प्रवासाची तारीख: १७ डिसेंबर २०२३
वाहतुकीची पद्धत: बस आणि बोट
किल्ल्यांचा इतिहास
1. पद्मदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये अरबी समुद्रातील बांधलेल्या सागरी किल्ल्यांपैकी एक. पद्मदुर्ग हा कासा (कासवाच्या आकाराचा) बेटावर बांधलेला असून, याचे बुरुज कमळाप्रमाणे दिसतात म्हणून याला पद्मदुर्ग असे नाव दिले. स्वराज्याचे आरमार हे नवखे असल्या कारणाने, अनुभवी आणि बलाढ्य सिद्दीच्या आरमाराशी समोर समोर युद्ध करणे अशक्य होते, तसेच जंजिरा काबीज करण्याचा प्रयत्न ही फसला होता. सिद्दीच्या समुद्धरी हालचालींनवर आळा घालयन्य करिता महाराज्यांनी जंजिरेकर सिद्दीच्या उरावर नवीन जंजिरा वसविला. २०१२ मध्ये स्वच्छता उपक्रमांदरम्यान, भारतीय पुरतत्व खात्यातील अधिकाऱ्यांना ऐतिहासिक मूल्याचे सुमारे २५० तोफगोळे सापडले. शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६७६ साली बांधला जेव्हा कोणतेही तंत्रज्ञान विकसित नव्हते, जसे आज आहे. किल्ला बांधताना अनेक वेळा शत्रूचे हल्ले झाले, सर्व हल्ले परतवून किल्ला उभा केला, आणि आज पुरावतत्व खाते, सोयसुविधांच्या अभाव असल्याचे कारण देत किल्ल्याची डागडुजी करणे टाळत आहे!
 |
किल्ले पद्मदुर्ग |
२. सामराजगड’ उर्फ ‘दंड-राजपुरी’ हा मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्याच्या नैऋत्येला एका टेकडीवर वसलेला आहे आणि प्रसिद्ध जंजिरा किल्ल्याजवळ आहे. शिवाजी महाराजांनी जंजिऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि जमिनीवरून त्याचा प्रवेश तोडण्यासाठी बांधला होता. जंजिर्यावरील हल्ल्यांसाठी मुख्य तळ म्हणून सामराजगडचा वापर केला गेला. जंजिरा सिद्दीच्या ताब्यात होता, हा किल्ला बांधण्यासाठी शिवाजी महाराजांनी व्यंकोजी दत्तो यांना पाठवले. सामराजगड हे जंजिर्याच्या अगदी जवळ असल्याने व्यंकोजीला संरक्षणासाठी मराठा सैनिकांची एक पलटण देण्यात आली. व्यंकोजीने सिद्दीच्या घोडदळांशी युद्ध केले आणि दंड-राजपुरीच्या आसपासचा प्रदेश काबीज केला. या युद्धात सुमारे ३०० हबशी मारले गेले. सिद्दीने युध्द करण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही.
राजापुरीजवळील टेकडीवर सामराजगड बांधला गेला. सामराजगडाच्या उभारणीमुळे सिद्दीसाठी मुरुडचा प्रवेश बंद झाला. आपल्या व्यापारी मार्गावरील हे बंधने दूर करण्यासाठी सिद्दीने सामराजगडावर हल्ला केला. त्याने लहान बोटींमध्ये सैनिक आणि तोफगोळे पाठवले. त्यांनी ताडाच्या झाडांना तोफ बांधून किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु झाडे कोसळली आणि हल्ला फसला. या अपयशानंतर सिद्दीने पुढील हल्ल्याची काळजीपूर्वक योजना केली. शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी रायगड सोडला होता. त्याआधी सिद्दीला सम्राजगड काबीज करायचा होता. दुसऱ्या हल्ल्याचे नेतृत्व सिद्दी खैरात आणि सिद्दी कासिम यांनी केले.
११ फेब्रुवारी १६७१ रोजी एका अंधाऱ्या रात्रीच्या आच्छादनाखाली सिद्दी खैरातने किल्ल्याच्या बाजूने ५०० हबशी सैनिकांसह हल्ला केला. त्या दिवशी होळीचा सण होता आणि मराठा सैनिक सन साजरा करण्यात दंग होते. तरीही त्यांनी प्रतिआक्रमण केले आणि सिद्दी खैरातचा चांगलाच सामना केला. दरम्यान, सिद्दी कासीम समुद्रमार्गे बोटीतून किल्ल्याजवळ आला होता. त्याने किल्ल्याच्या तटबंदीला शिडी आणि दोरी लावली. मराठा सैनिक सिद्दी खैरातशी लढण्यात व्यस्त असताना, सिद्दी कासिम आणि त्याचे सैनिक तटबंदीवर चढून किल्ल्यात घुसले. मराठा सैन्य चिमटित अडकले होते. प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी कडवी झुंज दिली. दारू कोठाराला आग लागली आणि स्फोट झाला आणि मराठ्यांची हार झाली. दोन्ही बाजूंचे शेकडो सैनिक मारले गेले. स्फोटाची बातमी ऐकून शिवाजी महाराजांनी आपले सैन्य पथक सामराजगडावर पाठवले. तोपर्यंत सम्राजगड मराठ्यांच्या हातून गेला होता. या पराभवामुळे शिवाजी महाराजांना जंजिर्यावरील आपला नियोजित हल्ला रद्द करावा लागला.
 |
किल्ले साम्राजगडावरील तळे |
3. रेवदंडा या ठिकाणचा इतिहास भगवान श्रीकृष्णाच्या प्राचीन पौराणिक काळापासूनचा आहे. पुराणकथेनुसार असे मानले जाते की संपूर्ण रेवदंडा परिसर प्राचीन "रेवतीक्षेत्र" होता, जिथे कृष्णाचा भाऊ बलराम यांची पत्नी रेवती राहत होती. ही जागा कृष्णाने रेवतीला तिच्या लग्नाच्या वेळी भेट म्हणून दिली होती. दुसरी कथा अशी आहे की राजा हंसध्वजाने अश्वमेध यज्ञाचा घोडा येथे थांबवला आणि रेवदंडाने त्याच्या आणि महान अर्जुनामध्ये हिंसक युद्ध पाहिले.
रेवदंडा हा चौल चाच एक भाग आहे, चौल हे अति प्राचीन बंदर, याला चंपावती या नावानेही ओळखले जायचे (चंपावती म्हणजे चाफ्याची भरपूर फुले असलेला प्रदेश). रोमन, चीन, ग्रीक, इजिप्त अश्या अनेक देश्यांशी व्यापार चौल बंदरावरून होत असे. चौल वर ताबा मिळवण्या करिता जागतिक पातळीवर युद्ध झाले होते, गुजरातचा सुलतान, इजिप्त चे नौदल आणि कालिकतचा राजा विरुद्ध पौर्तुगीज असे संयुक्त युद्ध झाले आणि यात पोर्तुगीजांचा पराभव झाला.
रेवदंडा किल्ला निर्मिती आधी येथे गुजरातच्या सुलतानाचे राज्य होते, १५२१ मध्ये पोर्तुगीज आणि सुलताना मध्ये झालेल्या तहा नंतर चौल हा प्रोतुगीजांच्या ताब्यात गेले. १५२१ मध्ये पोर्तुगीजांनी कुंडलिका नदीच्या मुखावर, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर रेवदंडा किल्ला बांधायला सुरवात केली आणि त्याच वर्षी किल्ला बांधून पूर्ण झाला.
त्यावेळच्या अनेक बलाढ्य शासकांनी किल्ल्याला वेढा घातला होता, पण त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. १६३६ - १६८३ या कालावधीत आंग्रे राज्यकर्त्यांनी किल्ला ताब्यात घेण्याचा वारंवार प्रयत्न केला आणि १७३६ मध्ये मराठ्यांनीही प्रयत्न केले. १७४० मध्ये पोर्तुगीजांनी केलेल्या करारानुसार रेवदंडा किल्ल्यासह मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. १८१८ मधे, रेवदंडा किल्ला ब्रिटिश राजवटीत गेला.
 |
किल्ले रेवदंड्याची तटबंदी |
प्रवास आणि ट्रेकचा अनुभव
साधारणपणे आम्ही आमच्या सहलींचे नियोजन स्वतःच आखतो, पण पद्मदुर्ग सागरी किल्ल्याला असल्याने बोटीने जावे लागते, बोटीचे शुल्क जास्त असल्याने, मोठ्या समूहात जाणे आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर ठरते, म्हणून आम्ही "डोंगर यात्रा" या प्रवास आणि ट्रेकिंग ग्रुपमध्ये सहभागी झालो. प्रति व्यक्ती १७०० खर्च येणार होता ज्यात पद्मदुर्ग, सामराजगड आणि रेवदंडा किल्ले पाहणी, नाश्ता आणि जेवणाचा समावेश होता. मी आणि माझे दोन मित्र विनायक आणि अमेय तिघांनी जाण्याचे निश्चित करून आम्ही आमच्या जागा आरक्षित केल्या. "डोंगर यात्रा" ने टेम्पो ट्रॅव्हलरची व्यवस्था केली होती जी रात्री १०:०० वाजता १६ डिसेंबर २०२३ रोजी दादर हुन निघणार होती, सानपाडा, चेंबूर, नेरूळ, कामोठे इत्यादी अनेक पिकअप पॉइंट होते. सानपाडा हे विनायकसाठी जवळचे स्थानक होते तर नेरूळ हे अमेयसाठी सर्वात जवळचे स्थानक होते म्हणून त्यांनी त्यानुसार बसमध्ये चढण्याचा निर्णय घेतला आणि मी सुरुवातीच्या ठिकाणाहून दादर ला बसमध्ये चढण्याचे ठरविले.
१६ डिसेंबरला मी दादरला पोहोचलो जिथे ट्रेक लीडर स्नेहा आणि इतर सहभागी आधीच उपस्थित होते. इतर सहभागींची वाट पाहत असताना, सुमारे रात्रि ९:४५ ला, मला विनायकचा फोन आला की तो ठाणे रेल्वे स्थानकावर आहे आणि हार्बर मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मी ट्रेक लीडरला कळवले आणि तिने फास्ट ट्रेनने दादरला येण्याचा सल्ला दिला, विनायक रात्री १०:२५ च्या सुमारास दादरला पोहोचला. रात्री १०:३० च्या सुमारास आम्ही प्रवासाला सुरुवात केली. अमेयने त्याचे सध्याचे लोकेशन शेअर केले, पण जेव्हा आम्ही नेरुळ एल. पी. ला पोहोचलो तेव्हा बस ड्रायव्हरने फ्लायओव्हरचा रस्ता धरला आणि आम्ही ३ किमी पुढे पोहोचलो. आम्हाला निघायला आधीच ३० मिनिटे उशीर झाला होता आणि आता पुन्हा सुमारे ३० मिनिटे थांबावे लागणार होते. द्रुतगति मार्ग असल्या कोणती ही वाहने थांबत नव्हती, ३ किलोमीटर पायी चालत येण्या पलीकडे पर्यां नव्हता, तो ३ किलोमीटर चालत रात्रि १:०० च्या सुमारास बस जवळ पहोचला. आम्ही पुढे निघालो आणि कामोठे येथे आणखी एक टीम लीडर विकास दुतल आमच्यात सामील झाला.
पहाटे ५:०० च्या सुमारास आम्ही मुरुड समुद्रकिनारी पोहोचलो, बसमध्ये विसावलो आणि ७:०० च्या सुमारास "पानवलकर खानावळ" नावाच्या जवळच्या खानावळीत नाश्ता करायला निघालो. नाश्त्याला "कांदे पोहे आणि चहा" होता, चविष्ट कांदे पोह्यांवर ताव मारून झाल्यावर आम्ही पुन्हा बस जवळ परतलो. टीम लीडर विकासने सहभागींना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या त्यानंतर आम्ही सर्वांनी आपली ओळख करून दिली आणि समुद्रकिनाऱ्यावर निघालो. सर्वजण पद्मदुर्ग किल्ल्यासाठी उत्सुक होते, पण बोट मालकाशी संपर्क होत नव्हता, अखेरीस बोट मालकाशी संपर्क झाला आणि ८:४० च्या सुमारास बोट आली. आम्ही आमचे शूज काढले आणि आमची जीन्स ओली होऊ नये म्हणून दुमडली तसेच बोटीला धक्का देऊन बोट वळवण्यास खलाशीला मदत केली, त्यानंतर आम्ही सकाळी ८:५५ च्या सुमारास बोटीमध्ये बसलो आणि पद्मदुर्ग किल्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.
 |
| मुरड समुद्र किनारा |
 |
| किल्ले पद्मदुर्ग |
जसजसे पुढे जात होतो तसतसा किल्ला जवळ येत होता आणि पद्मदुर्ग किल्याचे आकर्षण अधिक वाढत होते. सगळ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, १० मिनिटात आम्ही गडाच्या किनारी पोहोचलो. आम्ही बोटीतून गुडघाभर पाण्यात उतरलो होतो. खडकांवर शेवाळ असल्या कारणाने निसरडे झाले होते, तसेच खडकांवर तयार झालेल्या कालव्यांमुळे अजूनच सावध पणे चालावे लागत होते. चुकून जरी तोल गेला आणि कालव्यांवर पडलो तर वस्तर्या प्रमाणे शरीरावर घाव होणार हे निश्चित होते. आम्ही सर्व काळजीपूर्वक खडकांवरून चालत कोरड्या जागी पोहोचलो. आम्ही शूज घातले आणि किल्ला पाहू लागलो. टीम लीडर विकास याने किल्ल्याची रचना समजावून सांगायला सुरुवात केली आणि एका ठिकाणी त्याने बोट दाखवून सांगितले "चमत्कार/इंजिनियरिंग मार्वल" सुरुवातीला आम्हाला, त्याला काय म्हणायचे आहे ते समजले नाही, परंतु लवकरच त्याने स्पष्ट केले की, किल्ला ३५० ते ४०० वर्षांपूर्वी बांधला होता, आजवर समुद्राच्या लाटा त्यावर धडकत आहेत, या लाटांच्या धडकाने, तटातील दगडांची झीज झाली, पण दोन दगडांना जोडणाऱ्या पदार्थावर मात्र काहीच परिणाम झाला नाही, ते जसेच्या तशेच आहे! म्हणजेच ३५० ते ४०० वर्षांपूर्वी उत्कुष्ट दर्जाचे दगडांना जोडणारे पदार्थ (बॉण्डिंग मटेरियल) तयार केलं जायायचे. आजच्या पिडीला मात्र ते अवगत नाही!
 |
प्रचीन तंत्रज्ञानाचा चमत्कार, समुद्री लाटांचा माऱ्याने दगडाची झीज झाली पण बॉण्डिंग मटेरियल वर कोणताही परिणाम झाला नाही |
आम्ही पुढे गेलो आणि प्रथम, "पडकोट" पाहायला सुरवात केली, कस्टम आणि पुरातत्व विभागाच्या निष्काळजीपणामुळे तटबंदी ढासळली आहे, तसेच अनेक प्राचीन तोफा जमिनीवर तुटलेल्या अवस्तेत पाहून दुःख झाले. तोफा उचलून चांगल्या जागी ठेवावे वर इतर काही दुरुस्तीचे काम करायचे तर पुरातत्व विभागाची परवानगी लागते, नाहीतर दंडात्मक कार्यवाही ला सामोरे जावे लागते. पुरातत्व विभाग स्वत काही करत नाही आणि दुसऱ्यांना काही करू देत नाही. पडकोट पाहून झाल्यावर आम्ही मुख्य दरवाजातून गडाच्या आत जायचे ठरवले, प्रत्येक पायरी चढताना माझी छाती अभिमानाने फुलून गेली. नतमस्तक होत किल्ल्याच्या आत गेल्यावर डावीकडे काही अवशेषांनी आमचे लक्ष वेधून घेतले, ह्या वास्तू म्हणजे घोड्यांच्या पागा असे काही संकेतस्थळांवर नमूद केले आहे, पण सागरी किल्ल्यावर घोड्यांचा उपयोग काय? त्या संरचना सैनिकांच्या खोल्यांसारख्या आहेत किंवा इतर कारणांसाठी वापरल्या जाऊ शकतात परंतु घोड्यांची पागा नाहीत हे निश्चित, असे टीम लीडर विकास दूतल याने ठामपणे सांगितले. आम्ही पुढे सरकलो आणि कंडेश्वरी देवीच्या मंदिरात पोहोचलो, देवीचे मंदिर हे भग्न अवस्तेत आहे, व मंदिरात देवीची मूर्ती नाही. स्थानिकांनीं एका पाषाणावर देवीचे चित्र काढलेले आहे. मंदिर पाहून झाल्यावर आमच्या निदर्शनास सिमेंटचा लेप असलेली काही खोलीसारखी रचना दिसली; टीम लीडरने आम्हाला सांगितले की ही वास्तू कस्टम अधिकाऱ्यांनी बांधली आहे कारण हा किल्ला पूर्वी कस्टम अधिकाऱ्यांच्या वापरात होता. पुढे निघालो आणि कातळात बांधलेली पाण्याची मोठी टाकी समोर दिसली, सध्या पाणी पिण्यायोग्य नाही, पण सुरुवातीच्या काळात गडावर पाण्याचा स्रोत किंवा विहीर नसल्याने पावसाचे पाणी साठवून ते वर्षभर वापरायचे.

|
| पद्मदुर्ग केल्या वरील अवशेष व पाण्याचे टाके |
 |
| कंडेश्वरी देवीचे पडके मंदिर |
आम्ही पुढे निघालो आणि तटबंदीच्या पायऱ्या चढून तटबंदीवर चालू लागलो. ही लादनि (भिंत) साधारण ४ ते ५ फूट रुंद आहे. तटबंदीवरून जंजिरा किल्ला दिसतो, किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी बुरुजावर अनेक तोफा आहेत, पण त्यातली एक तोफ हे तोफगाड्यावर ठेवल्या मुळे आकर्षक दिसते. मार जंग्यातून पहिले तर, जणू ही तोफ जंजिऱ्यावर निशाणा साधत आहे असे भासते! तसेच गडावर प्राचीन "सौच कुप" (प्रसाधनगृहांची) व्यवस्था पाहावयास मिळते. काही ज्ञानी लोकांच्या म्हणण्या नुसार प्रसाधन गृहाची पद्धत ही इंग्रजांनी भारतात आणली, पण हे सपशेल खोटे आहे, याला इंग्रजांचे उदादिकारण करणे असे म्हणणे योग्य ठरेल. मराठ्यांच्या गडकिल्ल्यांवर विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज्यांनी बांधलेल्या किल्ल्यांवर प्रसाधन गृहाची वेवस्था प्रामुख्याने पाहायला मिळते. म्हणजे ३५० ते ४०० वर्षां पूर्वी मल निसरा योग्य पद्धतीने केला जात असे, आणि आज भारत सरकार ला या साठी योजना आखाव्या लागत आहेत! प्रातरविधींसाठी टॉयलेट चा वापर करा, उघड्यावर बसू नका वगैरे हे जाणतेला सांगावे लागते हे भारताचे दुर्दैव!
आमचा किल्ला पाहण्यात आणि प्राचीन बांधकाम व तंत्रज्ञानावर चर्चा करण्यात सुमारे ९० मिनिटे कशी गेली हे कळलेच नाही. परतीच्या प्रवासासाठी तीच बोट गडाच्या किनारी उभी होती, सर्वांना बोलावणे आले, आम्हाला गडावर अजून वेळ घालवायचा होता, पण अजून दोन किल्ले बघायचे होते म्हणून आम्ही बोटीत बसलो आणि १० मिनिटात सकाळी १०:४० च्या सुमारास समुद्र किनारी पोहोचलो.
 |
पदमदुर्ग गडावरील काही वास्तू
|
 |
पदमदुर्ग गडावरील तोफ आणि जंजिरा किल्ला
|
समुद्र किनाऱ्यावर पे अँड यूज टॉयलेट उपलब्ध असल्याने तिथे फ्रेश झालो आणि सामराजगड ट्रेकसाठी सज्ज झालो. एक आश्चर्यकारक गोष्ट आम्ही पाहिली, स्थानिक लोकांना सामराजगड विषयी काहीच माहित नाही ! आम्ही बसमध्ये चढलो आणि सामराजगडासाठी निघालो, गुगल मॅपच्या मदतीने आम्ही सामराजगडाच्या पायथ्याशी पोहोचलो, शिवमंदिराच्या बाजूने साम्राजगडाकडे वाट जाते हे ठाऊक होते, म्हणून आम्ही स्थानीकांना शिवमंदिराची वाट विचारली, त्यांनी जी वाट दाखवली त्या वाटेने आम्ही काही अंतर पुढे गेलो व ती पायवाट पुसत होऊ लागली, अंदाज आला होता कि आम्ही वाट चुलको आहे तसेच स्थानिकांनी ही आमची दिशा भूल केली होती. टीम लीडर विकास ने सर्वाना जिते आहेत तिथे थांबायला सांगितले आणि ते योग्य रस्ता शोधण्या करीत पुढे गेले, काही वेळाने समूहातील एकाला योग्य रस्ता सापडला व आम्ही सर्व त्या शिवमंदिर पाशी पोहचलो, फोन करून विकासलाही कळविले होते. गडावर किव्हा गडाच्या पायथ्याशी कोणती ही मार्ग दर्शिका लावलेली नाही, त्या मुळे वाट चुकणे स्वाभाविक होते.
 |
| साम्राजगाच्या पायथ्याशी पूर्वेकडील बाजूस नवी बनविलेल्या पायऱ्या |
 |
| साम्राजगडावरी एका वास्तूच्या खांबांचा अवशेष |
टेकडीची उंची जास्त नव्हती, पण दुपारची वेळ होती, त्यामुळे जरा दमलो होतो. २० मिनिटात आम्ही गडाच्या तटबंदी जवळ पोहोचलो, गडावरील आणखी अवशेष शोधण्याचा प्रयत्न केला, पण काहीही मिळाले नाही. खात्रीशीर सांगता येत नाही पण पुरातत्व विभागाने उत्खनन केले तर अवशेष सापडतील. येथे फक्त तटबंदी, ध्वजस्तंभ आणि मंदिराचा एक तुटलेला खांब उपलब्ध आहे. पुरातत्व विभागाने उत्खनन कार्य केले तर आणखी अवशेष सापडतील आणि किल्ल्याचा अधिक इतिहास जाणून घेण्यास मदत होईल. आम्ही सर्वजण तटबंदीवर बसलो आणि टीम लीडर विकास ने, सिद्धी आणि मराठा यांच्यातील ऐतिहासिक लढायांसह किल्ल्याची माहिती दिली. किल्ल्या विषयी माहिती ऐकून झाल्यावर आम्ही गड उताराला सुरवात केली, प्रचंड भूक लागली होती.
आम्ही गड उतरून बसमध्ये चढलो आणि "पानवलकर खानावळ" ला जेवायला गेलो. व्हेज आणि नॉनव्हेज लंचचा पर्याय होता, आम्ही व्हेज लंचची ऑर्डर दिली, स्वादिष्ट भोजन करून झाल्यावर आम्ही विकास बरोबर चर्चा करून सोलकडी मागवली, एक एक प्याला सोलकडी पियुन आम्ही तृप्त झालो आणि रेवदंड्या किल्ला पाहण्यासाठी सज्ज झालो. दुपारी दीडच्या सुमारास आम्ही रेवदंडा किल्ल्याकडे निघालो आणि ९० मिनिटात दुपारी ३:०० वा. आम्ही रेवदंडा किल्ल्यावर पोहोचलो, तिथे टीम लीडरने बस पार्किंगसाठी १५० रुपये दिले. आम्ही आवारात प्रवेश केला आणि चार मजली इमारतींच्या अवशेषांनी आमचे लक्ष वेधून घेतले. इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी टीम लीडर विकासने आम्हाला किल्ल्याचा इतिहास आणि महत्त्व सांगितले. इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर जुन्या तोफा ठेवल्या आहेत, तोफा चांगल्या स्थितीत आहेत. आम्ही इमारती मध्ये शिरलो पण इमारत पूर्णपणे पोकळ होती, इमारतीच्या वरच्या मजल्यावर मधमाश्याचे पोळे होते, त्यामुळे त्यांना त्रास न देता आम्ही बाहेर पडलो. एक ग्रुप फोटो काढला आणि सर्व जण रेवदंडा समुद्र किनारी गेलो, समुद्र किनारा सुंदर आणि स्वच्छ आहे. आम्ही समुद्रकिनाऱ्यावर थोडा वेळ घालवला आणि समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना तटबंदीवरील "शरब" या पौराणिक प्राण्याचे शिल्प निदर्शनास पडले. सहसा, हे शिल्प पोर्तुगीज किल्ल्यांवर पाहावयास मिळत नाही, तर हे शीलप हिंदू किल्ल्यावर पाहिले जाते. १७४० मध्ये मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला तेव्हा हे शिल्प तटबंदी वर लावले असावे असा अंदाज आहे.
 |
| रेवदंडा गडावरील चार मजली इमारत |
 |
रेवदंडा गडावरील चार मजली इमारतीतील आतील बाजू
|
 |
| रेवदंडा गडाच्या तटबंदीवर शरबाचे शिल्प |
समुद्रकिनाऱ्यावर थोडा वेळ घालवल्यानंतर आणखी एक सुंदर ग्रुप फोटो काढला व सायंकाळी ५:०० च्या सुमारास आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. परतताना चहासाठी मुंबई-गोवा महामार्गावर ३० मिनिटांचा थांबा घेतला आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरवात केली. प्रत्येक सदस्याला त्यांच्या जवळच्या रेलवे स्थानकाजवळ सोडत आम्ही रात्री १०:०० च्या सुमारास दादर स्टेशनवर पोहोचलो.
सुंदर आणि अविस्मरणीय सहलीसाठी "डोंगर यात्रा" ग्रुपचे आभार आणि किल्ल्यांबद्दल अमूल्य माहिती दिल्याबद्दल टीम लीडर विकास दुतल यांचे विशेष आभार!
 |
पद्मदुर्गाचे प्रवेश द्वार
|
 |
| पद्मदुर्गावरील ग्रुप फोटो |
 |
| शिवमंदिर जिथून साम्राजगडाकडे वाट जाते |
 |
| रेवदंड्यावरील ग्रुप फोटो |
 |
| ग्रुप फोटो |
 |
| ग्रुप फोटो |