाला बोरिवली स्थानकात पोहचली आणि मी ट्रेन मध्ये चढलो व आमचा प्रवास हरिद्वारच्या दिशेने सुरु झाला. जवळ जवळ दीड वर्षांनी कौशलशी भेट झाली होती, त्याच्या सोबत बराचवेळ गप्पा मारत बसलो. अमेयच्या आई वडिलांशीही भेट पहिल्यांदाच झाली होती. बरेचसे सदस्य माझ्या करीत अनोळखी होते, वेगवेगळ्या बोगीत असल्या कारणाने त्यांच्याशी ओळख झाली न्हवती. सकाळी निघतेवेळीच जेवण करून गिघालो होतो, भूक लागली नसल्याकारणाने दुपारी ट्रेन मध्ये जेवलो नाही. काही वेळा नंतर काही सदस्य उनो खेळायला लागले, कौशल सोबतच्या गप्पा संपवल्या आणि आम्ही दोघे त्यांच्यासोबत उनो खेळायला सामील झालो. पहिल्यांदाच उनो खेळत असल्याने नियम कळत नव्हते आणि आपला गेम झाला, एकूण १२ पत्ते मला घ्यावे लागले. रात्री जेवणाकरिता, ट्रेन मधेच पुलाव मागवला तसेच कौशलने घरून भाजी चपाती आणली होती. माझी आवडती मटकीची भाजी आणली होती, मग काय २-३ चपात्या आणि भाजी घेतली त्याच्याकडून. विशेष म्हणजे कौशल कोल्हापूरचा, त्यामुळे जेवण तिखट असणे स्वाभाविकच, पण इथे मात्र उलट झाले भाजीची चव अस्सल कोकणी जशी आई बनवते तशीच. जेवण पूर्ण केले आणि पुन्हा उनो खेळायला सुरुवात केली. अशाप्रकारे उनो खेळता खेळता सर्वांशी ओळखही झाली आणि पहिला दिवस मावळला. रात्री झोपायची वेळ आली तेव्हा पुन्हा तोच प्रश्न उद्भवला, एका सीट वर दोन जण कसे मावणार? मग काय "
जिंदगीका दुसरा नाम एडजस्टमेन्ट" म्हणत झालो एका सीट वर दोघे एड्जस्ट. 👉
पृष्ठाच्या सुरुवातीला जा
दिवस दुसरा
सकाळी ७:०० वाजताच जाग आली, फ्रेश झालो आणि चहा प्यायलो. जबरदस्त भूक लागली होती, ट्रेन मध्ये नाश्ता घेऊन कोणीतरी फिरकेल असे वाटले होते, पण चहा आणि कोल्ड्रिंक्स वाल्या शिवाय कोणी आलेच नाही. फरिदाबाद स्टेशन व हजरत निजामुद्दीन जंक्शनला ट्रेन थांबली पण नाश्तावाला काही आला नाही. टपरी जंक्शनला तर गाडी २० मिनिटे थांबली, आम्ही प्लॅटफॉर्म वर उतरून कुठे काही नाष्टा मिळतो का पाहत टपरी जंक्शन वर छपरी सारखे फिरत होतो पण कोल्ड्रिंक आणि चिप्स सोडून दुसर काहीच सापडले नाही. एवढे दळिद्री जंक्शन पहिल्यांदाच पहिले होते. चिप्स आणि स्लाइस केक खाऊन पोटपूजा केली आणि पुन्हा उनो खेळण्यात व्यस्त झालो ते दुपारी २ वाजे पर्यंत. दुपारी २:३० ला गाडी हरिद्वारला ऑन टाइम पोहचली. ट्रेन ऑन टाइम पोहचलेली पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. आजवर भारतीय रेल्वेने कधीच वेळेवर पोहचवले नाही, हाच अनुभव होता. असो भारतीय रेल्वेत होणारी सुधारणा पाहून बरे वाटले (अच्छे दिन आगये 😜).
हरिद्वार स्थानका बाहेर आलो, ग्रुप फोटो काढले आणि गाडीत जाऊन बसलो. १८ सदस्यांसाठी ३ गाड्या होत्या, प्रत्येक गाडीत ६ जण, अशी व्यवस्तिथ व्यवस्था केली होती. हरिद्वार स्थानकाच्या काही अंतर पुढे आलो आणि खांड गाव जवळील "रसोई ढाबा" येथे दुपारी ३:१५ ला जेवायला थांबलो. कौशल आणि मी स्पेशल थाळी ऑर्डर केली होती, कॉन्टिटी किती असेल याचा काही अंदाज नव्हता. वेटर थाळी घेऊन आला, थाळीमधील ६ नान पाहून माझी हवाच गुल झाली, विजय आणि प्रसादला एक एक नान शेर करून कशीबशी थाळी संपवली. पोट गच्च भरल होत, तरी पण थाळीत असणाऱ्या गोंडस गुलाबजामसाठी पोटात छोटीशी जागा शिल्लक होती, तो फस्त केला आणि सायंकाळी ४:३० च्या दरम्यान प्रवास सुरु केला तो चंद्रपुरीच्या दिशेने.
 |
ग्रुप फोटो - हरिद्वार डावीकडून उजवीकडे पहिली लाईन - निशिकांत, मी, प्रदीप, अमेयचे वडील व आई, ज्योत्स्ना, स्नेहलची आई, स्नेहल, अभषेकची पत्नी. मागील लाईन - सागर, प्रज्वल, कौशल, अभिषेक, अमेय, प्रसाद, प्रणाली. |
उत्तराखंड सरकारने रस्ते मोठे व वेवस्तीथ बनवले असल्या कारणाने गाडी सुसाट पळत होती, "काय झाडी काय डोंगार" पाहत आमचा प्रवास चंद्रपुरीच्या दिशेने सुरु होता. सायंकाळी ६:४० च्या दरम्यान आम्ही "
देवप्रयागला" पोहचलो,
भागीरथी आणि अलकनंदा नद्यांचा संगम पाहिला. तेथील असणाऱ्या "
सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीने" माझे लक्ष वेधून घेतले. ड्राइवर कडून या विषयी थोडी माहिती घेतली. भागीरथी अलकनंदा नद्यांचा संगमाजवळ काही फोटो आणि सेल्फी काढले. सायंकाळी ७:१० ला पुन्हा प्रवास सुरूझाला चंद्रपुरीच्या दिशेने. आतापर्यंत साडेचार तासांचा प्रवास झाला होता, गाडीत बसून थोडी झोप काढली. सर्वांनाच चहाची तलब लागली होती. विजयने ड्रायव्हरला चहासाठी गाडी थांबवायला सांगितली. ड्राइवर काही गाडी थांबवत नव्हता, चायवाला थोडी दुरीपे है, अभि आया, असं करत अर्धा तास झाला पण चहा साठी काही गाडी थांबवत नव्हता. अखेरीस त्याला विचारले, आपक चाय वाला और कितना दूर है? त्याने हसत हसत सांगितले, "शेहर मी गाडी रोकूनगा तो ट्राफिक जॅम हो जायेगा". शेहर के बाहेर निकलतेही चाय के लिये गाडी रुकाताहू हू. अखेरीस आम्ही शहारा बाहेर आलो आणि ड्रायव्हरने गाडी चहा करीत रात्री ८:३० वाजता थांबवली. चहा पिऊन तरतरीत झालो, पाय मोकळे केले आणि ९:१५ वाजता चंद्रपुरीच्या दिशेने प्रस्थान केले. अंदाजे रात्री ११:०० वाजता आम्ही चंद्रपुरीला
"शिखर लॉज" ला पोहचलो. चेक इन केले, फ्रेश झालो आणि थोडी पोटपूजा करून घेतली. विजयने सर्वाना सकाळी ६:०० वाजता निघायचे आहे अशी सूचना दिली होती. झोपण्या आधी केदारनाथ ट्रेक साठी लागणाऱ्या सामानाची बॅग तयार करून ठेवली आणि सकाळी ४:३० चा गजर लावून झोपलो. 👉
पृष्ठाच्या सुरुवातीला जा
 |
| देवप्रयाग - भागीरथी आणि अलकनंदा संगम |
 |
| सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी - देवप्रयाग |
दिवस तिसरा
ज्या दिवसाची इतकी वर्ष प्रतीक्षा करत होतो, अखेर तो दिवस उजाडला २३ मे २०२५. सकाळी ४:३० चा गजर झाला आणि आम्ही तयारीला लागलो. २५ किलोमीटरचा ट्रेक आणि महादेवाचे दर्शन ह्या दोनच गोष्टी डोक्या घोळत होत्या. न्याहारी गौरीकुंडला जाऊन करायचे असे ठरवून, ठीक सकाळी ६:३० वाजता सोनप्रयागच्या दिशेने आम्ही निघालो. सुमारे ८:३० च्या दरम्यान आम्ही सोनप्रयागजवळ पोहचलो, ट्रॅफिक जॅम असल्या कारणाने, काही अंतर अलीकडेच गाडीतून उतरलो आणि चालायला सुरवात केली. (चार वर्षां पूर्वी थेट गौरीकुंडला गाडीने जाता येत होते, पण भाविकांची आणि पर्यटकांची वाढती गर्दी पाहता, उत्तराखंड सरकाने सोनप्रयागला चेकपॉईंट बनवून सर्व गाड्या तिथेच पार्क करायला सुरुवात केली आहे). काही अंतर पुढे चालत गेलो आणि रेजिस्ट्रेशन तपासणी करिता रांगेत उभे राहिलो. तब्बल तासाभरानंतर आमचा नंबर आला. सुरक्षारक्षकाने रेजिस्ट्रेशन फॉर्म वरील QR कोडे स्कॅन केला आणि पुढे जाण्यास परवानगी दिली.
आम्हाला वाटले, आता ट्रेक ला सुरुवात झाली, पण तस नव्हत. पुढे जाऊन अजून एका रांगेत उभे राहावे लागले, ते म्हणजे सोनप्रयाग ते गौरीकुंड शटल सेवा करिता. उत्तराखंड सरकारने गर्दीचे नियोजन करण्या करीत केलेले प्रयोजन. वासुकीगंगा नदीचा पूल ओलांडला आणि आम्ही टॅक्सी स्टॅन्ड जवळ पोहचलो. अंदाजे ४०-४५ मिनिटांनी आमचा नंबर आला. माणशी ५० रुपये देऊन आम्ही गौरीकुंड करिता निघालो. टीप: जोवर गाडीत दहा सदस्य होत नाहीत तोवर गाडी सोडत नाहीत. सोनप्रयाग टॅक्सी स्टॅन्ड ते गौरीकुंड ४.२ किलोमीटर अंतर आहे, रस्ता अरुंद असल्याकारणाने इथे सुद्धा ट्राफिक जॅम झाले होते. अखेर एक किलोमीटर आधीच गाडीतून उतरून पायी चालायला सुरवात केली.
 |
शटल करीत रांगेत उभे असताना - सोनप्रयाग
|
 |
शटल करीत रांगेत उभे असताना - सोनप्रयाग
|
काही अंतर पुढे चालत गेल्यावर, एका स्टॉल जवळ थांबुन न्ह्यारी केली. पोटपूजा करून पुढे निघालो आणि पुढे खेचरं (खच्चर) आणि पालखी (डोली) वाले भेटले. पालखीचे भाडे १५००० ऐकून पायाखालची जमीनच सरकली. पालखीच्या भाडे संदर्भात घासाघीस सुरु झाली, काही वेळ तिथे उभे राहिल्या वर, मी विजयला सांगितले कि आम्ही (मी, कौशल, प्रज्वल) पुढे जातो. आम्ही अंदाजे दुपारी १२:०० वाजता ट्रेकला सुरुवात केली होती.
टीप : पालखी (डोली) करीत सरकारी दर सकाळी ४ ते १० वाजपर्यंत असतात, १० नंतर खाजगी (जास्तीचे) दर आकारले जातात. वरिष्ठ नागरिकांना पालखी करून दिल्या शिवाय विजयला पुढे जाणे शक्य नव्हते, तसेच अमेयचे आई वडील सुद्धा पालखीने जाणार होते म्हणून दोघे पालखीची सोय होईपर्यंत मागेच थांबले. इतर मंडळी हळू हळू पुढे गेली. ट्रेकच्या सुरुवातीला सर्वजण चालत जाऊ असे एका सुरात बोलत होते. काही मंडळींनी २-३ किलोमीटर नंतरच हार मानली आणि गुपचप खेचरावर बसून पुढे निघून गेले 😆.
वाटेत भैरवनाथाचे मंदिर लागते, भैरवनाथाला नमस्कार करून आम्ही पुढे गेलो आणि काहीवेळ विश्रांतीकरिता थांबलो. आम्हाला वाटले होते विजय आणि अमेय आमच्या मागोमाग असतील, दोघांचा चालायचा वेग आणि स्टॅमिना पाहता ते आम्हाला गाठतील अशी आशंका होती. विजयला दुपारी १:५० ला कॉल केला तेव्हा कळले की, त्यांनी नुकताच ट्रेक चालू केला आहे. पालखीचे भाडे ठरवण्यात जवळ जवळ डिड तास वाया गेला होता. विश्रांती करून आम्ही पुढे प्रस्थान केले, अजून बराच पल्ला गाठायचा होता. पाण्याच्या बाटलीत पाणी काही राहत नव्हते, प्रत्येक बिसलरी बॉटल साठी ५० रुपये मोजावे लागत होते. बर्फ वितळून पर्वतावरून यणारे पाणी जागोजागी पाईप द्वारे सोडले होते. तेच पाणी बॉटल मध्ये भरून पिऊ लागलो, यामुळे दोन गोष्टी झाल्या पैसेही वाचले आणि प्लास्टिकचे प्रदूषणही टाळता आले. (हिमालयन वॉटर आम्ही फुकट मध्ये पीत होतो 😁).
अंदाजे आतापर्यंत ७ किलोमीटर चालणे झाले होते, दुपारचे ३:३० वाजले होते. विश्रांती साठी थांबलेलो असताना प्रज्वल आणि कौशल ने बॅगा पिट्टू (हमाल) कडे देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मनाविरुद्ध असला तरी, आता पर्याय नव्हता, शरीर खूप थकले होते. आम्ही तिघांनीही बॅगा पिट्टू कडे दिल्या आणि ट्रेक चालू ठेवला. पिट्टू आमच्या सोबतच चालत होता, आम्ही मात्र विश्रांती घेत फोटो काढत चालत होतो. त्यामुळे त्याला सुद्धा ओझं घेऊन आमच्या सोबत उभे राहावे लागत होते, म्हणून त्याच्या लिसेन्सचा फोटो घेतला, त्यात त्याचा फोन नंबर होता व त्याला पुढे निघून जायायला सांगितले. भीमबलीला पोहचल्यावर आम्ही जेवायचा निर्णय घेतला. सायंकाळी ४:०० ते ५:०० च्या दरम्यान जेवण पूर्ण करून पुन्हा ट्रेकला सुरवात केली. कौशलची भेट अमेय आणि विजयशी झाली, मी थोडा पुढे निघून गेलो असल्या कारणाने भेट झाली नव्हती, पण आम्ही सर्वजण जवळ पासच होतो, एकमेकांनमध्ये जास्त अंतर नव्हते. ८ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण झाला होता, आणि अजून १७ किलोमीटर बाकी होते. टीप : पायी मार्ग, खेचरं व पालखी मार्ग एकच असल्या कारणाने, खुप सावध राहावे लागते. खेचरं व पालखीची धडक झाल्यास गंभीर इजा होऊ शकते.
मंदाकिनी नदीवरील पूल ओलांडून पलीकडच्या पर्वताकडे गेलो. प्रज्वल जेवला नसल्या कारणाने त्याचा थकवा अजून वाढला होता, तो जागो जागी विश्रांती साठी थांबू लागला, या मुळे आमचा (कौशल आणि मी) सुद्धा वेग मंदावला. मागून विजय आणि अमेय येतच होते, म्हणून प्रज्वलला मागे सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मंदाकिनी नदी ओलांडल्या नंतरचा चढ हा तीव्र होता, त्यामुळे फारच दमछाक होत होती. कौशल आणि मी, आम्ही दोघ संगनमताने एक-एक टप्पा ठरवून तो पार झाल्यावरच विश्रांती साठी थांबत होतो. ह्या स्ट्रॅटेजिने आतापर्यन्त आम्ही १८ किलोमीटरच अंतर पूर्ण केल होत. जस जसे उंची गाठत होतो तस तशी थंडी वाढत होती, सूर्यनारायण सुद्धा मावळला होता. हाताची बोटे गारठली होती, आणि तेव्हा जॅकेटची आठवण झाली, पण जॅकेट तर बॅगेत होते आणि बॅग पिट्टू (हमाल) पुढे घेऊन गेला होता. पिट्टूला कॉल करून जिते असशील तिथे थांबायला सांगितले पण त्याने बरेच अंतर पार केल होत. सांगितल्या प्रमाणे तो थांबून राहिला. काही वेळांनी आम्हाला प्रज्वल खेचरावरून जाताना दिसला (त्याच्याकरिता हा योग्य निर्णय होता). अंदाजे आम्ही रात्री ८:३० च्या दरम्यान छोटी लींचोली येथे पोहचलो, तेथील एका स्टॉल वर चहा घेतला आणि पुन्हा पिट्टूला कॉल केला आणि त्याला त्याचे लोकेशन विचारले. त्याने विद्युत पोल क्रमांक ४०९ कडे यायला सांगितलं आम्ही विद्युत पोल क्रमांक ३९८ जवळ असल्या कारणाने, जास्त दूर नाही असे वाटत होते.
चहा पिऊन पुन्हा तरतरी व उर्जित होऊन निघालो पोल क्रमांक ४०९ च्या दिशेने, थंड वाऱ्याची छोटीशी झुळूक पण असह्य होती, कधी एकदा पिट्टू भेटतो आणि जॅकेट घेतो असे झाले होते. अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्या मुळे अजूनच काळजी पूर्वक चालावे लागत होते. वेळोवेळी अमेय आणि विजयला फोन लावून त्यांचे लोकेशन जाणून घेत होतो. अंदाजे तासाभराने ९:३० च्या दरम्यान आम्ही पोल क्रमांक ४०९ कडे पोहचलो आणि पिट्टूला भेटलो. सर्वात पहिले बॅगेतून जॅकेट काढले आणि अंगावर चडवले आणि मंदिराच्या दिशेने चालू लागलो. काही अंतर पुढे आल्यावर, तहान लागली म्हणून पाण्याची बाटली शोधू लागलो. हातात बाटली नव्हती, जॅकेट बॅगेतून काढण्याच्या नादात तिथेच विसरलो होतो. ह्या पाण्याच्या बाटलीची एक विशेष आठवण म्हणजे, नाशिकला मित्र वैभव सोबत फिरायला गेलो असते वेळी, चहाच्या टपरीवर हीच पाण्याची बाटली विसरलो होतो, मित्राने ती आणण्याकरिता ,गाडी ३ किलोमीटर मागे घेतली होती. टीप : जेव्हापण आपली बॅग दुसऱ्याकडे द्याल, तेव्हा महत्वाच्या वस्तू जसे की औषधे, रेनकोट, गरम कपडे आपल्या जवळ काडून घ्या, नाही तर फजिती होईल जसी माझी झाली 😅. पिट्टूवाल्याच्या चालण्याच्या वेगाला जुळवणे आमच्या साठी कठीण जात होते. वाटेत आम्हाला राहुल नायर आणि प्रदीप सिंगोदीया भेटले. राहुलला आमच्या पुढे पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला, राहुलचे अंदाजे वजन १०० किलो पेक्षा जास्त असावे आणि त्याच्या पाठीवरील बॅग १०-१२ किल वजनाची असावी एवढे वजन घेऊन तो ट्रेक करत होता! सलाम त्याच्या क्षमतेला आणि इच्छाशक्तीला 🫡 याच्याहून मोठा पराक्रम त्याने तुंगनाथ ट्रेकला केला, तो पुढे तुंगनाथ प्रवासवर्णाना वेळे सांगेनच. बराच उशीर झाला होता, पिट्टूच्या सोबतीने चालताना दमछाक होत होती, तो मात्र आमच्या बॅगा घेऊन भरा भरा चालत होता. खेचरांच्या पागेजवळ (पोनी कॅम्प) आम्ही पुन्हा विश्रांती साठी थांबलो, पिट्टूला मात्र आम्ही पुढे जाऊ दिले त्याला थांबवले नाही. पोनी कॅम्प जवळील एका फलकावर लिहिले होते, केदारनाथ मंदिर १.५ किलोमीटर. वाचून मनाला थोडा दिलासा मिळाला. पुन्हा चालायला सुरवात केली जेमतेम ५०० मीटर पुढे आल्यावर पुन्हा एक मैलाचा दगड दिसला त्यावर पन केदारनाथ मंदिर १.५ किलोमीटर लिहलेल पहिल आणि कळल कि आपल्या सोबत स्कॅम झालाय 😅.
शेवटची ४-५ किलोमीटर काही संपेनात, मंदिराचे शिखर दिसत होते पण रस्ता काही संपत नव्हता. चिकित्सालयाजवळ कौशल पुन्हा विश्रांती साठी बसला, यावेळी तो फार दमला होता. "थोडेच अंतर बाकी आहे, चल उठ" पण कौशल काही उठायला तयार नाही. अखेर कौशलने मला पुढेजाऊन पिट्टूला मोकळे करायला सांगितले. नाईलाजास्तव कौशलला मागे सोडले आणि पुढे जाऊन पिट्टूला गाठले. अखेरीस रात्री ११:३० वाजता मी लॉज वर पोहोचलो, पिट्टूला त्याचे पैसे दिले आणि मोकळे केले. पाठोपाठ कौशलही येत होता, त्याची भेट राहुलशी झाली, राहुलने त्याला उमेद दिली व मदद करून पुढे आणले. अश्या प्रकारे एक एक करून कौशल, अमेय, विजय, राहुल, प्रदीप लॉज वर पोहचले. १८ सदस्यांपैकी मागे राहिले होते एकूण ६ जण, त्यातील २ जण रात्री १२:३० च्या दरम्यान पोहचले पण ४ सदस्य यायचे बाकी होते ते लवकरच पोहचतील या आशेत सर्वजण होते. समूहातील ४ जण सोडले तर बाकी सर्वजण लॉज वर आराम करत होते. विजयने सर्वांना सूचित केले होते कि रात्री १ वाजता महादेवाच्या अभिषेकला जायचे आहे, पण मला काही थार होईना. अंदाजे रात्री १२:१५ च्या दरम्यान मी विजयला सांगून निघालो मंदिर पाहायला, सोबत समूहातील सदस्य जोत्स्ना सुद्धा आल्या. आई वडिलांना आणता आले नाही याची खंत होती, ती कमी करण्या करीत विडिओ कॉल द्वारे आई वडिलांना दर्शन घडवले. रात्री दिव्यांच्या रोषणाईत मंदिर पाहण्याची मजा औरच. महत्वाचे म्हणजे मंदिराच्या मागिलबाजूस असणाऱ्या पांढऱ्या शुभ्र हिमालयाच्या पर्वत रांगा रात्रीच्या अंधारात गुडूप झाल्या होत्या. मंदिराचे छान छान फोटो काढले आणि आम्ही लॉज वर परतलो, इतक्यात विजय ने सांगितले अभिषेकासाठी निघायचे आहे. रात्री १:३० वाजता आम्ही पुन्हा मंदिराजवळ आलो आणि अभिषेकाच्या रांगेत उभे राहिलो. यावेळी आमच्या समूहात आणखीन ४ सदस्य शामिल झाले, जे हेलिकॉप्टरने केदारनाथला आले होते.
 |
| श्री केदारनाथ मंदिर, रात्री दिव्यांच्या रोषणाईत |
 |
| श्री केदारनाथ मंदिर, रात्री दिव्यांच्या रोषणाईत |
अखेर तो क्षण आला! अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात आम्ही मंदिराच्या पूर्वेकडील द्वाराने नतमस्तक होत आत प्रवेश केला. मंदिराच्या सभामंडपात श्री कृष्ण व पांडवांच्या मुर्त्या आहेत (द्रौपदी, भीम, अर्जुन, युधिष्टिर). मूर्त्यांना तुपाचा लेप चढवलेला होता. सभामंडपाच्या छताच्या मध्यभागी सुंदर नक्षीदार दगडी कमळ कोरले आहे आहे आणि त्याला जोडून मोठा झुंबर लावला आहे. झुंबराच्या खाली नंदीमहाराज विराजमान आहे व त्याच्या बाजूला खंडित झालेले अमलक (मंदिराचे शिखर व कळस यांच्या मध्ये असणारी दगडी चक्र) ठेवले आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाज्याकडे (आतील बाजूस) श्री लक्ष्मी नारायण यांची मूर्ती ठेवली आहे, मुर्त्या पाहून कळते कि या एकविसाव्या दशकातल्या आहेत. अंतराळाच्या द्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत. आम्ही अंतराळात पोहचलो (सभामंडप व गर्भगृहाच्या मधील जागा), गर्भगृहाच्या द्वारपट्टीकेवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. नतमस्तक होत गर्भगृहात प्रवेश केला आणि केदारनाथ बाबाचे दर्शन झाले. गर्भगृहाच्या भिंती सोन्याच्या पत्र्यांनी सजवलेल्या आहेत व शिवलिंगाच्या चारही बाजू चांदीच्या पत्र्याने सजवलेल्या आहेत. शिवलिंगावर जलाभिषेक केला, दर्शन घेतले आणि मंदिरातून बाहेर आलो. (विशेष म्हणजे, जलाभिषेक केले केलेले, बाहेर जाण्याकरिता जागा व प्रणाला दिसले नाही, आम्ही गर्भगृहात पूर्ण प्रदक्षिणा करून बाहेर पडलो होतो, इत्तर शिवमंदिरात पूर्ण प्रदक्षिणा केली जात नाही).
भारतातील बहुतांश मंदिरे ही पूर्वाभिमुख आहेत व शिवलिंगावरील केलेले जलाभिषेकाचे जल मंदिराच्या दक्षिणेस प्राणालाद्वारे उदक कुंडात जमा होते. पण केदारनाथ मंदिर दक्षिणाभिमुख आहे व शिवलिंगावरील केलेले जलाभिषेकाचे जल दक्षिणेस, पण मंदिराच्या मागच्या बाजूस बाहेर पडून उदक कुंडात जमा होते. केदारनाथ मंदिर हे नागर शैलीत बनवलेले असून, दगड जोडण्या करिता इंटर लॉकिंग पद्धतीचा वापर केला गेला आहे ज्यात दोन दगड लोखंडी क्लॅम्प द्वारे जोडले जातात. केदारनाथ मंदिराच्या बाहेर पुरातन दगडी नंदी आहे, या शिवाय सभामंडपात पण छोटा दगडी नंदी स्थापित केलेला आहे, कदाचित बाहेरील पुरातन दगडी नंदी खंडित झाला असावा म्हणून सभामंडपात नवीन दगडी नंदी स्थापित केल्याची शक्यता आहे.
 |
| श्री केदारनाथ मंदिराचे शिखर |
 |
| श्री केदारनाथ मंदिर - सभामंडपातील झुंबर |
मंदिरा मागील भीम शिळा पाहायला जात असते वेळी पावसाला सुरवात झाली आणि आम्ही सर्वजण पळत लॉज वर आलो. पायाच्या दुखण्यामुळे अमेयच्या आईला चालणे कठीण जात होते त्यामुळे पूर्ण कुटुंब मागे राहील होत, हे ध्यानातच आले नाही. अंधारात लॉज कडे जाणारा रस्ता कोणता हे कळत नव्हते, म्हणून अमेयने फोने केला असता, एक जास्तीचा रेनकोट घेऊन खाली उतरलो व सर्वांना लॉजवर घेऊन आलो. या वेळी उर्वरित ४ सदस्यांपैकी २ सदस्य पोहचले होते व दर्शनाकरीत गेले होते. पावसाला सुरुवात झाली असल्या कारणाने उर्वरित दोन सदस्यांनी सर्वांचीच काळजी वाढवली होती. अंदाजे रात्री २:३० च्या दरम्यान दोघेही लॉज जवळ पोहचले, पुन्हा खाली उतरून त्यांना लॉजवर घेऊन आलो. आता मात्र भूक लागल्याचे जाणवले, पण लॉज वर आणलेले जेवण थंड गार झाले होते. समूहातील सदस्य निशिकांत थाली यांनी पुरणपोळी व ठेपले आणले होते, ते खाऊन पोटाला आधार दिला.
पुरणपोळी व ठेपल्यांकरिता निशिकांत थाली यांचे खुप खुप आभार! सकाळचा ७ चा गजर लावून, पुन्हा मंदिर पाहण्याची उत्सुकता पोटी बाळगून झोपी गेलो. 👉
पृष्ठाच्या सुरुवातीला जा
दिवस चौथा
सकाळी सातचा गजर झाला, थकवा फार असल्या कारणाने उठायला काही होईना. अखेरीस ७:३० च्या दरम्यान उठलो आणि फ्रेश झालो. कडाक्याची थंडी असल्या कारणाने अंघोळ करायची हिम्मत काही होईना. गरम पाणी होते पण ते फक्त वॉश बेसिनच्या नळाला, शॉवर मध्ये फक्त ५ मिनिटेच गरम पाणी येत होते 😄. विजयने सुद्धा अंघोळ न करण्याचा निर्णय घेतला त्याच्या पाठोपाठ सर्वांनीच या निर्णयाचे अनुसरण केले 😅. लॉजच्या खोली बाहेर आलो असता, समोरच हिरव्यागार पर्वतातून धबधबा कोसळताना पाहून "व्वाव" हे उद्गार तोंडी आले, इतक्या राहुल नायर याने मला थोडे पुढे येऊन उजवीकडे पाहायला सांगितले. सफेद शुभ्र हिमालयाच्या पर्वत रांगा पाहून "व्वाव" हे उद्गार "बिव्हटिफूल" मध्ये बदलले. अंदाजे सकाळी ८:३० वाजता आम्ही सर्वजण मंदिराजवळ पोहोचलो. केदारनाथ मंदिर आणि त्याच्या मागील हिमालयाच्या पर्वत रांगा, हे सुंदर दृश्य पाहताच राहाव असे वाटत होते. पुन्हा एकदा घरच्यांना व मित्रांना विडिओ कॉल केला. आदल्या रात्री उशिराने आलेले २ सदस्यांना विशेष पास द्वारे विजयने त्यांना दर्शना करिता पाठविले. ग्रुप फोटो व सेल्फी काढले आणि १ किलोमीटर चढाई करून भैरवनाथ मंदिराकडे पोहचलो.
 |
| श्री केदारनाथ मंदिर |
.jpeg) |
ग्रुप फोटो - डावीकडून उजवीकडे खाली बसलेले सदस्य - अमेय, विजय, जोत्स्ना, अभिषेकची पत्नी. उभे सदस्य - अभिषेक, कौशल, राहुल, प्रज्वल, निशिकांत, प्रदीप, मी, अमेयचे वडील व आई, स्नेहालची आई. |
भैरवनाथ म्हणजे या जागेचा रक्षण करणारा क्षेत्रपाल. (कांतारा चित्रपटाच्या शेवटच्या सीन मध्ये गावाच्या रक्षणा करिता क्षेत्रपाल प्रकट होताना दाखवले आहे तसेच काहीसे). भैरवनाथाचे दर्शन घेऊन आम्ही सर्व जवळील एका टेकडीवर जाऊन फोटो काढू लागलो. मनोसोक्त फोटो काढल्या वर मी आणि कौशल मंदिराजवळ आलो, मुख्य मंदिराच्या शेजारील अजून एक छोटे मंदिर आहे. हे मंदिर कोणाचे आहे हे पुजाऱ्याने सांगितले होते पण ते आता मला ज्ञात नाही. तेथून आम्ही दोघे भीम शिळा पाहण्याकरिता जात असताना प्रज्वलशी भेट झाली. त्यांनी आम्हाला सांगितले कि सर्वांनी भैरवनाथाच्या पायथ्याशी असणाऱ्या भंडाऱ्यात नाश्ता/जेवण केले, तुम्ही ही जाऊन या. सकाळी नाश्ता केला नव्हता, मग काय भीम शिळेकडे न जाता मागे वळलो आणि "बर्फानी सेवा समितीचा - अलवर भंडाऱ्यातील" प्रसाद ग्रहण करून सकाळचा नाश्ता केला आणि निघालो भीम शिळेच्या दिशेने.
.jpeg) |
| भैरवनाथ मंदिर |
 |
| भैरवनाथ मंदिरातील देवांची शिल्पे |
भीम शिळा! १६ जून २०१३ मधील प्राकृतिक आपदेवेळी मंदिराच्या मागील बाजूस एक मोठी शिळा चमत्कारी रित्या येऊन थांबली व मंदिराचे रक्षण झाले. ढगफुटीमुळे हिमनदीतून (ग्लेशियर) येणारा पाण्याचा व दगडांचा प्रवाह या भीम शिळे मुळे दुभाजित झाला व मंदिराचे रक्षण झाले. (देवावर विश्वास न ठेवणाऱ्यासाठी दैवी चमत्काराचे उदाहरण!). भीम शिळेचे फोटो काढले आणि निघालो जगदगुरु आदी शंकराचार्य यांच्या समाधी स्थळाकडे. मंदिरापासून २०० ते ३०० मीटर अंतरावरील हे समाधी स्थळ आहे. आदी शंकराचार्य यांनी केदारनाथ मंदिराच्या मागिलबाजूस समाधी घेतली असे मानले जाते. समाधीचे दर्शन घेतले आणि आम्ही दोघे निघालो लॉजच्या दिशेने, केदारनाथ मंदिराच्या समोर आलो आणि शेवटचा नमस्कार केला, पुन्हा कधी एयायला मिळेल ठाऊक नाही. डोळे पाणावले होते, स्वतःला आवरले आणि लॉजवर पोहचलो. सामानाची आवराआवर केली आणि आम्ही सर्व परतीच्या प्रवासाकरिता लॉज मधून बाहेर पडलो, जवळील एका रेस्टऑरेंत मध्ये नाश्ता केला. अमेयच्या आई वडिलांना पालखी करून देण्या करिता विजय, अमेय सोबत थांबला होता.
 |
| श्री केदारनाथ मंदिरामागील - भीम शिळा |
 |
| आदी शंकराचार्य समाधी स्मारक |
अंदाजे दुपारी १२:१५ ला मी आणि कौशल पुढे निघून उतरायला सुरवात केली. या वेळी मात्र आम्ही आमच्या बॅगा पिट्टू (हमाल) कडे दिल्या नाहीत. बऱ्या पैकी वेगाने आम्ही दोघे खाली उतरत होते, बॅगा जड असल्याने विश्रांती साठी वेळोवेळी थांबत होतो. उतरतेवेळी उजव्या पायाच्या बोटांना इजा झाल्याचे जाणवले, बोटांना फोड आल्याचा अंदाज होता, पण बुटे काडून पाहत बसलो तर वेळ वाया जाईल म्हणून तसाच चालत राहिलो. अवघ्या २ तासात आम्ही छोटी लींचोलीच्या पुढे पोहचलो. काही अंतर पुढे आल्यावर अचानक माझे दोन्ही पाय घसरले आणि धडाम कण पडलो 😐. नशीब बलवत्तर बॅग मोठी असल्या कारणाने बॅगेवर आपटलो, नाहीतर ढुंगणाचा खुर्दा झाला असता 😅. तेथील एका यात्रेकरूने मला उठायला मदद केली. कौशल फोन वर असल्या कारणाने याबद्द त्याला काहीच कल्पना नव्हती. मंदाकिनी नदीवरील पूल ओलांडण्या आधी आम्ही जेवायचा निर्णय घेतला, व तेथील एका ढाब्यामध्ये जाऊन बसलो. पराठ्याची ऑर्डर दिली होती, वाट पाहत असतानाच पावसाला जोरदार सुरुवात झाली. आमच्या कडे रेनकोट होते, तरीपण थोडे फार भिजायला होणार याची कल्पना होती. या थंड वातावरणात भिजल्याने तब्बेत बिघडण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळं पाऊसाचा जोर मंदावण्याची वाट पाहत बसलो होतो. इतक्या समूहातील सदस्य प्रसाद मुंडे याच्याशी भेट झाली. जवळ जवळ ४० मिनिटे प्रतिक्षे नंतर पावसाचा जोर मंदावला व आम्ही निघायचा निर्णय घेतला. कौशल, प्रसाद आणि मी आम्ही तिघई रेनकोट घालून निघालो व नथांबत चालत राहिलो, तासाभरात आम्ही जंगल छत्ती जवळ पोहचलो. तेथे थोडी विश्रांती घेतली आणि नंतर विश्रांती साठी थांबलो ते थेट भैरवनाथ मंदिराजवळ. अंदाजे सायंकाळी ६ वाजता आम्ही गौरीकुंडच्या प्रवेश कमानी जवळ पोहचलो. तेथे केदारनाथ मंदिराची प्रतिकृती असलेल्या छोटे लाकडी मंदिरे खरेदी केले आणि निघालो गौरीकुंडच्या दिशेने. अंदाजे सायंकाळी ६:४५ च्या दरम्यान आम्ही खाली पोहचलो (केदारनाथ मंदिर ते गौरीकुंड, खाली उतरायला आम्हाला ६:३० तास लागले).
अमेयला फोन केला असता त्याने सांगितले की तो स्वतः, विजय व जोत्स्ना ३ किलोमीटर दूर आहेत, म्हणून आम्ही त्यांची वाट पाहत थांबलो. त्या वेळेत आम्ही नाश्ता करून घेतला. नाश्ता करून झाल्यावर, ते सर्व कुठवर पोहचले आहेत याचा अंदाज घेण्या करीत अमेयला पुन्हा फोने केला, अमेयने सांगितलेकी तो अजून ३ किलोमीटर दूर आहे. एवढा वेळ झाला तरीपण तुम्ही ३ किलोमीटर दूर? असा प्रश्न विचारला असता, अमेयने किलोमीटर स्कॅमची आठवण करून दिली 😅. त्याचवेळी विजयने कौशलला फोन केला होता, म्हणून अमेयला सांगितले कि कौशल आणि प्रसाद माझ्यासोबत आहेत; हे ऐकून अमेय आणि विजयने सुटकेचा श्वास सोडला. प्रसाद माझ्या सोबत आहे याची त्यांना कल्पना नव्हती.अमेय व विजयला, प्रसाद न सांगता पुढे निघून आला होता. पण विजय व अमेयला वाटत होते की प्रसाद अजून मागेच आहे, म्हणून प्रसादाची प्रतीक्षा करण्यात त्यांचा वेळ वाया जात होता. विजयने आम्हाला पुढे जाण्यास सांगितले, कारण गौरीकुंड ते सोनप्रयाग शटल साठी मोठी रांग होती, तसेच समूहातील पुढे गेलेले ३ सदस्य सोनप्रयागला प्रतीक्षेत बसले होते. प्रत्येक ६ सदस्यांकरिता एक गाडी असल्या कारणाने एकूण ६ सदस्य झाल्या शिवाय गाडी निघणे शक्य नव्हते. आम्ही शटल करिता रांगेत उभे राहिलो, अवघ्या ३० मिनिटात आमचा नंबर आला आणि आम्ही शीतलने (जीप) सोनप्रयागला पोहचलो. सोनप्रयाग टॅक्सी स्टॅन्ड पासून आम्हाला अजून १ ते १.५ किलोमीटर पुढे चालत जायचे होते.
सोनप्रयाग पार्किंग एरिया जवळ पोलिसांनी लावलेले बॅरिकेड ओलांडून पुढे गेलो असता, प्रसाद मुंडे गुडूप झाला, त्याचा फोन त्याच्या जवळ नसल्याने त्याला शोधणे अजून अवघड झाले होते. तेथे दोन रस्ते असल्या कारणाने हा नक्की कोणत्या रस्त्याने पुढे गेला हे कळेना व आम्ही दोघे (कौशल आणि मी) नक्की योग्य रस्त्यावर चालत आहोत कि नाही हे ही कळेना. प्रसादची पत्नी (प्रणालीला) फोने करून विचारले असता, तो अजून पोहचला नसल्याचे कळले आणि आमची चिंता अजून वाढली. तेथील एका दुकानदाराला चंद्रपुरीला जाणारा रास्ता हाच का? विचारले असता, त्याने हा एकाच रास्ता चंद्रपुरीला जातो असे सांगितले. पुढे जाऊन विश्रांती करिता थांबलेलो असताना अचानक दूरहून आवाज आला, तो प्रसादच होता. साहेबांची भेट झाली आणि आम्ही निर्धास्त झालो. अंदाजे रात्री ९:३५ च्या दरम्यान आम्ही इतर ३ सदस्यांना भेटलो आणि गाडीने चंद्रपूरच्या दिशेने निघालो. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी दरड पडल्या असल्या कारणाने ट्राफिक जॅम झाले होते. तासाभराच्या रस्त्याला आम्हाला दोन तास लागले आणि आम्ही चंद्रपुरीला रात्री ११:५० ला शिखर लॉजवर पोहचलो.
लॉज वर पोहचलो खरे पण, ज्या रूम्स २२ तारखेला आम्हाला दिल्या होत्या त्या आता बदलल्या होत्या, त्यामुळं थोडा गोंधळ उधाला होता. विजयला फोने करून विचारले असता त्याने गौरव नेगीला विचार असे सांगितले आणि त्याच वेळी त्याने मला एक चिंताजनक माहिती सांगितली. त्याच्या सोबत असणाऱ्या सदस्यांना पैकी एक सदस्य रस्ता चुकला होता व त्याचा फोन त्याच्या जवळ नसल्याने त्याला शोधणे अवघड जात होते. अखेर १ तासानंतर ती व्यक्त सापडली, विजय आणि इतर ५ सदस्य रात्री २:३० ला लॉज वर पोहचले. वरील सांगितल्या प्रमाणे, उतरतेवेळी पायाला इजा झाल्याचे जाणवत होते. बूट काडून पहिले असता, अंदाज खरा ठरला होता, बोटांना फोड आले होते. शैलेश दादाला सायंकाळीच फोन लावून विचारे असता, त्याने सुरवातीला चार शब्द ऐकवले, कारण त्याने कॅन्डीड अँटी फुंगल पावडर आधीच पायाला लावायला सांगितली होती आणि ते मी करायला विसरलो होतो. दादाने पावडर लावून ठेवायला सांगितल्या प्रमाणे, पाय स्वच धुवून व सुकवून फोड आलेल्या जागी पावडर लावून ठेवली. तुंगनाथच्या ट्रेकला चालत येईल कि नाही याची शाश्वती नव्हती, आता ते सकाळी उठल्यावरच कळणार होते.
प्रवासाच्या योजनेनुसार आम्ही रात्री चोपटाला टेन्ट मध्ये राहणार होतो, पण अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांची गैरसोय होऊनये म्हणून ऑर्गनाईझर विजय सुतार व उत्तराखंडातील ऑर्गनाईझर गौरव नेगी यांनी सर्वांना लॉज वर थांबवण्याचा निर्णय घेतला. योग्य वेळी योग्य निरणाऱ्य घेण्या करिता दोघांचेही खुप खूप आभार.
अशाप्रकारे आमचा केदारनाथ ट्रेक व दर्शन पूर्ण झाले आणि आम्ही तुंगनाथ ट्रेक साठी सज्ज झालो.
खर्चाचा तपशील